-सचिन परब
सध्या संत नामदेवांची गुरु ग्रंथसाहेबातली पदं वाचतोय. आपल्या मराठी नामदेव गाथेतल्या अनेक अभंगांवर प्रक्षिप्त असल्याचे आरोप झालेत. बदल केल्याचे संशय व्यक्त केले गेलेत. त्या तुलनेत नामदेवरायांची हिंदी पदं ओरिजिनल ठरतात. विशेषतः गुरुग्रंथसाहेबातली. ती पवित्र मानल्याने गेल्या दोनशे वर्षांत मराठी संतसाहित्यात घुसखोरी झाली. तशी होण्याची शक्यता नाहीच.
आजु नामे बीठुला देखिआ मूरखको समजाउ रे ।।
पांडे तुमरी गाइत्री लोधे का खेतु खाती थी ।
लै करि ठेगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी ।।१।।
पांडे तुमरा महादेउ घउले बलद चढिआ आवतु देखिआ था ।
मोदी के घरि खाणा पाका वाका लडका मारिआ था ।।२।।
पांडे तुमरा रामचंदु सो भी आवतु देखिआ था ।
रावन सेती सरबर होई घरकी जोइ गबाई थी ।।३।।
हिंदु अंधा तुरकू काणा दुहांते गिआनी सिआणा ।
हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीत,
नामे सोई सेविआ जह देहुरा न मसीत ।।४।।
पुस्तकात कठीण शब्दांचे अर्थ आहेत. त्यातून हे पद समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. नामदेव समजून घेण्याचा प्रयत्न केलाय. किती चूक, किती बरोबर, मला माहीत नाही. आता आहे ते आता बरोबर आहे. समज वाढली तरी जास्त खोलात जाता येईल.
आजु नामे बीठुला देखिआ मूरखको समजाउ रे ।।
हे ध्रुवपदच मस्तय. त्याचा अर्थ, `आज मी नामदेव, विठ्ठलाला साक्ष ठेवून मूर्खांना समजतोय.` यात स्टेटमेंट आहे. कन्विक्शन आहे. यातले मूर्ख म्हणजे कोण? त्याचं पुढे उत्तर आहे,
पांडे तुमरी गाइत्री लोधे का खेतु खाती थी ।
लै करि ठेगा टगरी तोरी लांगत लांगत जाती थी ।।१।।
नामदेव महाराज सांगताहेत, `भटा, तुझी गायत्री शेतकऱ्याच्या शेतात पिकं खात होती. तेव्हा देवाने तिच्या पायावर दांडा घातला. तेव्ही मी तिला लंगडत लंगडत जाताना पाहिलंय.`
पांडे म्हणजे पंडित किंवा ब्राह्मण. उत्तरेतलं ब्राह्मणांना हाक मारायचं संबोधन. मराठीत आपण भटा म्हटलं तर पांडेच्या जवळ जाऊ शकतो. गायत्री म्हणजे गाय आणि गायत्री म्हणजे वैदिक मंत्रांची कर्मकांडी परंपराही. लोधी म्हणजे शेतकरी.
नामदेव इथे ब्राह्मणांना तुमचं आमचं करताहेत. हे वेगळं आहे. लक्षवेधी आहे. भटा, तुझी परंपरा वेगळी, माझी वेगळी, असा त्याचा अर्थ काढता येतो. तुझी गायत्री गाय शेतकऱ्याच्या शेतात येऊन चोरून चरतेय. शेतकरी म्हणजे कष्टकरी. आजच्या संदर्भात बहुजन समाज. तेव्हाच्या संदर्भात शूद्र. बहुजनांच्या शेतात तुझी गायत्री शिरलीय. ती चोरून त्यांचं डोकं खाऊ लागलीय. त्यांना ते माहीतही नाही. माझ्या देवाने दंडुका मारून तिचं तंगडं तोडलंय. मी तिला लंगडत लंगडत जाताना पाहिलंय, म्हणजेच देव सांगतोय गायत्रीची वेदांची कर्मंकांडी परंपरा अर्धवट आहे. तोकडी आहे. बहुजन समाजाने त्याच्या नादी लागू नये. ती खरी भक्ती नाही.
पांडे तुमरा महादेउ घउले बलद चढिआ आवतु देखिआ था ।
मोदी के घरि खाणा पाका वाका लडका मारिआ था ।।२।।
`भटा तुझ्या महादेवालाही मी पांढऱ्या बैलावर बसून येताना पाहिलंय. राजाच्या घरी जेवण बनवण्यासाठी त्याने त्याचा मुलगा मारला होता.`
इथे नामदेवराय पुराणातल्या श्रियाळ राजाच्या गोष्टीचा दाखला देतात. पाहुणा म्हणून आलेल्या शंकराने श्रियाळ राजा आणि चांगुणा राणीसमोर अट ठेवली. त्यांचा एकुलता एक चिलया बाळाला उखळीत घालून मारलं. त्याचं जेवण बनवलं आणि राजाने तेच माझ्यासोबत खाल्लं, तरच मी जेवेन. राजाराणी त्या परीक्षेत पास झाले वगैरे गोष्ट आहे.
भक्तीचं महात्म्य सांगण्यासाठी आणि व्रतवैकल्यांची थोरवी गाण्यासाठी ही कथा वापरली जाते. पण नामदेवराय इथे नेमक्या उलट पद्धतीने ती गोष्ट घेतात. भटा, तुझा हा महादेव असा कसा अमानुष? असा प्रश्नच विचारतात.
इथे राजा किंवा मालक या अर्थाने मोदी शब्द येतो. आज त्या शब्दाचे सगळेच संदर्भ बदललेत.
पांडे तुमरा रामचंदु सो भी आवतु देखिआ था ।
रावन सेती सरबर होई घरकी जोइ गबाई थी ।।३।।
नामदेवराय सांगतात, `भटा, तुझ्या रामचंद्रालाही मी येताना पाहिलंय रे. रावणाशी युद्ध करेपर्यंत त्याने तर आपली लग्नाची बायकोही गमावली होती.`
असा कसा तुझा राम भटा. तो तर त्याची बायकोही हरवून बसतो. असलं काही नामदेवराय विचारत असतील, यावर आपला लगेच विश्वास बसत नाही. पण हे असं आहे खरं. बसवण्णांच्या वचनांमधे असे पुराणांमधले दाखले देऊन असेच प्रश्न विचारलेले आहेत. त्याची आठवण हे वाचताना येते.
आश्चर्य म्हणजे नामदेवांनी गुरू ग्रंथसाहेबामधल्या पदांमधे अनेकदा रामभक्तीचा, रामनामाचा महिमा गायलाय. इतरही हिंदी पदांमधे तर तो येतोच येतो. मराठीतही रामकृष्णाच्या गोष्टी त्यांनी अभंगांतून सांगितल्यात.
त्यांना सांगायचं असावं, पांडेचा राम वेगळा आहे आणि वारकऱ्याचा वेगळा. आपण तिथे घोटाळा करतो. गोष्टींतल्या रामाच्या पुढे जाऊन त्याने दाखवलेला निरामय जगण्याचा आदर्श घेण्याचा हा विचार असावा. गांधीजींचा राम आणि अडवाणींचा राम यातलं अंतरच आपल्याला कळत नाही.
हिंदु अंधा तुरकू काणा दुहांते गिआनी सिआणा ।
हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीत,
नामे सोई सेविआ जह देहुरा न मसीत ।।४।।
शेवट करताना नामदेवराय म्हणतात, `हिंदू आंधळा आहे. मुसलमान काणा. एकाचे दोन डोळे गेलेत. दुसऱ्याचा एक गेलाय. दोघांपेक्षाही खरा शहाणा आहे तो ज्ञानी. हिंदू देवळात पूजतो. मुसलमान मशिदीत पूजतो. नामदेव मात्र तिथेच पूजतो, जिथे देऊळही नाही आणि मशीदही नाही.`
एखाद्या गोष्टीचं तात्पर्य सांगावं, तसं हे शेवटचं कडवं येतं. नामदेवांचं हे पद अनेकदा कोट केलं जातं. पण ते गुरू ग्रंथसाहेबात आहे, हे मला तरी माहीत नव्हतं. इथे नामदेवरायांनी कट्टर धर्मवाद्यांच्या मुस्काटात खणकन वाजवलीय. आता तरी शहाणे बना. धर्माने आंधळे होऊ नका. मंदिर मशीद वाद करू नका. देऊळ नाही आणि मशीदही नाही, तिथेच खरी भक्ती होते. भक्ती धर्माच्या पलीकडे आहे. वारकरी विचार तिते आहे. नामदेवराय बहुतेक आपल्याला हेच बजावत आहेत. या चार ओळी फ्रेम करून घरोघर लावायला हव्यात आपण.
सातशे वर्षांपूर्वी नामदेवरायांनी हे शहाणपण आपल्याला सांगितलंय. पण अजून आपल्याला काही कळत नाही. आपण मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारे, मठ यांच्या पलीकडे बघायलाच तयार नाही. खरी भक्ती चार भिंतीत असूच कशी शकते? निदा फाजली म्हणतात, `घर से मस्जिद है बहुत दूर चलो यूं कर लें, किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए`. पण आम्ही तर मंदिर मशीद वादांवरून किती लेकरांना रडवलं. अनाथ केलं. उद्ध्वस्त केलं.
नामदेवराय, खरंच आम्हाला माफ करा. आम्ही खरं तर तुमची माफी मागण्याच्या लायकीचेही नाही.
(लेखक ‘कोलाज डॉट इन’ या वेब पोर्टलचे आणि ‘रिंगण’ या दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या वारी विशेषांकाचे संपादक आहेत)
……………………….
– संत नामदेवांच्या ७५०व्या जन्मवर्षानिमित्त लिहिलेले लेख वाचण्यासाठी facebook.com/ringanwari
गुरुग्रंथ साहिब मधले नामदेवांचे विचार सोप्या भाषेत सांगितले याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अतिशय अप्रतिम विश्लेषण नामदेवाच्या वैचारीक बैठकीचे, विशेषताहा हिंदीचे भाषांतरित रूप share केल्या बद्दल धन्यवाद