दि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !

-प्रवीण बर्दापूरकर

दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे यांच्या मृत्यूची बातमी तशी अनपेक्षित नाही तरी त्या बातमीनं मन विदीर्ण झालं , डोळ्यात अश्रू आले कारण त्यांचा प्रभाव माझ्यावर होता .
महात्मा गांधी आणि विनोबा यांचा अभ्यासक असलेला एक हिंदुत्ववादी , विद्वान पण भिडस्त संपादक अशी माझ्या मनावरची मामासाहेब घुमरे यांची प्रतिमा आहे .

‘क्लोज-अप’ या देशमुख आणि कंपनीने प्रकाशित केलेल्या मी लिहिलेल्या व्यक्तीचित्र संग्रहातील मामासाहेब घुमरे यांच्या आठवणी जागवणारा हा मजकूर- 

******

रात्री उशिरा पडवीत बाजेवर लोळत वाचत असताना दूरवर मंदिरात सुरु असलेल्या कीर्तनातल्या टाळ-मृदंगाच्या आवाजाच्या तालावर झोप लागावी आणि सकाळी जाग यावी ती , त्याच मंदिरातल्या काकड आरती आणि घंटांच्या आवाजानं. त्याचवेळी घरातला कुणीतरी ज्येष्ठ मोठमोठ्यानं मंत्र म्हणत असावा . अंगणातल्या पारिजातकाचा सुवास पडवीभर पसरलेला असताना दिवसाची सुरुवात व्हावी , असं गावाकडे अनेकदा घडायचं. सकाळ अशी सात्त्विक झाली की , उरलेला दिवस मग मंदिराच्या गाभार्‍यात संध्याकाळी पसरलेल्या समईच्या आश्‍वासक प्रकाशासारखा सरायचा. माझ्या पत्रकारितेची सकाळ प्रसन्न करणारे जे लोक भेटले त्यात अनंतराव भालेराव , रंगा वैद्य, निशिकांत जोशी , बाबा दळवी आणि दि.भा. उपाख्य मामासाहेब घुमरेही आहेत.

मामासाहेबांशी झालेल्या ओळखीचं वय आता प्रौढ वयात पोहोचलं आहे , म्हणजे पत्रकारितेच्या अगदी सुरुवातीच्या काळातच मामा भेटले . गुरु आणि शिक्षक या अर्थानं विचार करायचा झाला तर , मामांनी थेट मुळाक्षरं कधी गिरवून घेतली नाहीत किंवा वर्गात पत्रकारिताही शिकवली नाही ; पण सहवास सुरु झाल्यावर त्यांच्याकडून खूप काही शिकता आलं , हेही तेवढंच खरं . ते त्यांनी जाणीवपूर्वक दिलं आणि ते जाणीवपूर्वकच स्वीकारलं गेलं, असंही घडलं नाही. त्यांच्या लेखनाचा , त्यांच्या कामाच्या शैलीचा, वर्तनाचा कळत नकळत संस्कार होत गेला . खरं तर , सर्वच ज्येष्ठांनी भरभरून दिलं; पण आम्हालाच ते पूर्ण घेता आलं नाही . जेवढं काही घेता आलं त्यामुळेच जाणिवा समृद्ध , विकसित आणि संवेदनशीलही झाल्या . जर त्यांनी शिकवलेलं सगळंच आकलनाच्या कवेत घेता आलं असतं तर, कुठल्या कुठं पोहोचता आलं असतं याची रुखरुख कायम आहे .

एक माणूस आणि पत्रकार म्हणून मामा ज्या विचारांचे म्हणून ओळखले जातात त्यापासून करोडो मैलाचं अंतर असणार्‍यांपैकी मी एक . मीच एकटा कशाला ? रिपब्लिकन विचाराचे ज्ञानेश्‍वर वाघमारे , कम्युनिस्ट प्र. शं. देशमुख अशी ‘तरुण भारत’मध्ये नोकरी करणार्‍यांचीही बरीच नावं सांगता येतील ; पण एक ज्येष्ठ सहकारी आणि माणूस म्हणूनही मामा त्यांच्या त्या एका विचारामुळे विरोधी कधी वाटलेच नाहीत . उलट अनेकांना अमान्य असणारा हिंदुत्ववाद स्वीकारणारे आणि त्याचबरोबर महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्यावर अव्यभिचारी निष्ठा ठेवणारे मामा आमच्या सारख्यांना माणूस म्हणून कायमच वेगळं रसायन असणारे म्हणून अनुकरणीय राहिले . हिंदुत्ववादी दैनिकाचे संपादक असल्यानं गांधीवादी तसंच समाजवाद्यांकडून आणि गांधी-विनोबांवर श्रद्धा असल्यानं हिंदुत्ववाद्यांकडून मामासाहेब घुमरे बरेच दुर्लक्षित राहिले , याबद्दल विचारवंत भास्कर लक्ष्मण भोळे आणि माझ्यात एकमत होतं . मामांच्या त्या हिंदुत्ववादाच्या विरोधाला , विचारांचं अधिष्ठान कमी असलेला आणि आक्रमकता तसंच कुणाचे ना कुणाचे विचार ऐकून -वाचून केलेला आमचा तरुण वयातला कथित धारदार प्रतिवाद असे . तेव्हाही मामा अतिशय सौम्यपणे त्यांच्या विचारांचं समर्थन करीत असत आणि आता इतकी वर्षे त्यांना ओळखत असल्यावरही त्यांचा तो सौम्यपणा कणभरही कमी-जास्त झालेला नाही . प्रत्येक माणसाला आयुष्यभर असं एकाच मापानं आणि उंचीनं जगता येईल का ?

विरोधी विचारालाही प्रतिवादाचा हक्क असतो, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य असतं, हे तरुण वयात लक्षात यायचं नाही ; पण ते नंतर स्वीकारलं गेलं आणि अजूनही पाळलं जात आहे ते मामांच्या संस्कारांमुळेच . संपादक झाल्यावरही त्यांच्यासोबत अनेकदा संवाद साधण्याची संधी मिळत असे . आठवड्यातून एक-दोनदा तरी दुपारी चारच्या सुमारास मामा न्यूजरुममध्ये येऊन सगळ्यांसोबत चहा घेत , हास्यविनोदात सहभागी होत . शरद मोडक , प्रकाश देशपांडे , ज्ञानेश्‍वर वाघमारे , प्र. शं. देशमुख , वामन तेलंग , लक्ष्मणराव जोशी असे ज्येष्ठ सहकारी त्या गप्पांच्या मैफलीत असत . अशा मैफलीत मामा नंतर जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनलेल्या जगण्याच्या छोट्याछोट्या अतिशय छान टिप्स देत . उदाहरणार्थ, एकदा एका सौंदर्यवती अभिनेत्रीविषयी गप्पा सुरु असताना अचानक मामा समोर आले आणि आम्ही तरुण मंडळी गडबडलो . लपवाछपवी व्यर्थ ठरल्यावर त्या अभिनेत्रीवर सुरु असलेली चर्चा सांगितल्यावर मामा म्हणाले , ‘कोणत्याही सौंदर्यावर बोलण्यात पाप कसलं ? सौंदर्याला दाद न देणारा माणूस नपुंसकच असला पाहिजे.’ इतकी महत्त्वाची बाब तोपर्यंत कोणीच आम्हाला इतक्या साध्या शब्दात सांगितलेली नव्हती.

कायम लुनावर फिरणारे, फुलपँट , अर्ध्या बाह्यांचा बुशशर्ट आणि डोक्यावर काळे केस असे पाहिलेले मामासाहेब घुमरे आता नव्वदीच्या घरात आणि जाणीव-नेणीवेच्या पल्याड पोहोचलेले आहेत . तेव्हा एक अतिशय साधं टेबल आणि साधीच खुर्ची . टेबलवर एक काच आणि त्या काचेवर कागद ठेवून मामा आकंठ लेखनमग्न असत . मग्नता कसली ती तर लेखन साधनाच . मात्र त्या साधनेला गर्वाचा लवलेशही नसे . किंबहुना आक्रमकता , मोठ्या आवाजात-तावातावानं प्रतिपादन , ज्ञानताठा वगैरे मामांच्या आजूबाजूलाही फिरकत नसे. मराठीसोबतच इंग्रजी , हिंदी , संस्कृत भाषांवर हुकूमत होती. त्यांची विद्वत्ता थक्क करणारी; पण भिडस्त होती . बहुधा या भिडस्तपणामुळेच विद्वत्ता मिरवावी, संपादकीय भूमिकेतून व्यासपीठावर मिरवावं , असं त्यांना कधी वाटलं नाही . त्यामुळेच अनेक सन्मान त्यांच्याकडे चालून आले नाहीत आणि जे अनेक आले त्यातले बहुसंख्य मामासाहेबांनी नम्रपणे नाकारले . याचा अर्थ मामासाहेब ठाम नव्हते असं नव्हे , पण ते दुराग्रही नव्हते ; त्यांना राग-लोभ नव्हते, असं नव्हे . बातमीत एखादी चूक झाली तर कार्यालयात आल्याबरोबर मामांचा निरोप चपराशी कानावर घालत असे . मामांच्या केबिनचा दरवाजा साधारणपणे बंद असल्याचा अनुभव क्वचितच कुणाला आला असेल . अशा वेळेस ‘आत येऊ का ?’ असं म्हणत आपण समोरच्या खुर्चीत जाऊन बसलं की मामा डोळ्यावरचा चष्मा काढून टेबलवर ठेवत आणि खुर्चीवर मागे रेलत चूक काय झाली, तिथे नेमका शब्द कोणता हवा होता आणि शब्दशास्त्र समजावून सांगत असत . हे शिकवणं नसे आणि त्यांच्या कथनात पांडित्याचा आवही नसे पण , ते जे  काही सांगत असत त्यात तळतळ अशा तन्मयतेनं येत असे की त्यांचं ते म्हणणं मेंदूच्या मेमरीत एकदम फिट्ट बसत असे. उदाहरणार्थ ‘तज्ज्ञ’ हा शब्द त्यांचा संस्कार स्वीकारलेल्यांपैकी कुणीही ‘तज्ञ’ असा लिहिणारच नाही ! कठीण समय आला तर, सहकार्‍यांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहत. (याची एक हकिकत ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकात वर आहे ).

मामांसाहेबांच्या सौम्यपणात वरवर कधीच न दिसणारा एक आक्रमक बाणेदारपणा  आहे . हा बाणेदारपणा दाखवताना तो इतक्या खुबीने मामा शब्दात पकडतात की , भल्याभल्यांच्याही तो लक्षात येत नाही . उदाहरणार्थ आणीबाणीनंतर लिहिलेल्या एका अग्रलेखात (आणि तेही तरुण भारत’मध्ये आलेल्या!) आणीबाणीचं सर्व खापर एकट्या इंदिरा गांधींवर फोडण्याची भूमिका मामांनी संपादक म्हणून स्वीकारलेली नाही ; यावर आज कुणाचा चटकन विश्‍वास बसणार नाही . मामांच्या अग्रलेखांचा संग्रह असलेले ‘अन्हिक’ हे पुस्तक वाचताना हे पुन्हा लक्षात आलं की , आणीबाणीला प्रखर विरोध केल्यावर आणि त्याकाळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करावं लागल्यावरही मामांनी आणीबाणी लादल्याचा दोष इंदिरा गांधींच्या किचन कॅबिनेटला दिलेला आहे . त्या काळात अग्रलेखातून अशी भूमिका घेणं किती मोठं आव्हान आणि जोखीम असेल याची कल्पना आज करता येणार नाही पण , मामांनी ते केलंय हेही तेवढंच खरं .

मामासाहेब घुमरे, अनंतराव भालेराव, रंगा वैद्य, निशिकांत जोशी, बाबा दळवी ही मंडळी जेव्हा संपादक झाली, तेव्हा पत्रकारितेत एक मोठं स्थित्यंतर होण्यास सुरुवात झालेली होती . तोपर्यंत ‘मिशन’ असणार्‍या पत्रकारितेनं , ‘प्रोफेशन’च्या रस्त्यावर चालल्याशिवाय तरणोपाय नाही हे कटू असलेलं वास्तव स्वीकारलेलं होतं कारण, अस्तित्वाचा प्रश्‍न   होता . या संपादकांचेच समकालीन  गोविंदराव तळवलकर , माधव गडकरी आदींनी व्यवस्थापनाची ही भूमिका जाहीरपणे तर बाबा दळवी यांसारख्यांनी जाहीर न करता स्वीकारलेली होती. घुमरे काय , वैद्य काय किंवा अनंतराव भालेराव काय यांना ‘मिशन टू प्रोफेशन’ हा प्रवास पूर्णपणे अमान्य होता कारण, पत्रकारिता त्यांच्यासाठी केवळ मिशनच नव्हती , तर ती एक जीवनसाधनाही होती. त्यामुळे आणि तो व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारण्याबाबत संपादकांच्या त्या पिढीचा आणि त्यांच्या व्यवस्थापनाच्या मनातही संभ्रम होता . त्यामुळे त्या स्पर्धेतही ही मंडळी काहीशी मागेच राहिली, हा खरं तर इतका मोठा अपरिहार्य मानसिक कोंडमारा होता की, तो सहन करण्यासाठी विलक्षण दृढता आणि घडणही मामासाहेब घुमरे आणि त्यांच्या पिढीच्या संपादकांच्या मनाची होती , हे आता जाणवतं . या विपरीत अशा वैचारिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर लिखाणाशी कोणतीही तडजोड न करण्याची या मंडळींनी दाखवलेली सहनशीलता आपल्याला नम्र करणारी आहे. म्हणून मग मामा आपल्या मनावर अधिकाधिक अमीट होत जातात, हेही तेवढंच खरं.

संपादक म्हणून निवृत्त झाल्यावर ज्या पद्धतीनं मामांनी अयोध्येतील त्या जागेच्या संदर्भात सुरु असलेल्या कामात स्वतःला झोकून दिलं ते त्यांच्या टोकदार सामाजिक जाणिवेचा एक जिता जागता अनुभव होता कारण , काही तरी भयावह घडणार या संकेतानं अस्वस्थ असलेले मामासाहेब घुमरे तेव्हा बघायला मिळालेले आहेत. बाबरी मस्जिदीच्या संदर्भात आमच्या नावानं ती जी काही घटना घडली त्याच्या किती तरी दिवस आधी या देशात काही तरी विलक्षण अशी उलथापालथ घडणार आहे आणि जनजीवनात महाभयंकर लाटा उसळणार आहेत , असं अधेमधे भेट झाली की मामासाहेब कातर होऊन सांगत असत . तेव्हा मामा द्रष्टेपणानं काय सांगत आहेत हे लक्षात येत नसे . नंतर हे लक्षात आलं तेव्हा खूप उशीर झालेला होता . शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या कामातही मामांनी स्वतःला असंच झोकून दिलं मात्र , हे करताना त्यांची भूमिका त्यांनी कार्यकर्त्याचीच ठेवली. वयाच्या साठीनंतर, इतक्या मोठ्या पदावरुन निवृत्त झाल्यावरही मामा सदैव एक साधा माणूस म्हणून कार्यरत असतात हे लक्षात येतं आणि मामांचं माणूसपण अधिक भावतच जातं . मोठ्या पदावरून निवृत्त झाल्यावर आणि वय वाढत गेल्यावर हेकट आणि हट्टी न होता अधिक समंजस होत जाणंही सहज घडणारी प्रक्रिया नाही . त्यासाठी हवी असते सात्त्विकता, तीही जन्मजात आणि ती नेमकी तशीच मामासाहेबांजवळ आहे .

मामांशी अनेकदा बोलताना त्यांच्याकडून जे काही शिकता आलं त्याबद्दल बोलून दाखवलं तर मामांना विलक्षण संकोच वाटतो . मग त्या काळात सहवासात आलेले तुमच्या सोबतचे सगळेच हे का शिकले नाहीत ?, असा प्रश्‍न अतिशय भोळेपणानं मामा आपल्याला विचारतात आणि निरुत्तर करतात .  प्रश्नाचा रोख लक्षात आल्यावर तो प्रश्‍न विचारताना त्यांच्या चेहेर्‍यावर उमटलेले मिश्किल हसू ‘कीं कारणं’ हेही लक्षात येतं. मामांसारखी सात्त्विक आणि सोज्ज्वळ माणसं पत्रकारितेच्या निर्णायक टप्प्यावर भेटल्यानं लेखनात तडजोड आली नाही आणि त्यांच्यासारखे सीनियर्स भेटलेच नसते तर काय झालं असतं या प्रश्‍नाचं उत्तर माझ्याजवळ नाही; पण मामांचं भेटणं काय किमतीचं आहे हे सांगण्यासाठी ज्ञानेश्‍वरीचाच आधार घ्यायला हवा –

आपुलिया मनी बरवी असमाहि गोठी जीवी।

ते कवणेसी चावळावी जरी ऐक्य जाहले॥

(चांगली वाटते, जीवात मावत नाही, कुणाला तरी सांगाविशी वाटते अशी गोष्ट.)

– एक माणूस आणि संपादक म्हणून मामासाहेब घुमरे यांची भेट होणं आयुष्यात इतकं महत्त्वाचं आहे

( लेखन- २ जून २०१८ )

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
   ९८२२० ५५७९९

Previous articleकाँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ ?
Next articleभूतान:आनंदी व सुखी माणसांचा देश
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.