त्यात सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत , असा हा एकंदरीत तिढा आहे . आहे त्या नेतृत्वाच्या भोवती बहुसंख्येनं स्वार्थी , बेरके , जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या ( Fossil ) , खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा ( खरं तर सरदार म्हणा किंवा मनसबदार ! ) भरणा आहे . या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे . या बहुसंख्य नेत्यांना शीर्ष नेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी तर हवे आहेत पण , त्यांची पूर्ण हुकमत मात्र नको आहे , असा हा अवघड गुंता आहे आणि त्या गुंत्यात काँगेस पक्ष पूर्णपणे अडकलेला आहे . यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे . अलीकडच्या काळात भाजपशी लढण्याची नुसती भाषा आहे ; प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच लढतांना दिसत नाही ; सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे . उमेद हरवलेलं , पराभूत मानसिकता असणारं सैन्य लढाई जिंकू शकत नाही , हेही भान काँग्रेसला राहिलेलं नाही .