
मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८
-शेखर पाटील
तंत्रज्ञानाने आपले संपूर्ण जीवन व्यापून टाकले आहे. आज असे कोणतेही क्षेत्र नसेल की ज्यात तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेला नाहीय. तंत्रज्ञानाच्या विविध शाखांमध्ये सुरू असणारे संशोधन हे मती गुंग करून टाकणारे आहे. भविष्यात आपले जीवन नेमके कसे असणार याची चुणूक आपल्याला आजच मिळालेली आहे. अगदी खरं सांगायचे तर आपण याला अनुभवतही आहे. तथापि, एक असे क्षेत्र आहे की जे एकाच वेळी उत्कंठा आणि भय निर्मित करत आहे. ते आहे आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रिम बुध्दीमत्ता. वास्तविक पाहता तंत्रज्ञानातील अमुक-तमुक बाब शाप की वरदान असा बाळबोध प्रश्न आता अगदी गल्लीबोळांमधूनही विचारला जात आहे. तथापि, एकाच वेळी विलक्षण कुतुहल आणि तेवढ्याच प्रमाणातील भयगंडाने सुरू असणारी चर्चा ही कृत्रिम बुध्दीमत्तेच्या भोवती एकवटल्याची बाब नाकारता येत नाही.
कृत्रिम बुध्दीमत्ता हा शब्दच परस्परविरोधी आहे. बुध्दीमत्तेच्या बळावरच मानव पृथ्वीतलावरील सर्व प्राण्यांमध्ये सर्वाधीक प्रमाणात विकसित झाला. यामुळे बुध्दीमत्ता, प्रज्ञा आदींसारख्या बाबी या फक्त आणि फक्त मानव जातीशीच जोडल्या गेल्या. पृथ्वीवरील अनेक प्राण्यांमध्येही बुध्दीमत्तेची अनेक लक्षणे दिसून येत असली तरी ती मानवाच्या तुलनेत अतिशय प्राथमिक स्वरूपाची आहेत. या पार्श्वभूमिवर, कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहत नाही. आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच एआयची अकॅडमीक व्याख्या ही सर्वसामान्यांना क्लिष्ट वाटू शकते. मात्र साध्या-सोप्या शब्दांमध्ये सांगावयाचे तर मानवी बुध्दीमत्तेप्रमाणेच कृत्रीम पध्दतीत प्रज्ञा निर्माण करण्याची प्रणाली म्हणजे कृत्रीम बुध्दीमत्ता होय. याच्याच मदतीने विविध उपकरणांना मानवाप्रमाणे प्रशिक्षित करून विविध क्षेत्रांमध्ये काम करून घेण्यात येते. प्राचीन संस्कृतींमध्ये स्वयंचलीत उपकरणे आणि कृत्रीम बुध्दीमत्तेशी संबंधीत अनेक उल्लेख आहेत. मध्ययुगात स्वयंचलीत उपकरणांच्या निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले. तथापि, प्राचीन मिथकांमध्ये नमूद करण्यात आलेल्या संकल्पनांना कोणताही ठोस आधार दिसून आलेला नाही. तसेच मध्ययुगापासून विज्ञान आणि साहित्यात या प्रकारचे उल्लेख आले असले तरी ते अमूर्त स्वरूपातील मानले गेलेत. कारण यातदेखील कोणताही शास्त्रीय आधार आढळून आला नाही. या पार्श्वभूमिवर, या क्षेत्राला खरी चालना मिळाली ती विसाव्या शतकाच्या मध्यावरच ! विशेष करून चाळीसच्या दशकापासून एकीकडे संगणकीय उपकरणांच्या निर्मितीला वेग आला. तर यालाच समांतर एक शाखा उदयास आली. १९५६ साली जॉन मॅकार्थी यांनी एआयची पहिल्यांदा अतिशय अचूक अशी व्याख्या केली. त्यांनीच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स हे नाव दिले. मॅकार्थी आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्वतंत्र शाखेला विकसित करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. आज याला सहा दशके उलटून गेली असतांना आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स या क्षेत्रात प्रचंड घडामोडी घडतांना दिसत आहेत.

कृत्रिम बुध्दीमत्तेचा अवाका अमर्याद असून याचा मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये वापर होणार असल्याने अर्थातच यावर अत्यंत व्यापक प्रमाणात संशोधन सुरू आहे. याची पूर्ण संकल्पना समजून घेण्याआधी आपल्याला याच्याशीच संबंधीत मशीन लर्नींग प्रणालीची तोंडओळख करून घ्यावी लागेल. अनेक जणांना एआय आणि मशिन लर्नींग हा एकच संकल्पना वाटतात. खरं तर दोघांमध्ये साम्य असल्यामुळे असा भास होणे स्वाभाविक आहे. मशिन लर्नींग ही थोडी मर्यादीत तर कृत्रीम बुध्दीमत्ता ही याचाच समावेश असणारी व्यापक संकल्पना होय. कोणतेही उपकरण हे मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यान्वित होऊ शकत नाही. तसेच याला स्वतंत्र प्रज्ञादेखील नाही. तथापि, मशिन लर्नींगने विविध उपकरणांना स्मार्ट करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. आता एखाद्या संगणकाला दिलेल्या आज्ञावलीनुसार तो संबंधीत काम करू शकतो. तथापि, एखादा संगणक वा अन्य उपकरण हे प्रोग्रॅम अथवा बाह्य मानवी हस्तक्षेपाविना स्वयंचलीत पध्दतीत विविध बाबींना आत्मसात करत असेल तर याला मशिन लर्नींग म्हणतात. उदाहरणार्थ कॅल्युलेटरच्या मदतीने आपण अनेक संगणकीय आकडेमोड सहजपणे करू शकतो. यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा यात इनबिल्ट अवस्थेत देण्यात आलेली आहे. मात्र, एखादे कॅल्युलेटर हे संगणकीय आकडेमोड करतांनाच यात सुविधा नसणार्या समीकरणांना सोडविण्याचे तंत्र शिकत असेल तर याला मशिन लर्नींग म्हणतात. या माध्यमातूनच विविध मशिन्स या स्वतंत्रपणे शिकण्यास सक्षम होत असून स्वत:च विकसित होत असतात. अशा माध्यमातून विविध मशिन्स स्मार्ट होत आहेत. मशिन लर्नींगमध्येच अनेक घटकांचा समावेश होऊन कृत्रीम बुध्दीमत्ता या अतिशय चित्तथरारक अशा शाखेचा विकास झाला आहे.
कोणतेही उपकरण हे मशिन लर्नींगच्या माध्यमातून स्मार्ट झाले तरी ते मानवाप्रमाणे बुध्दीमान झाले असे मानता येणार नाही. कारण कोणतीही नवीन बाब आत्मसात करणे हा मानवी प्रज्ञेचा फक्त एक पैलू आहे. तर बुध्दीमत्तेमध्ये अनेक घटकांचा समावेश होतो. यामध्ये ज्ञान, तर्कशक्ती, भाषा कौशल्य, विविध स्थितींमध्ये देण्यात येणारा भावनात्मक प्रतिसाद, रंग/गंध आदींसारख्या संवेदना आदींसारखे अनेक घटक यात अनिवार्य आहेत. यामुळे खर्याखुर्या मानवाप्रमाणे विचार करण्यास सक्षम आणि त्या पध्दतीने कार्य करणार्या प्रणालीचा विस्तार म्हणजेच आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स होय.
कृत्रिम बुध्दीमत्तेचा उल्लेख येताच आपल्यासमोर रोबो अर्थात यंत्रमानव उभे राहतात. अनेक हॉलिवुडपट तसेच कादंबर्यांमुळे रोबो हे जागतिक पॉप्युलर कल्चरचा अविभाज्य घटक बनले आहेत. यांच्याशी संबंधीत अनेक चित्रपट तुफान लोकप्रिय झाले आहेत. यामुळे नेहमीच कृत्रीम बुध्दीमत्तेचा थेट संबंध हा रोबोंशी जोडला जातो. तथापि, ही बाब अर्धसत्य आहे. कारण प्रस्तुत लेखात आधीच नमूद केल्यानुसार रोबोटिक्स हे आधुनिक जगाचे हार्डवेअर तर एआय हे सॉफ्टवेअर आहे. या दोन्हींचा संगम यंत्रमानवात झाला आहे. रोबो हा ह्युमनाईड म्हणजेच मानवसदृश असेलच असेही नाही. मानवासमान दिसणारे यंत्रमानव हे अन्य रोबोंच्या तुलनेत मर्यादीत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रोबोटिक सर्जरी होय. या प्रकारची शल्यक्रिया ही मानवासमान दिसणारा एखादा यंत्रमानव करत नाही. तर यासाठी एक उपकरण वापरले जात असून याचे नियंत्रण संगणकाच्या माध्यमातून केले जाते. तसेच सध्या जगभरातील अनेक आघाडीच्या वृत्तसंस्थांमध्ये कार्यरत असणारे रोबो जर्नालिस्ट म्हणजे खर्याखुर्या मानवी प्रतिकृतीचे पत्रकार नव्हेत. तर हा एक संगणकीय प्रोग्रॅम असून यात इनपुट दिलेल्या माहितीवर विश्लेषण करून यापासून वृत्त तयार केले जाते. यामुळे एआयचा वापर हा फक्त आणि फक्त मानवसदृश्य रोबोंमध्येच केला जातोय/जाईल हा गैरसमज पहिल्यांदा दूर करण्याची आवश्यकता आहे.
आर्टीफिशियल इंटिलेजीयन्सला ढोबळपणे दोन प्रकारांमध्ये विभाजीत करण्यात येते. यात वीक एआय अथवा नॅरो एआय हा एक प्रकार आहे. याला आपण मर्यादीत प्रमाणातील कृत्रीम बुध्दीमत्ता म्हणू शकतो. यामध्ये एका निश्चित कामासाठीच एआयचा वापर केला जातो. अॅपलचा सिरी, अमेझॉनचा अलेक्झा तसेच गुगलचा गुगल असिस्टंट या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये वीक एआयचा वापर करण्यात आलेला आहे. याच्या माध्यमातून मर्यादीत पण अतिशय अचूक फंक्शन्स पार पाडले जातात. बहुतांश स्मार्टफोन्स, स्मार्ट स्पीकर्स आदी उपकरणांमध्ये हे डिजीटल असिस्टंट वापरले जात आहेत. या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात कृत्रीम बुध्दीमत्तेचा केव्हाच शिरकाव झाला आहे. याचप्रमाणे विविध चॅटबॉट, फेसियल रिकग्नेशन, व्हॉईस रिकग्नीशन, स्वयंचलीत अनुवाद, टेक्स्ट-टू-स्पीच प्रणाली, ई-मेलमधील स्पॅम फिल्टर्स/स्मार्ट रिप्लाय प्रणाली आदी बाबीदेखील वीक एआयमध्ये येतात. याशिवाय, येथे फेसबुकवर अपलोड करण्यात येणार्या फोटोंचे उदाहरण चपखलपणे वापरता येईल. आपणापैकी कुणीही फेसबुकवर एखादा ग्रुप फोटो अपलोड केल्यानंतर काही क्षणातच त्या छायाचित्रात असणार्या व्यक्तीला टॅग करण्याचे आपल्याला सुचविण्यात येते. अर्थात फेसबुकने यासाठी कृत्रीम बुध्दीमत्तायुक्त प्रणालीचा वापर केला आहे. अवघ्या काही सेकंदात ही प्रणाली फेसबुकवरील अब्जावधी फोटोंमधून नेमक्या त्या प्रतिमेतील व्यक्तीला अगदी अचूकपणे ओळखत असल्याची बाब नक्कीच विलक्षण आहे. याच प्रकारे गुगलसह अन्य सर्च इंजिन्समधील अलगॉरिदममध्येही एआयचा वापर केलेला असतो. फेसबुक व ट्विटरच्या न्यूजफिडमध्येही याचा वापर केलेला असतो. ही सर्व मर्यादीत कृत्रीम बुध्दीमत्तेची उदाहरणे आहेत.
याच्या अगदी विरूध्द एआय जेव्हा अतिशय व्यापक स्वरूपात वापरले जाते तेव्हा त्याला स्ट्राँग अथवा स्ट्राँग जनरल एआय म्हणून संबोधले जाते. यामध्ये उपकरण हे अगदी मानवाच्या समकक्ष बुध्दीवान असते. किंबहुना ते असावे असे अभिप्रेत असते. याबाबत मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. अद्याप अशा प्रकारचे कोणतेही उपकरण विकसित करण्यात आलेले नसले तरी येत्या काही वर्षांमध्ये अगदी मानवी प्रज्ञेप्रमाणेच स्वतंत्र बुध्दीमत्ता असणार्या मशिन्स अस्तित्वात येतील अशी शक्यता आहे. याची चुणूक आपण सोफिया या जगभरात लोकप्रिय झालेल्या मानवसदृश रोबोच्या माध्यमातून दिसून आली आहे. सोफियात अनेक त्रुटी असल्या तरी भविष्यातील यंत्रमानवाची एक झलक यातून जगाला नक्कीच मिळाली आहे. अशा प्रकारे मानवी जीवनातील विविध अंगांवर अतिशय व्यापक प्रकारे परिणाम करण्यास सक्षम असणार्या कृत्रीम बुध्दीमत्तेच्या क्षेत्रात अहोरात्र अतिशय सखोल संशोधन सुरू आहे. आपण आधीच याचा वापर करत असलो तरी भविष्यात अतिशय चित्तथरारक स्वरूपात याचे विविध उपयोग आपल्याला करता येणार आहे.
कृत्रिम बुध्दीमत्ता आणि यावर आधारित स्मार्ट मशिन्सचा एकमेव उद्देश हा मानवी शरीर आणि बुध्दीला असणार्या मर्यादांच्या पलीकडे जात विविध क्षेत्रांमधील अतिशय कठीण असणारी कामे करणे हा आहे. यासाठीच स्मार्ट मशिन्सच्या निर्मितीचा आटापिटा केला जात आहे. विस्तार भयास्तव या सर्व बाबींचा येथे आढावा सादर करता येणार नाही. मात्र अत्यंत जटील आणि गुंतागुंतीच्या कामांसाठी एआय आणि यावर आधारित यंत्रे वापरली जात आहेत. यात अतिउष्ण वा अतिशीत वातावरणातील विविध कामांमध्ये यंत्रमानवांचा वापर केला जात आहे. एआयवर आधारित रोबोटीक सर्जरी या आधीच वापरात आल्या असून येत्या कालखंडात यात अजून भर पडण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरलेस अर्थात वाहकाविना चालणार्या स्वयंचलीत वाहनांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेचाच वापर करण्यात आलेला आहे. लवकरच ही वाहने जगभरात वापरात येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अंतराळ संशोधन, सैन्यदल आदींमध्येही यंत्रमानवांचा वापर होणार आहे. भविष्यात रोबो वॉर होण्याची भाकितेदेखील करण्यात आलेली आहेत. अर्थात याचमुळे आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक अतिशय उत्कंठावर्धक शाखा मानली जात आहे. मात्र याचा दुसरा पैलूदेखील आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानातील प्रत्येक शाखेप्रमाणे एआयदेखील दुधारी शस्त्रासमान असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. एआयच्या माध्यमातून शास्त्रज्ञ हे यंत्रांना स्मार्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र हीच उपकरणे ओव्हरस्मार्ट होऊन मानवावर उलटली तर? हा प्रश्न अतिशय अस्वस्थ करणारा आहे. टर्मीनेटरसारख्या अनेक चित्रपटांमधून याची अनेक भयावह रूपे आपण पाहिली आहेत. तथापि, अलीकडच्या काळात प्रत्यक्षात घडलेली एक घटनादेखील तंत्रज्ञान क्षेत्राला हादरा देणारी ठरली आहे. फेसबुकचा एआय शाखेत दोन प्रयोग सुरू असतांना यावर काम करणार्या तंत्रज्ञांना विचीत्र बाब आढळून आली. यासाठी तयार करण्यात येणारे चॅटबॉट हे आपसात नवीनच भाषेत संवाद साधतांना दिसून आल्याने यावर काम करणार्या चमूचे कुतुहल चाळवले. याबाबत त्यांनी सखोल संशोधन केले असता त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण या चॅटबॉटनी स्वत: नवीन भाषा तयार करून एकमेकांशी संवाद साधण्यास प्रारंभ केल्याचे त्यांना दिसून आले. त्यांना मूळ आज्ञा (कमांड) ही इंग्रजीतून दिली जात असतांनाही हा प्रकार घडल्यामुळे सर्व जण अचंबीत झाले. म्हणजे हे चॅटबॉट (कृत्रीम का होईना) पण स्वत:च्या बुध्दीने विचार करायला लागल्याचे यातून स्पष्ट झाले. ही बुध्दीमत्ता नकारात्मकतेकडे वळल्यास काय होईल? या विचारांनीच या पथकाचा थरकाप झाला. अखेर फेसबुकने हे दोन्ही प्रोजेक्ट बंद करण्याची घोषणा केली. यामुळे भविष्यातील स्मार्ट मशिन्स, यंत्रमानव यांना एका मर्यादेच्या पलीकडे बुध्दीमत्ता मिळाल्यास ते याचा विध्वंसासाठी वापर करणार नाहीत हे आजच कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. याचमुळे कृत्रिम बुध्दीमत्ता हा अनेकांसाठी औत्सुक्याचा व जिव्हाळ्याचा मुद्दा असला तरी बर्याच जणांचा याला ठाम विरोध आहे. बिल गेटस्, एलोन मस्क आदींसारख्या मातब्बरांनी एआयवर फार काही विसंबून राहता कामा नये असा स्पष्ट इशारादेखील दिलेला आहे. मात्र आता या क्षेत्रातील संशोधन इतक्या प्रचंड गतीने पुढे गेलेय की, याला अकस्मात थांबवणे कुणाच्याही हातात नाहीय.
(लेखक हे ब्लॉगर व नामवंत पत्रकार आहेत)
9226217770