राजकीय नेत्यांच्या बोलण्यातील सुसंस्कृतपणाच नव्हे तर कोणत्याही माणसाचा सुसंस्कृतपणा हा त्याच्या झालेल्या जडणघडणीवर आणि संस्कारावर अवलंबून असतो. त्यामुळेच त्याच्या वागण्यातील सौजन्य लोकांना दिसून येत असते. किंबहुना त्या सौजन्यपूर्णतेमुळेच सुसंस्कृत राजकीय नेत्याचे व्यक्तिमत्व कायमस्वरूपी स्मरणात राहत असते. भारतीय राजकारणात असे कितीतरी दिग्गज नेते आहेत ज्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्यातील सज्जनता अजिबात ढळू दिली नाही. त्यांच्या विनम्र स्वभाववृत्तीमुळे राजकारणातील गढूळलेलं वातावरणच स्वच्छ होण्याला मदत झाली. आता मात्र अशा अपवादात्मक नेत्यांमुळे संपूर्ण राजकीय वातावरण स्वच्छ होण्याची शक्यता राहत नाही, कारण बहुसंख्य राजकीय नेत्यांचा अलिकडल्या काळातील आक्रमकपणा, त्यांच्या भाषणाच्या आक्रमक शैली बरोबरच त्यांच्या बोलण्यातील ‘वाचाळपणा’ मुळे प्रादेशिक राजकारणच नाही तर राष्ट्रीय पातळीवरील राजकारणही दूषित झाले आहे.
स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू देशातील काही उमद्या, अभ्यासू, तरुण संसपटूंचे भाषण, त्यांच्या भाषणातील माधुर्य, अभ्यासूपणा, व्यासंग ऐकण्यासाठी संसदेत मुद्दाम जास्तवेळ थांबायचे. अशा संसदपटूमध्ये तेव्हाच्या राजापूर लोकसभा मतदार संघातील खासदार बॅरिस्टर नाथ पै होते. विरोधी पक्षात असूनही बॅरिस्टर नाथ पै यांना नेहरूंचा जिव्हाळा लाभला तो त्यांच्या भाषा कौशल्यामुळेच. मात्र सद्यस्थितीत त्यांचा वारसा चालवणाऱ्या कोकणातील लोकप्रतिनिधींचे भाषा शैलीचे वर्तन ऐकले की, हेच का ते बॅरिस्टर नाथ पै यांच्या कार्यक्षेत्रात जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधी? असा प्रश्न उपस्थित होतो. अगदी अलीकडच्या काळात ‘मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली लगावली जाईल’ असे वक्तव्य आजी मुख्यमंत्र्यांबद्धल कोकणातीलच माजी मुख्यमंत्र्यांनी केले. त्याचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. या त्यांच्या असभ्य भाषाशैली वर्तनाबद्दल त्यांना अटकही झाली. या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की कोकण प्रदेशाच्या राजकीय वातावरणात राजकीय नेत्यांचे भाषावर्तन आणि त्या अनुषंगाने त्यांची विकास कार्यपद्धती कशी बदलत गेली. आता कोकणची जनताही अशाच नेत्यांना आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहे. त्यामुळे यांच्यातील बदलत गेलेल्या ‘रावडी भाषेला’ जनताही कशी शरण गेली आहे हेही लक्षात येऊ शकते.खरेतर आजच्या राजकीय नेत्यांचे अशा प्रकारचे वर्तन पाहिले की, फक्त कोकणच्याच नाही तर काही अपवादात्मक नावे सोडल्यास आजच्या राजकीय नेत्यांना स्वतःची अशी भाषाच नाही, असेच म्हणावे लागेल. आधीची सर्व कोकणची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता कोकणच बदलत गेलेलं हे राजकीय सौजन्य विचार करायला लावणार आहे, हे मात्र निश्चित!
भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की,”विकास करणे आणि निवडून येणे याचा काहीही संबंध नाही. निवडून येण्याची मानसिकता वेगळी असते”.जर तसे असते तर ज्यांना चार शब्द व्यासपीठावर नीट बोलता येत नाही, जे आयुष्यभर गुंड म्हणून लोकांच्या लक्षात राहतात ते निवडूनच आले नसते. गडकरींचे हे म्हणणे खरेच आहे.निवडून आल्यावर आपल्या मतदार संघात एकदाही न फिरणारे नेते पुन्हा पुन्हा निवडून येतात.ज्यांनी निवडून येऊन लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची कामे करण्याऐवजी गुंडगिरीच केलेली असते तेही निवडून येतात आणि लोकप्रतिनिधी असूनही ज्यांच्या तोंडात सतत शिव्याच असतात तेही पुन्हा निवडून येतात. कोकणातील लोकप्रतिनिधी नाथ पै, मधु दंडवते, सि.स.सावंत, केशवराव राणे, अप्पा गोगटे, भासाहेब सावंत, शाम कोचरेकर, अशा राजकीय विभूतींनी कधीही अपशब्द उच्चारला नाही.मात्र पक्ष कोणताही असो त्यांचे नाव घेऊन आज राजकारण करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अपशब्द उच्चाराशिवाय एकही दिवस गेला नाही अस झालं नाही.अलीकडल्या काळात राजकीय लोकांची विकासाची संकल्पनाच बदलून गेली आहे. याचे कारण म्हणजे लोकांच्या हिताचे निर्णय घेणे आणि त्याचा जनतेला लाभ देणे हे आपले प्राधान्याने काम आहे याचेच भान हरवलेले सगळीकडे दिसत आहे. हे भान हरविण्याची वेगवेगळी कारण आहेत. त्यातील प्रमुख दोन कारणे म्हणजे, एक तर सत्तेत राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रचंड तडजोडी आणि दुसरं म्हणजे सत्तेतील सततची अस्थिरता. अर्थात सत्तेतील ही अस्थिरता पूर्वीच्या नेत्यांना नव्हती का? तर ती होतीच. परंतु सत्तेच्या राजकीय लाभातून पुढील शेकडो पिढ्यांची जी ‘घरभरणी’ होते ती अभिलाषा त्यावेळच्या कोकणातल्या नेत्यांना नव्हती. त्यामुळे त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी कदाचित कोकणचा फार विकास केला नसेलही परंतु घराघरात शांतता नांदत होती. आता मात्र अशा अभिलाषेपोटी सर्वच लोकप्रतिनिधींची भाषा बदलत गेली. यातून घरच्या एका चुलीवर दोन पक्षांचा विचार शिजू लागला. त्यातून गावातीलच काय, घरातीलही शांतता नाहीशी झाली. ‘एकाच घराच्या धारणाला वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्यांचे वेगवेगळे रंगही दिसू लागले’. म्हणजे आताच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्यातून दिलासा मिळण्याऐवजी माणसाला सतत अस्थिर केलं जातंय. त्याचं अस्तित्वच मुळासकट खुडून काढण्याचे प्रयत्न कसे होऊ लागले हे आपल्या लक्षात येत जाईल.
लोकांच्या गरजा भागविण्यासाठी जे कष्ट पडतात ते कष्ट न घेता जिंकून येता येत असेल तर त्याचाच अवलंब केला जातो. हे कोकणातील गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकारणाने दाखवून दिले आहे. त्यामुळे आपल्यातील बोलघेवडेपणा जास्तीत जास्त सिद्ध करणे आणि त्या बोलघेवडेपणाला तरुणांना नादी लावणे हा अजेंडा अलिकडल्या लोकप्रतिनिधींनी राबवलेला दिसतो. बरं या बोलघेवडेपणात किमान सभ्यता बाळगली जावी अशी जर कोणी अपेक्षा बाळगत असेल तर तो मोठी चूक करत आहे असे म्हणावे लागेल. लोकांच्या समस्या लोकांचे प्रश्न सोडविता येत नसतील तर त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी राजकीय नेत्यांची भाषणे हा एक उत्तम प्रयोग अलीकडल्या काळात ठरत आला आहे. कोकणात दशावतार खेळ प्रसिद्ध आहे. रात्री दशावतार खेळ पाहिल्यावर मनोरंजन होते. दुसऱ्या दिवशी मात्र त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या जगण्यावर काहीच होत नसतो. अलीकडल्या राजकीय नेत्यांच्या भाषणाचा या दशावताराशी संबंध जोडता येईल. एवढी नाटकीयता राजकीय नेत्यांच्या भाषणात असते. दुर्दैवाची गोष्ट अशी की दशावतार कलाकाराला असं म्हटलं जाते की ‘रात्रीचो राजा आणि दिवसाचो त्याच्या डोक्यावर बोजा’…. जनतेची, तळातल्या काम करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची स्थिती मात्र या दशावतरातल्या राजासारखी असते. निवडणुका आल्या किंवा कोणतीही राजकीय पक्षाची मोठी सभा असेल तर जीव तोडून कार्यकर्ते कामाला लागतात. ते हजारो लोक गोळा करतात. लोक राजकीय नेत्यांची टाळ्याखाऊ भाषण ऐकतात. सभा यशस्वी झाल्याच्या आनंदात राजकीय कार्यकर्ते गुलाल उधळतात. फटाके फोडतात. मात्र सभा संपल्यावर त्यांच्या पदरात प्रसंगी अनवाणी पायाने घरी परतण्याची पाळी येते. अर्थात हे सर्व नको तेवढे खोटे बोलणाऱ्या आपल्या नेत्यांवर विश्वास ठेवल्यामुळे झालेले असते. परंतु हा धडा एकदा घेऊनही पुढे न सुधारलेल्या या काळातल्या कार्यकर्त्यांना पुढची सभा यशस्वी करण्याचे स्फुरण चढते. पण त्यांना माहीत नाही वर्षानुवर्ष ज्याच्यासाठी आपण राबलो, त्याने फक्त तोंडाच्या बाताच मारल्या. त्याने आपल्याला निवडून दिलेल्या आपल्या जनतेसाठी आणि आपल्या कार्यकर्त्यांनाही काहीच दिलेले नसते. देण्याचीही त्याची इच्छा नसते. कारण त्याला फक्त राजकारणात आपल्या पुढच्या पिढीची सोय लावायची असते.
कोकणातील मागच्या पिढीतील सर्व राजकीय नेते हे सहिष्णुतावादी स्वभावाचे होते.त्यांच्या सर्वोदयी विचाराचा पगडा त्यांच्या कार्यकर्त्यांवर होता. त्यामुळे त्यांच्या नेत्यांच्या बोलण्यात साधा वरचा स्वर नसायचा.याचा परिणाम कार्यकर्त्यांवर होऊन कार्यकर्तेही विनम्रपणे कार्यरत राहत. स्वर्गीय मधु दंडवते उर्फ नानांची सभा राजापूर लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी एका ठिकाणी होती. नानांवर भरभरून प्रेम करणारे कार्यकर्ते त्यांची सेवा करण्यासाठी धडपडत असत. त्या सभेच्या ठिकाणी नानांचे चहापान आपल्या घरी व्हावे म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली. शेवटी एका कार्यकर्त्याच्या घरी नाना उतरतील, फ्रेश होतील, चहा घेतील आणि सभेच्या ठिकाणी येतील असे सभा नियोजनाच्या मीटिंगमध्ये ठरले. दुसऱ्या दिवशी आधीच्या सभा करून येईपर्यंत नानांना या सभेला यायला उशीर झाला. ज्या घरी नाना चहापान करणार होते ते घर दूर असल्यामुळे नाना सभेच्या बाजूच्या घरात चहापान करतील असा अचानक बदल करण्यात आला. ज्याच्या घरी नाना चहापानाला जाणार होते त्याला हे कळतच तो हिरमुसला. त्याच्या घरातील माणसे नाराज झाली. सभेच्या ठिकाणी आल्यावर नानांना हे कळले.नानांनी सभेच्या बाजूच्या घरी चहापान केला. तिथेच आधी चहापानाची सोय ज्याच्या घरी केली तोही कार्यकर्ता होता. शेवटी त्या कार्यकर्त्याला घेऊन नाना त्याच्या घरी गेले. त्याच्या परिवाराला भेटले. त्याच्या आईला वाकून नमस्कार केला. त्याच्या घरी चहा घेतली आणि पुन्हा सभेच्या ठिकाणी आले.हा प्रसंग नाना देशाचे अर्थमंत्री असतानाचा आहे. यावरून आपल्या लक्षात येईल कोकणातील आधीच्या पिढीतील राजकीय नेते किती विनयशील होते आणि त्यांच्या भाषेत, त्यांच्या वागण्यात कसा कमालीचा गोडवा होता. आता मात्र भाषिक आक्रमकपणा, पांचट विनोद, करमणुकप्रधानता याचाच अनुभव येणाऱ्या आजच्या राजकीय नेत्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांची ‘अशी जपणूक करणे’ हे आता विसरायलाच हवे!
राजकीय नेत्यांनी त्यातही जबाबदार लोकप्रतिनिधीनी कसे वागावे हा खरंतर जगभरातील अलीकडल्या काही वर्षातील चिंतनाचा विषय आहे. राजकीय सुसंस्कृतपणा सर्वत्रच एकाच काळात लयास गेल्याचे दिसून येऊ लागले आहे. अपवादाने काही नेते मात्र आपल्यातील सुसंस्कृतपणा कठीण काळातही सोडून देत नाहीत. अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सार्वजनिक ठिकाणी विनोदाने काही टिप्पणी केली. त्यावर आक्षेप घेतले गेले. तर ओबामा यांनी लगेच माफी मागितली. एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीने किंवा त्या पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीने त्या पदाचा आब राखायचा असतो.हेच या कृतीतून ओबामा यांनी दाखवून दिले. इंदिरा गांधींची १९८४ ला हत्या झाली. त्यानंतर वैमानिक म्हणून काम करत असणाऱ्या राजीव गांधीना पंतप्रधान केले गेले. राजीव गांधी हे उमदे व्यक्तिमत्व. त्यांच्या वागण्यातील, बोलण्यातील सुसंस्कृतपणा हा इतर राजकीय नेत्यांनी आदर्श घ्यावा असा. परंतु लोकसभेच्या एका अधिवेशनात सभागृहात मधु दंडवते भाषण करत होते. त्यांचा इंग्रजीचा उच्चार चुकीचा निघाल्याचे समजून राजीव गांधी यांनी शेरेबाजी केला. त्यावेळी दंडवते चिडले. त्यावर एक प्रतिक्रिया दिली आणि ते थांबले. मात्र सभागृहाचे कामकाज थांबल्यावर पंतप्रधान असणाऱ्या राजीव गांधीनी दंडवतेना भेटायला बोलावले. दंडवते हेही भेटायला रागारागात गेले. मात्र राजीव गांधींसमोर जाताच राजीव गांधीनी “मी असे बोलायला नको होते. तुम्ही माझ्या वडीलांसमान आहात” असं म्हणून ‘सॉरी’ म्हटले.लोकसभा सभागृहात ज्येष्ठ नेते म्हणून वावरणाऱ्या दंडवतेंचा राग तिथेच निवळला. याला म्हणतात राजकीय समंजसपणा. अलीकडल्या काही वर्षात मात्र कोकणात हा राजकीय समंजसपणा धुळीस मिळाला आहे. खासदार-आमदारांपासून अगदी जिल्हा परिषद ते ग्रामपंचायतच्या सदस्यापर्यंत एकमेकावर जी टिपणी केली जाते ती ऐकू नये अशीच असते. चूक झाली असेल तर नम्र बोलण्याने माणसाला जिंकता येते. हे राजीव गांधी यांनी दंडवते याना ‘सॉरी’ म्हणून दाखवून दिले. तर दंडवते यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या कोकणात मात्र आता राजकीय भाषणातून दुसऱ्याची आयुष्यभरासाठीची निंदानालस्ती कशी केली जाऊ शकते हेच अनुभवास येत आहे.
राजकारणात सगळं माफ असतं असं म्हणतात. पण ते खोटे आहे. आधुनिक जगात राजकारणावरच लोकशाही टिकून असते. अशावेळी राजकीय लोकांनी लोकांच्या मनाविरुद्ध वागावे आणि आपल्या फायद्यासाठी हवे ते बोलावे वरून हे मी राजकारणासाठी केले असे म्हणावे, हे काही लोकशाहीचे लक्षण नाही. लोकशाहीचे खरे लक्षण बॅरिस्टर नाथ पै म्हणतात त्यातच आहे, बॅरिस्टर नाथ पै म्हणायचे, “लोकांनी आपल्या भल्याच्या निर्णयासाठी मला निवडून दिले आहे. तेव्हा मी त्यांच्याशी माझा विवेक शाबूत ठेवूनच वागायला पाहिजे”. नाथ पै यांच्या या भाष्यातून त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी दिसून येते. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा विवेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी कायमच जपला पाहिजे. तो जर जपला नाही तर त्यांच्या सार्वजनिक विश्वासार्थतेलाच तडा जातो. सार्वजनिक विवेक हरवतो तेव्हा बोलणाऱ्या राजकीय नित्याचेच नुकसान होत नाही तर सामाजिक प्रदूषणही वाढत असते. यातून सामाजिक निष्क्रियता वाढीस लागते आणि त्यातून एखाद्या माणसाचा अहंभाव दिसून येतो. त्यातून सवंग उथळ राजकारणाला सुरुवात होते. कोकणातील राजकारण ९० च्या आधी कधीच ‘व्यक्तिकेंद्रित’ नव्हते. एखादा निर्णय मोठा नेता घेत असला तरी त्या निर्णय प्रक्रियेत आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना सामावून घेतले जात होते. त्यावर साधक बाधक चर्चा होत होती आणि त्या चर्चेनंतर सार्वजनिक सभेत त्याची घोषणा होत असे. यातून काही जबाबदारीच्या गोष्टी घडत जात असत. पहिलं म्हणजे त्या राजकीय निर्णयाला अपयश आले तर ते अपयश सर्वांचे मानले जायचे. त्यामुळे या निर्णयाला एकटा राजकीय नेता जबाबदार धरला जात नव्हता. यातून सांघिक भावना वाढीस लागायची.या भावनेतून पुढील राजकारणाची दिशा ठरायची. मोठ्या सभेआधी छोट्या-छोट्या बैठका व्हायच्या.या बैठका म्हणजे नंतर होणाऱ्या सभेत राजकीय प्रमुख नेता काय बोलणार आहे, याची विश्वासार्हता होती. यामुळे अजून एक गोष्ट घडायची ती म्हणजे अशा बैठकीनंतर या निर्णय प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपणच हा निर्णय घेतला अशी त्याची भावना वाढीस लागायची. त्याचा परिणाम राजकीय नेत्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर व्हायचा. दुर्दैवाने कोकणातल्या राजकारणातील ही सांघिक भावना आता संपून गेली असून राजकीय नेत्याला जे वाटते तेच तो करतो. त्याच्यावर कोणताही नैतिक दबाव राहिलेला नाही. उलट एखाद्या सभेत बोललेला निर्णय तो बदलू शकतो. कारण त्यामागे आपला काही फायदा नाही हे लक्षात येत गेले तर त्या निर्णयाची पुढील प्रक्रिया थांबविली जाते. याचाच अर्थ असा की पूर्वी कोकणातील राजकीय नेते आपण बोललेल्या शब्दांची बांधिलकी स्वीकारायचे. आताचे नेते मात्र शब्द फिरविण्यातच माहीर आहेत. आणि याचा प्रत्यय वारंवार कोकणातील जनतेला येत आहे. गेल्या पंचवीस वर्षातील कोकणातील राजकारणाने हीच पातळी गाठली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते!
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसच्या सत्तेचे वारे वाहू लागले. या सत्ता राजकारणात पायाभूत सुविधा महत्त्वाच्या मानून खेडोपाडी विकासाच्या दृष्टीने पाऊल पडू लागले. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसचे सत्ताकारण राहिले. यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक ते शरद पवारांपर्यंत धुरंदर नेते मुख्यमंत्री राहिल्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत विकास होऊ शकला.त्यामुळे साहाजिकच अपवाद वगळता प्रत्येक वेळी काँग्रेसने सत्तापद प्राप्त केले. मात्र अशाही स्थितीत कोकणात समाजवादी आणि शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व बऱ्याच वेळा राहिले. तळकोकणात ‘समाजवादी पक्ष’ आणि पूर्वीच्या कुलाबा म्हणजे आताच्या रायगड विभागात ‘शेतकरी कामगार पक्ष’ असे समीकरण होऊन गेले.मात्र काही ठिकाणी काँग्रेस उमेदवार निवडून येत होते आणि त्यांचे वर्तनही काँग्रेस पक्षाला साजेसे असेच होते. उदाहरण द्यायचे झाल्यास तत्कालीन आमदार केशवराव राणे स्वातंत्र्यानंतर १९५१- ५२ ला पहिली निवडणूक जाहीर झाल्यापासून कायम काँग्रेसशीच एकनिष्ठ राहिले. राणे साहेबांनी कोकणच्या प्रमुख पाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी मिळवून घेतली. एसटी महामंडळाचे अध्यक्ष असताना कोकणातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्ण क्षमतेने चालू केली. असे असले तरी गावातील साधा गुराखीही त्यांच्या घरी आपली समस्या घेऊन जाऊ शकत होता. त्यांनी कधीच अपशब्दाने कुणाला दुखवलं नाही. मात्र तरीही समाजवादी पक्षाने तळकोकणात तब्बल १९९० सालापर्यंत आपले अस्तित्व राखले. या सगळ्यामागे बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाचा महिमा होता. बॅरिस्टर नाथ पै यांचा १९२२ साली वेंगुर्ले येथे जन्म झाला. काही वर्षांनी त्यांचे कुटुंब बेळगावला स्थायिक झाले. मात्र नाथ पै उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला गेले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की ते परदेशात असतानाच त्यावेळच्या १९५२ च्या मुंबई असेम्ब्लीच्या निवडणुकीत बेळगावातून नाथ पै यांना उमेदवारी देण्यात आली. पुढे नाथ पै प्रजासमाजवादी पक्षातून लोकसभेला राजापूर मतदारसंघातून उभे राहिले. नाथ पै यांच्या ओजस्वी अभ्यासू भाषणाचा प्रभाव संपूर्ण कोकण भर राहिला आणि त्यांची घराघरात प्रतिमा झळकू लागली.त्यामुळे १७५७- ६३- ६७ अशा तीन वेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत बॅरिस्टर नाथ पै हे भरघोस मतांनी निवडूनही आले आणि बॅरिस्टर नाथ पै यांचा कोकणात ‘नाथ हा माझा झाला’! नाथ पै यांचे स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या शब्दात दुसऱ्याबद्दल प्रचंड कणव आणि आदर होता. सामान्यातल्या सामान्य माणसाबद्दल प्रचंड आपुलकी होती. कला संस्कृतीचे ते भोक्ते होते. यामुळे ते सर्व स्तरातल्या वर्गाला शेवटपर्यंत जोडून राहिले. त्यांच्याकडे आलेल्या कुणाला त्यांनी कधीच विन्मुख पाठविले नाही. नाथांचे रात्री कुठेही कार्यक्रम असो कार्यक्रम झाल्यावर मुक्कामाच्या ठिकाणी परतताना वाटेत कुठे दशावतार कला सादर होत असेल तर ती कला पाहण्यासाठी दशावतार सादर होणाऱ्या स्टेजच्या समोर जाऊन ते बसायचे. दशावतार नाटक पहायचे. त्यातून दशावतार कलाकारांना मोठी प्रेरणा मिळायची. पुढे नाथांनी त्या वेळच्या सत्ताधाऱ्यांपर्यंत या कलेचा आवाज पोहचवला. अनेक कलाकारांना सन्मानही प्राप्त करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कोकणातील दशावताराचे बाबी नालंग हे भिष्माचार्य. त्यांना भारत सरकारच्या नाट्यकला अकादमीने गौरविण्यात आले. ते म्हणायचे, “तुमचा ‘सखाराम बाईंडर’ मंदिरात प्रवेश करू शकत नाही. पण आमचा दशावतार कलाकार मंदिरातच रंग गालावर चढवत असतो आणि या सगळ्या मागची प्रेरणा ही बॅरिस्टर नाथ पै यांची आहे.” हे सांगणारे बाबी नालंग शेवटपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते होते.
कोकणात घरात प्रवेश करताना दारावर गणपतीचा फोटो लावलेला आढळतो. दशावतार कलाकारांचे गणपती हे आराध्य दैवत. मात्र बाबी नालंग यांच्या घराच्या प्रवेशद्वारावर गणपती ऐवजी पूर्वी बॅरिस्टर नाथ पै यांचा फोटो लावलेला असायचा. यावरून आपल्या लक्षात येते या महान नेत्याने कोकणच्या जनतेवर, त्यांच्या कला प्रकारावर किती प्रेम केले असेल. आज मात्र दशावतार कलाकारांना आपल्या समस्येचे निवेदन इथल्या प्रमुख मोठ्या राजकीय नेत्यांना द्यायचे असेल तर कित्येक तास बाहेर ताटकळत थांबावे लागते. पुढे ते निवेदन जेव्हा अशा राजकीय नेत्यांच्या हातात पडते तेव्हा ते त्यांच्या फाईलच्या ढिगार्यात हरवून जाते. “खरा नेता सर्वसंमतीचा फक्त शोध घेऊन समाधान मानत नाही, तो आपल्या प्रयत्नांमधून सर्वसंमती निर्माण करतो” अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांचा शहीद झालेला नेता मार्टिन ल्यूथर किंग याचे हे उद्गार आहेत.हे उद्गार नाथ पै यांच्या कार्यकर्तृत्वाला लागू पडतात.देश स्वतंत्र झाल्यावर पुढील तीन लोकसभा निवडणुकीत कोकणचे नेतृत्व देशात करताना खरे समाजवादी संसदपटू बॅ. नाथ पै हे अशा प्रकारे जनतेला एकजीव होऊन जोडून राहणारे नेते होते. विरोधी पक्षात असूनही पंतप्रधान नेहरूंचा विश्वास त्यांनी संपादन केल्यामुळे आंतरराष्ट्रीय मुत्सद्दीपणासाठी नेहरू त्यांच्याबरोबर चर्चा करायचे. वयाच्या अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांनी संसदेत प्रवेश केला. त्यामुळे १९७० पर्यंत, म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लोकसभेत ते आपल्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने चमकले. गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील नाथ पै यांच्या लोकसभा मतदार संघातून कोकणचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी चुकून जर लोकसभेत कोकणची समस्या मांडलीच तर पुढे ती समस्या सोडवून घेण्याचा पाठपुरावा दूरच राहिला, त्याची आपल्या मतदार संघात जाहिरातबाजी करण्यातच ते धन्यता मानत असतात.
दुर्दैवाने १९७१ साली कोकणच्या या लाडक्या नेत्याचा वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी मृत्यू झाला आणि खऱ्या अर्थाने विकासाचा जिव्हाळा असणाऱ्या सुसंस्कृत नेतृत्वाला कोकण पोरके झाले. नाथांच्या निधनानंतर समाजवादी पक्षाला त्यांच्या एवढाच विद्वान, प्रामाणिक, भाषेवर प्रभुत्व असणारा, विशेषतः तळकोकणात सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडणारा उमेदवार लोकसभेसाठी हवा होता.तेव्हा कोकणात फारसं नाव माहीत नसणाऱ्या अहमदनगरच्या बॅरिस्टर प्रा मधु दंडवते या अर्थतज्ञ असलेल्या भल्या माणसाला राजापूर मतदारसंघातून तिकीट दिली गेली. हा सगळा काळ इंदिरा गांधी यांच्या कर्तुत्वाने भारावून टाकणारा होता. देशाच्या जनतेवर इंदिराजींचा खूपच प्रभाव होता तेव्हा असे म्हटले जायचे की, एखाद्या दगडाला जरी काँग्रेसचा उमेदवार म्हणून घोषित केले तरी तोही निवडून येईल. अर्थात यात महाराष्ट्रपण अपवाद नव्हता. १९७१ ची लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसच विजयी होणार असे छातीठोकपणे सांगितले जात होते. झालेही तसेच. एकूण ४८ लोकसभा उमेदवार पैकी ४७ काँग्रेसचे उमेदवार खासदार म्हणून निवडून आले. मात्र ४८ पैकी एकच खासदार जनता दलाचा निवडून आला. तो खासदार म्हणजे मधु दंडवते होय! कोकणची जनता सुज्ञ आहे.ही जनता सुशिक्षित उमेदवार निवडते. हे इंदिरा गांधीनाही कोकणच्या जनतेने दाखवून दिले. इंदिराजींनीही मोठ्या मनाने महाराष्ट्रातून विरोधी पक्षातल्या एकमेव निवडून आलेल्या मधु दंडवते यांचे लोकसभेच्या भाषणात अभिनंदन केले. तेव्हापासून राजापूर मतदार संघ विद्वान लोकांचा मतदारसंघ असे संकेत देशभर सर्व दूर गेले. तब्बल पंचवीस वर्ष मधु दंडवते अर्थात नाना पाच वेळा सलग लोकसभेत निवडून गेले. नानांची कोकण संदर्भातली मोठी स्वप्ने होती. अ.बा वालावलकर यांनी प्रत्यक्षात कल्पना मांडलेली आणि ही कल्पना पूर्ण करण्यासाठी नाथ पै यांनीही स्वप्न बघितलेला कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नानांनी अहोरात्र मेहनत घेतली.खरेतर नाथ यांच्या पाठपुराव्यामुळे त्यावेळी कोकण रेल्वेच्या मार्गाचा सर्व्हे तयार करण्यात आला होता.तेव्हा रोहा (रायगड) पर्यंत हा कोकण रेल्वे मार्ग वाहतुकीस तयारही झाला.मात्र पुढे हा मार्ग राजकीय इच्छाशक्ती अभावी होऊ शकला नाही.मात्र जनता दल मिश्र सरकार पुन्हा सत्तेवर आल्यावर देशाचे रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस होते आणि अर्थमंत्री मधु दंडवते.त्यावेळी लोकसभेच्या पहिल्याच अधिवेशनात अर्थमंत्री या नात्याने मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी कोकण रेल्वेचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची घोषणा केली.उद्या दुसरे सरकार सत्तेवर आले तर कोकण रेल्वे प्रकल्प बंद पडू नये म्हणून दंडवते यांनी त्यावेळी कोकण रेल्वे कार्पोरेशन स्थापन केले आणि एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गाचे काम सुरू केले.हा प्रकल्प प्रारंभी अवघ्या चार वर्षात पूर्ण करण्यात येईल असे जाहीर केले. थोडाफार वर्षाचा कालावधी मागे पुढे होऊन हा प्रकल्प मधु दंडवते यांनी १९९६ -९७ पर्यंत कोकण रेल्वेचे पहिले अध्यक्ष ई. श्रीधरन यांच्या साथीने पूर्णत्वास नेला. कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण होणार नाही म्हणून नानांची चेष्टा करणाऱ्या विरोधकांच्या नाकारावर त्यांनी कायमची फुली मारली!
अलीकडल्या काळातील कोकणातील राजकीय नेते सामान्यातील सामान्य होऊन जगताना दिसत नाहीत. त्यांचे राहणीमानही तसे नसल्यामुळे त्यांचा सामान्य माणसांपासून संवादही तुटलेला दिसतो. त्यांचे जगणेच पोशाखी असल्यामुळे राहणेही पोशाखी आणि बोलनेही सामान्य लोकांशी एक अंतर ठेवूनच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेशी त्यांचा संवाद कधी होतच नाही. त्यामुळे सामान्यांचे प्रश्नही ते गांभीर्याने घेत नाहीत. चुकून जर सामान्यांचे प्रश्न सुटत असतील तर ते त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे समजावे. विशेष म्हणजे हे कार्यकर्ते मिळणाऱ्या टक्केवारीमुळेच प्रश्न सोडवत असतात असा त्यांच्यावर आरोप केला जात आहे. मात्र या सगळ्यांहून मधु दंडवते माणूस म्हणून वेगळे होते. त्यांचा डोक्यात सतत सामान्य माणसाचे भले व्हावे याबद्धलच विचार चाललेला दिसायचा. ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये सामान्य होऊन राहायचे. म्हणून ते सर्व स्तरातील जनतेला प्रिय होते.त्यांचे रहाणीमान, त्यांचे सगळ्यांशी आपुलकीने बोलणे या याबद्दल अनेक उदाहरणे सांगता येतील. आताचे नेते वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागात आपले वेगळे बंगले बांधून राहिलेले दिसतात. त्यांच्या गाड्यांची तर गणतीच आपण करू शकत नाही. या सगळ्यामुळे त्यांच्या बोलण्यात कायम एक अधिकारवाणीचा दर्प जाणवत राहतो. नानांकडे मात्र स्वतःची गाडी नव्हती, की पंचवीस वर्षांत ज्या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून आले तिथे त्यांचं स्वतःचे घरही नव्हते. आपल्या मतदार संघात आले की ते शासकीय निवासस्थानीही राहायचे नाहीत. आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचा मुक्काम असायचा. कणकवलीत मामा आळवे हे त्यांचे जिवाभावाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या घरी बर्याच वेळा नानांचा मुक्काम असायचा. एके दिवशी नाना त्यांच्या घरी मुक्कामाला होते. तेव्हा मामा आळवेना पहाटे पाच वाजता बाथरूममध्ये कपडे धुतानाचा आवाज आला. मामा उठून बघतात तर काय, आपल्या घरी खासदार असलेला देशातील एक मधु दंडवतेंसारखा मोठा नेता स्वतःचे कपडे स्वतः धुतो आहे. हे पाहून मामांना संकोच वाटला. मामानी विनंती केली. कपडे धुवू नका. तर नाना म्हणाले, आपलं काम आपणच कायम कराव! दुसरी गोष्ट म्हणजे नाना अर्थमंत्री म्हणून देशाची सेवा बजावून दिल्लीहून मुंबईला आले तेव्हा गाडी घेण्यासाठी ते एका बँकेत गाडीचे कर्ज घ्यायला गेले. तेव्हा त्या बँकेचा मॅनेजर त्यांच्याकडे बघतच राहिला. त्याला काय बोलावं हेच कळेना.
खरतर हे सामान्यपण त्यावेळच्या सगळ्याच पक्षाच्या नेत्यांमध्ये होते. मालवणचे माजी आमदार श्याम कोचरेकर हे पूर्ण पाच वर्ष एकदा नगराध्यक्ष होते. दोनदा आमदार होते. तरी ते शेवटपर्यंत भाड्याच्या घरात राहत होते. जनता दलाचे कणकवली येथील दोन वेळा आमदार राहिलेले डॉ. य. बा. दळवी हे अगदी दोन वर्षापर्यंत त्यांच्या कळसुली गावात एक साधा दवाखाना लोकांसाठी चालवत होते.गावातून कणकवली शहरात येताना एसटीत गर्दीत उभे राहून येत असत.आज ते ९६ वर्षाचे आहेत. तरी कणकवली पासून बारा किलोमीटरवर असणाऱ्या कळसुली सारख्या छोट्या खेडेगावात राहून गावातल्या लोकांशी संपर्क ठेवून आहेत. माजी आमदार केशवराव राणे, माजी आरोग्य मंत्री भाईसाहेब सावंत, शामराव पेजे असे कितीतरी कोकणातील दिग्गज नेते याच सामान्य पद्धतीने जगले. मात्र ९० नंतर कोकणातील राजकीय स्थितीच बदलली. हे सामान्यपण ९० नंतरच्या नेत्यांमधून हरवून गेले. त्यामुळे त्यांची भाषाही बदलत गेली. अपवादात्मक सुरेश प्रभू. बँकिंग क्षेत्रातून पुढे आलेला हा नेता लोकांशी बोलताना अजूनही विनम्रपणे बोलतो. हीच काय ती आजच्या राजकीय भाषा वर्तनातील जमेची बाजू म्हणता येईल.
कोकण म्हणजे फक्त सिंधुदुर्ग नाही साहेब…