–प्रवीण बर्दापूरकर
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले . राज्यात भारतीय जनता पक्ष , एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या महायुतीला मिळून सव्वा दोनशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत म्हणजे अतिशय स्पष्ट बहुमत मिळालं आहे . त्याला आता नऊ दिवस होत आहेत तरी अजून मुख्यमंत्री ठरतच नाहीये. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार हेही कळत नाहीये . महायुतीत आणि त्यातही भारतीय जनता पक्षात सर्व काही आलबेल नाही आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर असलं तरी अजून त्यावे शिक्कामोर्तब झालेलं नाही ,असाच याचा अर्थ आहे.
माध्यमांच्या आणि त्यातही प्रकाश वृत्त वाहिन्यांच्या बातम्यावर जाऊ नका . प्रकाश वृत्त वाहिन्यांची घाई सर्वश्रुत आहे . राज्याचे सर्व निकाल हाती येण्याच्या आधीच वाहिन्यांनी मुख्यमंत्री आणि सरकारच्या शपथविधीची तारीख व स्थळ जाहीर करुन टाकलं आणि आतापर्यंत ते तीन वेळा बदललं . मतदार कधीही मुख्यमंत्री , मंत्री किंवा विरोधी पक्ष नेता निवडून देत नाहीत तर ते निवडून देतात तो विधानसभेचा सदस्य . विजयी उमेदवारानं सदस्यत्वाची शपथ घेतली की नंतर तो अधिकृत आमदार होतो . त्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची निवडणूक होते आणि तो ( पक्ष श्रेष्ठींनी ठरवलेला ! ) नेता मग मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो अशी ती प्रक्रिया असते .
इथे तर तीन पक्ष (महा)युतीत आहेत आणि त्यापैकी केवळ राष्ट्रवादीच्याच विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन अजित पवार यांचं नाव नेता म्हणून निश्चित झालेलं आहे . भाजप आणि शिवसेनेची विधिमंडळ बैठक अजून बाकी आहे ; ( अद्याप निवड न झालेल्या ) विधानसभा अध्यक्षाचा विरोधी पक्ष नेता निवडीचा अधिकार स्वत:च्या हाती घेत सरकार स्थापनेच्या एकापाठोपाठ बातम्या देण्याची नुसती घाई आणि स्पर्धा वृत्त वाहिन्यांमध्ये सुरु आहे . देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार नक्कीच आहेत पण , त्यांची निवड त्या पदावर अजूनही झालेली नसताना त्यांचा जणू कांही ‘भोंगा’ असल्याची वाहिन्यांची ही घाई अनेक संशय निर्माण करण्यास वाव देणारी आहे , हे निश्चित.
निकालानंतरच्या गेल्या नऊ दिवसातील राजकीय घटनांचं सखोल विश्लेषण (swot analysis) केलं तर लक्षात येतं की एवढ्या मोठ्या आणि अनपेक्षित विजयानं भाजपच कोंडीत सापडला आहे . १) देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत . २) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. ३) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचाही पाठिंबा आहे , या बातम्या क्षणभर खऱ्या मानूयात पण , भाजपच्या प्रत्येक निर्णय प्रक्रियेत संघ सतत हस्तक्षेप करत नाही हे लक्षात घ्यायला हवं . ४) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला विरोध नाही तर सशर्त पाठिंबा आहे ( त्या अटी अजून अटकळबाजीच आहेत ) तरी महाराष्ट्रात अजून सरकार का स्थापन होऊ शकलेलं नाही ?
यात सर्वात मोठा पक्ष भाजप आहे आणि भाजपत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात सर्व कांही आलबेल नाही असा याचा अर्थ आहे . दिल्लीतून मिळणारी आणि संघाशी संबंधित कांहीशी बोलल्यावर हाती येणारी माहिती अशी –
१) देवेंद्र फडणवीस यांच्या नावाबाबत भाजप श्रेष्ठी अजून एकमतावर आलेले नाहीत . मराठा आणि बहुजन समाजाच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात एखादा नवा चेहरा मुख्यमंत्री म्हणून द्यावा आणि देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या जागी घ्यावं , असा एक मतप्रवाह दिल्लीत आहे पण , यातील एक अडथळा असा की , नवा चेहरा राष्ट्रवादी तसंच शिवसेनेला मान्य व्हावा लागेल आणि असा मान्यताप्राप्त चेहरा ( यातील कांही नावेही समजली आहेत . ) अजून तरी भाजपला सापडलेला नाही म्हणूनच महायुतीची बैठक दोन दिवस पुढे ढकलण्यात आलेली असू शकते .
२) भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी जे ७/८ संख्याबळ कमी पडते त्याची चाचपणी या दोन/तीन दिवसांत होऊ शकते पण , ही स्वबळाची शक्यता कमी आहे कारण
३) अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा विनाअट आहे आणि अगदी टोकाची शक्यता म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेनं साथ सोडली तरी भाजप + राष्ट्रवादी ही युती सत्ता प्राप्तीसाठी पुरेशी बहुमतात आहे . तरी मित्र पक्षांना भाजप वाऱ्यावर सोडून देतो या म्हणण्याला पुष्टी नको असा मतप्रवाह प्रभावी आहे म्हणून शिंदे गट दुरावेल संकेत अजून मिळलेले नाहीत . या सर्व चर्चा आहेत हे खरं असलं तरी , यांचा एक अर्थ भाजप श्रेष्ठीत अजून महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत एकमत झालेलं नाही . याआधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणं राजकारण हा अनेक शक्यतांचाही खेळ असतो ( politics is game of possibilities ) म्हणूनच सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी , भाजप श्रेष्ठींकडूनच सरकार स्थापनेला विलंब होत असावा , असं म्हणण्यास जागा आहे.
अर्थात एक निर्विवाद आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा…च असेल व अर्थात त्यात आघाडीवर नाव नि:संशय देवेंद्र फडणवीस यांचंच आहे कारण भाजपच्या विजयात त्यांचाही मोठा वाटा आहे . मात्र देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तरी ते त्या पदावर फार फार तर अडीच-तीन वर्ष असतील . पुढच्या लोकसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात एखादं बडं पद दिलं जाईल आणि मुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे सोपवलं जाईल , अशीही चर्चा नवी दिल्लीत ऐकायला मिळते आहे . राजकीय चर्चेची अशी गुऱ्हाळं नवी दिल्लीत कायमच अहोरात्र पेटलेली असतात . नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळातील अशा सर्वच राजकीय चर्चा खोट्या , एकतर्फी नसतात आणि त्या लगेच खऱ्या ठरतात असंही कांही नसतं . कारण ठिणगी पडल्याशिवाय धूर निघत नसतो. नवी दिल्लीतील कांही चर्चा खऱ्या ठरण्यासाठी तीन/चार वर्षांचा अवधी लागतो असा अनुभव आहे . सध्या महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेचं निर्णय केंद्र नवी दिल्ली झालेलं आहे म्हणूनच दिल्लीत काय चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे , हे शेअर करणं एवढाच या मजकुराचा हेतू आहे .
गुऱ्हाळात गूळ पूर्ण तयार होईपर्यंत शर्यतीत आघाडीवर असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा !
(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
प्रवीण बर्दापूरकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.