साभार : अक्षरधारा मासिक
-वसुंधरा काशीकर
एकदा गुलजार यांच्या सत्कारानिमित्त एका खाजगी, छोटेखानी कार्यक्रमात माझा भाऊ, आमची एक मैत्रिण अंजुलिका आणि मी असे बसने जात होतो. अंधेरीला प्रसिद्ध हिंदी अभिनेते वीरेंद्र गुप्ता यांच्या घरी ‘स्लम डॉग मिलेनियर’ या चित्रपटाला मिळालेल्या ऑस्कर पुरस्कारानिमित्त हा कार्यक्रम होता. बसमध्ये मैत्रिणीला एक फोन आला ती म्हणाली, हॅलो मैं अंजुलिका जुरानी बोल रहीं हूँ. इतके दिवस लक्षातच आलं नाही की, अंजुलिका शक्यतोवर स्वत:चं आडनाव सांगत नाही. मी तिला सहजच विचारलं, अगं तू काय सुंदर मराठी बोलतेस..जराही लक्षात येत नाही तुझी मातृभाषा सिंधी आहे म्हणून. त्यावर तिने जे उत्तर दिलं, ते फार करुण होतं. ती म्हणाली की, ‘मी सिंधी आहे हे लक्षात येऊ नये यासाठीच मी काटेकोरपणे सुंदर, शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करते. लहानपणी शाळेत आम्हाला ‘शरणार्थी शरणार्थी’ म्हणून चिडवत असंत. वडिलांना विचारलं, लोक का आपल्याला शरणार्थी म्हणतात? त्यावेळी बाबांनी तू लक्ष देत जाऊ नकोस असं उत्तर दिलं. त्याने अर्थातच माझं समाधान झालं नाही. मुलं चिडवायची. त्याने माझ्या सिंधी असण्याबद्दल मनात न्यूनगंड निर्माण झाला. माझी सिंधी असणे, ही ओळख मी लपवायला लागले. त्यातून उत्तम मराठी बोलण्याचा ध्यास निर्माण झाला. आता मला सिंधी नीट येत नाही पण मराठी उत्तम येतं.’
न्यूनगंडाचा मनावर किती खोलवर, दूरगामी आणि भीषण परिणाम होऊ शकतो, त्याचं हे उदाहरण. असे कितीतरी गंड आपल्याला व्यवस्था, समाज, सभोवतालच्या व्यक्ती, नातेवाईक, शेजार देत असतो. काळ्या रंगाच्या माणसाला गोरं नसण्याचा गंड, गरिबाला श्रीमंत नसण्याचा गंड, हॅचबॅकवाल्यांना सिडान नसल्याचा गंड, एमपीएससीतून पास झालेल्यांना युपीएससी न झाल्याचा गंड, लठ्ठ असलेल्यांना बारीक नसण्याचा गंड, बुटक्यांना उंच नसण्याचा गंड, ज्युनिअर कॉलेजला शिकवणाऱ्यांना सिनियरला शिकवत नाही याचा गंड, प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्यांना माध्यमिक शाळेत शिकवत नसल्याचा गंड, सर्वात मोठ्या प्रमाणावर आढळणारा इंग्लिश येत नसल्याचा गंड…असे कितीतरी गंड आपल्याला सांगता येतील.
जागतिकीकरणानंतर आयटी क्षेत्राचा विकास झाला, त्यातून जो नवश्रीमंत वर्ग तयार झाला विशेषत: त्या वर्गातून स्कॅनिंगद्वारे गंड देण्याचं काम सुरू असतं. मग तुमचं स्वत:चं घर आहे की भाड्याचं..गाडी कोणती आहे..टॉप एंड सिडान की हॅचबॅक, त्यातही कुठला ब्रॅँड, फोनचा ब्रॅँड..यातून तुमचा आर्थिक स्तर ठरत असतो. मग तुम्हाला किती आणि कसा सन्मान आणि महत्व दयायचं हे ठरतं.
कमी-अधिक प्रमाणात आपल्यातले अनेक जण असे न्यूनगंडामुळे स्वत:ला हीन समजण्याच्या प्रसंगांना सामोरे गेलेलेच असतात. त्याला अपवाद अगदी नामवंत, सेलिब्रीटीही नाहीत. कुमार केतकरांनी एकदा नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली होती. त्यात नाना यांनी प्रांजळपणे शिक्षणात मागे असल्याने व्यक्तिमत्वात प्रचंड न्यूनगंड होता, हे कबूल केलं होतं. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिला तिच्या शालेय जीवनात सावळ्या रंगावरून शेरा मारल्याची आठवण आहे. पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधीवर लिहिलेल्या ‘इंदिरा’ या पुस्तकात इंदिरा गांधींची आत्या, पंडित नेहरुंची बहिण विजयालक्ष्मी पंडित यांनी इंदिरा गांधींना ‘तू कुरूप दिसतेस…’ असा शेरा मारल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे इंदिरा गांधीच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊन त्यांच्या आत्मसन्मानाच्या भावनेवर फारच नकारात्मक परिणाम झाला आणि ती जखम इंदिरा आयुष्यभर विसरू शकल्या नाही, हेही पुपुल यांनी लिहिलंय.
अशा या न्यूनगंडामुळे काय होतं, तर..व्यक्तीमध्ये स्वत:बद्दल हीनतेची भावना निर्माण होते. माणूस आत्मविश्वास गमावतो. नैराश्यानं ग्रासू शकतो. अनेकदा हीनतेच्या भावनेतून व्यक्तिमत्वात उर्मटपणा, उद्धटपणा,(Arrogance of inferiority) हिंसकता वाढीस लागते. मनावर कायमचे अदृष्य ओरखडे उमटतात, व्यक्तिमत्वात दुभंगलेपण येतं, तुटलेपण (Alienation) येतं, आणि या सर्वांहून गंभीर म्हणजे माणूस स्वत्व विसरतो. त्याची नैसर्गिकता, सहजता आणि निजता विसरतो. ही मला वाटतं कधीही न भरून येणारी, अपरिमित अशी हानी आहे.
प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ एम.एन.श्रीनिवास यांनी आपल्या संशोधनातून सर्वप्रथम ‘संस्कृतीकरण’ ही संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी काही जाती समुहांचे निरीक्षण केले. त्यात त्यांना असं लक्षात आलं की, समाजाने खालच्या ठरवलेल्या जाती-समुह वरीष्ठ म्हणून मान्यता पावलेल्या जाती-समुहांच्या प्रथा,परंपरा,चालिरीती, भाषा, पेहराव आणि खानपानाच्या पद्धतींचं अनुकरण करतात. एका समुहाने न्यूनगंडातून दुसऱ्या समुहाचं अनुकरण करणं याला त्यांनी ‘संस्कृतीकरण’ ही संज्ञा दिली. या अनुकरण करण्यात आपली ओरिजनलिटी हरवून बसणं, ही किती भयंकर गोष्ट आहे हे लक्षात येत नाही. वास्तविक पाहता आदिवासींची मातृसत्ताक पद्धती, जोडीदार निवडीचं संपूर्ण स्वातंत्र्य देणारी ‘गोटुल पद्धत’ ही किती आधुनिक आहे. पण आमच्या समाजाने त्यांना स्वत:च्या कसोट्यांवर मागास ठरवलं. एका विशिष्ट जातीसमुहाला आम्ही अस्पृश्य ठरवून त्यांचं जगणं मरण्याहून भयंकर केलं. त्यांना गळ्यात मडकं बांधून, कमरेला झाडू बांधून चालायला लावलं. अनेक पिढ्यांचा आत्मविश्वास आम्ही मारला. खून हा फक्त बंदुकीची गोळी मारून वा चाकू मारूनच होतो ,असं नाही. एखाद्या व्यक्तीचा आत्मविश्वास हिरावणं हा ही खूनच असतो. त्या अर्थाने हिंदू धर्माने केलेली ही सामूहिक कत्तल होती. म्हणूनच ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ असं आंबेडकरांना म्हणावं लागलं.
समाजातल्या या मान्यतेच्या कल्पनांमधून तयार होणाऱ्या गंडातून कितीतरी सुंदर गोष्टी आम्ही नष्ट केल्या. संपवल्या. प्रमाण भाषेच्या श्रेष्ठत्वापायी बोलीभाषा मागे पडल्या. किती सुंदर शब्द व्यवहारातून हद्दपार झाले. उर्दू भाषेचे सुप्रसिद्ध अभ्यासक विनय वाईकर यांनी एक छान उदाहरण दिलं होतं. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं म्हटलंय की, ‘अंगडाई’ या उर्दू शब्दातून जे भाव व्यक्त होतात ते व्यक्त करणारा एकही शब्द मला मराठीत सापडला नाहीये. विदर्भातल्या व-हाडी भाषेत ‘लदलद’ म्हणून एक शब्द आहे. त्याचा अर्थ आहे प्रचंड भरलेलं. माझे वडील बोलता बोलता सहज म्हणाले, ‘झाडाला काय ‘लदलद’ आंबे लागले आहेत…मला त्यावेळी अचानक जाणवलं अरे, लदलदसारखा भाव व्यक्त करणारा शब्द प्रमाण मराठीत नाही. पण प्रमाण भाषेचा आग्रह आणि श्रेष्ठत्वापायी बोली संपत चालल्या आहेत, हे वास्तव आहे.
काट्या चमच्याने किंवा चॉपस्टिक्सने खाण्याचं जसं सौंदर्य आहे तसं हाताने मऊसूत वरण-भात-तूप-लिंबू कालवून खाण्यांचंही आपलं असं वेगळं सौंदर्य आहे. असं कितीतरी वेगवेगळ्या विषयांचं सौंदर्य या गंडापायी नष्ट झालं आहे याची मोजदाद करता येणार नाही. जगण्यातली, खाण्यातली, पेहरावातली, वर्णातली, परंपरांमधली, भाषांमधली ही विविधता आपण कधी स्वीकारणार आहोत?
समाजात आज एका गोष्टीला, एका पदवीला, व्यवसायाला प्रतिष्ठा आहे आणि ते माझ्याजवळ नाही म्हणून मी निकम्मा, सन्मानास अपात्र ठरतो का? पण व्यवस्था, समाज असा अपात्रतेचा गंड सतत देत असते. यातूनच अनेक प्रज्ञावंत त्यांच्या प्रज्ञेची आभा जगाला न दिसताच मरुन जातात. प्रज्ञावंत किंवा प्रतिभावंतांचं (Gifted) समाजाच्या या मानसिकतेमुळे होणारं नुकसान हा स्वतंत्र चर्चेचा विषय ठरू शकेल. समाजात प्रतिष्ठा नाही, मान्यता नाही म्हणून प्रज्ञावंत अनेकदा आपल्यातले गुण निष्कासित (Eliminate) करतात. त्यामुळे त्यांच्या क्षमतेपेक्षा, गुणवत्तेपेक्षा त्यांना कितीतरी गोष्टी कमी मिळतात. थोडक्यात ते अंडर अचिव्हर राहतात. हे समाजाचंही नुकसान आहे. उदाहरणार्थ, हयातीत एकही चित्र विकल्या न गेलेल्या, समाजाच्या रुढ चौकटीत न बसणाऱ्या व्हॅन गॉगचं दु:ख आणि त्या पायी आलेला व्हॅन गॉगला आलेला न्यूनगंड, कार्ल मार्क्सला रेल्वेच्या कारकुनाच्या पदासाठी करावा लागलेला अर्ज आणि तो ही नाकारला जावा हे किती वेदनादायी आहे.
गंडाच्या या विषयाला आणखी एक विलक्षण आश्चर्यकारक असा पदर आहे. तो म्हणजे अनेकदा न्यूनतेच्या भावनेतून लोकांनी जिद्दीनं कर्तृत्व गाजवलं आहे. अनेकदा असंही लक्षात येतं की, प्रचंड जिद्दीने समाजात नाव कमावलेल्या व्यक्ती या मूलत: कसल्या तरी न्यूनगंडाने ग्रासलेल्या असतात. हा गंडच मग त्यांना काम करण्याची, नाव मिळवण्याची प्रेरणा देतो. म्हणजे गंड इथे उत्प्रेरक किंवा कॅटालिस्ट म्हणून काम करतो. शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री. शरद जोशी यांची आठवण या संदर्भात सांगाविशी वाटते. एकदा त्यांच्याशी सौंदर्य या विषयावर चर्चा सुरू होती. तेव्हा जोशींनी एक वेगळाच मनोविश्लेषणात्मक विचार मांडला. ते म्हणाले, मला माझा चेहरा गाईने चालता चालता रस्त्यात शेण टाकावं, तशा आकाराचा वाटतो. त्यावर मी त्यांना विचारलं, बरं मग त्यानं काय झालं? जोशी- त्यानं असं झालं की, आपल्याकडे काही सौंदर्य नाही. त्यामुळे लोक आपल्याला काडीचही महत्व देण्याची शक्यता नाही, हे मला नीट कळलं. मग लोकांचं लक्ष वेधलं जावं म्हणून मग मला अभ्यास करुन, मेहनत करुन कर्तृत्व गाजवावं लागलं नं…जोशींच्या म्हणण्यानुसार जे लोक कुरूप असतात, ज्यांच्यात काही न्यूनता असते वा गंड असतो; ते लोक मग न्यूनतेवर मात करण्यासाठी इतर गुणवत्ता विकसित करतात आणि समाजाकडून मानसन्मान मिळवतात. याउलट सर्व काही अनुकूल असलेल्या विशेषत: देखण्या व्यक्तीला काहीच कर्तृत्व गाजवण्याची गरज नसते. विचार केला, तर या मुद्द्यात काही अंशी तथ्य आढळतं. पण त्याचबरोबर अनेक देखण्या व्यक्तींनीही कर्तृत्व गाजवल्याची उदाहरणं आहेत. त्यामुळे या विचारात संख्याशास्त्रीय त्रुटी दिसते.
पण मग शरद जोशींच्याच युक्तिवादाचा विचार केला गंड असणं हे चांगलही असू शकतं असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. मला याचं विश्लेषण करताना नकारात्मक प्रेरणा आणि सकारात्मक, आरोग्यपूर्ण, प्रेरणा हा फरक करावासा वाटतो. कुठल्यातरी गंडातून जिद्दीन कर्तृत्व गाजवणे याला गुण आहेतच पण ते कर्तृत्व नैसर्गिक नाही. सहज नाही आणि आरोग्यपूर्णही नाही. खुन्नसमधून, स्वत:च्याच हिंसेतून ते आलं आहे. गंड नसलेला व्यक्ती हा कदाचित अधिक आत्मशोध घेईल, आपली खरी अभिव्यक्ती शोधेल न की, समाजमान्य अभिव्यक्ती. गंड असलेला व्यक्ती समाजमान्य अभिव्यक्ती शोधण्याची जास्तच शक्यता आहे. प्रयत्न, कष्ट, जिद्द यांचं महत्व सर्वमान्य आहेच पण त्यामागची प्रेरणा कोणती हे तपासणं गरजेचं आहे.
रजनीशांच्या एका प्रवचनात त्यांनी अहिंसेची फार अप्रतिम व्याख्या सांगितली. ते म्हणतात, ‘’अगर मैं दुसरे को परिपूर्ण स्वतंत्रता देता हूँ. उसे कहता हूँ, तुम जो होना चाहो हो जाओ…यही भाव अहिंसा आहे. अहिंसा का परम अर्थ हैं, व्यक्ती परम स्वतंत्र हैं…’’
प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र आहे. वेगळी आहे. वैशिष्ट्यपूर्ण आहे. निसर्गाची एकमेव निर्मिती आहे याची जाणीव जर प्रत्येकाने ठेवली तर ही मानसिक, भावनिक हिंसा होणार नाही. माझ्या उपस्थितीने, अस्तित्वाने अवती-भवतीच्या लोकांमध्ये आनंद आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा. माझ्या कृतीने, वाणीने जर दुसऱ्यामध्ये हीनतेची भावना निर्माण होत असेल तर ती सर्वात मोठी हिंसा आहे. आजवर अशा किती हत्या माझ्याकडून झाल्या आहेत याची ज्याची त्याने मोजणी करावी. खरा उमदा, पुरूषार्थ असलेला माणूस कधीच आपल्या अस्तित्वाने, वागणुकीने दुस-या व्यक्तीमध्ये हीनतेची भावना निर्माण करणार नाही. ‘प्रिटी वूमन’मधला रिचर्ड गिअर आठवतो. अतिशय महत्वाच्या ज्यात अब्जावधीचा व्यवहार होणार आहे अशा बिझनेस मीटिंगला तो ज्युलिया रॉबर्ट्सला घेऊन जातो. त्यात ती वेश्या दाखवली आहे. तिला काटा चमच्याने खाता येत नसतं. जेवता जेवता मध्येच तिच्याकडून मटनाचा तुकडा ताटाबाहेर उडतो. मात्र गिअर शांत बसला असतो. त्याला कुठेही तिची लाज वाटत नाही. ओशाळल्यासारखं होत नाही. काय या गावंढळ मुलीला आपण सोबत आणलं, असं काही काही त्याला वाटत नाही. आणि सिनेमाच्या शेवटी ते कायम बरोबर राहतात. यातून जाणवतो तो त्या व्यक्तिरेखेचा प्रचंड आत्मविश्वास. याला सुसंस्कृतपणा म्हणतात. याला जंटलमन म्हणतात.
यासाठी व्यक्तीसकट समाजाची सामूहिक संवेदनशीलता वाढवणे हाच यावरच उपाय आहे. आणि हे एका दिवसात होणार नाही हे तर खरेच. सुप्रसिद्ध शायर क़तील शिफाई यांचा एक फार गहिरा शेर आहे, ते म्हणतात, ‘के संग (दगड) तुझपे गिरे और जख़्म आये मुझे’…या दर्जाची करुणा आणि संवेदनशीलता निर्माण होण्यासाठी मला तरी कलेशिवाय, मग ते संगीत असेल, साहित्य असेल, सिनेमा असेल दुसरा आधार दिसत नाही. कला आणि कलाच माणसाला उन्नत करु शकते.
बाकी ‘’इसी दुनिया में हम भी तो है शामील, कहे किस मुँह से की दुनिया बेवफा है’’….तेव्हा सुरूवात नेहमी स्वत:पासूनच होते.
नवीन वर्षांच्या शुभेच्छा…सहज होऊयात…
(वसुंधरा काशिकर या लेखिका, निवेदक व भाषाविषयक सल्लागार आहेत)