एक लडकी को देखा तो ऐसा लगा…

– सानिया भालेराव

काही चित्रपटांबद्दल लिहिणं गरजेचं होऊन जातं कारण चित्रपटाच्या निमित्ताने जो विषय हाताळला जातो त्यावर खुलेपणाने चर्चा होणं आणि तो विषय पोहोचणं महत्वाचं असतं आणि म्हणून ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटावर लिहिणं गरजेचं. या पोस्टमध्ये चित्रपटाच्या कथानकातल्या काही गोष्टी मी उघड केल्या आहेत कारण मला ज्या मुद्द्यावर या निमित्ताने लिहायचं आहे ते त्याशिवाय शक्य नाही म्हणून हा स्पॉयलर अलर्ट. आपल्याकडे लेस्बियन रिलेशनशिप्सवर तसे फार कमी चित्रपट आहेत आणि त्यातले मोस्टली गर्ल ऑन गर्ल ऍक्शन या टॅग ला जागणारे असल्याने एकूणच मूळ मुद्दा बाजूला सारणारे. ‘एक लड़की को’ मध्ये जाणीवपूर्वक असे सीन्स टाळून शक्य त्या सेंसिबिलीटीने लेस्बियन रोमॅन्स हाताळल्याबद्दल दिग्दर्शक शेली चोप्रा धार चे कौतुक.. हं सेकंड हाफ अतिशय मेलोड्रॅमॅटिक, प्रेडिक्टेबल, क्लिशेड आणि थोडा बटबटीत आहेच पण कमर्शियल बॉलिवूड चित्रपटात होरीइन चक्क तथाकथित हिरोच्या प्रेमात न पडता चक्क दुसऱ्या मुलीच्या प्रेमात असते आणि हिरो ते प्रेम पूर्ण करण्यास मदत वगैरे करतो ही ष्टोरी मोठ्या पडद्यावर बघणं हे नक्कीच आशादायक आहे. राजकुमार राव, अनिल कपूर आणि माईंड शेटेरिंग जुही चावला आवडले.

मूळ मुद्दा जो मला जाणवला तो म्हणजे एकूणच आपण समाज म्हणून गे कपल्स बाबत थोडे फार का होईना लिबरल होत आहोत पण लेस्बियन नात्यांबाबत अजूनही मनात अढी जास्त जाणवते. गंमत म्हणजे पॉर्न बघताना गर्ल ऑन गर्ल, ग्रुप गर्ल सेक्स, थ्रीसम, लेस्बियन एक्शन बघणारा फार मोठा प्रेक्षक वर्ग प्रत्यक्ष आयुष्यात मात्र अशा नात्यांना नावं ठेण्यापलीकडे काहीही करत नाही. एकूणच LGBT कम्युनिटीमधल्या सर्वात जास्त घाणेरड्या व संकुचित नजरेने बाहेरच्या समाजातल्या सो कोल्ड स्ट्रेट लोकांकडून ज्या नात्याला बघितलं जातं ते म्हणजे दोन मुलींमधलं नातं. मुलींमधले शारीरिक चाळे चवीने बघणाऱ्या लोकांचा वाईडर माइण्डसेट जेंव्हा याच दोन मुलींमध्ये सहज फुलणाऱ्या प्रेमाकडे बघताना इतका सडका आणि संकुचित कसा होतो याचं आश्चर्य वाटत राहतं.

एक गंमत म्हणून सांगते.. काही महिन्यांपूर्वी मी आणि अनाद्या कोथरुडमधल्या एका बागेत खेळत होतो. गवतावर बसलो असताना सहा वर्षाच्या माझ्या चिमुरडीने एकदम मला विचारलं … ‘आई फक्त बॉय आणि गर्ल प्रेम करून मग लग्न करू शकतात का? यावर मी हसून तिला म्हणाले.. सगळ्यात पहिले तर प्रेम असेल तर लग्न केलंच पाहिजे असं गरजेचं नाही आणि लग्न मुलगा आणि मुलगीच करू शकतात असं गरजेचं नाही.. आपल्या आवडीला, प्रेमाला कोणताच निर्बंध नको ना.. पिल्लू ओके म्हणून खेळायला गेलं पण माझ्या बाजूला बसलेली एक आई मात्र तिच्या मुलीला तिथून माझ्याकडे एक खास तिरकस कटाक्ष टाकून निघून गेली.. एकदम मला खूप गंमत वाटली…

समलैंगिकता हा एक मानसिक वा शारीरिक आजार आहे असं मानणारा प्रचंड मोठा वर्ग आजही आहेच.. अगदी सो कोल्ड शिकले, सवरलेले, मॉडर्निझमचे बुरखे पांघरणारे लिबरल लोक त्यांच्या स्वतःच्या घरात, नात्यामधल्या लोकांच्या बाबतीत हाच लिबरल अप्रोच ठेवतात हा कळीचा मुद्दा आहे. शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा असा विचार करणारा पांढरपेशा वर्ग.. आपण जेंव्हा बदलाची भाषा करतो, मानसिकता बदलावी असं आपल्याला वाटतं तेंव्हा त्याची सुरवात स्वतःपासून करायला हवी. निदान आपल्या मुलांना तरी एका पोषक, सुदृढ आणि सजग विचारसरणीच्या समाजात वावरता यायला हवं आणि हा समाज तुमच्या माझ्या सारख्या लोकांनीच तर बनणार आहे.

प्रेम करताना ते जेंडरच्या पलीकडे जायला हवंय. हे स्ट्रेट, गे, लेस्बियन, बायसेक्शुअल वगैरे वर्गीकरणांची सुद्धा गरज नको पडायला. आपलं सेक्शुअल ओरिएन्टेशन जसं आहे जे आहे ते नॉर्मलच आहे असं त्या व्यक्तीला वाटणं गरजेचं. समलैंगिकता नैसर्गिक नाही असं म्हणून आतल्या उर्मींना दाबू पाहणारा समाज खरंतर अनैसर्गिक. यातून जाणाऱ्या लोकांचे काय हाल होतात हे आपल्या चौकटीत रमणाऱ्या मनाला ठाऊक देखील नसतात. आपण नॉर्मल नाही, आपल्यात काहीतरी बिघाड आहे आणि आपल्यामुळे आपल्या घरच्यांची नालस्ती होईल या भीतीपोटी न्यूनगंड बाळगून आतून विझून गेलेले कित्येक लोक आहेत. लेस्बियन रिलेशनशिप्स तर अजूनच अवघड प्रकरण कारण जिथे मनासारख्या पुरुष प्रियकराबरोबर राहता येणं हेच अशक्य आहे तिथे मला मुलीबरोबर राहायचं आहे हे तोंडातून बाहेर काढणं म्हणजे महा भयंकर पाप..

प्रेम केवळ प्रेम असतं.. साथ केवळ साथ.. दोन जीवांनी एकत्र येणं, प्रेम करणं, एकमेकांच्या सुख- दुःखात साथ देणं, एकमेकांचं मन जपणं, प्रेमावर निष्ठा असणं हे वाईट असू शकतं का? वरवरून चकचकीत दिसणारं पण आतून मृत झालेल्या नातं… आपल्या आंतरिक उर्मींशी प्रतारणा.. मन मारून जगणं.. स्वतःला कोशात अडकवणं.. नैतिकता आणि अनैतिकतेच्या कुचकामी झालेल्या चौकटी.. शेवटी माणूस निवडतोच काय ते पण निदान स्वतःच्या घरात शिवाजी नको असं जर सगळ्यांनी म्हटलं असतं तर स्वराज्य मिळालं असतं का? बदल हवा असल्यास सुरवात स्वतःपासून का करू नये.. आपल्या कक्षा रुंदावून बघूया.. जग सुदंर आहेच.. त्याला तसंच राहू देऊया.. Cheers to accepting yourself the way you are..Cheers to love that is beyond all boundaries…

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही  त्यांची आवड आहे .)

[email protected]

……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………

हे सुद्धा नक्की वाचा-

अस्तु-समाधानी आणि शांत जगण्याचा मंत्रhttp://bit.ly/2VPJKXv

नवरा – बायकोतल्या नात्यावर सेन्सीबली भाष्य करणारा – बेलाशेषेhttp://bit.ly/2LgHILE

जगावं कसं आणि कशासाठी हे सांगणारा – ‘कास्ट अवे’! http://bit.ly/2VVvmcR

‘द नोटबुक’-जन्म मृत्यूच्या पलीकडे जाणारी प्रेमकहाणी–  http://bit.ly/2UAWW2m

९६- हळुवार,अलवार प्रेमाची गोष्ट सांगणारा चित्रपट http://bit.ly/2G2DlQ1

Previous article…पर्याय राहुल गांधीच !
Next articleमोदींचा विजय नेमका कशामुळे?-सुहास पळशीकर
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here