सेवाग्राम. कर्तव्य, सत्यनिष्ठा आणि अनुशासनाचा संदेश ज्या ठिकाणाहून अवघ्या भारतभर पसरला ते चिमुकले गाव. या गावाने देशाला अद्भुत अन् मंतरलेले क्षण दिले. अहिंसेचा महामंत्र दिला आणि स्वातंत्र्यसूर्याचे दर्शनही घडविले. ग्रामस्वराज्याची चळवळ याच भूमीतून संक्रमित झाली. स्वावलंबनाचा हुंकार निनादला तो याच परिसरातून. सेवाव्रताचा हिरिरीने पुरस्कार करीत सर्वसामान्यांचे आत्मबळ जागृत करणारा प्रदेश हाच. जगन्मान्यता मिळविलेल्या एका महात्म्याच्या साध्या-सोप्या वास्तव्याने या स्थळाला पुण्यधाम करून टाकले. मिठाच्या सत्याग्रहाने देश भारावलेला असतानाच हा महात्मा वर्धेत आला. गुजरातला जाणे टाळून सेवाग्रामात स्थिरावला. मानवसेवेचा वस्तुपाठ देणाऱ्या अशा महात्म्याच्या कर्मभूमीत काही ध्येयवेडे मागील आठवड्यात एकत्र आले…म्हणायला ते शिबिर होते, पण म्हटले तर एक मंत्रमुग्ध सत्यशोधनही.
सामान्य माणूस हाच सेवेचा केंद्रबिंदू ठेवणाऱ्या महात्म्याला स्वातंत्र्यानंतर याच सामान्यांनी देवत्वापर्यंत पोहचविले. शत्रूविचारही न शिवणाऱ्या गांधींचा दुस्वासही मागील काही वर्षांनी अनुभवला. चर्चेचा आणि वादाचाही विषय ठरलेल्या गांधींना समजून घ्यायचे असेल तर सेवाग्रामशिवाय समर्पक स्थळ कोणते असू शकेल? याच विचारांनी काही जणांची पावले सेवाग्रामकडे वळली. शिबिरात सहभागी झालेल्या मनांना गांधीविचारांनी मंत्रमुग्ध करून टाकले. परतीच्यावेळी अनेकांनi करुणेचा स्पर्श झाला होता. गांधींनी केवळ ‘समज’ दिली होती असे नव्हे तर त्यांचे आत्मभानही जागे केले होते… गांधींना वाट्टेल तसे वापरून घेण्याची सध्या स्पर्धा सुरू झाली आहे. गांधीवचनांचा उल्लेख तोंडी लावण्यापुरती करणारे महाभाग कमी नाहीत. जगाने महात्मा ठरविलेल्या बापूंना संकुचित करण्याचेही काम सर्रास सुरू झाले आहे. त्यांच्याविरोधात गरळ ओकली जात आहे. काहींची मजल तर याहूनही पुढे गेली आहे. निग्रहाने सशक्त परंतु शरीराने कृश झालेल्या याच महात्म्याच्या देहाला ज्याने पद्धतशीर संपविले, त्याच माथेफिरूची पुतळासक्ती भारतीयांच्या वाट्याला येऊ लागली आहे… अशा अस्वस्थ वर्तमानात गांधी समजून घेणे म्हणजे स्वतःवर ओरखडे काढून घेणेच. भूतकाळातील आठव आणि वर्तमानातील दाहकतेची अनुभूती म्हणजे शिडकावा नसतोच. हलाहल पचवितानाच विलक्षण करुणेने हळवे करून सोडणारी आत्मप्रचिती असाच त्याचा उल्लेख करावा लागेल. ७ आणि ८ फेब्रुवारीला शंभरावर जणांनी ही अनुभूती घेतली. ‘गांधींच्या कर्मभूमीत गांधी समजून घेताना’ या मथळ्याने गांधी अनुयायांना एकत्र आणण्याचे काम ‘आम्ही सारे’ने केले. या कर्मभूमीतील विलक्षण कळकळीने आणि कमालीच्या हळहळीने खरेतर शिबिर ही औपचारिक संकल्पनाच गळून पडली. मनामनांमध्ये एक चळवळ उभी करण्याचे सक्षम काम मात्र त्यातून नक्कीच साधले गेले.
गांधींच्या सांगण्यावरून पाकिस्तानला ५५ कोटींचे दान दिले काय, फाळणीला बापूच जबाबदार होते काय, त्यांचे ब्रम्हचर्याचे प्रयोग नक्की होते तरी काय, त्यांच्या हत्येमागील खऱ्या रोषाचा जन्म नक्की कुठून झाला, गांधी आणि डॉ. आंबेडकर यांचे मतभेद कोणत्या प्रकारचे होते अशा अनेक शंकाकुशंकांनी उपस्थित केलल्या प्रश्नांची सुस्पष्ट उत्तरे देणारे मंथन या दोन दिवसांनी केले. अधूनमधून उठणारी आवई किती तकलादू आहे याचा प्रत्यय या सहवासाने दिला. गांधींवरील आक्षेपांवरही या ठिकाणी सांगोपांग चर्चा झाली. नव्या पिढीसमोर गांधीहत्येमागील सत्य लख्खपणे पुढे आणण्याचे महत्त्वाचे कामही याच दोन दिवसांनी केले.
तुषार गांधी, सुरेश द्वादशीवार, दत्ता भगत, शेषराव मोरे, चंद्रकांत वानखडे, आशुतोष शेवाळकर आदी वक्त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी गांधी या नावाविषयी असलेल्या आत्मीयतेत अधिकच भर टाकली. नवी असोशीही तयार केली. या ज्ञानपर्वाची सुरुवातच तडाखेबंद राहिली. गांधी हे एका सामर्थ्यशाली आणि संघर्षरत व्यक्तिमत्त्वाचे नाव आहे म्हणूनच ‘गांधी नावाचे गारूड’ कायम राहील, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांनी केले. ‘गांधी का मरत नाही’ याची कारणमीमांसा शेतकरी नेते आणि पत्रकार चंद्रकांत वानखडे यांनी केली. गांधीजींनी आपले जीवन सर्वसामान्यांच्या जगण्याच्या कसोटीवर उतरविले. त्यामुळे जगात चांगुलपण आहे तोपर्यंत गांधीजींना मरण नाही, असे स्पष्ट विचार त्यांनी मांडले. गांधीजींचे पणतू तुषार गांधी हे या शिबिरातील विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या भाषणाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल होते. बापूंच्या हत्येमागील एक-एक रहस्य त्यांनी नेटक्या आणि नेमक्या भाषेत उलगडले. गांधींच्या सहवासातील काही व्यक्तींच्या वक्तव्यांचा आधार देत त्यांनी विषयाची मुद्देसूद मांडणी केली. गांधीहत्या हा सुनियोजित कट कसा होता आणि यात नथुराम गोडसे, परचुरे, नारायण आपटे आणि अल्वार-ग्वाल्हेर संस्थानांमधील समन्वय त्यांनी पुढे आणला. वि. दा. सावरकरांपर्यंत पोचणारी ही ‘कॉमन लिंक’ त्यांनी ठोसपणे प्रतिपादित केली. गांधीहत्येचे दु:ख निश्चितच आहे, परंतु हत्येपूर्वी आणि हत्येनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांचे उत्तर अद्यापही न मिळाल्याचे दु:ख अधिक आहे. जो पर्यंत यामागील सत्य बाहेर येणार नाही, तोपर्यंत गांधींना खरा न्याय मिळणार नाही, असे बोचरे शल्यही तुषार गांधी यांनी व्यक्त केले. हृदयाला पीळ पाडणारी वेदना तुषार गांधी यांच्या मुखातून प्रस्फुटित झाली तेव्हा अनेकांचे डोळे पाणावले होते. साधकबाधक प्रश्नोत्तराने या चर्चेत रंग भरला. फाळणीबद्दलची अनेक गृहीतके, कल्पिते गांधींशी जोडण्यात आली आहेत, त्याच्या परामर्श डॉ. शेषराव मोरे यांनी घेतला. फाळणीसाठी तयार होण्याखेरीज कोणताही पर्याय तत्कालीन परिस्थितीने गांधींपुढे ठेवला नाही. नवस्वतंत्र राष्ट्राच्या जडणघडणीचा विचार करूनच त्यांनी फाळणीचा निर्णय घेतला, असे मोरे यांनी सांगितले. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांची मांडणी समाज आणि धर्मदृष्टिकोनातून केली असली तरी दोन्ही महापुरुष राजकीय होते. त्यामुळे त्यांच्यात मतभेद असले तरी दोघांचे अंतिम लक्ष्य बघता तत्कालीन परिस्थितीत मध्यस्थी करणारा ‘अॅडव्होकेट’ नसल्याने मतभेदाची चर्चा अधिक झाली. सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळत नसेल तर स्वतंत्र मतदारसंघ द्या, अशी बाबासाहेबांची मागणी होती, परंतु गांधींचा त्याला विरोध होता. या मागणीतील राजकीय हेतू गांधींनी ओळखला होता. म्हणूनच त्यांच्यात समन्वय शक्य होता, असेही डॉ. मोरे म्हणाले. गांधींच्या ब्रह्मचर्याच्या प्रयोगाची चर्चाही खूप होत असते. आशुतोष शेवाळकर यांनी गांधींच्या या ब्रह्मचार्याचा नवा अन्वयार्थ लावीत सत्याग्रह ही ब्रह्मचर्यातून आलेली संकल्पना आहे, असे विवेचन केले. मानसशास्त्रीय वेधही त्यांनी घेतला. समाज-व्यक्ती यांच्याविषयीच्या वादविवादांना हिंसक पातळीवर जाऊन असंवैधानिक पद्धतीने रस्त्यावर उतरून सोडविण्याचा प्रयत्न आज होताना दिसतो आहे. अशावेळी ‘आम्ही सारे’ फाउन्डेशनचा हा प्रयोग फारच महत्त्वाचा ठरला. अशा वैचारिक मंथनातून सत्यशोधनाचा मार्ग प्रशस्त होत असतो. गांधीहत्येसंदर्भात जगापुढे जे सत्य यायला हवे ते ऐकायला कुणी तयार नाही, ही तुषार गांधी यांची खंत मन हेलावून गेली. आयुष्यात सत्याचे प्रयोग करणाऱ्या महात्मा गांधींची प्रतिमा असत्य कथनातून मलिन करण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत. परंतु गांधी त्यातूनच पुन्हा पुन्हा उजळून निघत असतो याची साक्षात्कारी अनुभूती या शिबिराने दिली. अविनाश दुधे, सचिन परब आणि ‘आम्ही सारे’ची चमू यासाठी अभिनंदनास पात्र आहेत. पूजनीय व्यक्तींना तटस्थपणे समजून घेण्याची खंडित झालेली परंपरा या शिबिराच्या निमित्ताने प्रवाहित होऊ शकली तर हे परिश्रम सार्थकी लागतील. महात्म्यांनाच अडगळ ठरविणाऱ्या वृत्तीवर निर्बंध आणण्यासाठी चर्चेचे प्रवाहीपण अधिक गरजेचे आहे.
प्रा. राजेंद्र मुंढे, वर्धा
सौजन्य -महाराष्ट्र टाइम्स