-मिथिला सुभाष
A person often meets his destiny on the road he took to avoid it.
तुम्ही तुमच्या ‘वाटा’ कितीही बदला, तुमचे ‘वाटे’ बदलत नाहीत.
हे वाचून माझं मत तुमच्या लक्षात आलं असेल. पण ते मी अतिशय विचारांती बनवलंय, सहजासहजी नाही आले मी या निष्कर्षावर. माणसाचे भविष्य त्याच्या मनगटात असते, तो स्वत: ते घडवू शकतो वगैरे गोष्टींची झिंग मलाही होती. मी माझे भविष्य घडवू शकेन हा आत्मविश्वास होता. ‘हे शक्य नाही,’ असा आक्रोश करणाऱ्या घटना आणि माणसं डोळ्यासमोर होती. पण तरीही संबंधितांच्या अपयशाचे खापर त्यांच्याच डोक्यावर ठेऊन मी माझं भविष्य घडवायला घेतलं होतं. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि भीषण विपरीत घटना घडत होत्या. पण मी त्यांच्याकडे काणाडोळा करून नेटाने शिकत होते. कदाचित तेव्हा माझी नियती मला हसत असावी. प्रत्येक अनपेक्षित वळणावर मी स्तब्ध होत होते आणि एक अखेरचे वळण आले आणि माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याला शरण जाण्याशिवाय माझ्या हातात कुठलाच पर्याय नव्हता.
पण तरीही माणसाने नियतीसमोर नतमस्तक असावे हे मत मी माझ्या एकटीच्या अनुभवावर बेतलेले नाही. मी हट्टी आहे. फोकस्ड होऊन विचार करू शकते. एखाद्या व्यक्तिगत प्रसंगातून स्वत: बाजूला होऊन त्या घटनेकडे त्रयस्थ दृष्टीने, तटस्थपणे पाहण्याचे कसब माझ्यात आहे. त्यामुळे ही शरणागती मी सहज पत्करली नाही. वाचन सुरु होतेच. चिंतन-मनन आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे डोळस निरीक्षण सुरु होते. माणसांचे, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे आणि त्यातल्या अपरिहार्यतेचे. आणि हळूहळू मला कळायला लागलं की माणसाच्या हातात फारसे काही नसते. अगदीच शरणागत होण्याचा स्वभाव नसला तरी समोर आलेल्या दोन पर्यायांपैकीच एक स्वीकारावा लागतो.
‘नियती’ या विषयाचा सुटा विचार करता येत नाही. नियती, नशीब, पूर्वजन्म, पुनर्जन्म, जन्मकुंडली आणि भविष्य या सगळ्या गोष्टी आस्तिकतेतून निघालेल्या आहेत. एकमेकांशी निगडीत आहेत. देव या संकल्पनेवर विश्वास ठेवला की बाकीच्या गोष्टी पॅकज डीलसारख्या आपोआप येतात. मग तुम्ही मूर्तिपूजक असा नाहीतर निर्गुणाचे उपासक असा. कुणातरी ‘अज्ञात शक्ती’चं अस्तित्व मान्य करणं म्हणजे नियतीचा रेटा मान्य असणंच असतं. जगातल्या अनेक थोर शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी ते मान्य केलेलं आहे. यातच काही स्वप्नसंकेतही येतात. मी दहा वर्षाची असल्यापासून मला एक स्वप्नं पडायचं. असंबद्ध, पण दर दोन-चार दिवसांनी तेच. पण पुढे अनेक वर्षांनी माझी मुलगी दहा वर्षाची झाल्यावर ते स्वप्नं तंतोतंत खरं झालं. अगदी त्यातल्या माणसांच्या कपड्याच्या रंगासह. आणि ती घटना घडल्यानंतर मला ते स्वप्नं पडणं बंद झालं. पण आता मी तुम्हाला मलाच पडणाऱ्या एका अशा स्वप्नाबद्दल सांगणारे, ज्याचा संबंध माझ्या कुठल्या जन्माशी होता ते मला माहीत नाही. पण तो होता एवढं मात्र नक्की.
माझी मुलगी दीड वर्षाची होती तेव्हा माझा नवरा घरच्यांशी भांडून आम्हा दोघींना घेऊन इंदौरहून मुंबईत आला. आम्ही नवीन मुंबईतल्या ‘सानपाडा’ नावाच्या गावात एका झोपडीवजा घरात राहायला लागलो. तिथे वीज-पाणी या बेसिक सोयी पण नव्हत्या. माझ्या नवऱ्याला ‘विक्स’मधे फिरता सेल्समन म्हणून काम मिळालं. दिवसाला वीस रुपयेप्रमाणे आठवड्याचे पैसे एकदम मिळायचे. त्यातून त्याचे शाही षोक वगैरे करून तो शनिवारी रात्री ५०-६० रुपये माझ्या हातावर टेकवायचा. त्यात आठवडा काढायचा. तेव्हाही हे शक्य नव्हतं. माझं शिक्षण बेताचं, मुलगी सांभाळायला कुणी नाही आणि ‘मराठ्याची बायको नोकरी करणार नाही,’ हा हट्ट, त्यामुळे मी कसलीही नोकरी करण्याचा प्रश्नच नव्हता. माझं वयवर्षे जेमतेम वीस-एकवीस. मला काही लिहिता येतं हेच मला तेव्हा माहीत नव्हतं.
सुभाषला म्हणजे माझ्या नवऱ्याला, विक्सच्या जाहिरातीचे छान ग्लॉसी पेपर्स भरपूर मिळायचे. मी दिवसभर खपून त्याच्या पिशव्या बनवायचे.. पेपर बॅग्ज..!! आणि अंधार पडण्याआधी त्या घेऊन पायी ‘तुर्भे’ नावाच्या गावात जायचे. तिथे वाण्याच्या दुकानात त्या विकायचे आणि दोन वेळची रसद, अन्नधान्य, चहा-साखर, तेल-मसाले खरेदी करून आणायचे. ते दुकान एका म्हातारीचं होतं. पण पुढची घटना सांगण्याआधी तुम्हाला माझं स्वप्नं सांगायला पाहिजे.
मला नेहमी अजूनही एक स्वप्नं पडतं. एक कुटुंब शेतावर काम करतंय. चाळीशीतले नवरा-बायको, १४-१५ वर्षाचा मुलगा आणि एक म्हातारी बाई. ती नुसती बसलेली. नवरा धान्याची काहीतरी ‘झोडपणी’ करतोय.
मुलगा जमिनीवर बसून काहीतरी खातोय आणि म्हातारबाई त्या नवऱ्याशी बोलताहेत. बायको सुपात धान्य घेऊन दोन्ही हाताने ते सूप वर धरून धान्य पाखडते आहे. आणि ती बाई म्हणजे मी आहे, मिथिला. हे स्वप्नं मला नेहमी पडतं. या स्वप्नातली मिथिला आणि इतर तिघं शलवार-कुर्ता, शाल-स्वेटर, मोजे-कानटोप्या वगैरे घालून असतात.
तर.. आता पिशव्या विकायला तुर्भे गावातल्या त्या दुकानात जाऊ. त्या दुकानात मी पहिल्यांदा गेले तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझ्या स्वप्नातल्या म्हातारबाईसारखी दिसते ही आजी. अर्थात ते मी माझ्यापाशीच ठेवलं. पण ती आजी पण माझ्याशी खूप मायेने वागायची. माझं स्वत:चं लहान वय, हातात छोटी मुलगी, दुसऱ्या हातात पेपर बॅग्जची पिशवी (जी रिकामी झाल्यावर त्यातच मी खरेदी केलेलं सामान ठेवायचे.) हे सगळं बघून ती आपल्याशी मायेने वागते असा माझा समज झाला होता. ती मला पिशव्यांचे जास्त पैसे द्यायची, मी खरेदी केलेल्या सामानाचे कमी पैसे लावायची, कधीतरी माझ्या मुलीच्या हातात बिस्कीटाचा पुडा द्यायची, वगैरे. हे सारे पावसाळ्यात पार पाडतांना माझी अतिशय त्रेधातिरपिट उडायची. मुलगी, पिशवी आणि छत्री, शिवाय साडी हे सारे दोन हाताने सांभाळायचे म्हणजे सर्कसच. शिवाय तेव्हा नवीन मुंबई जवळजवळ मोकळी होती, त्यामुळे पाऊस वेड्यासारखा धुंवाधार, वाकडातिकडा कोसळायचा. एक दिवस त्या आज्जीने मला विचारलं की, ‘बेटा, तू पंजाबी डीरेस कायको नई पैनती..?’ मी म्हंटलं, ‘मेरी ससुराल में नहीं चलता पंजाबी ड्रेस!’ त्यावर ती हसली आणि म्हणाली, ‘मेरे सपने में तो तू पंजाबी ड्रेस पैनके आई थी..!’ हे ऐकून मी उडाले. तिला विचारलं की मी तिच्या स्वप्नात कधी आले..?? त्यावर ती म्हणाली की, ज्या दिवशी तू पिशव्या घेऊन त्या विकायला आलीस ना, त्या रात्री मला एक स्वप्नं दिसलं. आज्जीने मला स्वप्नाचे तपशील सांगितले. ते डिट्टो मला पडणारंच स्वप्नं होतं. त्यात मी होतेच. आणि त्या स्वप्नातली म्हातारी ती स्वत: होती असं तिला वाटत होतं. म्हणून ती माझ्याशी आऊट ऑफ द वे, जास्त छान वागायची म्हणे..!!
मी शहारले, पण तेव्हाही काही बोलले नाही, आत्ताही काही सुचत नाही. एका गोष्टीची मात्र खात्री आहे की मला सांभाळून घेणारं कुणीतरी माझ्या आसपास सतत असतं.
हा सारा नियतीचा खेळ आहे. सगळी सृष्टी जशी आपसात जोडलेली आहे, तसे आपले सगळे जन्म आपसात जोडलेले आहेत. आपलं संवेदन त्या दिशेने काम करायला लागल्यावर आपल्याला या गोष्टी कळतात असा माझा कयास आहे. माझ्याकडे ते माझ्या वडलांकडून आलं. माझे वडील उत्तम ज्योतिषी होते. तो त्यांच्या पोटापाण्याचा व्यवसाय नव्हता. कदाचित त्यामुळेच, त्यांच्या या विद्येला सत्याची आणि सत्वाची धार होती. एकदा त्यांच्याकडे सोमाणी नावाचे एक गृहस्थ स्वत:ची जन्मपत्रिका घेऊन आले. त्यांचा प्रॉब्लेम विचित्र होता. त्यांच्या आधीच्या दोन पिढ्या त्यांच्या कुटुंबात आणि सगळ्या चुलत कुटुंबात मुक्या मुली जन्माला येत होत्या. मुलगे व्यवस्थित, पण मुलगी झाली की ती मुकी असायची. सोमाणी यांची मोठी सात-आठ वर्षाची मुलगीही मुकी होती. त्यांची बायको तिसऱ्यांदा गरोदर राहिली आणि सोमाणी घाबरले की मुलगी झाली तर मुकी होईल. त्यांना कुणीतरी माझ्या वडलांकडे पाठवलं. माझ्या वडलांनी त्यांना विचारलं की तुमच्या कुटुंबात दोन-तीन पिढ्यांपूर्वी तुमच्या एखाद्या पूर्वजाने कुणाची फसवणूक केली होती का? एवढं जुनं त्या गृहस्थाला माहीत असण्याचं कारण नव्हतं. पण ते म्हणाले, कुटुंबात अनेक पिढ्या सावकारी आहे, त्यामुळे ही शक्यता अगदीच नाकारता येत नाही. वडलांनी त्यांना चौकशी करायला सांगितलं. चोखणी राजस्थानातल्या आपल्या खेडेगावात गेले. जुन्या कीर्दखतावण्या पाहून आणि काही अतिवृद्धांशी बोलून त्यांना समजलं की त्यांच्या आधीच्या दोन-तीन पिढीपैकी एका आजोबाने गावातल्या एका विधवेची दोन एकर जमीन लुबाडली होती. तिने काही बोलू नये म्हणून लोखंडाच्या तापत्या सळीने तिच्या पडजीभेला डाग दिला. म्हातारी काही वर्ष वेड्यासारखी गावात फिरायची. तिला दोन मुलगे होते. म्हातारी मेल्यावर दोन्ही मुलं गांव सोडून कलकत्त्याला निघून गेली.
सोमाणीने हे सांगितल्यावर माझ्या वडलांनी त्यांना सांगितलं की कसंही करून त्या मुलांच्या वारसदारांना शोधा आणि आणि आजच्या भावाप्रमाणे दोन एकर जमिनीची रक्कम अतिशय सन्मानपूर्वक त्यांना द्या. झालेल्या घटनांमुळे सोमानींचा माझ्या वडलांवर पूर्ण विश्वास बसला होता. अतिशय साधनसमृद्ध माणूस होता तो. त्याने काय ते सगळे यातायात करून त्या मुलांच्या वारसदारांना शोधलं आणि त्या सगळ्यांना मिळून जमिनीची रक्कम सुपूर्द केली. सोमाणी जेव्हा कलकत्त्याला हे कार्य पार पाडत होते तेव्हा इथे त्यांची बायको बाळंत झाली आणि तिला मुलगी झाली. सगळं कुटुंब हवालदिल झालं. सोमाणीही परत आले. त्यांना विश्वास होता की ही मुलगी बोलेल. पण अखेर बापाचं काळीज होतं. काही महिन्यांनी जेव्हा त्या मुलीने पहिला शब्द उच्चारला तेव्हा आमच्या घरात टोपलीभर मिठाई घेऊन आलेल्या सोमाणीने माझ्या वडलांच्या पायावर घातलेलं लोटांगण मला अजून आठवतंय.
हे काय होतं..? नियती..!! त्या गृहस्थाने माझ्या वडलांना भेटणं, आणि त्यांचं ऐकून वागणं, हीही नियतीच. आणि म्हणूनच मला असं वाटतं, नाही, माझी खात्री आहे की नियती, नशीब, पूर्वजन्म, पुनर्जन्म, जन्मकुंडली, भविष्य आणि स्वप्नातून मिळणारे संकेत ही अज्ञात सृष्टीच्या प्रोग्रामिंगची एक साखळी असते. जी आपल्याला कधीच कळत नाही. काहींना त्याचे संकेत मिळतात, काहींना नाही मिळत. काही त्यावर विश्वास ठेवतात, काही नाही ठेवत. पण त्यामुळे सृष्टीचं काहीही बिघडत नाही. तिच्या ज्ञात-अज्ञात नियमांवर तुमचा विश्वास नसला तरी तुमच्यावर तिचा पूर्ण अंकुश असतो.
माझे वडील त्यांच्या आईच्या गर्भात असतांना अशाच नियतीच्या थपडा खात उत्तरप्रदेशातल्या एका गावातून अमरावतीजवळच्या चांदूरबाजारात पोचले. तिथे त्यांचा जन्म झाला आणि त्या काळात लाखोच्या मालमत्तेचा मालक असणारा तो मुलगा इर्विन हॉस्पिटलच्या किचन’मधे रुग्णांचा स्वयंपाक करणाऱ्या ‘ब्राह्मणी’चा मुलगा म्हणून ओळखला गेला. सतराव्या वर्षी नवऱ्याचा मृत्यू, त्याच्या कुटुंबाची गडगंज मालमत्ता, पोटात त्याचा वारस आणि त्याच्या जीवावर उठलेले दुष्ट नातेवाईक. आपलं बाळ वाचवण्यासाठी ती घरातून पळाली. मिळेल त्या गाडीत बसत, गाड्या बदलत, बडनेराला उतरली. तिथून चांदूरबाजारला कशी पोचली ते मला नक्की माहीत नाही. पण तिच्या मुलाचा जन्म तिथे व्हायचा होता, तिला तिथे पोचावं लागलं. आज उत्तरप्रदेशातल्या त्या जिल्ह्यात ‘मिश्र’ कुटुंबाची अगणित इस्टेट आहे. भलते कुणीतरी तिचा उपभोग घेत आहेत. आणि खरा वारसदार (पुन्हा हाही एकुलता एक) माझा भाऊ मुंबईत ‘टाईम्स ऑफ इंडिया’मधे नोकरी करतोय. माझ्या वडलांनी खूप पूर्वीच आम्हाला सांगितलं होतं की तिथला एक पैसाही आपल्यापैकी कुणाला लाभणार नाही. पण तरीही कर्णोपकर्णी ऐकू येणाऱ्या तिथल्या वैभवाच्या बातम्यांनी मन खिन्न होतं.
लेखात ‘मी, माझे, मला’ असू नये. पण इथे ते अपरिहार्य आहे. कारण आयुष्याची दिशा आणि विचार करण्याची पद्धतच बदलणाऱ्या तत्वावर कुणीही माणूस स्वत:च्या अनुभवानेच येत असतो. मी काही अभ्यासक, तत्वचिंतक वगैरे नाही. अतिशय साधी, घरगुती, पण भरपूर वाचन आणि आपल्या बौद्धिक ऐपतीप्रमाणे, त्यावर सम्यक विचार करणारी बाई आहे. भवताली घडणाऱ्या सगळ्या घटनांचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत असते. त्यातून मला काही प्रश्न पडतात, ज्याची मला पटू शकतील अशी उत्तरं अजूनही कुणी देऊ शकलेलं नाहीये.
व्यक्तिगत घटना आता बाजूला ठेऊ, सार्वजनिक आणि सार्वकालिक घटनांपासून सुरु करू. आपलं भविष्य जर आपल्या हातात आहे, जर आपण ते घडवू शकतो, तर मग अमिताभ बच्चन आणि त्याच्याचएवढी अभिनयक्षमता असलेला एखादा धडपडणारा कलावंत यांचे वर्तमान एकसारखे का असू नये? मुकेश अंबानी आणि त्याच्याच ऑफिसमधल्या त्याच्याहून अधिक हुशार असणाऱ्या एखाद्या एम्प्लॉईचे आयुष्य सारखे का नाही? अशी अनेक उदाहरणं देता येतील. वानगीदाखल ही दोन दिली आहेत. यावर नेहमी एकच उत्तर दिलं जात की त्यांना समान संधी मिळाल्या नाहीत किंवा त्यांच्या परिश्रमाला दिशा नव्हती. यावरच मला असं म्हणायचंय की संधी आणि परिश्रमाला दिशा देण्याची बुद्धी हेच मुळात प्रत्येकाला आपापल्या पूर्वसंचितानुसार मिळत असते. आपलं अध्यात्मही हेच सांगतं. माणूस जन्माला येण्यापासून सुरु झालेलं चक्र त्याच्या मरणानंतर संपत नाही, तर त्याच्या दुसऱ्या जन्मापर्यंत आणि मग त्यापुढे, असं अविरत सुरु असतं. तो उर्जेचा प्रवास आहे. माणूस म्हणजे नुसता देह नाही हे एकदा मान्य केलं की ती एक उर्जा आहे हे मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि उर्जा कधीच संपत नाही, तिचं स्वरूप बदलतं. आणि हे बदलणारं स्वरूप, ती उर्जा धारण करणाऱ्या माणसाच्या कर्मामुळे ठरत असतं.
उपनिषदात पूर्वसंचित आणि नियती याबद्दल खूप लिहिलं आहे. गीतेतला ‘संभवामि युगे युगे’ हा विचार अजूनही कुणी खोडून काढू शकलेलं नाहीये. साधं उदाहरण घेऊ, आपण घरचा गणपती विसर्जित करतांना त्याच्या पार्थिवाची माती पाटावरून घरी आणतो. कारण तो पुढल्या वर्षी परत येणार असतो !! हे जे परत येणं आहे, ते फक्त ‘पुढचा गणेशोत्सव’ एवढं सीमित नाहीये. त्याच्या मुळाशी पूर्वसंचित आहे, आणि तेच नियतीशी बांधलेलं आहे. आपण कितीही नाकारलं तरी या गोष्टी आपल्या संस्कारात, संस्कृतीत, आपल्या सिस्टीममधे आहेत. रुजल्या आहेत. वेद, वेदांत आणि गीतेतले दाखले देणं हे माझं काम नाही. मी तेवढी अधिकारी नाही. जे अधिकारी असतात, तेही आज फक्त, ‘पूर्वसुरींनी अमुक लिहून ठेवलंय,’ हेच सांगू शकतात. सिद्ध काहीच करू शकत नाहीत. मग वेदोपनिषदातले दाखले बघण्यापेक्षा, रोजच्या जगण्यातले तसे दाखले बघणं जास्त संयुक्तिक होईल.
कधीतरी कुठेतरी एखादा मोठा अपघात होतो. अनेकजण दगावतात. मग काही दिवसांनी आतल्या घटना बाहेर यायला लागतात. कुणीतरी सांगतं की या गाडीने मी जाणार होतो, पण ऐनवेळी असं काही झालं की मी नाही जाऊ शकलो, म्हणून मी आज जिवंत आहे. एखाद्या कुणाचा नातेवाईक सांगतो की आमचा अमुक नातेवाईक खरं तर जाणारच नव्हता, पण स्टेशनवर गेला, तिकीट मिळून गेलं म्हणून तो या प्रवासावर गेला. आणि आज या जगात नाही. या गोष्टी आपल्याला फार वरवरच्या दिसतात. पण त्या तशा नसतात. पूर्वसंचितानुसार प्रत्येकाच्या आयुष्यातल्या घटना ठरलेल्या असतात, आणि त्या ठराविक दिवशी होतात. आणि म्हणून मला वाटतं की, आपण आयुष्य निवडत नसतो. आयुष्याने आपल्याला निवडलेले असते आणि आधीच ठरवलेल्या गोष्टी आपल्या ओंजळीत घातल्या जातात..!!
या संबंधातली ‘कठोपनिषदा’तली ‘यमदूत आणि कावळ्या’ची कथा अतिशय सूचक आहे. यमदूत दक्षिणेतून आकाशमार्गे प्रवास करत होता, त्याला एका झाडावर एक कावळा बसलेला दिसला. यमदूत त्याला तिथे पाहून चकित झाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्कील हसू आलं. ते बघून कावळा घाबरला. तो प्राणभयाने जो उडत सुटला तो सरळ हिमालयाच्या पायथ्याशी दमून कोसळून पडला. त्याच्या पंखातले बळ संपून गेले होते, भुकेने तो कासावीस झाला होता आणि आता हिमालयाच्या थंडीत तो काकडत होता. पण त्याला एकच समाधान होतं की त्याने यमदूताला चकवलं. पण त्याचं हे समाधान फार काळ टिकलं नाही. भूक, थंडी आणि थकव्यामुळे त्याला त्याचा अंत जवळ आलेला दिसत होता. आणि तेव्हाच तो यमदूत प्रकटला. कावळा कळवळून म्हणाला की का रे बाबा माझा पिच्छा पुरवतोयस?? त्यावर यमदूत म्हणाला, ‘अरे हे तर माझं काम आहे. तू मला दक्षिणेत दिसलास तेव्हाच मला आश्चर्य वाटलं की काही दिवसाने याचं मरण हिमालयाच्या पायथ्याशी ठरलेलं आहे, हा इथे काय करतोय, आणि तू स्वत:च उडत आलास इथे.’ ही नियती. हिच्यापासून कुणीही स्वत:ची सुटका करून घेऊ शकत नाही.
माझ्या बघण्यात अशा अनेक घटना आहेत ज्या पाहिल्यावर या गोष्टीवर विश्वास बसतो. तुम्ही कितीही ‘वाटा’ बदला, तुमचे ‘वाटे’ बदलत नाहीत. वेगळ्या मार्गाने गेलात तरी तुमच्या ‘वाट्याचं’ जे असतं ते तुम्हाला मिळतंच. चमत्कार वाटतील अशा अनेक घटना चिकित्सक बुद्धीच्या माणसालाही विचार करायला भाग पाडतात. त्यांची उत्तरं तर्काने सापडत नाहीत. अगदी माझ्या जवळ घडलेली आणखी घटना सांगते. माझ्या सख्ख्या जावेच्या बहिणीचे सासरे खूप आजारी होते. घरात त्यांचं करणारं कुणी नव्हतं, नर्स वगैरे ठेवण्याची ऐपत नव्हती. माझ्या जावेची बहीण (म्हणजे त्यांची सून) त्यांचं सगळं म्हणजे सगळं अंथरुणात करायची. त्यांना पोटाचा काही विकार होता, त्यामुळे दर तासाला बेडपॅन द्यावे लागायचे. ते त्यांची सूनच करायची. ते फार खजील, दु:खी व्हायचे. शरमून जायचे. पण ती त्यांना, ‘मी तुमची मुलगी आहे असं समजा,’ असं म्हणून दिलासा द्यायची. काही दिवसांनी त्यांचं बोलणंही बंद झालं आणि एक दिवस ते गेले. पण त्यांनी जाण्याआधी आपल्या सुनेला सांगितलं की तू माझी मुलगी नाहीस, आई आहेस. मरणाआधी अखेरच्या महिन्यात ते बोलले असं हे एकच वाक्य. सासरे वारले तेव्हा सुनेला नुकते दिवस गेले होते. यथावकाश तिला मुलगा झाला. त्या मुलाला शौचाची जागाच नव्हती. तो आईशिवाय इतर कुणाहीकडे राहायचा नाही. त्याच्यावर उपचार करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण त्याच्या शरीरात उत्सर्जन यंत्रणाच नव्हती. १०-१२ दिवसाने ते मूल गेलं. आणि त्या दिवशी तिच्या स्वप्नात तिचे सासरे आले, म्हणाले, मी तुझा मुलगा झालो, पण तुला ‘शी’ साफ करण्याचा त्रास दिला नाही !! काय आहे हे..?? याचं उत्तर कुणाकडेच नाही.
हे सारे नियतीचे खेळ असतात. जे आपल्या पूर्वसंचितानुसार ठरलेले असतात. सृष्टीतली कुठलीही घटना विनाकारण होत नाही. सारे ठरलेले असते. आपण आयुष्य निवडत नसतो, आयुष्याने आपल्याला निवडलेले असते. हे एकदा मान्य केल्यावर चिकित्सक मन निरीक्षण करायला लागतं. या निरीक्षणातून काही निष्कर्ष हाती येतात. असे निष्कर्ष कधीच जनरल नसतात, त्यांना अपवाद असतो. असंच एक निरीक्षण केल्यावर लक्षात आलं की माणसाच्या आयुष्याचे ढोबळमानाने दोन भाग होतात. त्याचं आयुष्य ऐंशी वर्षाचं आहे असं मानलं तर चाळीसाव्या वर्षाच्या आसपास त्याचं आयुष्य काही प्रमाणात बदलतं. बदलाचं हे प्रमाण प्रत्येकाच्या कर्मानुसार ठरलेलं असतं. अर्धं आयुष्य तुम्ही पूर्वसंचित जगत असता आणि उरलेलं अर्धं आयुष्य, आधी जगलेल्या आयुष्याची फळं भोगत असता. ते जगत असतांना पुढच्या जन्मासाठी संचित गोळा करत असता. हा माझा निष्कर्ष नाही. ही एक विचारधारा आहे जी मला पटली आहे.
आपण आसपास अनेक विचित्र घटना घडतांना पाहतो. एखाद्या घरातलं वाढत्या वयाचं मूल आई-वडलांच्या डोळ्यासमोर दगावतं..! एखाद्या दीड-दोन वर्षाच्या पोरीची आई एकदम मरूनच जाते..!! मग लोक म्हणतात, हे नशीब आहे. नशीब म्हणजे काय..?? पूर्वसंचित..!! याच्यासमोर बुद्धी, भक्ती, प्रार्थना, यापैकी काहीच चालत नाही. मग असं वाटतं, नशिबात जे आहे तेच भोगायचं असेल, नियतीसमोर जर कुणाचं काही चालतच नसेल तर तिलाच शरण जावं ना..!!
नियतीवाद माणसाला अकर्मण्य, निष्क्रीय बनवतो असं म्हणण्याची फॅशन आहे. पण समजूतदारपणे स्वीकारलेली नियतीशरणता माणसाला निष्क्रीय नाही, समाधानी बनवते. सगळ्यांच्यात असून अलिप्त राहायला शिकवते. नियतीवादी माणूस समाधानी असतं. ज्या गोष्टीवर आपला ताबा नाही, ती घडली म्हणून दु:ख करायचं नाही ही समज त्याला आपसूक येते. आणि मग पराकोटीचं यश, सन्मान, कीर्ती आणि पैसा पचवून भानावर राहण्याचं कसबही येतं. मनातली नकारात्मकता संपते. ‘पत्ता भी नहीं हिलता बिना उसकी रजा के’ या उक्तीवर पूर्ण श्रद्धा असलेलं माणूस दु:खाने कोसळत नाही आणि यशाने माजत नाही. ‘हे हवं, ते हवं, पलीकडचं हवं, त्यापलीकडचंही हवंच,’ ही हाव संपते. माणूस शांत, स्थिर होतं. ‘गम और खुशी में फर्क न महसूस हो जहां..’ अशा वळणावर नियतीवादी माणूस सहज पोचतं. त्याचा प्रवास हलका आणि सोपा होतो.
(पूर्वप्रसिद्धी : ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०१५)
फोटो सौजन्य : Google
पुन:प्रकाशनाबद्दल आभार!!
लोकांना हा विषय आवडत नाही. कारण त्यांना तो कळत नाही. कळला तरी मान्य होत नाही. कारण आपले सगळ्यांचेच अहंकार फार टोकदार असतात. ‘मी केले’ ही भावना जबरदस्त असते. ‘इदं न मम’ स्वीकार करणे फार कठीण असते.
ज्यांना मान्य होईल तेही ते जाहीरपणे कबूल करत नाहीत.
-मिथिला सुभाष.
या लेखातील प्रसंग मी आधीही वाचले होते, पुन्हा वाचून ही तितकेच थक्क व्हायला होते.
Life is really a mystery, a puzzle sometimes. Thank you for sharing your experiences.
Very nice article !
Would like to read more articles by her.
अतिशय अभ्यसपूर्ण व वास्तववादीं लिखाण
त्यात अनुभवाचें बोल असल्यामुळे जास्त मनाला पटणारे प्रत्येक जातकाचें जीवन हे ठरलेले आहे . त्यात त्याच्या वाटेंला येणारे सुख दुख क्लेश त्रास वै हे त्याला भोगायचें आहेतच फकत त्याची तीव्रता ही आपण करणाया कर्मावर अवलंबुन असते . आपले भविष्य आपले कर्म ठरवत नाही तर आपले कर्म आपले भविष्य ठरवते हे समातंर या वेब मालेकेमाधिल वाक्य पटते
प्रारब्ध कधीच बदलू शकत नाही हे स्वीकारले तर आयुष्य जगणे सुखकर होते … मी जेव्हाएखादयाची मदत करतो त्यावेळेस माझ्या मध्ये अशी भावना असते कि परमेश्वराने त्या मदतीकरिता माझी निवड केली आहें . हे माझे मी भाग्य . नाही तर आपली काय लायकी कि आपण कोणला मदत करूँ शकु .. आणी आपण केलेली मदत त्यामुळे मिळालेले आशीर्वाद हे आपल्या कड़े संचित होतात .. आपल्याच वाईत स्थितित आपल्या उपयोगी पडतात . ते असे दिसुन येत नाही तर ओळखावे लागतात . हा माझा स्वानुभव आहे अनेक वेळ
अड़चणीत अथवा त्रास होत असताना अचानक कोणी तरि येऊन मदत करतो व परिस्थिति मध्ये आपोआप बदल होतो हे काही सहज घडत नाही त्यामागे पण काही योजना असतात . आपण ते स्वीकारलें पाहिजे
तसेच आपल्या लेखनात ज्या ज्याची ज्ञान नाही ते प्रामाणिक पणे मान्य करुन त्यावर आपण भाष्य केले नाही ते मनाला भावले मिथिलजी खुपच छानलिहले आहें असेच नेहमी लिहत रहा नव्हे बहुतेक तूमच्या प्रारब्धातच ते असावे
धन्यवाद
मिथिळजी फारच सुंदर वास्तववाद आपण लिहिलात माणसाचे कर्तृत्व चांगले असेल तर आपण जीवन चांगलेच व्यतीत करू तरी पण आपले प्रारब्ध व पूर्व जन्मातील कर्मा मुले बरा वाईट परिणाम असतोच.
Khup sundar lekh tai mi tumchi khup fan ahe tumchya lekhatun tumhi mla agdi jawadchya watta. Ase wattey tumhi bolt ahat ani mi samor basun eiktey
अतिशय छान, अनुभवांनी समृद्ध लेख. ओघवती भाषा.
सर्वच विषय माझ्या आवडीचे असल्याने अधिकच भावलं लिखाण !
अत्यंत वास्तववादी लेखन कर्म कितीही चांगले असले पण त्याला भाग्याची साथ नसेल तर व्यर्थ. लेखातील अनुभव हेच सांगतात. चिंतन करण्यास भाग पाडणारे लिखाण.आपण कठपुतली आहोत.असे मला वाटते. कर्ता करविता तोच आहे…… अतिशय मनाला भावणारे लिखाण!