तुमचे आणि शिवसेनाप्रमुखांचे कसे जुळले… हा प्रश्न विचारताच ‘स्वातंत्र्य….’ असे उच्चारून संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांसारखा संपादक होणे नाही. माझ्या शब्दापासून वर्तनापर्यंत सगळेच त्यांचे. त्यांनी विचार करायला शिकवले, भाग पाडले..!’
संसद भवनाच्या पहिल्या मजल्यावरील ग्रॅनाइट स्तंभांना हलकेच टिचकी देत, भुवया नेहमीप्रमाणे उंचावून खासदार राऊत चालत होते. पाचेक वर्षे झाली असतील. खासदार अनिल देसाई सोबतीला होते. बटण सोडून घातलेला निळ्या चौकटीचा कोट सांगत होता मंद हिवाळा सुरू झाला.. काही अंतर मागे अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, विनायक राऊत, श्रीकांत शिंदे, कृपाल तुमाने आणखी बरेच खासदार होते. कृषिमंत्र्यांना भेटून हे शिष्टमंडळ परतत होते.
हळूहळू अनेक विषयांवर गप्पा झाल्या. तशा त्या नेहमीच होत असत. वर्तुळाकार मजला निम्मा फिरून एका निमुळत्या जिन्यातून आम्ही शिवसेनेच्या संसदेतील कार्यालयात पोहोचलो. तिथे भगव्या खुर्च्या नि तेथील बोलीही भगवीच.! राजकारणात रमलेले ‘राऊतसाहेब’ तिथे बघायला मिळाले. हे चित्र सुखावह असले तरी कालौघात ते खूप बदललेले दिसले. ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक पण ठळक बाजू होती. नव्याने बघणाऱ्यांसाठी भन्नाट असेलही, पण माझ्यासाठी नक्कीच पुरेसे नव्हते.
राऊत नावाचा पत्रकार, माणूस, मित्र आणि ‘राऊतसाहेब’ नावाच्या संपादकास भेटून किमान २६-२७ वर्षे झाली आहेत. त्यांची विविध रूपे पुढे आली. अंगार असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावात राज्य व त्यांच्या एका कृतीने भारून जाणारा देश असताना, त्या व्यक्तीच्या भवताली संजय राऊत यांचे असणे, कुतूहल निर्माण करणाऱ्या अनेक गूढ, सुरस आणि अगम्य घटनांचा मागोवा यामुळे घेता येत होता. संदर्भ पक्के आणि सूत्र सच्चे असल्याने पत्रकार म्हणून माझा त्यांच्याकडे अधिक ओढा. या एकाच नव्हे, विविध वैशिष्ट्यांमध्ये भावणारे आहेत ते राजकारणाबाह्य “पत्रकार संजय राऊत !”
मुंबईत ‘सामना’ सुरू झाला, त्या पहिल्या अंकापासून मी विदर्भात ‘सामना’चे काम करत होतो. अशोक पडबिद्री संपादक होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काटेकोर लक्ष असे. उद्धव ठाकरे सूचना देत असत. शिवसेना भवनाच्या तिसऱ्या माळ्यावर राज ठाकरे यांची ‘चाणक्य’ नावाने जाहिरात कंपनी होती. तिथे बसून ते सामनासाठी व्यंगचित्र काढत. अधूनमधून सामनाच्या प्रभादेवीतील कार्यालयात ते येत आणि चित्र पूर्ण करीत.
“सामना म्हणजे फॅमिली..” हे एका संपादकीय मीटिंगमधील बाळासाहेबांचे शब्द आजही कानात आहेत. १९९३च्या दरम्यान संजय राऊत या फॅमिलीत आले.. आणि ते कुटुंबप्रमुख झाले. ते सामनाचे संपादक म्हणून भेटण्यापूर्वी त्यांचे लोकप्रभेतील लेख, मालिका, मुलाखती आणि क्राइम स्टोरी वाचून झाल्या होत्या. लेखन तल्लीन करणारे होते. शैली पटकथेसारखी, भाषा मोहात पाडणारी आणि कथाबीज रहस्यपटाला साजेसे होते. गुंग करणारे!! भयपटातून उलगडणारे रहस्य ही त्या लेखनाची मेख होती. आतासारखी समाज माध्यमांची बरसात डोळ्यांवर आणि मेंदूवर नसल्याने उत्कंठा हे एकमेव प्रमेय ती रहस्यकथा शमवत होते. केवळ राऊतच नव्हेत तर बरेच लेखक तेव्हा वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे होते. अनेक मासिके, साप्ताहिके आणि दैनिकांतील स्तंभ वाचकप्रियतेच्या शिखरावर होते. आतासारख्या वेबसिरीज तेव्हा थरार वृत्तमालिका म्हणून वाचकांच्या भेटीला येत असत तेव्हाचा तो जमाना राऊतांनी गाजवला… आणि आता तर ते स्वतःच गाजू लागले. दररोज गर्जू आणि बरसूही लागले! कालौघात ‘सामना’च्या नागपूर आवृत्तीचा प्रमुख म्हणून राऊतांनी माझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यालाही आताशा वीस वर्षे उलटली. बदल हा जगण्याचा पाया असला तरी, काही व्यक्तिमत्त्वे मूळ प्रतिमेतच भावतात. खासदार झाल्यानंतरही त्यांच्यातील पत्रकार जिवंत राहिला. पत्रकार, लेखक आणि चित्रपट निर्मातेही झाले.
तरीही “बातमीतले राऊतसाहेब” भावले!!
त्यांच्यातला पत्रकार हा माझा सच्चा मित्र आहे. त्यांच्यातील माणूस म्हणजे जिवलग गोष्ट आहे. कुणी प्रेयसीवर प्रेम असावे तसे बातमी, शब्द आणि मथळ्यांना ते जपतात. छोटी वाक्ये आणि चपखल शब्द हे त्यांच्या शैलीचे बलस्थान. खासियत. भावबंध घट्ट करणारा त्यांच्यातील माणूस विलक्षण आहे. आस्थेने चौकशी करून मदतीसाठी भिडमूर्वत न ठेवता धावून येणारा आहे. वर्तमानपत्रातील सहकारी आणि संपादक असा पायऱ्यांचा सनातनी भेद संवादामुळे नष्ट करणाराही आहे. असे असले तरी, थेट शिवसेनाप्रमुखांसोबतच त्यांची २५ वर्षे गेल्याने सहवासाची भाषा तिखट झाली, झोंबणारी बनली. कधी-कधी पराकोटीची दुखावणारी ठरली, मने दुभंगवणारीही जाणवू लागली, संतापी भासू लागली, शब्द आग ओकू लागले. त्यामुळे राऊत अनेकांना नकोसे वाटू लागले, असे सांगणारा आणि ‘राऊत है तो, हुकूमत है..’ असे मानणारा मोठा वर्गही बघायला मिळतो.” जिन्हें आपको गलत ही समझना हैं, वो लोग आपके मौन का भी गलत अर्थ निकाल ही लेंगे..” हा चष्मा लावणारेही आहेतच.
शिवसेनेत राऊतांमुळे दोन गट पडले, राऊत स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार प्रोजेक्ट करू लागले, त्यासाठी त्यांची फील्डिंग सुरू आहे.. असे अनेक चित्कार कानावर पडत होते. ते किती खरे होते तेही लोकांपुढे आलेच. समाजात राऊतांविषयी दोन मतप्रवाह दिसू लागले; तसे विचारही कानावर आले. एकाच वेळी राऊत शिवसेनेचे निष्ठावान तसेच पवारांचे स्वकुळी दिसू लागले. त्यांची आणि पवारांची मैत्री ही त्यांनी कधी लपविली नाही. दिल्ली तर गॉसिपसाठी उत्कृष्ट जागा आहे. राऊतांमुळे शिवसेनेत दोन गट आहेत, असे म्हणणारा एक वर्ग जसा शिवसेनेत आहे, तसाच राऊतांच्या भाजपविरोधी विधानांमुळे सुखावणारा एक वर्ग भाजपातही अंडरग्राउंड होताच.. या लोकचर्चेला राऊतांमधला राजकारणी थेट सामोरे गेला; तो सर्वांनी बघितला. वर्ष- दीडवर्षात राऊत नावाचा राजकारणी सगळ्यांना अंगावर घेत उद्धव ठाकरे यांच्यासाठी लढतो आहे. राजकारणातील प्रसंग कुठलाही असू दे, राऊतांची कमेंट लक्षवेधी ठरू लागली. मग ते देवावरचे रोखठोक असो की, राजभवनातील सारीपाट असो. सगळीकडे राऊत! अनेकदा राऊत खलनायक ठरू लागले, कैकदा नायक! राज्याच्या राजकारणातील राऊत हा शब्द पुढे ऑक्सफर्ड डिक्शनरीत येऊ शकतो, इतका वेगळा गाजू लागला. कदाचित जशी ठाकरी भाषा, तशीच राऊत शैली असावी..!
राऊतांमधील अर्जुनाचे माश्याचा डोळा हेच लक्ष्य होते. अर्थातच, श्रीकृष्ण कोण हे सांगण्याची गरज आहे का? आजारपण आले तरी, ध्येय विचलित नव्हते. शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल, यासाठी रात्रीचा दिवस करत होते. व्यूह आखत होते. राजकारण अंगावर घेत लढा देत होते. टीकास्त्र झेलत होते, मारा करत होते.. राऊत रोज जिंकत होते.
राऊत जसे बोलू लागले, तशी त्यांच्यावर टीका होऊ लागली. अर्थात राऊतांच्या राजकीय जीवनाचा आता तो अविभाज्य भाग आहे, त्यांची व पक्षाची राजकीय मुशाफिरी त्यांनी ठोस व ठाम केली. नव्या राजकारणात जिंकायचे असेल तर “एक राऊत हवाच,” हा बोध देण्याइतपत त्यांची धडपड होती. विरोधकांनी खुल्या मनाने हे मान्य करण्याइतपत स्थिती आहे.
एक बाजू अशीही असताना, राऊतांनी महाराष्ट्राच्या ‘योद्धा पत्रकार’ म्हणून लौकिक मिळवला. तरीही, त्यांची राजकीय भूमिका त्यांच्यापाशी. त्यांची ओली-सुकी विधाने त्यांच्याच जवळ. त्यांची महत्त्वाकांक्षाही त्यांच्याच पारड्यात ठेवूया. ते यासाठी की, सामान्य माणसाचे दुःख व्यवस्थेपर्यंत पोहोचविण्यासाठी ज्यांना शब्द सुचतात, मग ते झोंबणारे असो, पिच्छा पुरवणारे असो की रडविणारे असोत, ते राऊतांचेच असतात! मुंबईतील गँगवॉर, बिहारातील हत्याकांडे, मंत्रालयातील घडामोडी असोत किंवा मराठवाड्यातील कदम-पाटोदकर अथवा विदर्भातील बोधनकर प्रकरण असो.. धारदार मांडणी हे त्यांचे खास वैशिट्य आहे.
अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देताना यंत्रणेपुढे तो ‘सुपरहिरो ‘ठरला पाहिजे, इतकी काळजी त्यांनी लेखनातून कायम घेतली. ते स्वभावाने बंडखोर आहेत. बाणा लढाऊ आहे. ‘होयबा’चा नाद त्यांच्या स्वभावात नाही. परिणामांची तमा न बाळगता कुणाशीही टक्कर घेण्याची तयारी हा गुण त्यांना अनेकदा अडचणीत आणतो खरा; पण तरीही ते खेटतात, चर्चेत राहतात!
कोर्टाची पायरी चढण्याआधी राऊतांना आशेने भेटणारी मंडळी होती. सामनातील ‘सच्चाई’साठी.! ‘सच्चाई’ एक लोकन्यायालयच होते. ‘सच्चाई’त कैफियत छापून आली की, प्रश्न सुटतो ही धारणा लोकांची झाली होती. प्रश्न सुटत होते, लोकांना दिलासा मिळत होता. आताच्या चॅनलच्या सुळसुळाटी जमान्यात जे शक्य नाही, ते राऊतांच्या सच्चाईने होत असे, हे निर्विवाद मान्य करणारे आहेत.
राऊतांची ‘जरबी ओळख’ झाली ती एका अध्यायातून.. आपल्याच मालकाविरुद्ध केलेल्या थेट लिखाणामुळे! बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या चौफेर टीकेमुळे!!
एक त्रिकालाबाधित सत्य आहे. ते म्हणजे, संपादकांना वृत्तपत्र मालकांच्या म्हणण्यानुसार सगळे ऐकावे लागते. विरोध केला, तर त्याचे चटके कसे बसतील याचा नेम नाही. या पार्श्वभूमीवर, संजय राऊत पत्रकार- संपादक म्हणून का योद्धे आहेत, याचा अंदाज घेता येईल. तसेच ‘स्वातंत्र्य’ या शब्दासोबत राऊत आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाते कसे गुंफले गेले, तेही स्पष्ट होईल.
मुंबईत १९९२ला दंगल उसळली होती. त्यानंतर लगेचच १२ मार्च १९९३ साली मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. या स्फोटानंतर संजय दत्तच्या घरी अवैध शस्त्र सापडले होते. त्यामुळे ‘टाडा’ कायद्याखाली संजय दत्तला अटक होऊन, १९९५ ला संजय दत्तची रवानगी जेलमध्ये झाली. संजयच्या सुटकेसाठी त्याचे वडील सुनील दत्त जंग-जंग पछाडत होते. सुनील दत्त यांनी संजूबाबाच्या सुटकेसाठी अखेर बाळासाहेब ठाकरेंना साद घातली. ते बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. ज्यावेळी अटक झाली तेव्हा काँग्रेसचे राज्य होते. सुनील दत्त यांनी काँग्रेससाठी जीवनभर काम केले; पण मुलाच्या अटकेनंतर काँग्रेसने हात वर केले. ही गोष्ट त्यांच्या वर्मी लागली होती. बाळासाहेब त्या भेटीत सुनील दत्त यांना म्हणाले होते, सरकार आमचे नाही. जर ते आले तर मदत करीन. पुढे महाराष्ट्रात शिवसेना-भाजपचं युती सरकार सत्तेत आले. त्यावेळी बाळासाहेबांनी चक्रं फिरवली आणि तब्बल १८ महिने तुरुंगवास भोगून संजय दत्त बाहेर आला. त्यानंतर लगेचच संजय दत्तने वडील सुनील दत्त यांच्यासोबत बाळासाहेबांची भेट घेतली.
हा घटनाक्रम सर्वांना माहीत आहे. तो छापून आला. टीव्हीवर दिसला. यामागे एक राजकीय रहस्यकथा दडून होती ती संजय राऊत यांनी लिहिली आणि कल्लोळ माजला.
राऊत यांनी सामनातील त्यांच्या ‘रोखठोक’मध्ये एका रविवारी या प्रकरणाचा गौप्यस्फोट केला. जी घटना ‘मातोश्री’त होती. बंदद्वार होती. ती राऊतांनी जगापुढे आणली.
‘मोठ्यांसाठी राजशकटही हलतात..!’ या मथळ्याखाली राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुखांवरच टीका केली. यानंतर काय झाले असावे याचा अंदाजच आपण करू शकतो. असा विषय तेव्हा बाहेरून लिहायलाही कुणी धजायचे नाही, तो गोटातून लिहायचे दरारी-धाडस राऊतांनी दाखवले. शिवसेनाप्रमुखही मोठया मनाचे. त्यांनी आपल्याच दैनिकातून स्वतःवर झालेली टीका कशी सहन केली असावी आणि राऊतांनी ते बाण कसे परतविले असावेत, हे त्यांचे कौशल्य जसे विलक्षण आहे. तसे त्यांच्यामधील दिलेर नातेही!
आता पुन्हा नेपथ्य तेच आहे. सरकार शिवसेनेचे आहे. राऊत सामनात आहेत.. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत उद्धव ठाकरे. तीन पक्षांचे सरकार, धोरणे आणि व्यक्ती असे सगळे पेच आहेत. ते पेच सोडवताना, ढिले करताना,पक्के करताना आपण राऊताना बघतो, वाचतो आणि ऐकतो. राऊत कधीकधी अडचणीत येतात. इतरांना आणतात. मग सगळा रंग एकच होतो. अशी त्यांची रूपे याकाळात आपण पाहिली. शेरोशायरी अनुभवली. ट्विटरच्या चिमणीचा बेखुदी लाभ राऊतांनी घेतला. सर्वच माध्यमांचा सर्रास वापर राऊतांनी घेतला. सतत चर्चेत असणे हा त्यांच्यातील राजकारण्याचा भेदक गुण आहे.’शब्द आणि कंगोरे ‘ हेसुद्धा हाताळण्याचे कसब त्यांना उपजत आहे, त्याचा पुरेपूर उपयोग त्यांनी केला..करताहेत. त्यातून टोकदार तर कधी उलटणाऱ्या कोट्या झाल्या. त्यांच्या बोलण्यातील बदल लक्षात आले, जरबही कमीअधिक बघितली. हावभाव बदलताना दिसू लागले. पत्रकार ते राजकारणी हा भेद दिसू लागला.
सामना’तील लेखन कैकदा भडकावू – विखारी असते, भाषाही प्रक्षोभक असते. त्या भाषेने पत्रकारितेला कोणतेही योगदान मिळाले नाही, असे सामना आणि राऊतांचे अभ्यासक सांगतात. भरपूर उदाहरणेही दिली जातात; पण सामनातील भाषा सामान्यांची आहे. ती दिवाणखाणी नाही, व्यासपीठी नाही. ती अस्सल मायबोली आहे, हे लक्षात घेतले तर त्याची लज्जत वाढेलही, असा युक्तिवाद असेल तर, चूक काय?
आता राजकीय पिपाण्या वाजत राहणार. मागील काही महिन्यांत सर्वांना दिसलेले राऊत आणि पत्रकार राऊत या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची पत्रकारिता सामान्य माणसांसाठी चिरेबंदी युक्तिवादाचा हा प्रवास आहे. राजकीय पेचामुळे राज्यसभेतील आसन मागच्या ओळीत गेले आणि राऊत कमालीचे दुःखी झाले. कोणाच्याही वर्मी लागेल असाच हा राजकीय मामला आहे. राऊत यांच्यामागे असा कोणताही वारसा नाही की त्या परीसस्पर्शाने त्यांनी यशाची शिखरे गाठली. राऊत स्वकष्टाने इथवर आले. दिल्लीत त्यांनी शिवसेना चमकवली. सुरुवातीला ते फार गंभीरपणे प्रसंग हाताळत नव्हते. राष्ट्रीय स्तरावर पक्षाची तेवढ्यापुरती भूमिका ते मांडायचे.
मात्र, अलीकडच्या काही वर्षांत ते ठसा उमटवू लागले. मग भलेही प्रशांत किशोर यांचे बळ मिळाले असेल, असे अभ्यासक म्हणतील. पण ‘राऊत नावाचा ब्रँड’ अधिक उन्नत आहे. पक्षाची देशव्यापी झुंझारू प्रतिमा निर्माण करण्याचे यश राऊतांचे आहे.
नियती असते. ती ललाटावर लिहिते आणि प्रत्यक्षाकारही घडविते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अभूतपूर्व ‘सामना’ सर्वांनी पाहिला. राऊतांनी तो शाईतून आणि शब्दांतून खेळला. अनेकांनी अनुभविला!
महाभारतात संजयला युद्धभूमीवरील दिसत होते. ते त्याचे कथन इतिहासातील दस्तऐवज ठरले. आधुनिक युद्धभूमीत तरी काय वेगळे घडत होते? प्रेमात व युद्धात सारे काही क्षम्य असते.. आणि राजकारणात तर मैत्री आणि शत्रुत्व कधीच कायम नसते.
म्हणूनच, शरद पवार हे “मॅन ऑफ दी सिरीज” असतील, तर संजय राऊत “सामनावीर” ठरले. या युद्धाची पटकथा कुणाचीही असू दे; पण युद्धाच्या कथा रम्य असतात…
(लेखक ‘पुण्यनगरी’ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत)
प्रिय मित्र रघुनाथ यांचा सामना चे संपादक संजय राऊत यांच्या वरील लेख अतिशय आवडला.आशयाची तरलता वाचनिय आहे.रघुनाथचे मन:पूर्वक अभिनंदन.