काही वर्षांपूर्वी गप्पांच्या ओघात मजरूह सांगत होते की ओ.पी.ला जेव्हा लता मंगेशकर पुरस्काराबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की, “माझ्या खिशात शेवटचा एक रुपया शिल्लक असेल आणि माझ्याकडे काहीही काम नसेल तेव्हाही मी लता मंगेशकर पुरस्कार घेणार नाही.” ही ऐट ओपीच करू जाणो.. तो जगला ऐटीत, वावरला ऐटीत, आणि याच ऐटीने त्याचा घात केला. त्याबद्दल ओघाने येईलच.. आधी त्याच्या सांगीतिक गुणांबद्दल बोलू. ते बेशक़ बेशक़ीमती होते..
लाहोरमध्ये (पाकिस्तान) जन्मलेला ओंकार प्रसाद नय्यर जालंधर आकाशवाणीच्या संगीत विभागात नोकरीला होता. स्वत:च्या संगीत क्षमेतवर त्याचा दुर्दम्य विश्वास होता, तो रास्तही होता. विश्वासाची ही शिदोरी घेऊन ओपी १९५१ साली मुंबईत आला. दलसुख पांचोली या निर्मात्याने आपला ‘आसमान’ नावाचा सिनेमा ओपीच्या हवाली केला. सिनेमा पडला पण त्यातलंच एक गाणं नंतर कित्येक वर्षं बिनाका गीतमालाची साईन ट्यून म्हणून वाजत राहिलं. नौशाद, अनिल बिस्वास, गुलाम हैदरसारख्या लोकांचा काळ होता आणि ओपीचे आसमान, छमछमाछम, बाज’सारखे सिनेमे धडधड कोसळत होते. आपला बाजा घेऊन परत जालंधरला जावं की काय असा विचार तो करत होता. त्याच सुमारास गुरुदत्त ‘आरपार’साठी जमवाजमव करत होता. गीता दत्तने ओपीच्या नावाची शिफारस केली. गुरुदत्तला काही ते पटेना. पण ‘आरपार’च्या नशिबात ओपीच होता, हो-नाही करता गुरुने त्याला ‘आरपार’ दिला. ‘कहीं आर कहीं पार’सारखी त्यातली गाणी अफलातून गाजली.
ओपीचा जमाना सुरु झाला होता!
शंकर-जयकिशन, नौशाद, सचिनदा, मदनमोहन, रवी, रौशन या साऱ्यांना एकेका गाण्याने पीछे सोडत ओपीची आगेकूच सुरु झाली. ‘मिस्टर अँड मिसेस 55’ ‘सीआयडी’ ‘फागुन’ ‘रागिनी’ ‘हावडा ब्रिज’ एकामागून एक येत राहिले. सपाटून गाजत राहिले. ठुमरी, टप्पा, दादरा, लोकसंगीत अशा टप्प्याने सुरु झालेल्या वर्तुळाचा प्रवास ओपीला लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेला. चित्रपट संगीताला वेगळं स्थान, वेगळी ओळख मिळाली. ‘ले के पहला पहला प्यार’ ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ ‘मन मोर बावरा’ ‘मेरा नाम चिन चिन चूं’ ‘जाता कहां है दिवाने’ ‘छोटासा बालमा’ अशी एकापेक्षा एक बहारदार गाणी घराघरात वाजू लागली. ओपी आणि आशा भोसले ही नवीन सुरेल जोडी उदयाला आली आणि सिनेसंगीत वयात आलं!
मुळात ओपीवर ‘न्यू थिएटर्स’चा, केएल सैगलचा जबरदस्त प्रभाव होता. त्याने के.एल.सैगलच्या धर्तीवर स्वत:चं नाव ‘ओ.पी.नय्यर’ ठेवलं होतं. सुरुवातीच्या काळात त्याने सुरात बांधलेलं, त्याच्या बायकोनं, मोहिनी नय्यरने लिहिलेलं आणि सीएच आत्माने गायलेलं ‘प्रीतम आन मिलो’ हे गाणं ऐकलं तर हा प्रभाव स्पष्ट जाणवतो. त्याच्याच म्हणण्याप्रमाणे, त्याला या प्रभावातून बाहेर काढलं गुरुदत्तने. त्याच्या आयुष्यात गुरु आला नसता तर त्यानंतर आपण जो ओपी ऐकला त्याचा उदय झालाच नसता. त्याला ‘आरपार’ दिला तेव्हा गुरुने त्याला ‘बिंग क्रॉसबी’ या गायकाच्या उडत्या गाण्यांच्या रेकॉर्ड्स देखील दिल्या. हे ऐक आणि अशा पद्धतीची गाणी मला दे, असं त्याला सांगितलं. यातूनच नवा, दिमाखदार, लय-तालबद्ध ओपी जन्माला आला.
पाश्चिमात्य संगीतावर भर देणाऱ्या ओपीकडे पंजाबी लोकसंगीताचाही भरपूर साठा होता. त्याने या दोघांना बेमालूम मिसळण्याची विलक्षण अद्भुत किमया केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. ‘हुजुरे आला, जो हो इजाजत’ हे गाणं आठवा. ही सही सही पाश्चिमात्य सुरुवात आहे, पण पुढे ‘तुम्हारी अदाओं पे मारते हैं हम’ या ओळीला नकळतच टाळ्यांचा पंजाबी ठेका सुरु होतो. ‘यह रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराईये’ ऐका. ‘सुनिये तो जरा’ या अंतराच्या ओळीपर्यंत गाणं कसं संथ, शांत वाटतं, आणि ‘जल उठेंगे दिये जुगनूओं की तरह’ गाताना हेच गाणं एकदम दुडकी झेप घेऊन उडू लागतं. ही कीमियागिरी ओपीने बऱ्याच ठिकाणी केली आहे. गुलाम हैदर यांनी हिंदी सिनेमात आणलेल्या टप्प्याचं स्थान ओपीने पक्कं केलं. अण्णा चितळकरांनी (सी. रामचंद्र) आणलेल्या पाश्चिमात्य संगीताचे कोपरे घासून अधिक गुळगुळीत केलं आणि एक नवीन सांगीतिक रसायन जन्माला आलं. नौशाद, सचिनदा, मदनमोहन, रौशन, सलिल चौधुरी, शंकर-जयकिशनच्या रांगेत मानाच्या जागी ओपी पोचला.
भारतीय वाद्ये ओपीला भुरळ घालायची. ‘कल्पना’मधलं ‘बेक़सी हद से जो गुजर जाये (बासरी) ‘सावन की घटा’मधलं ‘मेरी जान तुमपे सदक़े’ (सितार) ‘फागुन’मधलं ‘पिया, पिया ना लागे मोरा जिया’ (बासरी) ‘एक मुसाफिर एक हसीना’मधलं ‘बहोत शुक्रिया’ (हार्मोनियम) ही त्याची काही वेचक उदाहरणं.
‘रागिनी’मधलं ‘छोटासा बालमा’ हे गाणं मास्टर दीनानाथांच्या ‘सुकतातचि जगी या’ या चीजेवरून ओपीला सुचलं असं म्हणतात. मेहदी हसनने जेव्हा ‘छोटासा बालमा’ ऐकलं तेव्हा तो ओपीला म्हणाला, इस एक धून पे मेरी सारी जिन्दगी न्योछावर है! नय्यर ही आठवण अभिमानाने सांगायचा.
हो, अभिमान त्याच्या स्वभावातला स्थायीभाव होता. त्याला कुणी सृजनशील माणसाचा फक्कडपणा म्हणतात, कुणी ‘क्रीएटर्स इगो’ म्हणतात. पण याने नुकसानच होतं. जोपर्यंत तो ‘अभिमान’ असतो, तोपर्यंत कौतुक होतं, तुम्ही कुणीच नसता तेव्हा कुणी दखलही घेत नाही, पण तुमच्यामागून शिखराच्या पायवाटेवर अनेकांची पावलं पडलेली असतात तेव्हा तुमच्या अभिमानाला मसालेदार फोडणी देऊन त्याचा ‘अहंकार’ हा पदार्थ बनवून तो जगासमोर पेश केला जातो. आणि ही सिच्युएशन कलावंताचा घात करते.
कोणालाच कसं म्युजिक येत नाही, कित्येकांना कसं त्यानेच ‘घडवलं’, त्यानेच कसा हिंदी सिनेसंगीतात ऱ्हीदम आणला, नाहीतर संगीतात दमच नव्हता.. या आणि अशा फाकत्या मारायची ओपीला सवय होती. त्या त्याने खाजगी बैठकीत मारल्या असत्या तरी काही हरकत नव्हती.. याहून वाईट गमज्या कलावंत खाजगी बैठकीत मारतात. पण सार्वजनिक मैफलीत सौजन्याचा मुखवटा चढवायचा असतो हे भान त्यांना असतं. ओपीचं तेच भान सुटलं होतं. या साऱ्या गोष्टी तो भर रेकॉर्डिंगच्या वेळी बोलायचा. वादक, रेकॉर्डीस्ट वगैरे मंडळी ते बाहेर पोचवायची.
‘जवानीयां ये मस्त मस्त बिन पिये’ ‘सर पर टोपी लाल’ ‘यूं तो हमने लाख हसीं देखे हैं’ सारखी गाणी ओपीने ‘तुमसा नहीं देखा’साठी बनवली. पण त्याच्या बोलबच्चनगिरीला नसीर हुसैन कंटाळला. त्याने ‘दिल देके देखो’साठी उषा खन्ना आणली. तिला ओपी स्टाईलचं संगीत द्यायला लावलं. ते क्लिक झालं. ओपीसाठी हा धक्का होता. पण अहंकारी माणूस कधीच कुठलाच धक्का लागल्याचं मान्य करत नाही, ओपीनेही नाही केलं. ‘काश्मीर की कली’मधे त्याच्या तर्जवर ठुमके मारणाऱ्या शम्मीला जेव्हा हे कळलं की, ‘शम्मी को मैने बनाया’ असं ओपी म्हणतो तेव्हा तो नाराज झाला. नसीर जेव्हा ‘तिसरी मंझिल’मधे पुन्हा ओपीला बोलावण्याच्या गोष्टी करू लागला तेव्हा शम्मीने मोडता घातला.
वहिदाच्या आग्रहामुळे गुरुदत्त कॅम्प सुटला तेव्हा ओपीमधे उमेद होती, ‘आशा’ होती. त्यावर तो तगला. पण जेव्हा शम्मीने त्याला नाकारला तेव्हा ओपीच्या अंताची सुरुवात झाली. त्याच सुमारास ‘चैन से हमको कभी आपने जिने ना दिया’ ही करुण विलापिका गाऊन आशा पण निघून गेली. ओपीचं म्युजिक असेल तर मी अर्ध्या मानधनात काम करेन, असं म्हणणारी मधुबाला दूर जात-जात आयुष्यातूनच गहाळ झाली. या सगळ्यांची जी गत तीच बीआर चोप्राची. ओपीला जे एकुलतं एक फिल्फेअर अवार्ड मिळालं ते चोप्रांच्या ‘नया दौर’मधे. त्या काळात फिल्मफेअर पुरस्कार विकत मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना मान होता. पण फटकळ स्वभावामुळे चोप्रांनी ओपीला पुन्हा जवळ केलं नाही. सचिनदांकडे नवकेतनचा ग्रुप होता. शंकर-जयकिशन आरके घेरून बसले होते. रवीकडे चोप्रा, मदनमोहनकडे चेतन आनंद होते. एक ओपीच असा होता ज्याच्याकडे एखादी मातब्बर कंपनी नव्हती.
खरं तर ‘नया दौर’नंतर ओपीचं संगीत बहरलं होतं. पण नामांकित दिग्दर्शक, गीतकार त्याच्याबरोबर काम करायला उत्सुक नसत. त्याच सुमारास साहिरनेही त्याच्याबरोबर काम करणं सोडलं. मजरूह नाराज झाला. ओपीने शेवान रिझवी, एसएच बिहारी, नूर देवासी, अझीझ काश्मिरीसारख्या नवीन लोकांना पुढे आणायला घेतलं. नवीन माणसं आपल्या मेंटॉरच्या मागेपुढे करत असतात, ते ओपीच्या तबियतीला मानवणारं होतं. हा तो काळ होता जेव्हा ओपीची गाणी सघन, अर्थपूर्ण झाली होती. ‘वो हसीन दर्द दे दो’ ‘चैन से हमको कभी’ ‘आओ हुजूर तुमको’ ‘रातों को चोरी चोरी’ ‘कोई कह दे कह दे कह दे, जमाने से जा के, के हम घबरा के मोहब्बत कर बैठे’ ही उत्तम काव्यं असलेली गाणी याच काळातली.
ओपीने आपला जमाना गाजवला. सगळा माहौल संगीतमय करून टाकला. घोड्यांच्या टापांचा ताल, शब्दांवर आघात देत गाणं (ले के पहला पहला प्यार) ओपीने रुजवलं. चंदेरी पडद्यावरच्या मखमली प्रणयाला सुरीलं बनवलं ते ओपीनेच. सेन्श्युअस – बेहोष करणारी मदभरी गाणी ही त्याची खासियत झाली होती. त्यामुळे इंडस्ट्री त्याच्यावर नाराज होती पण श्रोते खुश होते. ‘रातों को चोरी-चोरी बोले मोर कंगना’ ‘वो हसीन दर्द दे दो’ ही गाणी ओपीच्या सेन्श्युअस म्युजिकची उत्तम उदाहरणं आहेत.
ओपीच्या अहंकारी स्वभावाचा गवगवा वेगाने होत होता. कचकड्याच्या जगाला त्याचा धगधगता अहंकार मानवेनासा झाला. तो एकटा पाडला गेला. आयुष्याच्या अखेरच्या काळात ओपी कफल्लक झाला होता. मुंबईच्या एका उपनगरात नाव बदलून जगत होता. होमियोपॅथीची प्रॅक्टिस करत होता. लोकांना औषधं देत होता. आपल्या अहंकारी स्वभावामुळे हा युगकर्ता संगीतकार एखाद्या कोमल स्वरासारखा गर्दीत मिसळून गेला.. आणि गर्दीतच विरून गेला..!! पण आजही त्याची गाणी ऐकू आली की बीमार मनाला औषध मिळतं आणि सहजपणे ओठावर येतं, ओ त्तेरा क्या कहना!
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.
मिथिला सुभाष यांचं सध्या होणारं हे हिंदी चित्रपट विषयक लेखन वेधक आहे .
शैली विशेष आवडलेली .
– प्रब
अप्रतिम मॅडम
मला आवडतात अशी माणसं प्रस्थापितांना धक्का देणारी . लेखन तुमचं नेहमी छानच असतं.
बहोत बढिया