-मुग्धा कर्णिक
बाबासाहेब आंबेडकरांचा १२८वा जयंती दिन पार पडला. त्यांनी समाजासमोर ठेवलेले जातीअंताचे लक्ष्य अजूनही विंधले गेलेले नाही. जातीचा कलंक नष्ट होण्याऐवजी आपल्या समाजावर अधिक ठळक झाल्यासारखा निदान काही कप्प्यांत तर नक्कीच दिसतो.
तरीही या वर्षीचा ५ फेब्रुवारी हा दिवस देशाच्या इतिहासात एक महत्त्वाचा दिवस ठरेल. जातीव्यवस्था कशी महत्त्वाची, कशी सोयीची हे सांगणाऱ्यांच्या, जातीच्या पोकळ अस्मिता जपणाऱ्यांच्या ये देशात एका तरूण मुलीने हट्टाने पाठपुरावा करून मी कोणत्याही जात आणि धर्माची नाही असे नजात प्रमाणपत्र तहसीलदाराकडून मिळवले. स्नेहा या तामिळनाडूच्या वकीली व्यवसायातील तरुणीने असे प्रमाणपत्र देशात प्रथमच मिळवले. आजवर तिचे आईवडील आणि ती नेहमीच सरकारी अर्जांत आपल्या जातीचा, धर्माचा रकाना रिकामा ठेवत आले होते. आणि आता तिने एक पुढचे पाऊल टाकले. या पावलाचे पुढे काय परिणाम होतील फार जास्त आशा बाळगण्यात अर्थ नाही. तरीही तिने हे कागदोपत्री करून घेतले हे कौतुकास्पद आहे.
आपल्याला माहीत असेल, जात न पाळणारा एक पंथ १९२०च्या दशकात महाराष्ट्रातही उदयाला आला होता. तो स्थापन करणाऱ्या गणपती महाराज यांच्या पतवंडांपर्यंत हा पंथ टिकला. पण सुरुवातीच्या दोनतीन दशकांत ही चळवळ प्रभावी होती तरीही नंतर मात्र पुन्हा जातीच्या प्रश्नांवरूनच अनेक अनुयायी सोडून गेले. साठहजारच्या वर अजातीय मानव संस्थेचे अनुयायी होते. आज ती संख्या जमतेम शंभर आहे. चळवळ जोरात असतानाच स्थानिक उच्चवर्णीयांनी गणपती महाराजांवर खटले टाकले. वकील बहुतांशी ब्राह्मण उच्चवर्णीयच असल्यामुळे त्यांना वकील मिळाले नाहीत. यानंतर तर त्या पंथांच्या लोकांच्या जातीची नोंदणी अजात म्हणून करायला सुरुवात झाली होती. हेतूचा पराभव कसा करावा याचे बोलके उदाहरण. या पंथाच्या लोकांना जात प्रमाणपत्र नाही म्हणून निवडणुका लढवायचीही संधी मिळत नव्हती, शिक्षणासाठी प्रवेश घेण्यात लोक अडचणी उभ्या करीत होते. या पंथाची नोंद घेऊन त्यांना सरकारी मदत मिळावी म्हणून एक अधिकारी धडपड करीत होते. जयदीप हर्डीकर या पत्रकाराने या पंथावर एक उत्तम वृत्तलेख लिहिला. त्यानंतर या धडपडीला वेग आला. पण ते अधिकारी निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या सर्व कामावर पाणी फिरवणे सोपेच होते. दोनतीन वर्षांपूर्वी या विषयावर एक माहितीपट निघाला आणि त्याचे जगभरात कौतुकही झाले. पण म्हणून इथे भारतात तो लोकांना दाखवला जाण्याची आस कुणीच दाखवली नाही.
जात ही भारतीय हिंदूंच्याच नव्हे तर बाटल्यामुळे धर्म बदललेल्या मुस्लिमांच्या आणि ख्रिश्चनांच्याही मनातून जात नसते. आम्ही मूळचे अमक्या जातीचे होतो, ते अमक्या म्हणजे खालच्या जातीचे असले मुद्दे काढून मुस्लिम कुटुंबांत, ख्रिश्चन कुटुंबात भांडणे झाल्याचे माहीत आहे. गेल्या पन्नास वर्षांत खाण्यापिण्यावरचे निर्बंध थोडे कमी झाले. नागरीकरणाच्या रेट्यामुळे अन्न शिजवणारा नि वाढणारा कोण हे कळायला मार्गही राहिले नाहीत आणि तेवढीशी फिकीरही राहिली नाही. पण लग्नसंबंध जोडताना मात्र जातीची हरामी चौकट लोक जिवापाड सांभाळताना दिसतात. सांस्कृतिक सारखेपणा महत्त्वाचा आहे असे गोंडस कारण देऊन, किंवा परंपरेचे रक्षण म्हणून किंवा… काय करणार आईवडिलांचं मन मोडता येत नाही अशी पुळचट कारणे देऊन लग्नाच्या वेळी शक्यतो जातीतलीच, फार तर पोटजातीतील संबंध शोधला जातो.
गुजरातमधून एक विनोदी बातमी गेल्याच आठवड्यात वाचली. एकंदर दहा हजार तरुण तरुणींना आईवडिलांच्या मनाविरुद्ध प्रेम विवाह करणार नाही अशी शपथ देववण्यात आली. या मनाविरुद्ध प्रेमविवाह प्रकरणात सर्वात महत्त्वाचं असतं ते प्रेम जातीबाहेरचं असणं. त्यानंतर मग लायकी, आर्थिक मत्ता वगैरे प्रश्न येतात. अगदी उत्तम आर्थिक परिस्थितीतले असले तरीही जातीबाहेरचे संबंधी करून घेणं लोकांना अगदी जीव द्यावा इतके नकोसे वाटतात. त्यातून भरपूर मेलोड्रामा आणि मनस्ताप- क्वचित खूनखराबाही केला जातो हे या देशातले वास्तव आहे.
बहुतांश भारतीयांच्या मनात मुरलेला जातीयवाद हा जरासा बोथटल्यासारखा वाटू शकतो. पण हे सारे छोट्याछोट्या कप्प्यांमधूनच चालते. त्यामुळेच कर्नाटकमधल्या एका गावात अजूनही गेल्या शतकातील परंपरेनुसार अस्पृश्यता पाळली जाते हे वाचून फारसे आश्चर्य वाटायचे कारण नाही. आपण ज्या शहरी कप्प्यात जगतो त्यात याचे आश्चर्य नक्कीच वाटते.
कर्नाटकातील हरणगिरी नावाच्या गावातील माडिगा जातीसमूहाच्या- यात साधारण पन्नास अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जाती आहेत- लोकांना अजूनही अस्पृश्य म्हणूनच वागणूक मिळते. त्यांचे केस कापायला त्यांना दुकानात प्रवेश नसतो. तशी मागणी केल्यावर गावातल्या तीन केशकर्तनालयांनी दुकाने बंद केली आणि घरोघर जाऊन स्पृश्य जातीतल्यांचे केस कापायला सुरुवात केली. आणि आता सगळ्या माडिगांना केस कापायला १९ किलोमीटरवरच्या रेनेबेन्नूर शहरात जावे लागते.
स्वाभिमानी दलित शक्ती संघटनेच्या युवकांनी गेली तीन वर्षे या प्रकाराबद्दलची इत्थंभूत माहिती गोळा केली. इथे रहाणाऱ्या पाचशेच्या वर व्यक्तींना हा भेदभाव सोसण्याशिवाय गत्यंतर नाही, इतकी जबरदस्त भीती त्यांच्या मनात तथाकथित उच्च, मनाने नीच जातीच्या लोकांनी बसवली आहे. मृतांना पुरायला जागाही दिली जात नाही. पाणी मिळू दिले जात नाही, दुकानांत चहा किंवा पाणी घ्यायचे तर कळकट प्लास्टिकचे मग्ज किंवा कप त्यांच्यासाठी अजूनही वेगळे ठेवले जातात.
अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आली त्याला सुमारे साठ वर्षे लोटली, पण इथे अजूनही ही पाचेकशे जितीजागती माणसे सार्वजनिक नळावर पाणी भरू शकत नाहीत, देवळात प्रवेश करू शकत नाहीत. त्यांना कुणीही लिंगायत, कुरुबा लोक स्पर्श करत नाहीत. गायीगुरं मेली की त्यांनाच ती ओढून नेणं भाग असतं. काम नाकारण्याची प्राज्ञाच नाही कुणाची. घरसफाईची कामं बिनपैशानेच करवून घेतली जातात. त्यांना घरात संडास बांधू दिले जात नाहीत, कारण घरे असलेली जमीन त्यांची नाहीच असा उच्च जातीच्या लोकांचा दावा आहे. संडासला बाहेरही जाण्याची सोय राहू दिली जात नाहीत. बायका बाहेर गेल्या तर लिंगायतपंथी पुरुष मुद्दाम अवतीभवती उभे रहातात. अनेकदा नाईलाज होऊन बायकांना तसेच बसावे लागते- इतकी उच्चवर्णीय संवेदना दाखवली जाते.
हे सगळे का होते यावर स्थानिक तहसीलदार म्हणतात, की हे सर्व विश्वास, परंपरा ते स्वतःहून पाळतात, त्यात भेदभावाचा प्रश्नच नाही.
२०१२मध्ये बीबीसीनेही राजस्थान हरियाणामधील अस्पृश्यता पाळण्यासंबंधी वृत्त दिले होते. डॉक्टरेट केलेल्या, दिल्ली विद्यापीठात शिकवणाऱ्या डॉ. सोनकरांना त्यांच्या मूळ गावी गेल्यानंतर चहाच्या दुकानात दलित असाल तर आपला कप धुवून ठेवा असे सांगण्यात आले होते. या आणि असल्या कथा साठ वर्षांपूर्वी जितक्या होत्या त्यापेक्षा कमी असतील यात समाधान मानण्यात अर्थ नाही. या देशाच्या कायदा-सुव्यवस्था पालिकेचे रक्षक कर्तव्यावर असतानाही आपल्या मनातून जातविषयक भेदभाव काढत नाहीत.
लग्न म्हणजे फालतू परंपरा पाळण्याचा एक सोहळा एवढाच विचार करणारे बुद्धीदारिद्रय असलेले अनेकानेक भारतीय लोक ही घाण मनातून कधी काढतील कोण जाणे.
देशाची स्वच्छता म्हणजे मनातून ही घाण काढणे हे आम्हाला कळतच नाही.
वरवरची स्वच्छता आणि वरवरची देशभक्ती…
जय हिंद.
(लेखिका अभ्यासपूर्ण व रोखठोक लेखनासाठी प्रसिद्ध आहे. ‘फाउंटन हेड’, ‘अॅटलास श्रग्ड’ ‘आय अॅम अ ट्रोल’, ‘शॅडो आर्मीज्’ , ‘द गॉड डिल्यूजन’ आदी गाजलेल्या पुस्तकांचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे )
हे सुद्धा वाचा- ‘अजात’ही झाली ‘जात’!- http://bit.ly/2Dfwgd7