-संजय सोनवणी
कोणत्याही समाजाचे आर्थिक तत्वज्ञान काय आहे, ते कसे राबवले जाते आणि त्या अर्थतत्वज्ञानाची उद्दिष्टे नेमकी काय आहेत यावरुन त्या समाजाची संस्कृती ठरत असते. किंबहुना जागतिक संस्कृत्यांचा पुरातन काळापसून ते आजतागायतपर्यंत अभ्यास केला तर धर्म नव्हे तर अर्थतत्वज्ञान व आर्थिक स्थितीचा फार मोठा प्रभाव मानवी संस्कृतीवर राहिला आहे असे आपल्याला दिसते. किंबहुना अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची हवी व ती कोणत्या प्रकारच्या राजकीय व प्रशासकीय प्रणालीमार्फत राबवली जावी याबाबतचे संघर्ष जगभर आजही सुरु आहेत. प्रत्येक प्रबळ राजकीय पक्ष कोणत्या ना कोणत्या अर्थतत्वज्ञानाचा प्रबळ समर्थक असतो तो यामुळेच. ज्यांना अर्थतत्वज्ञानच नाही अशा पक्षांना दीर्घकाळ राजकीय भवितव्य नसते हेही इतिहासाने वारंवार सिद्ध केले आहे.
आपण सिंधू काळापर्यंत मागे गेलो तर ती व तिला समकालीन असलेली इजिप्त, असिरियन व चीनी संस्कृती वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या भुभागात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक परिस्थित्यांचा वापर करत बलाढ्य बनलेल्या आपल्याला दिसतात. प्रत्येक संस्कृतीचे सामाजिक, धार्मिक विचार वेगवेगळे असले तरी एकच महत्वाचा दुवा म्हणजे ती उत्पादक व व्यापा-यांची संस्कृती होती. त्यामुळे अर्थजीवन भरभराटीला आले व प्रत्येक संस्कृतीने जी ऐहिक झेप घेतली ती अवशेषांच्या रुपाने का होईना आज आपण पाहू शकतो. तज्ञांच्या मते युद्धे व पर्यावरणातील बदलामुळे सनपूर्व १७५० च्या दरम्यान या संस्कृत्यांना आहोटी लागली. सिंधू संस्कृतीचे लोक पाऊस कमी पडू लागल्याने शहरांकडून ग्रामीण भागांत सरकले. मध्यपुर्वेत सुरु असलेल्या युद्धांमुळे व्यापार थांबला हेही कारण आर्थिक पडझडीला होते. यामुळे झाले असे की तटबंदीयुक्त, सुबक नगरे होती तीच कंगाल होत शेवटी अवशेषग्रस्त झाली. मग नव्याची निर्मिती कोठून होणार? कला-संस्कृतीतही घसरण झाली. निर्माणकर्ते समाज नवनवीन शोध लावण्यापेक्षा जगण्यापुरते तरी कसे कमावता येईल या विवंचनेने ग्रासले. थोडक्यात संस्कृतीचे अध:पतन आर्थिक आरिष्टामुळे झाले. तत्कालीन ज्ञात संस्कृत्यांत जगभर थोड्याफार फरकाने असेच झाले.
अर्थशास्त्राचा पद्धतशीर अभ्यास करत सिद्धांत मांडायची सुरुवात फार नंतर सुरु झाली असली तरी माणूस टोळ्या करुन रहात होता तेंव्हापासून अत्यंत प्राथमिक स्वरुपाचे का होईना अलिखित अर्थशास्त्र विकसित झालेले होते. त्या अर्थशास्त्राला अनुकूल अशी शेती, व्यापार, गुलाम व्यवस्था सर्वत्र आकाराला येत गेली. ग्रीक-रोमनांनी जरी आद्य लोकशाहीचा पाया घातला असे मानले जात असले तरी त्यांची अर्थव्यवस्था ही गुलाम केंद्रित होती. हा एक विरोधाभासच म्हणायला हवा!
भारतातील शेतीकेंद्रित अर्थव्यवस्थेला व्यापार यंत्रणेने बळ पुरवले. पण शेती व व्यापार यावर राज्यसंस्थेचे आधी कडक निर्बंध होते असे दिसत नाही. श्रेणी संस्था अधिक प्रबळ होती. चर्मकारापासून ते सोनारांपर्यंत प्रत्येक कारागिरांच्या जशा श्रेण्या होत्या तशाच सेवा पुरवणा-यांच्याही श्रेण्या होत्या. या श्रेणीप्रमुखांच्या संमतीखेरीज राजा कोणतेही अधिकचे कर आकारू शकत नव्हता. कौटिल्याने अर्थशास्त्रात तर श्रेणीप्रमुखांना एकत्र येत राजाविरुद्ध कट करू नये यासाठी उपाय सुचवले आहेत. अर्थात तसे कट कधी घडल्याचा एकही दाखला नाही. उलट उत्पादक व व्यापारी श्रेण्यांना स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आपण चवथ्या शतकापर्यंत भारताची आर्थिक भरभराट झाल्याचेच पाहतो. म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या आर्थिक अध:पतनापासून धडा घेत नवी अर्थरचना आकाराला आली व ती स्वतंत्रतावादी असल्याने व चार्वाक ते आगमिक शास्त्राने त्यांना तात्विक बळ पुरवल्याने देशाचे भरभराट झाली होती असे आपल्याला म्हणता येईल.
पण मधल्या काळात कशीबशी टिकून असलेली व्यवस्था पुन्हा कोलमडली आणि नवी बलुतेदारी अर्थव्यवस्था स्विकारल्याने पुन्हा एकदा नवे आर्थिक आरिष्ट सुरु झाले. गुप्तकाळापासुनच सामंतशाही व मंदिरशाहीचे वाढलेले प्रस्थ, परकीय आक्रमणे आणि धर्मतत्वज्ञानांतील आंतरकलह यामुळे हे अध:पतन सुरु झाले असे मानले जाते. यामुळे भारत पुन्हा आर्थिक व म्हणुनच सामाजिक अंध:कार युगात फेकला गेला तो आजतागायत फारसा बाहेर पडलेला नाही. या झंजावातात श्रेणीव्यवस्था पार जमीनदोस्त झाली आणि अकराव्या शतकाच्या आसपास तिने शेवटचा आचका घेतला. या नव्या आर्थिक आरिष्टाने समाजव्यवस्थाच सैरभैर झाल्याने इहवादी भारतीय परलोकवादी बनत गेले. आगमशास्त्रांच्या स्वतंत्रतावादी तत्वज्ञानाची जागा सावकाश वैदिक स्मृतीप्रणित बंदिस्त समाजव्यवस्थेच्या तत्वज्ञानाने घेतली. आर्थिक व्यवस्था व समाजसंस्कृतीचे नाते असे परस्परावलंबी असल्याने जो सामाजिक मनोगोंधळ होत जातो त्यातून संस्कृतीचे अध:पतन होत नवनिर्माणाच्या उर्मी मारल्या जातात. कोणत्याही दरिद्र समाजात सामाजिक जाणीवा प्रगल्भपणे विकसित होण्याची क्षमता नसते. एका अवनतीतून सावरण्यासाठी दुस-या नव्या अर्थसिद्धांताची गरज असते. पण ब्रिटिशकाळाने तीही शक्यता संपवली व आम्ही आयात केलेल्या आर्थिक रचनाशास्त्राला प्राधान्य देत बसलो.
खरे म्हणजे आर्थिक स्वतंत्रतावाद विरुद्ध कौटिल्याचा राज्य-नियंत्रित अर्थवाद यावर धमासान भारतात पूर्वीच होऊन गेले होते. कौटिल्याने अनेक उद्योग सरकारद्वारा चालवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात वस्त्रोद्योग, सुवर्ण, खाणी ते पार वेश्यालयेही सरकारने चालवावीत अशा सूचना दिल्या. सरकारी मालकीचे उद्योग ही संकल्पना भारतात समाजवाद अथवा साम्यवादाकडून आलेली नाही तर ती प्रथम कौटिल्याकडून आलेली होती. गुप्त काळात काही प्रमाणात तर नंतर मोठ्या प्रमाणात कौटिलिय अर्थतत्वज्ञान राजसंस्थेने वापरले. त्याची परिणती खाजगी व्यवसायांच्या स्वातंत्र्याचे हरण होण्यात झाली. नंतर तर मग अशी स्थिती आली की राज्यसंस्थाही उद्योग चालवू शकल्या नाहीत आणि खाजगी क्षेत्राचे कंबरडेच मोडले असल्याने चरितार्थापुरता व्यवसाय असे त्याचे स्वरूप बनले. त्यात दहाव्या शतकानंतर आलेल्या दुष्काळांच्या रांगेने तर होती तीही अर्थव्यवस्था पार धुतली गेली. बलुतेदारी पद्धतीचा उगम यातुनच झाला आणि त्यातून व्यवसायाधिष्ठित सामाजिक व्यवस्था नाहीशी होत तिचे जातिव्यवस्थेत रुपांतर झाले व ती कठोर बनायला हातभार लागला. थोडक्यात अर्थतत्वज्ञानातील ही फार मोही गफलत होती व तिचे परिणाम समाज-संस्कृतीवर होणे अपरिहार्य होते. तसा तो झालाही. पण आमच्या सामाजिक विचारवंतांनी आर्थिक इतिहासाकडे आणि आर्थिक प्रेरणा व संस्कृती यातील संबंध नीटसा न अभ्यासल्यामुळे आमचे नवे शास्त्रशुद्ध अर्थतत्वज्ञान जन्माला येणे शक्य नव्हते.
म्हणजेच अर्थव्यवस्था समाजसंस्कृती कशी असेल हे ठरवते. कंगालांच्या आर्थिक प्रेरणा या नेहमी भ्रष्टतेकडे झुकतात हा जागतिक अर्थपर्यावरणाचा इतिहास आहे. त्यातून जी समाजसंस्कृती अस्तित्वात येते ती ना धड राजकीय, ना आर्थिक, ना धड प्रगल्भ समाजव्यवस्था साकारते. भारतीय परिप्रेक्षात विचार केला तर आपले सांस्कृतिक अध:पतन का झाले आहे हे आपल्या लक्षात येईल. बौद्धिक क्षेत्रात मागास राहिलेले अर्थमागासच राहतात. आणि अर्थ-मागासांच्या सांस्कृतिक उत्थानाची शक्यता धुसर असते हे ओघाने आलेच. आर्थिक स्थिती व एकूणातील सांस्कृतिक स्थिती यातील अनुबंध तपासावा लागतो तो यामुळेच.
विषमता, भेदभाव, गलिच्छ पातळीवर जाणारी आपापसातील स्पर्धा, झुंडशाही, सर्वोपरी होऊ पाहणारी धर्मशाही, विकासाचे घसरते मापदंड याची मुळे माणसाच्या अर्थप्रेरणा नेमक्या काय आहेत व कोणते अर्थतत्वज्ञान त्याला अभिप्रेत आहे यातही असतात. कारण मानवी संस्कृतीचे ते अविभाज्य अंग आहे. आज काय व्यवस्था आहे ते पाहिल्याखेरीज आम्हाला भविष्यात कोठे आंणि कसे जायचे आहे हे ठरवता येणार नाही हे उघड आहे. कोणती अर्थरचना आम्हाला उपकारक ठरेल आणि तशा प्रेरणा निर्माण व्हायला व स्विकारायला आमची मन:स्थिती तयार असेल काय, याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे.
(लेखक नामवंत अभ्यासक असून सडेतोड वैचारिक लेखनासाठी ते ओळखले जातात )