काँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ ?

-प्रवीण बर्दापूरकर

ध्या जी कांही अंतर्गत सुंदोपसुंदी माजलेली आहे , कलह सुरु आहे आणि त्यातच अध्यक्षपदाचा सावळागोंधळ सुरु आहे , त्यामुळे देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्ष एक समृद्ध अडगळ झाल्यासारखी स्थिती आहे . सलग दोन लोकसभा निवडणुकांच्या पराभवाच्या मानसिकतेतून हा पक्ष सावरणं , कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण करुन संघटना मजबूत करणं आणि काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी तसंच भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं हे सध्याच्या घडीला तरी ‘मुंगेरीलाल के सपने’ दिसू लागलेलं आहे , इतका हा पक्ष ( राहुल गांधी वगळता ) निष्क्रिय झालेला आहे !

या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणारा , पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचे बलिदान दिलेल्या , सत्तेत तब्बल सहा दशकं राहिलेल्या , या देशाला विकासाच्या वाटेवर नेणार्‍या आणि अगदी गाव-खेड्यापर्यन्त पसरलेल्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे .  इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून हा पक्ष अधिकाधिक व्यक्तीकेंद्रीत होत गेला , गांधी कुटुंब तसंच कांही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित झाला , पक्ष संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला , ही वस्तूस्थिती आहे . कधीकाळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणार्‍या या पक्षाला गेल्या दोन निवडणुकात लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्या इतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत , इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे , कारण साडेतीन-चार दशकात या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली   नाही , त्यासाठी आवश्यक असणार्‍या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत आणि दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत ‘तेच ते’ नेते आहेत ; नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची फौज उभारलेली गेलेली नाही , असं घडलं तर त्या तरुण रक्ताला वाव द्यावा लागेल , अशी विद्यमान नेत्यांना भीती आहे . त्यातच गेल्या सुमारे सव्वा वर्षापासून या पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्ष नसतांनाही कोणतंही सोयरसुतक या पक्षाच्या नेत्यांना आणि नेतृत्व करणार्‍या गांधी घराण्याला नाही , अशी चारही बाजूंनी मोडकळीस आलेल्या वाड्यासारखी अवस्था सध्या पाहायला मिळते आहे . याचं एक कारण म्हणजे या पक्षाला शीर्षस्थानी आवश्यक आहे तसं खंबीर नेतृत्व सध्या नाही . जे कांही शीर्ष नेतृत्व ‘गांधी’ घराण्याचं आहे ती एक अपरिहार्य अगतिकता आहे पण , आता त्या गांधी नावाचा करिष्मा ओसरु लागलेला आहे , असं म्हणण्यास खूप वाव असल्यासारखे निवडणुकांचे निकाल आहेत  .

त्यात सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत , असा हा एकंदरीत  तिढा आहे . आहे त्या नेतृत्वाच्या भोवती बहुसंख्येनं स्वार्थी , बेरके ,  जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या ( Fossil ) , खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा ( खरं तर सरदार म्हणा किंवा मनसबदार ! ) भरणा आहे .  या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे . या बहुसंख्य नेत्यांना शीर्ष नेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी तर हवे आहेत पण , त्यांची पूर्ण हुकमत मात्र नको आहे , असा हा अवघड गुंता आहे आणि त्या गुंत्यात काँगेस पक्ष पूर्णपणे अडकलेला आहे  . यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे . अलीकडच्या काळात  भाजपशी लढण्याची नुसती भाषा आहे ; प्रत्यक्षात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच लढतांना  दिसत नाही ; सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे .  उमेद हरवलेलं , पराभूत मानसिकता असणारं सैन्य लढाई जिंकू शकत नाही , हेही भान काँग्रेसला राहिलेलं नाही .

पक्षाला उभारी देण्याऐवजी , राहुल गांधी यांना बळ प्राप्त करुन देण्याऐवजी काँग्रेस नेते कसे बेजबाबदार वागत आहेत , याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात २३ नेत्यांनी केलेल्या बंडाकडे पाहायला हवं . पक्षाची इतकी काळजी आहे तर पक्ष पातळीवरच चर्चा होऊ देण्याऐवजी या नेत्यांनी हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना पाठवलेलं पत्र माध्यमांकडे पोहोचतं केलं आणि तेही या पत्रावर चर्चा करण्याचं मान्य केलेलं असल्यावर ; याचा अर्थ ते पत्र/बंड/कळकळ एक स्टंट होता . पक्षाची वाईट स्थिती झालेली आहे , याचं भान या नेत्याना आलं हे चांगलंच होतं असं म्हणता आलं असतं पण , अशी स्थिती निर्माण होण्यासाठी गांधी घराणं वगळता , या नेत्यांपैकी कोणी कोणती जबाबदारी पेलायला हवी होती आणि ती पेलण्यात त्यांना अपयश कसं आणि का आलेलं आहे , याचा ऊहापोह या पत्रात करण्यात आलेला नाही . इतकी वर्ष पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची ऊबवूनही यापैकी एकही नेता किमान राज्यात तरी पूर्ण जनाधार मिळवू शकलेला नाही , याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या नेत्यांनी दाखवलं नाही . राहुल गांधी यांनी  पत्राच्या संदर्भात हल्ला चढवताच या नेत्यांनी ते पक्षाशी कसे एकनिष्ठ आहेत आणि आजवर त्यांनी पक्षात कधीही बंडखोरी केलेली कशी नाही,  याचा दाखला दिला . पण , गेल्या   सहा-सात वर्षात राहुल गांधी देशभर फिरुन नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे नेते का सहभागी झाले नाहीत , असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला असता तर हे सर्व नेते निरुत्तर झाले असते . राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हते तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले , विविध संसदीय अस्त्रांचा वापर करुन किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली , याही प्रश्नांची उत्तरे जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं . भाजपकडून होणार्‍या गळचेपी विरुद्ध , फिरवल्या जाणार्‍या वरवंटयाविरुद्ध , घाईत लादलेल्या नोटाबंदी , वस्तू आणि सेवा कराविरुद्ध , राफेल विमानाच्या खरेदीच्या संदर्भात , रान पेटवत राहुल गांधी यांनी पुकारलेल्या लढाईत काँग्रेसच्या यापैकी कोणत्या नेत्यानं समीधा टाकण्याचा कधी प्रयत्न केला , याचंही उत्तर मिळायला हवं . राहुल गांधी यांचे कांही आरोप अंगलट आले हे खरं आहे , राजकारणात असं घडतच असतंही पण , त्याचसोबत राहुल यांच्या मागे यापैकी किती नेते पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्वाचा आहे . कारण त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे . राजकारणात पक्षनिष्ठा महत्वाच्या असतातच पण , त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली , हेही त्याइतकंच महत्वाचं असतं ; अशा भूमिकातून त्या नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून निघत असते . काँग्रेसच्या या बहुसंख्य नेत्यांनी या काळात स्वीकारलेल्या मौनी भूमिकेला म्हणूनच ‘सोयीस्कर’ असा अर्थ प्राप्त झाला आणि भाजपला अप्रत्यक्षपणे बळ मिळालं , हे विसरता येणार नाही  .

या पत्रावर गंभीर चर्चा करवून आणण्याऐवजी श्रीमती सोनिया गांधी यांनी त्रागा व्यक्त करण्यातून कांहीही साध्य झालेलं नाही , हेही सांगून टाकायला हवंच . पक्षाच्या प्रती त्यांचं असणारं योगदान कुणीही कधीही ( अगदी त्यांच्या विरोधकांनीही ) नाकारलेलं नसतांना आणि आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राहणं शक्य नसताना , त्यांनी पुन्हा हंगामी असेना अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं . कोणत्याही दबावाला बळी न पडता सोनिया गांधी यांनी  एक तर राहुल गांधी यांच्याकडे झुकणारा त्यांचा कल स्पष्ट सांगायला हवा होता आणि राहुल गांधी यांची रीतसर निवड होईपर्यंत एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपवून दूर होणं इष्ट ठरलं असतं किंवा गांधी घराण्याला या पदाचा कोणताही मोह नाही , हे एकदा निक्षून सांगून टाकत पक्षाच्या सर्व कटकटीतून मुक्त होत अन्य इच्छुकासाठी अध्यक्षपदाचा  मार्ग मोकळा करुन द्यायला हवा होता . पुन्हा हंगामी का असेना पद स्वीकारुन , हे पद त्या ‘गांधी घराण्या’तच ठेऊ इच्छितात असा संदेश ( नकळतपणे का होईना ! ) श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडून दिला गेला आहे .

राहुल गांधी यांना खरंच जर अध्यक्षपदात रस नसेल तर तर त्यांनीही ते स्पष्ट करायला हवं आणि त्या पदासाठी एखाद्या उमेदवाराचं नाव सूचवण्याचा उमदेपणा दाखवायला हवा किंवा सलग तिसर्‍या पराभवाची भीती न बाळगता , जुन्या धेंडाना कठोरपणे बाजूला सारत त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेत पक्षाची नव्यानं बांधणी करायला हवी ; सर्व स्तरावर नवे चेहरे देत पक्षाचा चेहेरा तरुण करायला हवा . त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिला पण , सोनिया गांधी यांचं स्वास्थ्य ठीक नसल्यानं निर्णयाधिकार राहुल यांच्याकडेच आहेत , हे एक उघड गुपित आहे . ताजं उदाहरण राज्यसभेतील उपनेतेपद गौरव गोगोई आणि प्रतोदपद रवनीतसिंग बिटू यांच्या नियुक्तीचं आहे .  गुलाम नबी आझाद , मनीष तिवारी , चिदंबरम  यासारख्या ज्येष्ठांना डावलून या नियुक्त्या झाल्या आहेत . असाच खमकेपणा यापुढे राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षित आहे आणि ते जमत नसेल तर त्यांनी पक्षाची आणखी वाताहत होऊ देण्यापेक्षा अन्य कुणाच्या सूत्रं देणं इष्ट  ठरेल . देशाच्या राजकारणात नुसती अडगळ बनून राहण्यापेक्षा काँग्रेसनं ‘समृद्ध अडगळ’ होणं बरं असेल , कारण त्यामुळे दिवाणखान्यात शोभेची वस्तू म्हणून तरी स्थान मिळेल !

  (लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
   ९८२२० ५५७९९

Previous articleसुळी दिलेला संत (विनोबा : नवे आकलन)
Next articleदि. भा. घुमरे – एक भिडस्त संपादक !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.