-सुनील इंदुवामन ठाकरे
दिवाळी म्हटलं की, नवे कपडे, फटाके, चमचमीत फराळ आणि किल्ले आलेच. तसं पाहत विदर्भात किल्ल्यांचं तेवढं फॅड नाही. मात्र विदर्भाबाहेर दिवाळीच्या सिझनला किल्ल्यांची इंडस्ट्रीच उभी होते. लहानमुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आकर्षित करणाऱ्या किल्ल्यांच्या कारखान्यात फेरफटका मारताना अनेक रंगीत पैलू पुढ्यात आलेत.
पूर्वी दिवाळी म्हटलं की मातीचे किल्ले बनवले जात. घरातील मोठी मंडळी माती, दगड, विटा आणि साहित्य लहान लेकरांना उपलब्ध करून द्यायचे. लेकरं स्वतः किंवा मोठ्यांच्या सहाय्याने हे किल्ले बनवायचे. आजही मातीचे किल्ले केले जातात. मात्र त्या तुलनेत रेडिमेड किल्ले घेण्याकडे अनेकांचा कल असतो.
इन्स्टंट आणि रेडिमेडच्या युगाची मागणी पूर्ण करण्यासाठी कुंभारकाम करणारे कलावंतदेखील सज्ज असतात. गणेशोत्सव झाला की दिवाळीची तयारी सुरू होते. यात मातीच्या पणत्यांची जास्त डिमांड असते. मात्र पंढरपुरातील माती दिव्यांसाठी तेवढी सोयीची नसल्याने पणत्या गुजरातमधून मागवल्या जातात. काही दशकांपूर्वी मातीचे किल्ले तयार करून विकणारे कलावंत आता रेडिमेड प्लास्टर ऑफ पॅरीसकडे वळलेत.
विठुरायांच्या पंढरीत संत कैकाडी महाराजांच्या मठाजवळ कुंभारकाम करणारे अनेक परिवार आहेत. त्यातील पांडुरंग वैजनाथ आटपाडकर व त्यांच्या टीमची भेट घेतली. त्यांच्या कुटुंबातील जवळपास 10 सदस्य या कामात असतात. सलग दोन महिने दिवाळीसाठी हा कारखाना काम करीत असतो. मातीच्या वस्तू तयार करणे अधिक वेळ घेणारे व सोयीचे नसल्याने सर्व जोर पीओपीवरच असतो.
दिवाळीतील किल्ला असो किंवा कोणताही किल्ला असो, सर्वात आधी डोळ्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजच येतात. किल्ले आणि छत्रपती ही लोकमानसातली अमीट प्रतिमा आहे. त्यामुळे किल्ल्यासोबतच छत्रपती शिवरायांच्या मूर्तींचीदेखील मागणी होते. विविध आकारातील किल्ल्यांप्रमाणेच या मूर्तीदेखील उपलब्ध असतात. दिवाळीत किल्ला विविध प्रकारे सजविला जातो. हे किल्ले सजवण्यासाठी, किल्ल्यावर ठेवण्यासाठी छोटे छोटे पुतळे लागतात. यात मावळे, स्त्री, पुरूष, सैनिक, तोफ अशा 50 ते 60 व्हेरायटीज असतात. हाताच्या पंजात मावतील इतक्या आकाराचे हे पुतळे पाच रूपये नगाने मिळतात. एका कारखान्यात असे जवळपास 10 हजार पुतळे तयार होतात.
हे किल्ले आणि पीओपीमध्येच तयार केले जातात. एका कारखान्यात जवळपास 22 किलोचे 50 पोते लागतात. सध्या ही 22 किलोची पीओपीची बॅग 180 रूपयाला हे विकत आणतात. रबर मोल्ड अर्थात रबरी साच्यात हे पुतळे तयार होतात. याचा मोल्ड बनविण्यासाठी त्यांना आधी मातीची मूर्ती बनवावी लागते. ही मूर्ती ते स्वतः बनवतात किंवा रेडिमेड विकत आणतात. याचा मोल्ड बनला की त्यामध्ये पीओपी भिजवून ओतून पुतळे तयार केले जातात. मातीच्या तुलनेत हे खूप वेगाने वाळतात. हाताळायला सोपे असतात. बाहेरून माती मागविल्यास खूप खर्च येतो. तसेच पीओपीच्या तुलनेत अनेक बाबींनी माती सोयीची नसतेदेखील. साच्यातून काढलेल्या पुतळ्यांना मग वॉटर कलर दिले जातात. अलीकडच्या काळात ब्रशऐवजी छोटे स्प्रेअर्स वापरले जातात. या वॉटरकलरची 250 मिलीची बाटली 250 रूपयांच्या आसपास मिळते.
अनेक कुटुंबांचा हा पिढीजात व्यवसाय आहे. कुटुंबातील सर्वच सदस्य या कामात इन्व्हॉल्व असतात. हे कारागीर उन्हाळ्यात रांजण, माठ असे पाणी साठवण्याचे साधन तयार करतात. पावसाळ्यात गणपतीचा मोठा सिझन असतो. विविध सणांच्या निमित्ताने, भुलाबाई, लक्ष्मी, हत्ती, सुगडी, गाडगी, संक्रांतीचे वाण अशी कुंभाराची भट्टी वर्षभर सुरूच असते. गवयाचं पोर सुरातच रडतं, तसंच यांच्या परिवारातील लेकरंदेखील मोठ्यांना तेवढ्याच कुशलतेने हातभार लावत असतात.
पंढरपुरच्या कारखान्यातून माल संपूर्ण जिल्ह्यात जातो हे विशेष. घाऊक व्यापारी स्वतः येऊन हा माल विकत नेतात. तळहाताएवढ्या किल्ल्यांपासून लेकराच्या उंचीएवढ्या किल्ल्यांपर्यंतच्या खरेदीला दिवाळीच्या आधीपासूनच सुरुवात होते. सगळ्यात लहान किल्ला हा 50 रूपयांचा तर सर्वात मोठा 1100 रूपयांत मिळतो. प्रत्येकाला आपल्या खिशाप्रमाणे दिवाळी साजरी करता येते.
अलीकडच्या काळात सगळीकडेच किल्ले बनवा सारख्या स्पर्धा होत आहेत. किल्ल्यांकडे नव्या पिढीला आकर्षित करण्याचं हे उत्तम साधन आहे. दिवाळीला हातांनी बनवलेले शेणा-मातीचे किल्ले पाहिले की अनेकांना ते त्यांच्या बालपणात नेतात. स्वतः विविध कलाकृतींनी केले सजावट ही अधिक नैसर्गिक व अस्सल असायची. नैसर्गिक वस्तुंचा वापर करून तयार केलेल्या या अनेक गोष्टींमधून मिळणारा आनंददेखील नैसर्गिकच असायचा. चिरंतन असायचा. जग फास्ट व इन्स्टन्ट होत चाललंय. तसेच सुख शोधण्याची साधनेदेखील. या दिवाळीला इन्स्टन्ट सुखांतून चिरंतन आनंद शोधुया….
हॅप्पी दिवाली….
(लेखक निवेदक , कवी आणि मुलाखतकार आहेत)
8623053787
@पंढरपूर २८ ऑक्टोबर २०१८
मा. संपादक व टीम आभार