अलेप्पी बॅकवॉटर ट्रिप: एक अविस्मरणीय अनुभव

-राकेश साळुंखे

बरोबर एक वर्षांपूर्वी दक्षिण भारताची मी एक भन्नाट ट्रिप केली होती.  . कोल्हापूर मध्ये आम्ही चौघे मित्र  प्रताप भोसले,  अनुप वारंग, शैलेश  जाधव व मी  एकत्र आलो.  दुपारी तीन वाजता कोल्हापूरहून निघालो. कुठे जायचे, किती दिवस रहायचे? काहीच निश्चित नव्हते .  दक्षिणेकडे जायचे एवढेच ठरले होते . रानेबेंनूर मागे पडले व शिमोगाचा पर्यायही मागे पडला. रात्री १० वाजता चित्रदुर्गला जेवणासाठी थांबलो. मुक्कामाला म्हैसूरूला जायचे ठरवले .  फोन करून ओळखीचे हॉटेल बुक केले. पहाटे ३- ४ वाजेपर्यंत येऊ असे सांगितले . रात्रीचा प्रवास चालू झाला . तुमकुरु ओलांडले . सगळीकडे सामसूम दिसत होती.  बंगलोर बायपासमार्गे जायचे की मधल्या कुनिगल मार्गे जायचे यावर चर्चा झाली . कुनिगलच्या रस्त्याचा मागचा माझा अनुभव चांगला नव्हता तरी  याच शॉर्टकट रस्त्याने जायचे ठरले  आणि आश्चर्य असे की नवा कोरा  नवीन रस्ता आम्हाला लागला . मग काय आम्ही सुसाटच निघालो . ड्राइविंग  आता शैलेशकडून अनुपकडे  आले होते.   पहाटे चारला म्हैसूरला हॉटेलवर  पोहोचलो. थोडा वेळ विश्रांती घेऊन दिवसभर म्हैसूर दर्शन केले . दुसऱ्या दिवशी सकाळी  कूर्ग  कडे निघालो . कुर्ग पाहून पुढे उटी ला जायचे ठरले . उटीला वायनाडमार्गे जायचे की काय अशी चर्चा चालू असतानाच  प्रतापराव म्हणाले, केरळला हाऊस बोटीवरच जाऊ .  तेथे जेवण पण मस्त असते आणि  बॅकवॉटरचा अनुभव पण परत घेऊयात.

लांबचा व प्रचंड रहदारी असलेल्या रस्त्याने प्रवास असल्याने सकाळी  लवकर   निघालो . नागरहोले वाइल्ड लाईफ संचुरीमधून वायनाडमध्ये उतरलो . दुपारच्या जेवणासाठी एक हॉटेल पाहिले . हॉटेलमध्ये बारही होता. केरळमध्ये बहुतांश  भागात दारू बंदी आहे . अपवादात्मक परमिट रूम आहेत. इस्त्री केलेला कडक शर्ट व लुंगी घातलेले  दोनतीन  जण  वेगवेगळ्या टेबलवर बसले होते.  आम्हाला वाटले ते  जेवणाच्या ऑर्डरची वाट बघत असतील, पण त्यांची ऑर्डर आली तसे ते सगळे  खाडकन उभे  राहीले व  लुंगी टाईट करून आलेली  Quarter ग्लासमध्ये रिकामी केली  .  उभ्या उभ्या घटाघटा ड्राय मारून बिल देऊन काही क्षणातच ते बाहेर पडले.  आम्ही हे दृश्य पाहून अवाकच झालो. नंतर काही वेळाने मात्र आम्हाला हसू आवरेना .  जेवण झाले आणि आम्ही  निघालो वाटेत. वाटेत  मनमोहक निसर्ग असूनही फारसे न थांबता अलेप्पीला पोहचायचे हे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन पुढे जात होतो.  कालिकतच्या आधीपासूनच हेवी ट्रॅफिक लागले. कालीकत लाच संध्याकाळचे  ७ वाजले  होते.हेवी ट्रॅफिकमुळे पुढे जाण्यास खूप वेळ लागत होता. आता बराच काळ असेच ट्रॅफिक राहणार होते .  अलेप्पीला पोहोचण्यास बराच काळ लागणार अस लक्षात आले.

  मग कोची येथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला . तेथील हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग केले  . कोचीला पोहोचण्यास रात्रीचे १२ वाजले .  रात्र असल्याने रस्ता सामसूम होता . GPS असूनही  हॉटेल लवकर सापडेना . हॉटेलला लावलेला  कॉलही  उचलला जात नव्हता . मग मात्र  तेथील मुक्कामाचा विचार बदलून अलेप्पीला जायचे असे ठरले. पाऊस चालू झाला होता . पहाटे  ३ वाजता मुक्कामी पोहोचलो .हॉटेल मालक चक्क मराठी बोलणारा होता.  त्याने महाराष्ट्रात २० वर्षे काढली होती . त्यामुळे बोलण्यात वेळ गेला .  एका  प्रसिद्ध हॉटेलबुकिंग अँप  चलावणाऱ्यांनी इथल्या हॉटेल वाल्यांचे खूप पैसे थकवलेत व त्यामुळेच ऑनलाईन बुकीग इथले हॉटेल वाले घेत नाहीत असे त्याच्या बोलण्यातून समजले . झोपायला चार वाजले . दोन तास झोप घेवून सहाला सर्वजण उठले ,  कारण आम्हाला बॅकवॉटरची ट्रीप करायची होती .

      केरळमधील मित्राला सांगून बोट आधीच ठरवली होती.  पूर्वीच्या  बॅक वॉटर  ट्रीपच्या वेळी कुमारकोमला हाऊस  बोट  घेतली होती .  त्यामुळे यावेळी अलेप्पीला प्राधान्य दिले.  वेळेवर जेटीवर पोहोचलो .  बोटवाल्यांनी  शाकाहार की मांसाहार  विचारून त्याप्रमाणे  त्यांचा माणूस खरेदी करून आला.  त्यात एक तास गेला.  आधीच एवढा प्रवास व जागरण त्यामुळे हा एक तास सुद्धा खूप मोठा वाटला.   एकदाचे  बोटीत बसलो व त्याने इंजिन स्टार्ट केले . वेम्बनाद तलावाच्या दिशेने आमची  सफर चालू झाली .  सुरुवातीला छोट्या कॅनाल मधून जात असताना कॅनॉलच्या दुतर्फा असणारी  घरे , नारळी पोफळीची झाडे  व घरापुढे असलेल्या छोट्या बोटी  असे सुंदर दृश्य नजरेस पडत होते  . दुसऱ्या हाऊसबोट आम्हाला क्रॉस होत होत्या.  तर काहींना आम्ही ओलांडून पुढे चाललो होतो .   काही  बोटीतील उत्साही लोक हात हलवून किंवा छानसे  स्माईल देऊन अभिवादन करत होते.  थोड्याच वेळात स्वागत पेय व नाश्ता आला, सर्वांना भूक लागली होतीच . पटापट आलेले खाद्यपदार्थ संपवून बोटीवर आम्ही सैलावलो.  हाऊस बोटीवर आचारी चांगला असला तर खाण्याची चंगळ असते. बहुदा तो चांगलाच  असतो. नाश्तामध्ये इडली अप्पम हा केरलीयन पदार्थ होता . हा पदार्थ तांदळाच्या शेवयांपासून बनवलेला असतो . त्यासोबत हरभऱ्याची उसळ होती .

    वेम्बनाद या भव्य तलावात बोटीने प्रवेश केला .  सर्वांनी कॅमेरे , मोबाईल बंद केले . प्रत्येक जण त्याची भव्यता डोळ्यात साठवू लागला .  निळ्याशार पाण्यावर संथ चाललेल्या हाऊस बोटी चित्रातल्या सारख्या वाटत होत्या . चोहोबाजूला पाणीच पाणी व त्यावर आम्ही तरंगत , मजेत चाललो होतो . थोड्या वेळाने पाण्यातच एका कडेला बोटीचा नांगर टाकला गेला व जेवणासाठी  केळीची पाने टेबलावर अंथरली गेली . आम्हाला दुपारच्या जेवणातील करिमन फ्राय माशाची व केरळीयन जेवण सडयाची प्रतीक्षा होती.  करिमन हे गोड्या पाण्यातील चविष्ठ मासे केरळमध्ये  प्रसिध्द आहेत .  सड्या म्हणजे केळीच्या पानावर वाढलेले पारंपरिक जेवण. त्यावर जो भात वाढला जातो तो जाड तांदळाचा असतो  . तो शिजण्यास तीन तास तरी लागतात. तो भरपूर खाल्ला तरी पचनाची बिलकुल तक्रार होत नाही . दोन  तासात पोट रिकामे वाटते . साऊथ इंडियन पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला पोटाची बिलकूल तक्रार निर्माण होत नाही . फक्त काहींना  सांबरच्या  आंबटपणाचा त्रास होऊ शकतो.

    जेवण झाल्यावर परत बोट सुरू झाली आणि मग बॅकवॉटरमधून संध्याकाळी पर्यंत फिरलो  . बोटीतून फिरताना निसर्गाच्या भव्यतेची प्रचिती घेत अंतर्मुख व्हायला होत होते . कुमारकोमला बॅक वॉटर ट्रीप घेतली तर भरपूर पाणपक्षी दिसतात. बोटीतील AC संध्याकाळी  चालू करून सकाळी ७ पर्यंत सुरु ठेवतात .  जेथे बोटीतील AC सुरू करण्यासाठी वीज कनेक्शन मिळते अशा ठिकाणी बोटी पार्क करतात.   कुमारकोमला असाल तर सकाळी उठल्यावर बोटीतून बाहेर पाहिले की सर्वत्र अक्षरशः हजारो कमळाची फुले उमललेली असतात.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Alleppey Houseboat Trip Experience |

Previous articleकाँग्रेसच्या पिंजर्‍यातील पोपटांची फडफड !
Next article‘मीडिया वॉच’: दिवाळी अंक २०२०-Video
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.