‘थर्मल स्कॅनिंग’ म्हणजे नेमकं काय?

-नितीन पखाले

आपल्या देशात कोरोनाने प्रवेश केल्यापासून ‘थर्मल स्कॅनिंग’ हा शब्द सतत आपल्या कानांवर आदळत आहे. ‘कोरोनाच्या अनुषंगाने विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रवाशांची तपासणी’, असे आपण या काळात बरेचदा वाचले, पाहिले, ऐकले असेल. कोरोना विषाणूने भारतात पाय ठेवल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणे होत असलेल्या दिल्ली, मुंबई, कोलकतासह अनेक विमानतळांवर आधुनिक थर्मल स्कॅनर लावले. पण थर्मल स्कॅनर काय आहे, त्याद्वारे तपासणी कशी केली जाते, आदी प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात असतील,. थर्मल म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर साधारणत: औष्णीक वीज केंद्र वगैरे येतात. थोडक्यात थर्मल स्कॅनिंग ही आपल्या शरीरातील उष्णतेसंबंधीची चाचणी आहे. हा थर्मल स्कॅनर ‘इन्फ्रारेड थर्मोग्राफी’ ( विद्युत चुंबकीय किरणांचा उपयोग करून शरीरातील निरनिराळ्या भागात किती उष्णता उत्पन्न होते याचे मूल्यमापन करणे) च्या माध्यमातून काम करतो. ‘इन्फ्रारेड थर्मोग्राफी’ एक डिजिटल प्रतिमा तयार करते आणि आपल्या शरीरातील तापमानाची नोंद दाखविते. ४० अंश डिग्रीपासून ५०० अंश डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद यावर होते. व्यक्तीच्या शरीरातील तापमान जसे जसे बदलते त्या पद्धतीने थर्मल प्रतिमेचे रंग बदलत जातात. अनेक संयंत्रांमध्ये रंगाच्या पद्धतीशिवाय मानवी शरीरातील तापमानसुद्धा किती आहे, ते दिसते. एखाद्या वक्तीच्या शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा अधिक झाले तर या स्कॅनरवर ‘बीप’च्या माध्यमातून संकेतही दिले जातात.

साधारणपणे आपल्याकडे विमानतळांवर थर्मल स्कॅनर आढळतात. पण अलिकडे मोठे मॉल, चित्रपटगृहात प्रवेश करण्यापूर्वीही व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग केले जाते. आपण ताप मोजायला ‘थर्मामीटर’ वापरतो. तो जिभेखाली किंवा काखेत मिनिटभर ठेवून शरीराच्या तापमानाची नोंद घेतो. पूर्वी पारा असलेले थर्मामीटर असायचे. अलिकडे डिजिटल थर्मामीटर आलेत. त्याहीपुढे जाऊन हे थर्मल स्कॅनर आले आहेत. त्यातलाच प्रकार आपण हल्ली बघतो तो, थर्मल गन. ही गन काही इंच दुरून आपल्या कपाळावर धरली जाते आणि काही सेकंदातच आपल्या शरीराचे तापमान किती आहे, हे त्यातील इन्फ्रारेड स्क्रीनवर उमटते. हीच प्रक्रिया अधिक सविस्तरपणे शरीराचे स्कॅनिंग करून ज्यात केली जाते ते थर्मल स्कॅनिंग. तर, एखादा व्यक्ती जेव्हा या स्कॅनर समोर उभा राहतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरात असलेले विषाणू शरीराच्या तापमानासह स्कॅनिंग होतात आणि ते इन्फ्रारेड चित्रांद्वारे दिसतात. ज्यांच्या शरीरात विषाणूंची संख्या सामान्यपेक्षा अधिक आढळते तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीराचे तापमानही वाढलेले असते. अशा लोकांना वेगळे काढून त्यांची अधिक बारकाईने तपासणी केली जाते. थर्मर स्कॅनिंगद्वारे माणसाच्या त्वचेच्या पातळीवरचे तापमान घेतले जाते.

सध्या कोरोना संसर्गात हे थर्मल स्कॅनर आपल्या अधिक परिचयाचे झाले असले तरी त्याचा वापर ताप, सार्सची लक्षणं आणि एव्हियन इन्फ्लुएंझा आदी बिमारींचा शोध घेण्यासाठी केला जातो.  कोरोनाबाधित, संशयित रूग्णांचा शोध घेण्यासाठी थर्मल स्कॅनिंग हा सहज उपलब्ध असलेला, स्वस्त आणि विश्वसनीय पर्याय ठरला आहे. मात्र अशा पद्धतीने स्कॅनिंग केले तरी संबंधिताच्या घशातील लाळीचा नमूना (थ्रोट स्वॅब) व नाकातील द्रवाचा नमूना घेऊन विशिष्ट तपासण्या केल्याशिवाय व्यक्तीस खरोखरेच कोरोना संसर्ग झालेला आहे की नाही, हे बघितले जाते. त्यामुळे थर्मल स्कॅनिंग हे कोरोना संसर्गाच्या प्रवासातील पथदर्शी टप्पा आहे, असे म्हणता येईल.

‘करोना’ लढ्यात डिजिटल प्लॅटफॉर्मची महत्वाची भूमिका

जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक देशात विविध उपाययोजना सुरू आहेत. भारतीय जनेतचा उत्साह, अज्ञान, अंधश्रद्धा, गरज नसताना घराबाहेर पडण्याची ऊर्मी, टाळेबंदीनंतर आहे तिथेच थांबा, हा आदेश पायदळी तुडवून गर्दी करण्याचा आगाऊपणा… अशा अनेक गोष्टी आपल्या देशात दररोज घडत आहे. याचे दुष्परिणाम कोरोना संसर्गाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानंतर आपल्या जवळचे कोणी मरेल तेव्हा लक्षात येईल बहुधा; पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. अशा विपरित स्थितीत कोरोनाशी दोन हात करण्यासाठी ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ आपल्याकरीता अतिशय महत्वाचा ठरतोय. आता तर केंद्र शासनानेही यावर शिक्कामोर्तब केले आहे. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रत्येक महानगरात, नगरपालिका क्षेत्रात उपलब्ध असलेल्या ‘स्मार्ट, डिजिटल’ सुविधांचा वापर करावा, असे निर्देशच केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने राज्यांना दिले आहे. या डिजिटल उपाययोजनांच्या आधारे भारतात तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर असलेला कोरोना संसर्ग रोखण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास केंद्र सरकारला आहे.

देशात सुरू असलेली टाळेबंदी (लॉकडाऊन किंवा लॉकआऊट) आणि अत्यावश्यक सेवांसाठी निर्माण झालेला मनुष्यबळाचा अभाव पाहता ‘स्मार्ट सिटी’साठी करण्यात आलेल्या विविध तंत्रस्नेही उपयांचा वापर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी होणार हे निश्चित. प्रत्येक शहरात गृह विभागाच्या अख्यत्यारित सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे. गुन्ह्यांच्या तपासात सीसीटिव्ही फुटेज महत्वाचा आधार असतो. सध्या करानोच्या अनुषंगाने सुरू असलेल्या टाळेबंदी दरम्यान शहरात विविध भागात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हींद्वारे नियमभंग करून विनाकारण बाहेर पडणाऱ्या जनतेच्या हालचाली टिपणे शक्य आहे. सीसीटिव्हीद्वारे अशा गर्दीच्या ठिकाणी वॉच ठेवून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लगेच कारवाई करणे, गर्दी नियंत्रणात आणणे शक्य आहे. या उपायांच्या जोडीला ‘ड्रोन’ कॅमेऱ्यांचा वापरही समोर आला आहे. अनेक शहरांमध्ये तर या कॅमेऱ्यांचा प्रत्यक्ष वापर करून उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. सोबतच परदेशातून व बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाकडे उपलब्ध आहे. अशा नागरिकांना प्रशासनाने ‘होम क्वारंटाईन’ केले आहे.

मात्र १४ दिवसांच्या गृह निरीक्षणात असतानाही या व्यक्ती घरातच राहतील याची शाश्वती नाही. या अनुषंगाने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ‘गुगल टॉयलेट लोकेटर’ हा प्रकार अस्तित्वात आहे. यात शहरातील सार्वजनिक शौचालये, प्रसाधनगृहांची माहिती ऑनलाईन मिळते. याच पद्धतीचा वापर करून कोरोना संशयित व्यक्तींचे लोकेशन गुगल सेवेस ऑनलाईन टॅग करून त्यांच्या सतत संपर्कात राहता येवू शकते. अशा व्यक्तींची १४ दिवसांची गृह निगराणी संपली की, योग्य आरोग्य तपासणीअंती त्यांना ‘अनटॅग’ करता येईल. हा पर्याय केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाच्या सचिवांनी नुकत्याच घेतलेल्या ‘व्हीसी’ मधून पुढे आला.  तसेच संशयित व गृह निरीक्षणातील व्यक्तीच्या मोबाईलवरील ‘जीपीएस’ यंत्रणा २४ तास कार्यान्वित ठेवण्याचे आदेश देवून प्रशासनाने त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, असाही एक पर्याय आहे. अशा संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने काही अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी आणि गृह निरीक्षणात असणाऱ्यांना दिवसातून तीनवेळा ‘व्हिडिओ कॉल’ करून ते घरातच असल्याची खातरजमा त्यांच्याकडून करून घ्यावी. या उपायांमुळे गृह निरीक्षणात असलेले नागरिक घराबाहेर पडण्याची व कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता कमी होईल, हे नक्की.

महानगरपालिका, नगर पालिकांमध्ये या स्मार्ट उपाययोजनांचा अवलंब करून कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांवर आलेला ताण बऱ्यापैकी कमी करता येईल. शिवाय कोरोना संशयितांना प्रशासनाचे आपल्यावर प्रत्यक्ष लक्ष आहे, याची जाणीव होऊन ते घराबाहेर पडणारच नाहीत, असा कयास आहे. तसेच कमी मनुष्यबळात डिजिटल यंत्रणांचा वापर मोठ्या स्तरावर होऊन कोरोना संसर्ग पसरण्यास प्रतिबंध घालता येईल, असे अनुमान हे डिजिटल प्लॅटफॉर्म वापरण्यामागे काढण्यात येत आहे. अर्थात या स्मार्ट डिजिटल उपायांचा वापर करून संशयित नागरिकांवर लक्ष ठेवणे, त्यांची टेहाळणी करणे ही बाब नियमाने अनेकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालणारी ठरू शकते. याचाही विचार या सुविधांचा वापर करण्यापूर्वी नक्कीच होत आहे.  कोरोनाचा संसर्ग तिसऱ्या टप्प्यात गुणात्मक वाढतो. यात परदेशात जाऊन आलेल्या, प्रत्यक्ष त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच नव्हे; तर सर्वसाधारणपणे कोणालाही संसर्ग होण्याची शक्यात कितीतरी पट अधिक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून नागरिक घराबाहेर पडणार नाही, हाच खात्रीशीर उपाय आहे.

इटली, स्पेन, अमेरिका या प्रगत देशातील भयाण आणि स्मशान वास्तव दररोज बघत असुनही आपल्या देशातील नागरिक अजूनही कृतीशील बोध घ्यायला तयार नाहीत, ही आपली सार्वजनिक शोकांतिका आहे. दोन रूपयांच्या कोथिंबिरीसाठी अनेक महाभाग घराबाहेर पडून दोन तास शहरात, गावात फेरफटका मारून टाळेबंदीचा भाजीपाला करीत आहे. गरज नसताना घराबाहेर पडणाऱ्या  अशा निर्लज्ज लोकांचा हा फेरफटका आपल्याला नरकयातानांकडे घेऊन जात आहे. त्यामुळे सार्वजनिक हितासाठी परिस्थितीवर, संशयितांवर स्मार्ट वॉच ठेवून, डिजिटल यंत्रणांचा वापर करून कोरोना संसर्गाला आळा घालणे, हेच आपण जिवंत राहण्यासाठी आज तरी गरजेचे आहे. तरच आपण या जैविक युद्धात विजयी होवू!

(लेखक लोकसत्तेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)

९४०३४०२४०१

Previous article‘द प्लॅटफॉर्म’: माणसामाणसातील उतरंडीचे भयानक अनुभव मांडणारा चित्रपट
Next articleएकाकीपणाच्या मुळाचा अवघड शोध
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.