सौजन्य -लोकसत्ता
वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या १९८४ सालच्या कवितेवरून १९९४ मध्ये सुरू झालेला वाद आता न्यायालयातही एका वळणावर आलेला असताना अभिव्यक्तिस्वातंत्र्य, त्याला मर्यादा घालणारे वर्चस्ववादी राजकारण आणि कलाकृतीचा आशय व दर्जा यांची चर्चा होणे आवश्यक आहे. ती साध्या भाषेत करणारा हा मसुदा..
‘गांधी मला भेटला’ या वसंत दत्तात्रय गुर्जर यांच्या कवितेवरून सध्या न्यायालयीन वाद सुरू आहे. समाजातही तिच्याविषयी चर्चा सुरू आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक संकेत आदी मूल्यांबाबतच्या चर्चा सुरू आहेत. या चच्रेत राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या व सामाजिक सुधारणेच्या महान संग्रामातून विकसित झालेल्या पुरोगामी वारशावर उघड तसेच प्रच्छन्न हल्ले करून त्यांविषयी गोंधळ माजवणे सुरू आहे. या पुरोगामी वारशाचे वारसदार या नात्याने या चच्रेत भाग घेणे आम्हाला आमचे कर्तव्य वाटते. त्यादृष्टीने आम्ही काही मुद्दे खाली नोंदवत आहोत :
ही कविता १९८३ सालची असून अशोक शहाणेंच्या प्रास प्रकाशनाने ती पोस्टर पोएट्रीच्या स्वरूपात १९८४ साली प्रसिद्ध केली. १९९४ साली बँक कर्मचाऱ्यांच्या युनियनच्या अंकात ती पुनप्र्रकाशित करण्यात आली. बँकेतल्या वरिष्ठांच्या काही गरप्रकारांना उघडकीस आणण्याचा लौकिक असलेले तुळजापूरकर हे या अंकाचे संपादक होते. आधी १० वष्रे ज्या कवितेवर काहीही आक्षेप घेतला गेला नव्हता, त्या कवितेवर या वेळी मात्र आक्षेप घेऊन कवी वसंत गुर्जर व या अंकाचे संपादक तुळजापूरकर यांच्यावर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. गांधीजींसारख्या ऐतिहासिक महान व्यक्तीचा अवमान व अश्लील भाषा या मुद्दय़ाच्या आधारे १९९४ साली दावा दाखल करणारी संघटना होती संघकुळातली पतितपावन संघटना. संपादक म्हणून तुळजापूरकर यांनी आधीच माफी मागितल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मुक्त केले असून कवी गुर्जर यांच्यावर मात्र लातूर येथील न्यायालयात खटला चालू राहणार आहे. गुर्जर यांनी माफी मागायला नकार दिला आहे.
या घटनेत कलाकृतीचा दर्जा, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि राजकारण हे तिन्ही मुद्दे समाविष्ट आहेत. त्यातील राजकारणाचा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतला पाहिजे. कारण हा खटला दाखल करण्यामागील प्रेरणाच राजकीय आहे.
पतितपावन संघटनेचे गांधीप्रेम हे पूतनामावशीचे प्रेम आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. पतितपावन ही एक िहदुत्ववादी संघटना आहे. आणि िहदुत्ववादी संघटनांना गांधींबद्दल किती प्रेम आणि आदर वाटतो हे जगजाहीर आहे. पण पतितपावन संघटना असे म्हणू शकते की, ‘आमचा गांधींच्या काही भूमिकांना विरोध आहे. पण गांधींबद्दल मात्र आदर आहे.’ पण या म्हणण्यातदेखील केवळ चलाखी असणार आहे. हे समजण्यासाठी केवळ एकाच गोष्ट पुरेशी आहे. गांधीहत्येचा, एका खुनी माणसाचा गौरव करणारे ‘मी नथुराम बोलतोय’ हे नाटक महाराष्ट्रात गेली कित्येक वष्रे जोरात चालू आहे. पण पतितपावन संघटनेने त्यावर बंदी घालण्याची गोष्ट तर सोडाच, साधा निषेधही केलेला नाही. यावरूनच पतितपावन संघटनेचे ‘राजकारण’ स्पष्ट होते. महात्मा गांधींचा अधिकृत वारसा सांगणाऱ्या विचारवंतांकडून वा संघटनांकडून या कवितेबद्दल आक्षेप घेतले न जाणे व पतितपावन संघटनेने ते घेणे हेही पुरेसे बोलके आहे.
मग या कवितेबद्दल आक्षेप घेण्यामागील पतितपावन संघटनेचे ‘राजकारण’ काय असेल? ते उघड आहे. त्यांना या निमित्ताने कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणायची आहे. त्यांचा खरा आक्षेप कवितेतील भाषेबद्दल आहे. ‘गांधींचा अपमान’ हा देखावा आहे. एकदा का सुप्रीम कोर्टाकडून आपल्याला हवा तसा निर्णय मिळाला की मग एखादी कलाकृती आमच्या देव-देवतांचा तसेच त्यांना राजकीयदृष्टय़ा सोयीच्या असलेल्या ऐतिहासिक व्यक्तींचा अपमान करते असा मुद्दा उपस्थित करून त्या कलाकृतीवर बंदी घालणे पतितपावनसारख्या संघटनांना शक्य होणार आहे. आज जगात अनेक ठिकाणी मूलतत्त्ववादाला जोर आला आहे. अलीकडच्या इस्लामी राष्ट्रांतील घटना तर त्याचे ठळक उदाहरण आहे. हा मूलतत्त्ववाद येथील बहुसंख्य िहदू धर्मीयांत रुजवणे, त्यास असहिष्णू बनविणे व प्राचीन काळापासून वैचारिक मतभिन्नतेचे जागरण करत एकत्र नांदणाऱ्या बहुसांस्कृतिक ‘भारतीयत्वा’ला कमजोर करणे, अशी ही रणनीती आहे. महाराष्ट्रातील विचारी जनतेने हे समजून घेण्याची गरज आहे.
बंदी हवी कुणाला?
येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करणे आवश्यक आहे. ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकावर बंदी घालण्याची मागणी जरी कोणी केली तरी आमचा त्या मागणीला पूर्ण विरोध असेल. नथुराम गोडसेंचे विचार आम्हाला अजिबात मान्य नाहीत आणि त्याची कृती आम्हाला घृणास्पद वाटते. पण म्हणून त्याची राजकीय भूमिका मांडण्याच्या स्वातंत्र्यावर बंधन आणणे आम्हाला पूर्ण चुकीचे वाटते. हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेऊ या की, महाराष्ट्रातील ज्या ज्या लोकांना ते िहदुत्ववादाच्या विरोधात असल्यामुळे ‘स्यूडो-सेक्युलर’ म्हणून हिणवण्यात आले आहे त्यांपकी कोणीही, ‘मी नथुराम बोलतोय’ या नाटकावर बंदी आणली पाहिजे, असे म्हटलेले नाही. उलट अशी बंदी आणता कामा नये अशी जाहीर भूमिका घेतलेली आहे. विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्तिस्वातंत्र्य या गोष्टी अत्यंत मोलाच्या आहेत. त्यांना तडा गेला तर एक सुसंस्कृत लोकशाही राष्ट्र म्हणून उदयाला येण्याच्या आपल्या ध्येयालाच तडा जाऊ शकेल.
समाजातल्या साचले-कुजलेपणावर आपल्या कवितांद्वारे कोरडे ओढणारे संवेदनशील कवी म्हणून वसंत दत्तात्रय गुर्जर परिचित आहेत. त्यांनी या कवितेत गांधीजींच्या विचारांना तिलांजली देणाऱ्यांचा समाचार उपरोधिक-रूपकात्मक शैलीने घेतला आहे. हा उपरोध प्रभावी व कलात्मकरीत्या व्यक्त करतानाची अपरिहार्यता म्हणून बहुजन समाजात व्यापकरीत्या वापरली जाणारी भाषा कवीने वापरली आहे. तिला अश्लील ठरविले गेल्यास संत तुकारामांपासून नामदेव ढसाळांपर्यंत अनेकांना निकाली काढावे लागेल. कवितेचे अभिन्न अंग म्हणून येणारी ही भाषा, तिचा लहेजा व रूपकात्मता इंग्रजी अनुवादाद्वारे आकलन होणे कठीण आहे. ही कविता समजून घेताना न्यायालयालाही हीच मर्यादा पडली असावी. वास्तविक न्यायालयाने मराठी भाषेचे तज्ज्ञ, साहित्यिक, गांधीवादी विचारवंत अशांचा Amicus curiae (न्यायालयाचे मित्रवकील) म्हणून सल्ला घ्यायला हवा.
सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आमच्या हाती नाही. पण वृत्तपत्रांतील बातम्यांमधून न्यायालयाचे जे म्हणणे कळते त्यानुसार भाषा, ऐतिहासिक व्यक्तींचा अवमान यादृष्टीने कलाकृतीचे मापन करताना प्रचलित सामाजिक संकेतांचा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला आहे. तोही निसरडा आहे. काळ, समाजविभाग, संस्कृती, प्रदेशनिहाय हे संकेत भिन्न असू शकतात. भारतातील िहदू समाजातच उत्तरेत रावण खलनायक, तर दक्षिणेत तो नायक मानला जातो. असे अनेक बाबतींत संभवते. खुद्द या कवितेबाबत ८३ सालचे सामाजिक संकेत विचारात घेणार की ९४ सालचे? ते ठरवणार कसे? असे प्रश्न उभे राहतात.
रुपकांचा अन्वयार्थ
सर्वसाधारण वैचारिक अभिव्यक्ती व कलात्मक अभिव्यक्ती यातही फरक आहे. वैचारिक अभिव्यक्ती सरळ असते, त्यामुळे तिचा अर्थ स्पष्ट असू शकतो. कलात्मक अभिव्यक्ती ही अशी सरळ नसते. ती अनेकविध पद्धतींची असते. तिचा अर्थ शब्दश: घेण्याने फसगत होऊ शकते. या कवितेत गांधीजी कवीला जिथे भेटतात, तिथे प्रत्यक्ष गांधीजी भेटतात, असे कवीला म्हणायचे नसते. त्याला काही वेगळे सूचित करायचे असते. अशा वेळी कवितेचा-कलेचा अर्थ लावणे कलावंतांवर, त्या क्षेत्रातील समीक्षकांवर सोडणेच उचित ठरते.
सर्वसाधारण समाज त्याचा अर्थ कसा लावतो, हे महत्त्वाचे आहेच. त्या दृष्टीने कलाकारांसहित सर्वानीच विवेकी राहावे, हे म्हणणे निराळे. पण त्यामुळे समाजातील सर्वाना स्पष्टपणे अर्थबोध होईल वा आक्षेपार्ह असणार नाही अशीच कलाकृती तयार करा, असा आदेश कलावंतांना दिला तर कला ही कला राहणारच नाही. समाजात कलेबाबतच्या समजाची प्रौढता असलेले तसेच नसलेलेही असतात. त्यासाठी कलाकृतीतील रुपकांचा अन्वयार्थ लावता येण्याची, त्यातील सौंदर्यस्थळे हेरण्याची, त्यातील संदेश समजण्याची कुवत व कलेबाबतचा उदार दृष्टिकोन आपल्या समाजात वाढायला पाहिजे. तो वाढवण्यासाठी व जोपासण्यासाठी कलावंत, विचारवंत, सामाजिक-राजकीय संघटना तसेच सरकार या सगळ्यांनीच प्रयत्नशील असले पाहिजे.
आज गांधींचा अपवाद वगळता इतर अनेक इतिहासकालीन आणि आधुनिक काळातील लोकांचे आपण दैवतीकरण केले आहे. त्यांच्या विचारांवरील, कृतीवरील कोणतीही टीका सहन केली जात नाही. अशी टीका करणाऱ्या लोकांना त्याची मोठी, जबर किंमत द्यावी लागू शकते. सुदैवाने महात्मा गांधींसारख्या जगन्मान्यता असलेल्या नेत्याच्या बाबतीत तो धोका नाही. म्हणून आम्ही ही भूमिका घेण्याचे धर्य दाखवू शकतो याची आम्ही प्रामाणिक कबुलीदेखील येथे देत आहोत. जे स्वातंत्र्य आपल्याला महात्मा गांधींबद्दल मिळते तेच स्वातंत्र्य महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या बाबतीत मिळण्याइतका महाराष्ट्र सुसंस्कृत आणि विचारी व्हावा, अशी या निमित्ताने कळकळीची अपेक्षा व्यक्त करतो.
शेवटी पुन्हा एकदा, या प्रकरणातील ‘पतितपावन’ संघटनेच्या राजकारणाचा निषेध करतो आणि कवी वसंत गुर्जरांच्या आम्ही बाजूने आहोत, हे जाहीर करतो.
शांता गोखले, उल्का महाजन, सुरेश सावंत, मिलिंद मुरुगकर,
लोकेश शेवडे, भारती शर्मा, मधुकर डुबे, नीला लिमये यांनी विचारविनिमयाने हा मसुदा प्रसृत केला आहे.
सौजन्य -लोकसत्ता