काँग्रेसच्या पिंजर्‍यातील पोपटांची फडफड !

-प्रवीण बर्दापूरकर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कमेंटमुळे विरोधकांना जितका आनंद झाला त्यापेक्षा जास्त आसुरी आनंद काँग्रेसमधील कांही पोपटांना झालेला असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसतं आहे . ‘उत्सुक पण पुरेशी तयारी नसलेला विद्यार्थी’ अशा ज्या बातम्या प्रकाशित या संदर्भात प्रकाशित झाल्या आहेत त्या संदर्भ सोडून आहेत . जे विधान माध्यमात आले ते ओबामा यांच्या २००८मधील निवडणुकीच्या संदर्भात आहे . बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीतील स्मरणांवर आधारित असलेल्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकातील त्या पानावरील पूर्ण मजकुराचा अनुवाद असा-

♦♦♦

त्या रात्री मेजवानीच्यावेळी सोनिया गांधी बोलण्याऐवजी ऐकतच जास्त होत्या . जेव्हा जेव्हा धोरणांबद्दल उल्लेख होई त्यावेळी त्या मनमोहन सिंग यांच्याशी सहमती दाखवत होत्या . बऱ्याच वेळा त्या आमचं संभाषण त्यांच्या मुलावर केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत होत्या . मला हे स्पष्ट जाणवलं की , त्या एक धूर्त आणि समोरच्या व्यक्तीवर प्रभाव टाकण्याइतपत चाणाक्ष होत्या . राहुल मला हुशार आणि उत्सुक वाटला . तो त्याच्या आईसारखाच देखणा होता . त्यानं त्याच्या राजकारणासंबंधी पुरोगामी विचार आणि भविष्याबद्दल मत मांडले . अधूनमधून तो २००८ मधील माझ्या निवडणुकीच्या मोहिमेबद्दल थांबत थांबत भेदक प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत होता पण , त्याच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता आणि अपरिपक्वता जाणवली . जसं काही त्याने अभ्यासाची उत्तम तयारी केलेली होती आणि आपल्या शिक्षकावर प्रभाव टाकण्याची त्याची इच्छा होती . पण , कुठेतरी खोलवर त्याच्यामध्ये मला क्षमता किंवा योग्यतेचा आणि ध्यासाचा अभाव वाटला .

जसं जसा आम्हाला उशीर होत होता मनमोहन सिंग झोपी न जाण्याची धडपड करत होते . दरवेळी आपला चष्मा चेहऱ्यावरुन काढायचे आणि जागं राहण्यासाठी घोट घोट पाणी प्यायचे . मी मिशेलला म्हणजे माझ्या पत्नीला , खुणेनं निरोप घ्यायची वेळ झाली असं सूचित करत होतो . पंतप्रधान मनमोहन सिंग आपल्या पत्नीसोबत आम्हा दोघांना आमच्या गाडीपर्यंत सोडण्यासाठी सोबत आले . अंधुक प्रकाशात सिंग अशक्त आणि वयाच्या ७८ वर्षांच्या मानाने वयस्कर वाटत होते .

आम्ही गाडीतून निघालो तसं मला आश्चर्य वाटत होतं की , भविष्यात ते पंतप्रधान नसतील तेव्हा काय होईल ? सत्ता सरळ राहुलच्या हातात जाईल का ? त्याच्या आईनं त्यांच भविष्य तसं अधोरेखित केलेलं होतं आणि काँग्रेस पक्षाचं वर्चस्व अबाधित राहिल का ? का भाजपच्या देशाच्या विभाजनवादी राष्ट्रीयतेला बळजबरीला बळी पडेल ? काही का असेना माझ्या मनात शंका होती . तो दोष मनमोहन सिंग यांचा नव्हता . त्यांनी त्यांचं कर्तव्य चोखपणे बजावलं होतं . या मुक्त लोकशाहीचा बाजा वाजवणाऱ्या शीत युद्धाच्या पश्चात . त्यांनी आपलं काम भारताच्या संविधानानुसार पार पाडलं . दैनंदिन गोष्टींकडे दुर्लक्ष न करता किंवा जीडीपी वाढवण्याच्या तांत्रिक बाजू सांभाळत , त्यांनी सामाजिक सुरक्षिततेचं जाळं चांगलचं सांभाळलं . आमच्या दोघांना खात्री होती की , लोकशाहीकडून आपण एवढीच अपेक्षा करु शकतो . विशेषत: एका मोठ्या , विविध सांस्कृतिक आणि धार्मिक समाज भारत आणि अमेरिकासारख्या देशात क्रांतिकारक झेप किंवा महत्त्वाची सांस्कृतिक पुनर्बांधणीने नव्हे . प्रत्येक सामाजिक रोग बरा करणे किंवा शाश्वत उत्तर त्यांच्या आयुष्यात उद्देश आणि अर्थ शोधत असतात . फक्त नियमांचे पालन . ज्यामुळे आपण आपल्या समोरील प्रश्न सोडवू शकलो किंवा निदान परस्परांमधील भेदभाव ( फरक ) सहन करणे आणि सरकारी धोरणं ज्यामुळे आपली जीवन पद्धती सुधारली आणि शैक्षणिक प्रगती साधली तर ते मानवाच्या हीन आवेशाला लगाम लावेल .

( ज्येष्ठतम अनुवादक प्रा. संतोष भुमकर यांनी हा अनुवाद केलेला आहे . )

♦♦♦

बराक ओबामा यांनी राहुल गांधी यांच्यावर टिपणी करावी आणि त्याच वेळी राहुल गांधी यांचं नाव न घेता त्यांच्या नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर कांही काँग्रेस नेत्यांनी (?) पुन्हा एकदा आडून वार करावा हा योगायोग असू शकत नाही .  पिंजर्‍यातल्या पोपटाचं बंड केवळ पंख फडफडवण्यापुरतंच मर्यादित असतं . एकदा का पंख फडफडवून थकवा आला , की पिंजर्‍यातली मिरची आणि डाळ खाऊन धन्याची कवणं गाण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्यासमोर नसतो . हे आठवण्याचं निमित्त , पी. चिदंबरम आणि कपिल सिब्बल यांनी काँग्रेस नेतृत्वाविरुद्ध केलेली वक्तव्ये आहेत . त्या सुरात महाराष्ट्राचे पृथ्वीराज चव्हाण यांनीही सूर मिसळला आहे . काँग्रेस पक्षाच्या वाताहतीची इतकी चिंता आहे तर या तिघांसह ते ‘शूरवीर’ २३ नेते पुढे येऊन नेतृत्वाची सूत्रे हाती घेऊन काँग्रेसला नवसंजीवनी प्राप्त करुन देण्याचा क्रूस का पेलत नाहीयेत हा खरा प्रश्न आहे .

पक्षाला उभारी देण्याऐवजी , राहुल गांधी यांना बळ प्राप्त करुन देण्याऐवजी काँग्रेसमधले हे पोपट बेजबाबदारपणे वागत आहेत . पक्षाची वाईट स्थिती झालेली आहे , याचं भान या पोपटांना आलं हे चांगलंच आहे , असं म्हणता आलं असतं पण , अशी स्थिती निर्माण होण्यासाठी गांधी घराणं वगळता , या पोपटांपैकी कोणी कोणती जबाबदारी पेलायला हवी होती आणि ती पेलण्यात त्यांना अपयश कसं आणि का आलेलं आहे , याबद्दल आत्मपरिक्षण करायला हवं . इतकी वर्ष पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची ऊबवूनही यापैकी ( शरद पवार यांचा ठोस अपवाद वगळता ) एकही पोपट किमान राज्यात तरी किमान जनाधार मिळवू शकलेला नाही , याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या पोपटांनी दाखवलं नाही .

गेल्या सहा-सात वर्षात राहुल गांधी देशभर फिरुन नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे पोपट का सहभागी झाले नाहीत , असा प्रश्न विचारला तर हे सर्व निरुत्तर होतील . राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले , विविध संसदीय अस्त्रांचा वापर करुन किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली , याही प्रश्नांची उत्तरं जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं . भाजपकडून होणार्‍या गळचेपी विरुद्ध , फिरवल्या जाणार्‍या वरवंटयाविरुद्ध , घाईत लादलेल्या नोटाबंदी , वस्तू आणि सेवा कराविरुद्ध , राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात , रान पेटवत राहुल गांधी यांनी पुकारलेल्या लढाईत काँग्रेसच्या यापैकी कोणत्या पोपटानं समीधा टाकण्याचा कधी प्रयत्न केला , याचंही उत्तर मिळायला हवं . राहुल गांधी यांचे कांही आरोप अंगलट आले हे खरं आहे , राजकारणात असं घडतच असतंही पण , त्याचसोबत राहुल यांच्या मागे यापैकी किती पोपट पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्वाचा आहे . त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य पोपटांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे . राजकारणात पक्षनिष्ठा महत्वाच्या असतातच पण , त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली , हेही त्या इतकंच महत्वाचं असतं ; अशा भूमिकातून प्रत्येक नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून उठत असते .

खरं तर , पक्षाविषयी एवढी कळकळ आणि अंगात धमक असेल तर सरळ सरळ आम्हाला राहुल गांधी यांचं नेतृत्व अमान्य असल्याचं जाहीर करुन या पोपटांनी पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत पण , ते तसं करणार नाहीत कारण गांधी नावाचं नेतृत्व असल्याशिवाय यापैकी एकही पोपट नगर पालिकेच्या निवडणुकीतही निवडून येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे . प्रतिस्पर्धी असलेला भारतीय जनता पक्ष देशात पाळंमुळं कशी घट्ट करतो आहे याचा अभ्यास तरी या पोपट केला आहे का आणि  तशी प्रदीर्घ काल सत्तेशिवाय राहून पक्षासाठी पूर्ण झोकून देण्याची तयारी या पोपटांनी आजवर कधी दाखवली आहे का , असेही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात .  सरकार आलं की सत्तेची खूर्ची उबविण्या आणि स्वत:ची आलिशान निवासस्थाने उभारण्या पलीकडे यापैकी बहुसंख्य काँग्रेसी पोपटांनी कांहीही केलेलं नाही . असं असतांना या नेत्यांनी व्यक्त केलेल्या नाराजी म्हणा की असंतोष म्हणजे पिंजर्‍यातली फडफड आहे !

आणखी एक , राहुल गांधी अभ्यासात कमी पडतात या बराक ओबामा यांच्या मताशी सहमत होता येणार नाही पण , ते राजकीय गांभीर्यात कमी पडतात हे मात्र मान्य करायला हवं…च . राहुल गांधी यांना खरंच जर अध्यक्षपदात रस नसेल तर तर त्यांनीही ते स्पष्ट करायला हवं आणि त्या पदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सूचवण्याचा उमदेपणा दाखवायला हवा किंवा सलग तिसर्‍या पराभवाची भीती न बाळगता , पक्षातील सर्व धूर्त आणि वृद्ध ‘पोपटां’ना जबाबदार्‍यांतून मुक्त करत अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेत पक्षाची नव्यानं बांधणी करायला हवी ; सर्व स्तरावर नवे चेहरे देत पक्षाचा चेहेरा तरुण करायला हवा . राफेल प्रकरणात आपला अभ्यास कमी पडला याचा भान त्यांनी बाळगायला हवं ; त्यामुळे नाहक बदनामी पदरी पडली आणि भाजपच्या हाती आयतं कोलीत मिळालं , लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलिंगन देण्याचा प्रकार देण्याचा बालिशपणा ठरला ; असे सल्ले देणार्‍यांपासून त्यांनी सावध राहायला हवं . राजीव गांधी वर्षातून एकदा सूटी घेत कारण तेव्हा काँग्रेसकडे बहुमत होतं , हे राहुल गांधी यांनी विसरु नये , आता परिस्थिती तशी नाही . बिहारच्या निवडणुका रंगात आलेल्या असताना राहुल पर्यटनाला गेले , नरेंद्र मोदी यांचे सरकार शेतकरी विरोधी कायदे करत होते तेव्हा राहुल विपश्यना करण्यासाठी ५७ दिवस गायब होते…असे बरेच दाखले देता येतील . राजकारण हा पूर्ण वेळ देण्याचा आणि गंभीर विषय आहे याचा विसर राहुल गांधी कध्धीच पडू देऊ नये तरच काँग्रेसला कायम विरोधी बाकावर बसण्याची वेळ येणार नाही .

शेवटी – बराक ओबामा यांच्या  ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या पुस्तकात नरेंद्र मोदी यांचा उल्लेखही नाही तसंच भाजपला ओबामा यांनी विभाजनवादी ( Divisive ) म्हटलं आहे , हे राहुल गांधी यांच्यावर केलेल्या एका कथित प्रतिकूल टिपणीमुळे ‘आनंदी’ झालेल्या भाजपच्या समर्थकांनीही विसरु नये !

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९

 

Previous articleशेतीच्या शोधाचे ऐतिहासिक परिणाम
Next articleअलेप्पी बॅकवॉटर ट्रिप: एक अविस्मरणीय अनुभव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here