एकाकीपणाच्या मुळाचा अवघड शोध

साभार: साप्ताहिक साधना

– सुरेश व्दादशीवार

एकाकीपण हे स्वयंभू की स्वीकारलेले?  जे एकांतातही टिकते आणि मित्रांच्या सहवासातही असते त्याची उपज कशी होत असावी? अखेर द्वैत खरे की अद्वैत? तशाही दोन गोष्टी एकाचवेळी खर्‍या असू शकत नाहीत म्हणून त्यातली एकच खरी असा तर्क करून शंकराचार्यांनी अद्वैत हेच अंतिम सत्य असल्याचे सांगितले. ते खरे मानले तरी त्याचे एकटे व एकाकीपण कायम राहते त्याचे काय?

काहींच्या मते ते येत नाही. उपजत असते. त्याचे अस्तित्व नाकारल्यामुळे ते उपजत नाही असे वाटते एवढेच. इतरांच्या मते तो मैत्रीचा वा मित्रभावनेचा अभाव असतो. संवाद नसणे हेही एक कारण असते. सामाजिक वा अन्य संघटनांशी नसलेले संंबंध, अबोलपण, तुसडेपण, भांडखोर वृत्ती, तुच्छतावाद, एकारलेपण,आत्ममग्नता आणि वैचारिक, धार्मिक, जातीय वा वर्गीय अहंता ही देखील त्याची कारणे असतात. ’मी आणि माझे कुंपण’ ही वृत्ती, वैराग्य, संन्यस्तपण, अनभ्यस्त वृत्ती किंवा स्वयंभूपणा ही देखील त्या वृत्तीची कारणे असू शकतात. कारणे सांगता येतील, त्यात आणखीही काहींची भर घालता येईल मात्र त्याच्या स्वरूपाचे खरे ज्ञान अज्ञातच असेल.

’एकाकीपण आहे, ते जाणवते पण ते का व नक्की कशामुळे हे सांगता येत नाही.’ अशी उत्तरे अनेकांकडून ऐकली. जे सार्‍यांच्या वाट्याला येते त्याविषयीची एवढी अनभिज्ञता का आणि त्या विषयीचे औदासीन्य तरी कशामुळे, हा मग प्रश्न येतो. आपण खूपदा आपल्याशी जराही संबंध नसणार्‍या गोष्टींची चर्चा करतो. त्यात रमतो. पण ज्या गोष्टी आपल्या आहेत, सोबत आहेत, छळत किंवा खुलवत आहेत त्यांच्याच बाबतचे हे अनभ्यस्तपण कसे? की ते तसेच आपण गृहीत धरले असते? अशावेळी मनात येते, त्या ग्रेलिंगने त्याच्या हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफीत सॉक्रेटिसबाबत विचारलेला प्रश्नच महत्त्वाचा मानायचा काय?  ’जे असल्याचे कळते, जे अनुभवाला येते, दिसले की ओळखता येते त्याची व्याख्याचं कशाला करायला हवी?’ सॉक्रेटिसच्या प्रश्नावलीबाबतचा ग्रेलिंगचा हा आक्षेप खराही आहे. मात्र तेवढ्यावर थांबले की संशोधन व शोधकताच संपते. जे कळले त्यावरच समाधान मानले जाते. प्रश्नाच्या मुळापर्यंत जाण्याची तयारी व वृत्तीच संपते. शास्त्रे अशी थांबली तर प्रगतीच संपते व खुंटते. त्यामुळे सॉक्रेटिसची प्रश्नावली कितीही नाकारली तरी तीच अखेरच्या खरेपणापर्यंत नेणारी असते. त्यामुळे प्रश्न थांबविणे हा त्याचे उत्तर देण्याचा मार्ग ठरत नाही. उत्तर सापडेपर्यंत त्याचा शोध घेतच राहणे त्यामुळे भाग असते. श्रद्धावानांना त्यांची उत्तरे ईश्वराच्या चरणी सापडतात. तर्ककर्त्यांना ईश्वर वा त्याचे चरण याच गोष्टी अमान्य असतात आणि जग तर्कानेच पुढे जाणार असते.

शिवाय जे जाणवते व प्रत्यक्ष अनुभवाला येते, त्याचे खरे स्वरूप वा कारण सापडत नाही म्हणून ते नाकारायचे ठरविले तर त्याच तर्काने ईश्वराचे वा वैश्विक शक्तीचे अस्तित्वही नाकारावे लागते. जे आहे, इंद्रियगोचर आहे ते सत्य समजण्याची पाश्चात्त्य व ग्रीक तत्त्वज्ञांची मांडणी स्वीकारली की एकाकीपण हे दीर्घकाळ अनुभवाला येणारे वा अखेरपर्यंत सोबत करणारे वास्तव ठरते. ते प्रसंगी अल्पकालीन वा दीर्घकालीनही असते. कधीकधी काहींच्या वाट्याला ते कायमचे आलेलेही असू शकते. त्या स्थितीत तेच त्याचे सत्यस्वरूपही ठरते. बाकीच्या काळात येणारे अनुभव याच मग तात्कालिक बाबी ठरतात. हे पचायला व समजून घ्यायला अवघड आहे. पण मग त्यासाठी दुसरी उत्तरेही खरी ठरत नाहीत.

तरीही माणसे राहतात. आपण जगत असतो. खर्‍या वा खोट्या आधारानिशी व समाजानिशी. सोबती असतात, मैत्र असते, नाती असतात, व जाती-धर्मही असतात पण त्यांचे दूरस्थपणही असते. समाजासाठी जगणे, काही करणे, लढणे याही बाबी असतात. पण त्या व्यक्तीचे एकाकीपण घालवितात काय? आपले कार्य व जबाबदार्‍या संपल्या की याही माणसांपुढे काय वाढून ठेवले असते? नव्या जबाबदार्‍यांचा शोध वा मागोवा की झाले तेवढे पुरे असे समजण्याची वृत्ती? आस्तिक वृत्तीची माणसे ईश्वरसत्य मानतात पण त्या ईश्वराजवळ जाण्याची आकांक्षा धरून श्रद्धा, धारणा व तपश्चर्या यांच्या मार्गाने जाणारी माणसेही आप्तांपासून दूर जातच असतात. ईश्वराजवळ जायचे तेही आपली माणसे सोडूनच हे खरे असेल तर त्या अंतिम शक्तीलाही हे जडजगत् व आप्तजन अमान्य आहेत असेच मानायचे काय? तिकडे जाणारी माणसे आप्तस्वकीयांपासून तुटतात तेव्हा ती त्यांच्या इप्सिताला तरी गाठतात काय? की ती तशी दोन्हीकडून तुटलेलीच असतात? त्या तुटलेपणालाच ती पूर्णत्व वा आत्मस्वरूप मानत असतील तर ती ईश्वरमग्न असतात की आत्ममग्न? श्रद्धेय की दयनीय?

अशावेळी आपल्या श्रद्धा आड येतात. एवढ्या वर पोहोचलेल्या व्यक्तीला आत्ममग्न वा दयनीय कसे म्हणायेच? मग त्याविषयीचा विचार एकदम बाजूला सारूनच माणसे वेगळा विचार करू लागतात. त्या व्यक्तीला तुम्ही खरोखरीच तिथवर पोहोचलात काय, असे विचारणे हेच मग पातक ठरते. त्यापेक्षा ती व्यक्ती सांगते वा मानते तेच खरे मानून वा त्याकडे दुर्लक्ष करून राहणे हेच सार्‍यांना हिताचे असते. प्रत्यक्ष त्या व्यक्तीचे ’असणे’ हाच मग त्यापुढचा प्रश्न राहतो. ’तुझे आहे तुजपाशी’ मधला आचार्य जसा खरा असतो आणि नसतोही तशीच ही स्थिती आहे. जगतो कोण? आचार्य की काकाजी? त्यातले खरेपण कोणाचे आणि आव आणणे कोणाचे? ’तुम्ही एवढ्या ईश्वरार्पणाच्या कथा सांगत असता, तुमच्यावर सारा महाराष्ट्र श्रद्धा ठेवतो, तरी तुम्हाला अध्यात्माचा स्पर्श झालेला कोणी आजवर भेटला काय?’ हा प्रश्न प्रस्तुत लेखकाने एका महाराष्ट्रव्यापी महंताला विचारला. बराच विचार करून तो निराशेने म्हणाला, ’नाही.’ ’तुम्हाला तो सापडला नसेल तर मग आम्हा मर्त्य माणसांना तो कसा दिसायचा?’ असे त्याला काहीशा संकोचाने विचारले तेव्हा तो म्हणाला, ’याचे उत्तर मी तरी कसे देणार?..’ तात्पर्य हा साराच अनुत्तरित राहणारा किंवा उत्तरच नसणारा प्रकार आहे.

अगदी आद्यशंकराचार्यांची गोष्ट घेतली तरी सारे ज्ञान प्राप्त करून परतणार्‍या त्या महापुरुषाला एका चांडाळाच्या पायाशी शरण जावे लागले होते. एवढे ज्ञान प्राप्त केल्यानंतरही काहीतरी राहूनच गेल्याचे त्या गरीब माणसाने त्या आचार्यांना समजावले होते. त्याही मागे जाऊन वेदांचे संपादन करणार्‍या व्यासांची गोष्ट विचारात घेतली तरी त्यांनाही भीष्माचा शब्द प्रमाण होता आणि भीष्म काय? तो महाज्ञानी असलेला थोर माणूसही आपल्या नातवंड-पंतवंडांसाठी वधू शोधत देशभर लढाया करीत किंवा पैसेच मोजत होता… या पार्श्वभूमीवर वेद रचणारे काही ऋषीमुनी असे की त्यांच्या कहाण्या शिष्टसंमत समाजाने कधी समजूनही घेऊ नयेत. त्यांची चर्चा व नुसते वर्णनेही केवळ अभद्र व अमंगळच नाहीत तर अश्लील व असभ्यही आहेत.

’एकाकीपण सारेच अनुभवतात. मीही अनुभवते’ असे सांगणारी प्रस्तुत लेखकाची एक ज्येष्ठ सहकारी स्त्री म्हणाली, ’ते कंटाळवाणे व प्रसंगी जीवघेणेही असते. पण त्यावर उपाय आहेत. आयुष्याला नवी वळणे (डायव्हर्शन्स) द्यावी लागतात. ती शोधावी लागतात. त्यावरून काही काळ चालले की एकाकीपण विसरता येते.’ जरा वेळाने ती म्हणाली, ’प्रसंगी ही वळणेही अधिक आकर्षक व देखणी वाटू लागतात…’ ’पण ती आवडू लागली आणि त्यांचाच मोह जडला तर महामार्ग विस्मृतीत जाऊन संपतो काय?’ या प्रश्नावर ती म्हणाली, ’नाही. तो मनाच्या पार्श्वभूमीवर सतत असतोच. आणि आताचे हे वळण अल्पकाळाचे आहे व फिरून पुन्हा त्याच एकाकी महामार्गावरून चालणे आहे हेही लक्षात येते… मात्र काही माणसे सारे आयुष्यच या वळणांवर काढतात. त्यातच रमतात, जगतात आणि त्याचीच चित्रे मनात घेऊन जगाचा निरोप घेतात. त्यांना काय म्हणायचे, ज्ञानी, अज्ञानी की पळवाटा शोधणारे?’ या प्रश्नावर आम्ही दोघांनीही एकदमच म्हटले, ’तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना अडाणी वा पळवाटा शोधणारे म्हणणारे आपण कोण होतो?’ अखेर तीही आपल्यासारखीच माणसे असतात. सुख आणि आनंद शोधण्याचा अधिकार सार्‍यांनाच आहे. अगदी वंचितांनाही तो हवाच आहे. ज्ञानी माणसांचा तो एकाधिकार नाही. उलट खूपदा ही ज्ञानी माणसेच सदैव सचिंत व चिंतामग्न दिसतात.

एकाकीपणाला व्यक्तीचे वेगळेपणही (युनिकनेस) कारण ठरत असावे. एक माणूस दुसर्‍यासारखा नसतो. त्याचे मन, मनोव्यापार, विचार, विकार आणि क्षमता या सार्‍याच गोष्टी वेगळ्या असतात. साऱ्या भावा बहिणीत हे वेगळेपण आढळते. मुलेही त्यांच्या आई-वडिलांसारखीच निपजतात असे नाही. आपण वेगळे आहोत ही भावना कधीतरी मनात घर करते व ती व्यक्तीला एकाकी व एकटे करीत असते हे पुन्हा आईनस्टाईच्या प्रकाशाच्या सिद्धांतासारखेच आहे. प्रकाशाचा प्रत्येक कण (क्वांटा) वेगळा असतो. त्यात एकजीविता नसते. माणसे जन्मतः सारखी असली तरी काही काळातच त्यांना त्यांचे वेगळेपण कळू लागते. हे वेगळेपण नेहमी संस्कारातूनच येते असे नाही. ते तिचे स्वतःचेही असते. आईन्स्टाईनला त्याच्या वयाच्या तिसर्‍या वर्षी मारिया ही बहीण झाली. ती त्याला खेळण्यासारखी वाटली. तो आईला म्हणाला, ’पण हिला चाकं कुठे आहेत?’ जॉन केनेडीच्या मुलीने पहिला शब्द उच्चारला, तो होता ’एरोप्लेन..’ कदाचित आपले वेगळेपण सोडत जाऊन सभोवतीचे सारे समजू लागले तर व्यक्ती आणखी प्रगल्भ होईल व तिला स्वतः एवढेच इतरांचेही वेगळेपण कळू शकेल. दुर्दैवाने स्वतःच्या शोधात न रमता माणसे इतरांच्याच भानगडीत अधिक रमतात. ते बदलणे गरजेचे आहे.

सूर्य एकाकी व एकटाच असतो. त्याच्या भोवती प्रकाशाच्या कळा असतात. त्या कळांमध्येच एक काळी कडाही असते. ती आभासमय असली तरी असतेच. ती आभासी कडा भेदून प्रत्यक्ष सूर्यदर्शन घडणे हे आत्मदर्शनासारखे असेल काय? की या काळ्या कडेचे खरेपणच आपल्यातील एकाकीपणाचे कडे अधिक मजबूत व घट्ट करीत असेल? कारण ती कडाही सूर्याचीच साथ देते. दर दिवशी ती जात नाही. डोळ्यांना दिसते म्हणून ती आभासीही म्हणता येत नाही. तशा तर त्याच्या प्रकाशाच्या कडाही आभासीच असतात. ज्ञानाच्या व आकलनाच्या कडांचेही असेच होत असेल काय? या कडा आभासी कशा म्हणता येतील? कारण त्या दर क्षणी विस्तारतातही. प्रसंगी लहान होतात. पण लोप मात्र पावत नाहीत.

एरिक फ्रॉम हा सामाजिक मानसशास्त्रज्ञ या संदर्भात एक वेगळेच प्रमेय मांडतो. त्याचा ’फिअर ऑफ फ्रिडम’ हा ग्रंथ सर्वज्ञात आहे. तो म्हणतो, ’माणसांना स्वातंत्र्याहून सुरक्षितताच अधिक हवी असते.’ स्वातंत्र्यात प्रत्येक निर्णय स्वतःला घ्यावा लागतो आणि त्याची जबाबदारीही स्वीकारावी लागते. ती येणे नको म्हणून स्वातंत्र्यच नको अशी ही भूमिका आहे. आपल्यासाठी दुसरे कोणी निर्णय व त्याची जबाबदारी घेत असतील तर ते त्यांना हवे असते. सबब सुरक्षितता हीच माणसाची पहिली निवड… ही सबब व्यक्तीला जन्मापासून जडली असते. जन्माला येणारे मूल एका क्षणात, एका स्वस्थ व अंधार्‍या एकांतातून अस्वस्थ व प्रकाशमान समूहात येते. तो त्याला बसलेला पहिला धक्का असतो. त्यातून सावरायला त्याला बरेच दिवस लागतात. गर्भावस्थेतले सुरक्षित व एकांत आयुष्यच तेव्हा त्याला हवे असते. त्याचमुळे मूल लहानपणी आपल्या आईच्या अंगाअंगाशी राहते. शक्यतोवर तिला लगटून व तिच्या जवळ. ही मूळची एकाकी पण सुरक्षित स्थिती. ही स्थिती माणसे आयुष्यभर मनात ठेवतात. बाहेर कितीही स्वतंत्र वा दमदार दिसत असली तरी त्यांना सुरक्षिततेचे असणारे हे आकर्षण कायम असते. ते दडलेले वा दडवलेले असेल पण ते कायमस्वरूपी त्यांना चिकटले असते. जन्मापासून मृत्यूपर्यंत. हे एकाकीपणच त्यांना इतरांपासून दूर व स्वतःत मग्न ठेवत असते. स्त्रीदेहाविषयीचे पुरुषाचे आणि पुरुषाच्या शरीराविषयीचे स्त्रीचे आकर्षणही अशाच संरक्षक आश्वासनाचे असते. भांबावलेली माणसे कशाचा आधार घेतात? घराचा, घरातल्या माणसांचा, पत्नीचा, आईचा, ईश्वराचा वा मंदिराचा. जेथे आश्वस्त वाटेल त्या जागेचा वा तशा माणसांच्या सोबतीचा. एकाकीपणाचा हा प्रकार काहीसा दयनीय वाटत असला तरी तो खरा आहे आणि अतिशय सामर्थ्यवान वाटणार्‍या वा दिसणार्‍या माणसालाही तो हवा असणारा आहे. एकाकीपण हा काहीसा भीतीदायक विषय असल्याचीही ही कबुली आहे. एरिक फ्रॉमचं हे पुस्तक सार्‍या जगाने वाचले व प्रशंसीले आहे. मात्र ते मनोमन मान्य करणे अनेकांना अवघड वाटले आहे.

ज्यांना स्वतःविषयीचा कमालीचा आत्मविश्वास वाटतो व जी माणसे कमालीची आत्माभिमानी दिसतात तीही व्यक्तिगत सुरक्षेबाबत सदैव जागरूक असतात. त्या सुरक्षेविषयीच्या विश्वासातूनच त्यांचा आत्मविश्वास येत असावा. सत्ता, सरकार, राज्य, पोलिस, कुटुंबाचा कर्ता माणूस, समाजाचे व राजकारणाचे नेते नेमकी हीच संरक्षकाची भूमिका वठवितात. हेन्केन हा अमेरिकन पत्रकार तर म्हणतो, ’तुम्हाला सार्‍यांपासून भय आहे. त्यातून मीच तुम्हाला वाचवू शकतो अशी समाजाची धारणा करून देणे याचेच नाव राजकारण.’

याचा अर्थ भय हे एकच एकाकीपणाचे कारण मात्र नाही. ते असंख्य कारणांपैकी एक आहे. घरची माणसे बाहेर गेली तरी, नोकर वेळेवर आला नाही तरी फार कशाला, घरचे नेहमीचे कुत्रे दिसेनासे तरी ते येते. भीतीला जेवढी कारणे लागतात व असतात तेवढीच किंबहुना त्याहून अधिक एकाकीपणालाही असतात. ती सतत नवनवी येत असतात. वयमानपरत्वे बदलतही असतात. घरची तरुण मुलगी वेळेपूर्वी घरी परतली नाही तरी भीती व एकाकीपण दाटून येेते. मध्यमवर्गातली अनेक कुटुंबे अशा मुलींना दुपारची ती बाहेर पडली तरी त्याविषयीची चौकशी व विचारणा करीत असतात. विदेशातील, दूरगावच्या मुलांच्या काळजीचीही कारणे असतात. माणसांना भीती एकटेपणाचीही वाटते आणि कधीकधी तिची कारणेही त्यांना नीट सांगता येत नाहीत. एकाकीपण याहून वेगळे नसते.

आपल्या अस्तित्वाची होत जाणारी जाणीव (याला आत्मभान वा आत्मप्रचिती अशी मोठी नावेही देता येतील.) ही माणसांना त्यांची उंची व व्यक्तिमत्त्व देत इतरांपासून दूर करते काय? इतरांपासूनचे आपले वेगळेपण व इतरांचेही वेगळेपण त्यांना ती जाणवून देते काय? स्वतः कोण हे कळखेरीज इतरांचीही ओळख कशी पटणार? तशी ती न पटतानाच त्यांच्याशी संबंध ठेवणे हे त्यांना गृहीत धरण्याजोगे असते. व्यक्तीचे आत्मभानही जरा काळजीने पाहावे असे आहे. खूपदा अहंता, फुशारकी वा खोटा आत्मविश्वासही अनेकांना आत्मभानासारखा वाटतो. आलेल्या अनुभवाने आपली उंची व प्रगल्भता वाढविली काय या निकषावर त्याचे परीक्षा करायची असते. ही परीक्षा दुसरे कोणी करीत नाही वा ती करायला धजावतही नाही. ती स्वतःच करायची असते. येथे एक गमतीशीर पण थोर उदाहरण नोंदविण्याजोगे- ’बाहेरच्या कोणाचीही मदत न घेता एकाकीपण जगत असताना केवळ तर्काच्या बळावर आपण सत्याचा शोध घेऊ शकतो याची जाण मला वयाच्या बाराव्या वर्षी आली, तेव्हा मी आनंद व आश्चर्याने फुलून गेलो.’ अशी आठवण आइन्स्टाईनने लिहून ठेवली आहे. आत्मप्रत्यय वा आत्मभान असे आइन्स्टाईनसारखे असेल तर ते खरे. अन्यथा त्याची सत्यासत्यता वा फोलपणाच लक्षात घ्यायचा असतो. माणसे मग अज्ञानात जगतात, आनंदात राहतात. पण ते जगणे वागणे पोकळ असते. ते त्यांच्याखेरीज इतरांना कळते व ते इतरांच्या दयेचे विषय होतात.

तात्पर्य आपलेच एकाकीपण आपल्या जवळ असताना त्याचा शोध घेऊन त्याच्यापर्यंत जाता येणे ही गोष्ट साधी नाही. आत्मशोध जेवढा अवघड असेल वा असावा तेवढेच हे प्रकरणही अवघड आहे. खूप गोष्टी बाजूला साराव्या लागतात. अनेक विषय नाकारावे लागतात व त्यातल्या काही तर आपल्या नव्हेच हे लक्षात घेऊन त्या कठोरपणे या शोधाला लागावे लागते.

(लेखक नामवंत संपादक व विचारवंत आहेत)

9822471646

हे सुद्धा नक्की वाचा-

१.एकाकीपणावर मात… http://bit.ly/2UAwp42

२.जगन्मिथ्या म्हणजे तरी काय? http://bit.ly/2MDdy3J

३. एकाकीपणाशी मैत्र… http://bit.ly/2EI5eLE  

४. एकाकीपणाचे पिशाच!- http://bit.ly/2OPFa7a

 

Previous article‘थर्मल स्कॅनिंग’ म्हणजे नेमकं काय?
Next articleराधाबाई बुधगावकर नाट्य संच: रंजन-प्रबोधनाची विलक्षण कहाणी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here