-पंकज वंजारे
धार्मिक कर्मकांड करायला, की अचूक कालगणनेसाठी…?
एकादशी…चतुर्थी असो, की सोमवार…रविवार येतो कशासाठी ?
चला समजून घेऊ या…!
..अधिक महिना का येतो ? याचे पंचांगकर्त्यांनी व त्या आधारे ‘शुभ – अशुभ मुहूर्त ‘ सांगणाऱ्यांनी याचे खरे – खुरे उत्तर समाजाला सांगायला हवे होते. जे अपेक्षित होते, तसे न करता, पाप – पुण्याची भीती दाखवत, दान – दक्षिणा लुटत, पुरोहितांकडून धार्मिक कर्मकांडांच्या आधारे जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करणे सुरूच ठेवण्यात आले आणि अधिक महिना शोषण करण्याचे माध्यम झाले आहे.
महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना ‘अधिक ‘ या शब्दाचा अर्थ नीट कळला, असं वाटत असतानाच, अधिक महिना आल्याची चर्चा ऐकली. त्या वेळी प्रश्न पडला, की या वर्षी पृथ्वी सूर्याभोवती जास्त फिरणार आहे का ? हा प्रश्न तुम्हालाही पडला असू शकतो. उत्तर शोधले पाहिजे. चला शोधूच मग !
अधिक महिना आला,की नदीपात्रात पुण्य मिळवायला, पाप धुऊन टाकायला अंघोळ करणे, (बरं विनोद बघा, असे करणे याचा अर्थ आपण पाप केलंय् हे स्वतःच सिद्ध करणे होय.), जावयांना भेटवस्तू देणे, जेवण देणे, मांसाहार न करणे , पुण्य मिळवण्यासाठी पुरोहितांच्या हातून धार्मिक कर्मकांड करवून घेणे, दान – दक्षिणा देणे इत्यादींची परंपरा या महिन्यात पाळली जाते.
पण खरंच, हे वरील कर्मकांडे पाळण्यासाठी, अवैज्ञानिक वर्तन करण्यासाठीच हा ‘अधिक महिना ‘ येतो कां..? अधिक महिन्याच्या नावाने आपले मानसिक, आर्थिक शोषण तर नाही ना केल्या जातं ?
आपण आपल्या घराच्या भिंतीवर टांगलेले ३६५ दिवसांचे सौरवर्षाची [ (पृथ्वीची सूर्या भोवती केलेली एक प्रदक्षिणा)सूर्यावर आधारीत दिनदर्शिका वापरत जरी असलो तरी सण – उत्सव आपण पंचांगानुसार साजरे करत असतो. याची आपल्याला कल्पना सुद्धा नसते. हिंदू पंचांगानुसार चंद्राला पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा काळ म्हणजे एक महिना (मास). या गृहितकावर आधारित आहे पंचांग. ज्याला चांद्रमास म्हणतात.
परंतु भारतीय पंचांग हे आता ‘चांद्र – सौर्य ‘ आहे. याचा अर्थ वर्ष सौर आहेत, पण महिने मात्र चांद्र. ते कसे ? हे विस्ताराने समजून घेऊया. म्हणजे , चंद्र २९.५ दिवसांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचा अर्थ चांद्रमास (महिना) २९.५ एवढ्या दिवसांचा झाला. आता पुढील गणित केल्यास, बघा काय लक्षात येतं .
२९.५ × १२ = ३५४ दिवस
हे उत्तर येईल. प्रत्यक्षात ३६५ दिवसांचे एक सौरवर्ष असतांना चांद्रवर्षावर आधारित पंचांगात ते ३५४ दिवसांचे आहे. म्हणजे सौरवर्षापेक्षा (३६५दिवस ) चांद्रवर्षात प्रत्येक वर्षी ११ दिवस कमी भरतात. याचा अर्थ चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान आहे. हे असेच सुरू राहिले असते तर, प्रत्येक सण अकरा – अकरा दिवसांनी मागे – मागे येत, थंडीत गुढीपाडवा, पावसाळ्यात दिवाळी, ऊन्हाळ्यात दसरा साजरा करावा लागला असता ?
मित्रांनो, आजचा विचार केला तर हिवाळी आणि उन्हाळी परिक्षेचे वेळापत्रक कोलमडले असते. हा व इतर कालगणनेच्या संदर्भातील गैरसोय, अनर्थ टाळण्यासाठी आपल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी यावर एक युक्ती शोधून काढली, ती म्हणजे अधिक महिना…! तिस-या वर्षी चांद्रवर्षात एका महिन्याची भर घातली जाते. कालगणना चुकू नये व पंचांगाची ऋतूंबरोबर सांगड राहावी म्हणून. अशा वर्षी चांद्रवर्षाचे १३ महिने असतात. यामुळे ॠतू आणि आमच्या सणांचीही सांगड घातल्या जाते हेही महत्त्वाचे. सण पाळायचे की नाही ? हा स्वतंत्र चर्चेचा विषय. मात्र अधिक महिना नाही घेतला तर ते नाही पाळता येत. हा सुद्धा प्रमुख मुद्दा पुढे समजून घेतला पाहिजे.
तसे नाही केले तर काय होते ? आणि मुस्लिम महिना सुरू करण्याची पद्धत…
अधिक महिना नाही घेतला तर काय होत ? याचे उत्तर जाणण्यासाठी चांगले उदाहरण म्हणजे मुस्लिम पंचांग हे होय. ते ही चांद्रमासावर (चंद्रावर) आधारित पण त्यात अधिक महिना घेण्याची तरतूद नसल्याने, प्रत्येक वर्षी मोहरम, ईद हे सण मागील वर्षी पेक्षा पुढील वर्षी ११ दिवस आधी येतात. (म्हणजे ॠतुंच्या संदर्भात दरवर्षी ११ दिवसांनी मागे पडत जाते.) हा अनुभव आपण प्रत्येक वर्षी घेतो. सर्व मुस्लिम सण ३३ वर्षाच्या काळात सर्व ॠतूंमधून भ्रमण करतात.
मुस्लिम कालगणनेत दिवसाचा प्रारंभ सूर्यास्तानंतर होतो व पुढील सर्यास्ताला तो दिवस समाप्त होतो. प्रतिपदेची (अमावस्येनंतर ) चंद्राची बारीक कोर आकाशात दिसल्यावरच मुस्लिम धर्मगुरू महिन्याचा प्रारंभ करत. ( आता कॅलेंडर छापली जातात. ) कोणत्या दिवशी कुठल्या वेळी आणि स्थळी चंद्र कुठे असेल याची अचुक माहीती खगोलशास्त्र देऊ शकत असताना , ते ज्ञान सहज उपलब्ध असताना मुस्लिम कॅलेंडरमध्ये महीना सुरू करण्याची ही चुकीची पद्धत का बदलली गेली नसेल ?
महिना सुरू करण्याच्या प्रक्रियेच्या आधारे आपला प्रभाव , एकाधिकारशाही कायम राहावी असा तर यामागे उद्देश नसावा ?
आता मुस्लिम पंचांगात अधिक महिना न घेतला तर काय होत हे आपल्या आता लक्षात आलं असेलच. तसेच हेही लक्षात आल असेल की, अधिक महिना ही अचूक कालगणनेसाठी केलेली गणितीय तरतूद आहे, कर्मकांडे, पाप धुण्याकरिता, पुरोहितांना दान – दक्षिणा देण्यासाठी आलेला महिना नव्हे. ( परंतु त्याचा आता वापर त्याच उद्देशातून होतोय, हे नाकारता येत नाही. )
कॅलेंडर- पंचांग – मुहूर्त…
वर आपण समजुन घेतल्याप्रमाणे , चंद्राची पृथ्वी भोवती केलेली एक प्रदक्षिणा जसा एक महिना होतो. त्याच प्रमाणे चंद्राच्या कला या दिन गणनेच्या ( दिवस मोजण्यासाठी) संदर्भात एकक म्हणून, घटनेच्या नोंदी ठेवण्यासाठी व कालगणनेकरिता वापरल्या जायच्या. ती त्या काळाची गरज होती. जगभरात विविध पंचांगांचा यातूनच उगम झाला. ग्रहगोलांचे वारंवार, नियमित निरिक्षण, त्याच्या नोंदी ठेवत व मदतीला गणित, यांच्या उत्तम संयोगाने अनेक दिनदर्शिकांची (कॅलेंडरची) निर्मिती जगभर झाली. चुका असलेली कॅलेंडर काळासोबत मागे पडली. अनेक निरिक्षण, ज्ञान , गणितीय माहितीच्या आधारे सुधारणा करण्याचेही काही कॅलेंडरमध्ये प्रयत्न करण्यात झाले. नवीन माहितीच्या आधारे सुधारणा होत होत्या, नवीन निर्मिती होत होती, प्राचीन काळापासून ही प्रक्रिया चालत राहली.
आज जगभरात ग्रॅगोरियन कॅलेंडर ( दिनदर्शिका ) उपयोगात आणले जाते. १५ ऑक्टोबर १५८२ ला या कॅलेंडरचा प्रारंभ झाला. टप्प्यांमध्ये अनेक देशांनी ते स्वीकारलं, अंमलात आणल.
चंद्रावर आधारीत कालगणना नाकारली
चंद्रावर आधारीत महिने व त्या आधारे केल्या जाणाऱ्या कालगणनेतील दोषांमुळे, जगातील अनेक देशांनी , संस्कृतींनी चंद्रावर आधारीत कालगणनेची पद्धत नाकारली, सौरवर्षावर आधारीत कालगणेची पध्दत स्वीकारली. सत्य स्विकारणे , राजकीय , कृषी , व्यापार , दैनंदिन जीवनातील कार्यपद्धतीत, कालगणेत अधिकाधिक सुधारणा करण्याची मानसिकता या मागे होती, जी अंमलात आणली गेली.
फलज्योतिषी आव्हान का स्वीकारत नाही ?
पंचांग हे खगोल अभ्यासाचे साधन आहे. त्यातील गणित आज खगोलशास्त्राने पूर्णपणे उपयोगात आणले आहे. त्याचा जसा कालगणनेसाठी वापर व्हायचा तसाच खगोल अभ्यासासाठी , आकाश निरिक्षणासाठीही उपयोग व्हायचा, होतो. मात्र आज खगोलशास्त्राचं ज्ञान वापरत चंद्रकलांच्या नावाआड भीतीशास्त्र वापरल्या जातंय. ‘भविष्य सांगणे हे प्राचीनशास्त्र आहे’ म्हणत, ते सांगण्यासाठी फलज्योतिषकार पंचांगाचा आधार घेतात आणि वर म्हणतात,’फलज्योतिष्य हे पूर्ण शास्त्र आहे.’ मग , अ.भा.अंनिसने ३० लाखांचे आव्हान दिले आहेच की , ‘फलज्योतिष्य हे शास्त्र आहे, हे सिध्दही करून दाखवा आणि ३० लाख मिळवा.’ ते आव्हान का स्वीकारत नाही? निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून तर विवाहासाठी शुभ – अशुभ मुहूर्त सांगून सोहळे करण्याचा विकतचा सल्ला देणा-यांना व घेणाऱ्यांना आपण काही सांगण्यापेक्षा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत म्हणतात-
प्रसन्न हवा, पाणी, ऋतू । हाची विवाहाचा मुहुर्तू ।
बाकीचे झंझट फालतू | समजतो आम्ही ।
त्यातही महिनाभर एकादशी – चतुर्थी – सप्तमी- अष्टमी (उदा.) या आधारे कर्मकांड सांगणारे व करणारे आपल्या स्वतःचे मानसिक शोषण करत वेगळ्याच विश्वात वावरत असतात. अनेकांना या (दिवसांना) वारांना उपवास, कर्मकांड करतांना व ते आपण करतोय हे सांगताना मोठेपणा वाटतो. यात सुशिक्षितांचाही समावेश असतो, अगदी शिक्षक सुद्धा असतात. जे स्वतःच प्राथमिक वर्गातील पाठ्यपुस्तकांच्या आधारे केलेल्या अध्यापनातून चंद्रकला व कालमापनाचे ज्ञान विद्यार्थ्यांना देत असतात. असे शिक्षक ते वैज्ञानिक खगोलीय ज्ञान विद्यार्थ्यांना कसे देत असतील ? कुणास ठाऊक ? (सर्वच शिक्षक तसे नाहीत.) परंतु एकादशी – चतुर्थी – सप्तमी- अष्टमी (उदा.) हे काही विशेष दिवस नाहीत तर चंद्राच्या कलांवरून आपल्या पूर्वजांनी तयार केलेली दिनमान व कालगणनेची पद्धती आहे. हे सुद्धा या निमित्ताने आपण समजून घेतले पाहिजे.
मग, वार पाळायचे नाहीत कां ?
वरील माहितीचे आपले वाचन झाल्यावर आता वरील प्रश्न आपणास पडणे स्वाभाविक आहे. जो प्रश्न अनेकांना पडत नाही. परंतु आता पडला असेल तर आपले अभिनंदन !!
आम्ही शुभ – अशुभ, दिवस पाळण्यासाठी सोमवार ते रविवार निश्चित करून आठवडा निर्धारित केलेला नाही. ते मापक आहेत कालगणनेतील. म्हणजे, पृथ्वी सूर्याभोवती ३६५ दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे झाले एक वर्ष. त्या वर्षाला विभागल्या गेलं १२ महिन्यात. प्रत्येक महिन्याचे विभाजन सरासरी चार आठवड्यात. प्रत्येक दिवस २४ तासांचा, एक तास ६० मिनिटांचा, एक मिनिट ६० सेकंदाचा, हे परिमाण, निकष (एकक) आपण आपल्या सोयीसाठी निश्चित केलेले आहेत.
आता मित्रांनो, असा विचार करा, की जर पृथ्वी ५०० दिवसात सूर्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करते. तर आता मला कळवा, की वार, महिने, तास समायोजित ( ADJUST ) करता , की मिनिट, सेकंद, वार ? बोला ?…?
मित्रहो, आता तुमच्या लक्षात आले असेल, की ६० सेकंद ते १२ महिने = ३६५ दिवसांचे १ वर्ष हे वैज्ञानिक पध्दतीने निश्चित केलेले कालगणनेचे सूत्र आहे. हे अचूक कालगणनेसाठी आहेत. व्रत- वैकल्य करायला, दिवस पाळायला नाहीत, हेही या निमित्ताने आपण कृपया समजून घेतले पाहिजे.
अचूक कालगणना, ऋतूं सोबत सण व पंचांगाची सांगड जुळवण्यासाठी आमच्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी केलेली अधिक महिन्याची तरतूद आज अंद्धश्रद्धेचे मायाजाळ झाले आहे, शोषणाचे माध्यम झाले आहे. अधिक महिना कां येतो ? याचे पंचांगकर्त्यांनी व त्या आधारे ‘शुभ – अशुभ मुहूर्त ‘ सांगणाऱ्यांनी याचे खरे – खुरे उत्तर समाजाला सांगायला हवे होते. जे अपेक्षित होते, तसे न करता, पाप – पुण्याची भीती दाखवत, दान – दक्षिणा लुटत, पुरोहितांकडून धार्मिक कर्मकांडांच्या आधारे जनसामान्यांचे आर्थिक, मानसिक शोषण करणे सुरूच ठेवण्यात आले आणि अधिक महिना शोषण करण्याचे माध्यम झाले. ( याला काही पंचांग अभ्यासक अपवाद आहेत, परंतु तेच, जे खगोलशास्त्राचे सच्चे अभ्यासक आहेत.)
पंचांग हे खगोलशास्त्राच्या अभ्यासाचे आणि महिना- आठवडा- दिवस- तास हे कालगणनेचे साधनं असताना , आज ते मानसिक, आर्थिक शोषणाचे माध्यम ठरत आहे. हे कटू सत्य आहे.
छत्रपती शिवाजीराजे यांनी कधीही मुहूर्त, शुभ दिन न पाहता अंधारी अमावास्येची रात्र शत्रूला संपवून स्वराज्य स्थापण्यासाठी महत्वाची मानली आणि* *आम्ही पौर्णिमा- अमावास्या, शुभ -अशुभ मुहूर्त काढून मानसिक गुलामगिरीचे राज्य मजबूत* *करण्यासाठी मदत करतोय .
हे थांबवण्यासाठी ही माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपण निर्धार करू या. समाज शोषणमुक्त, निकोप, विज्ञाननिष्ठ आणि विवेकी करू या!! हीच कळकळीची विनंती.
—————————— ————————–
लेखक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या युवा शाखेचे राज्य संघटक-आहेत .
9890578583