‘द प्लॅटफॉर्म’: माणसामाणसातील उतरंडीचे भयानक अनुभव मांडणारा चित्रपट

-सानिया भालेराव

नुकताच नेटफ्लिक्सवर आलेला Galder Gaztelu-Urrutia या दिग्दर्शकाचा स्पॅनिश चित्रपट ‘द प्लॅटफॉर्म’ पाहिला आणि काही वर्षांपूर्वी इमाइल दुर्खीम (Émile Durkheim) यांचं ‘डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी’ हे पुस्तक बाबांच्या लायब्ररीतून घेऊन त्यावर मी, आई आणि बाबा आपापलं मत मांडत नेहेमीप्रमाणे वाद घालत बसल्याचं एकदम आठवलं.. याचं कारण म्हणजे.. Eat or be Eaten.. असं या चित्रपटातलं एक एक पात्र म्हणतं.. चित्रपटाची कथा न उलगडता त्याच्या आशयावर लिहिण्याचा हा प्रयत्न कारण कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे सध्याची जी परिस्थिती आहे आपल्या आजूबाजूला, त्या परिस्थितीमध्ये या चित्रपटाची कन्सेप्ट एकदम फिट बसते आणि रोज जेवण नरड्यातून खाली जाताना जी वांझोटी हळहळ आणि कणव मनात दाटून येते, त्या अपराधीपणापासून काही वेळासाठी का होईना स्वतःची मुक्ती करून घेण्याचा हा स्वार्थी प्रयत्न.

तर एक खोल असा खड्डा.व्हर्टिकल प्रिझन असावं असं.. यामध्ये कोणास ठाऊक किती मजले. प्रत्येक मजल्यावर दोन लोक राहतात. वरपासून खालपर्यंत असा एक जेवणाचा प्लॅटफॉर्म दिवसात एका ठराविक वेळेला, अगदी ठराविक काळासाठी प्रत्येक मजल्यावर थांबतो. या प्लॅटफॉर्मवर अत्यंत उत्तम, स्वच्छतेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळून, चविष्ट असे वेगवेगळे खाद्यपदार्थ ठेवले असतात. शून्य ते खालपर्यंत प्रत्येक मजल्यावर हा अन्नाने भरलेला प्लॅटफॉर्म थांबतो. तसं पाहता हा खड्डा म्हणजे एक जेल आहे. इथून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही. जितक्या काळासाठी तुम्ही इथे आहात त्यामध्ये सर्व्हायव्हल हा जिवंत राहण्यासाठीची एकमेव पर्याय. जसं जसं हा प्लॅटफॉर्म खाली सरकतो तसं तसं त्यातलं अन्न कमी होत जातं. वरच्या मजल्यावरच्या लोकांना जे अन्न नको ते खालच्या मजल्यावरच्या लोकांना मिळणार. मग अन्न उष्ट असेल, तोडांत टाकून चव आवडली नाही तर तसंच थुंकून दिलेलं असेल, काही जण त्यातच उलटी करणारे आहेत, काही जण खालच्या मजल्यावरच्या लोकांना चांगलं अन्न मिळू नये म्हणून आपलं झालं की त्या अन्नात लघवी करणारे आहेत.. काही ठराविक मजले झाले की त्यानंतरच्या मजल्यावरच्या लोकांना तर अन्न मिळत सुद्धा नाही. कारण त्यांच्यावरचे लोक अधाशासारखं खातात. आता यात एक ट्विस्ट असतो. प्रत्येक मजल्यावर एक माणूस तीस दिवस राहू शकतो. तीस दिवस संपले की रात्रीतून झोप आणणारा गॅस सोडला जातो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही वेगळ्याच मजल्यावर.कदाचित त्याच किंवा वेगळ्या कैद्यांसोबत. म्हणजे जर तुम्ही ४० नंबरच्या मजल्यावर असाल तर तीस दिवसानंतर तुम्ही चौथ्या मजल्यावर जाऊ शकता किंवा मग २०० व्या मजल्यावर सुद्धा. जितका खालचा मजला तितकं जगणं कठीण. कारण अन्नाचा तुटवडा. अशा या भयानक जागी गोरेंग जो या चित्रपटातला नायक आहे तो जातो आणि आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या आयडिऑलीवर विश्वास ठेवणाऱ्या या माणसाचा प्रवास, बदलणाऱ्या मजल्यागणिक त्याला येणारे भयानक अनुभव आणि त्याचा आयुष्यातल्या वास्तवाशी सामना याची गोष्ट म्हणजे “द प्लॅटफॉर्म”.

Spontaneous solidarity ज्याला आपण उस्फूर्त एकनिष्ठता असं म्हणू शकतो किंवा सजग भावनिष्ठा जिच्यातून एकता निर्माण होते असं सुद्धा म्हणू शकतो या एकतेच्या कॉन्सेप्ट भोवती ही कथा आणि आपलं आजच आयुष्य सुद्धा फिरतं आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वरच्या मजल्यावरचे लोक प्रिव्हिलेज क्लास मधले. समोर सगळं ताट मांडलं असताना भूक लागली आणि अन्न नसलं तर काय होतं ते कळतं का? आणि ते जर माहीत असेल, आणि तसं जगून जर कोणी वर आला असेल तर तो माणूस खाली असणाऱ्यांना अधिक दाबतो की जे त्यांच्या बद्दल अनुकंपा ठेवून त्यांच्यासाठी काही करतो यावर सामाजिक दरीमधलं अंतर वाढणार की कमी होणार हे अवलंबून असतं. बुडाखाली चादर असेल तर आयुष्यातल्या आयडिऑलीजवर खूप भाषणं ठोकता येतात पण गिळायला अन्न नसलं की मग कळतं आपली सद्सद्विवेकबुद्धी शाबूत आहे की नाही ते!

या चित्रपटात सुरवातीला अत्यंत काटेकोरपणे सजवलेला, सर्वोत्तम खाद्यपदार्थांनी भरलेला तो देखणा प्लॅटफॉर्म दर मजल्यागणिक खाली जाताना किती विद्रुप होत जातो हे बघणं म्हणजे दुःस्वप्नापेक्षा भयंकर. अधाश्यासारखं खाणारे, अन्नावर उलट्या, मलविसर्जन करणारे, आणि अगदी तळाच्या मजल्यावर असल्यास आपल्या सोबत असलेल्या कैद्याला मारून त्याचं मांस खाणारे लोक बघताना अनेकदा भडभडून आलं. जगण्यासाठी आपण कदाचित या अशा थराला जाऊ शकतो असा विचार डोक्यात आला आणि आतून प्रचंड घाबरायला झालं. मृत शरीरातल्या झालेल्या अळ्या खाऊन जगणं, दुसऱ्याला मारून स्वतःचा बचाव करणं हे असं इतकं विखारी वागू शकतो का माणूस? यातलं का हे गळून पडतं हळूहळू.. गोरेंगला वाटत असतं की जर वरच्या मजल्यावरच्या माणसांनी त्यांना गरज आहे तितकच खाल्लं आणि खालच्या मजल्यावरच्या माणसाचा विचार केला तर अगदी तळाच्या मजल्यावर असलेल्या माणसांना सुद्धा अन्न व्यवस्थितपणे मिळू शकतं.. पण मजले किती आहेत हे माहित नाही, अन्न तितकं पुरेल हे सुद्धा माहित नाही आणि सगळे जण हा असा विचार करतील हे सुद्धा माहित नाही.. आणि हे माहित नसणं.. हेच वास्तव…

आज मी हे लिहिते आहे लॉकडाऊनमध्ये असताना. घरामध्ये दोन वेळेस जेवता येईल इतकं अन्न आहे. घरी बसून बोअर होतंय किंवा घरी आहे तर वेळ मिळतोय आवडत्या गोष्टी करायला असं आपल्याला म्हणता येतंय हा किती मोठा प्रिव्हिलेज आहे आपल्यासाठी याची जाणीव होते आहे का? मला आहे का ही जाणीव असं चाचपडून बघावंसं वाटतं आहे? माझ्या जवळच्या माणसांना काही होऊ नये ही काय ती माझी पांढरपेशी भीती आणि काळजी. स्वतःची लाज वाटायला लागली आहे. हातावर पोट असणारे हजारो लोक, ज्यांना आज राहायला जागा सुद्धा नाहीये, स्थलांतरित मजूर जे झुंबड करून आपापल्या गावी जाऊ पाहता आहेत.. त्यांना मी घरी बसून शिव्या देते आहे. या लोकांना अकला नाहीयेत का? हे घरी बसू शकत नाहीत का काही दिवस? हे लोक कोरोना पसरवत आहेत आणि असं काय काय मी म्हणते आहे.. हातातल्या चहाचे घुटके घेत आणि नफीजचे टोस्ट मिळाले असते तर बरं झालं असतं.. हे टोस्ट इतके छान नाहीत अशी कुरकर करत.. स्वतःला एक सणसणीत थोबाडीत ठेवून द्यायची उर्मी उफाळून वर येते आहे पण माझी खोटारडी संवेदनशीलता या लेखणीचा आधार घेऊन मी पाजळते आहे आणि स्वतःला स्वतःच्या नजरेत जरा बर भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करू पाहते आहे.

माझ्यापेक्षा खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांचा मी विचार करणार आहे का कधी? माझ्यावरचे माझा विचार करत नाही मग मी कशाला माझ्या खालच्या लोकांचा विचार करू हे असंच आपण जगत राहिलो तर ही दरी वाढत जाणार.. “The test of our progress is not whether we add more to the abundance of those who have much; it is whether we provide enough for those who have too little.” असा कोट आहे फ्रॅंकलिन रुझवेल्ट यांचा. हे जे चालू आहे तसंच चालू राहिलं तर उद्या आपल्या खालच्या मजल्यावर राहणारे लोक आपल्या घरात शिरले आणि त्यांनी आपल्याकडे असलेलं ओरबाडून नेलं तर त्यांना चूक किंवा गुन्हेगार ठरवण्याचा हक्क आपल्याला आहे का खरंच हा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपण आपल्या स्वार्थी आणि अप्पलपोट्या वागण्याने आपलं स्वतःच आणि पुढच्या पिढयांचं भवितव्य ठरवत आहोत. सगळ्यांना पोटभर मिळेल असं नाही पाहिलं तर ज्यांना कमी पडतं आहे त्यांनी ज्यांच्याकडे ओसंडून वाहतं आहे, वाया जातं आहे.. त्यांच्याकडे जाऊन ते हिसकावून घेतलं तर आपल्या कमकुवत नैतिकतेच्या पट्ट्या लावून लगेच त्यांना नावं ठेवणाऱ्या हरामखोर समाजाला वेळेस अक्कल येणं गरजेचं आहे. आपण जिथे आहोत, ज्या परिस्थितीमध्ये आहोत तिथून जे शक्य असेल ते केलं पाहिजे. केलेलं अन्न वाया जाऊ नये इथपासून ते भुकेल्या पोटाला अन्न मिळावं इथपर्यंत.. जमेल ते.. जमेल तसं.. आपण आहोत त्या मजल्यावर निदान शांत झोप यावी या स्वार्थी हेतूने का होईना.. पण हे करायला हवं.. आत्तापासून.. या क्षणापासून.. कारण बदल हा एकदम घडत नसतो.. तो हळहळू घडतो आणि त्यासाठी बदलावी लागते ती मानसिकता.. निदान स्वतःला आरशामध्ये पाहताना थोडी लाज कमी वाटेल.. आज आपण बदलू.. उद्या निदान अजून काही लोक बदलतील..मजला कोणताही असो पण आपल्यामधली चांगुलपणा आणि माणुसकी टिकून राहो हीच आशा..

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )
[email protected]

Previous articleकोरोनापासून बचाव करणारे ‘पीपीई कीट’
Next article‘थर्मल स्कॅनिंग’ म्हणजे नेमकं काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.