शिवसेनेत लोकशाही नाही; शिवशाही आहे आणि शिवसेनाप्रमुख हेच शिवसेनेचे एकमेव नेते आहेत; ही गोष्ट बाळासाहेबांनी कधी लपवली नाही. ही रचना मान्य करणाऱ्यांनाच त्यांच्या शिवसेनेत स्थान होते. ते विविध पदांवर निमूटपणे प्यादे म्हणून वावरत होते. तरीही ‘आज ना उद्या आपल्याशिवाय आहेच कोण,’ अशी आशा काहींना होती. ते आपल्या पुढे कुणी घुसू नये; यासाठी घुसण्याची ताकद असणार्यांना विविध मार्गाने हतबल करण्याची वा बाहेर हुसकावण्याची फडणीशी करीत. परंतु, उद्धव आणि राज ठाकरे ही पटावर नव्यानेच अवतरलेली ‘प्यादी’ हत्ती-उंट-घोडा सोडा; वजिराच्या चालीने चालू शकतात, हे जाणवताच फडणीशी चालीच्या नेत्यांची घालमेल झाली. त्यांनीच हस्ते- परहस्ते माधव देशपांडेंना पुढे केले होते. त्यांचा उद्धार सभास्थानी शिवसैनिक करीत होते.
शिंदे गटाचा ’दसरा मेळावा’ मुंबई- बीकेसी येथे झाला. त्याला बाळासाहेबांचे द्वितीय पुत्र जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना जयदेव ठाकरे म्हणाले, ”मी इथे आलो ते एकनाथ शिंदे यांच्या प्रेमापोटी. मी गोटात आलेलो नाही. ठाकरे कुणाच्या गोठ्यात बांधले जात नाहीत !’’ शब्दाचे खेळ करण्यात सगळेच ठाकरे वस्ताद आहेत. त्या जोरावर ते ’गुंतुनी गुंत्यात सारा, पाय माझा मोकळा’ हे कविवर्य सुरेश भट यांचे शब्द खरे करीत असतात. ते असेही म्हणाले, ”हा सारा सत्तेचा गोंधळ संपवा. निवडणुका घ्या आणि सरळ शिंदेशाही आणा!” हाही शब्दांचाच खेळ. कारण इतिहासात गाजलेल्या ‘शिंदेशाही’ची गादी ग्वाल्हेरात आहे. त्यांचा आणि एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचा दुरान्वयेही संबंध नाही. असलाच तर तो शिंदेशाहीच्या तिरीमिरीशी आहे.