मंडला शहर नर्मदा नदीच्या विशाल पात्राने दोन भागात विभागलं गेल आहे. एकदा का या नर्मदेवरील विशाल पुलावर आपली गाडी आली की नर्मदेचं मनमोहक रूप पाहून प्रवासाचा सारा ताण क्षणभरात निघून जातो. शहरात प्रवेश करताना एखाद्या प्राचीन, ऐतिहासिक नगरीत आपण प्रवेश करतो आहे आणि कुठल्याही क्षणी दोन घोडेस्वार येऊन ‘गढा मंडला में राणी दुर्गावती की और से आपका स्वागत है’, असं म्हणतील की काय, असे वाटते. मंडला शहर हे नर्मदेचं शहर आहे. शहराचे सारेच संदर्भ, इतिहास, संस्कृती, सणवार, नवस, उत्सव, प्रत्येक ऋतू, प्रेयसी-प्रियकराच्या आणाभाका आणि मनुष्याचं अंतिमस्थान सारं काही नर्मदेशी जोडलेले. शहरासाठी नर्मदा फक्त नर्मदा नाही, “मां नर्मदा” आहे. शहराचा प्रत्येक भाग हा नर्मदेशी कायमच संपर्कात असल्यासारखा असतो. ‘सहस्त्रधारा’, ‘हाथी घाट’, ‘जेल घाट’, ‘उर्दू घाट’, ‘वैद्य घाट’, ‘महंतवाडा घाट, हे सारे घाट सदैव ‘सुमत्स्य, कच्छ, नक्र, चक्र, चक्रवाक शर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे’ च्या जयघोषाने दुमदुमत असतात. वर्धेजवळच्या पवनार आश्रमात गंगेची सुंदर मूर्ती आहे तशीच एक रेखीव, मगरेच्या वाहन असलेल्या नर्मदेची मूर्ती मंडला जवळच्या पुरवा गावात आहे.
मंडला हे गोंड साम्राज्याचं महत्त्वाचं ठिकाण. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीपासून गोंड राजा संग्रामशाही यांनी आपल्या राज्याचा विस्तार मंडलापासून ५२ गढांपर्यंत केला. १६ व्या शतकाच्या मध्यापर्यंतच त्याच्या राज्याचा विस्तार भोपाळपासून छोटा नागपूरपर्यंत आणि बंगालच्या उपसागरापासून चांदा (चंद्रपूर) पर्यंत केला. दुर्गावती ही संग्रामशाहीची पत्नी. संग्रामशाहीचा तरुणवयातच मृत्यू झाला. त्यानंतर राणी दुर्गावती मंडलाच्या सिंहासनावर आरुढ झाली. विद्वत्ता, ऐश्वर्य, कला व संस्कृतीचा अत्युच्च संगम हिच्या काळात झाला, असे सांगितले जाते . त्या काळी अकबराने राणी दुर्गावतीच्या राज्यकारभाराचा अभ्यास करण्यासाठी एक दूत मंडल्याला पाठवला होता. मंडल्यामध्ये नर्मदा आणि बंजर नदीच्या संगमावर वसलेला गोंडांचा ऐतिहासिक किल्ला गोंड साम्राज्याच्या उत्कर्ष आणि पतनाचा मूक साक्षीदार आहे. किल्ला तिन्ही बाजूने नर्मदेने वेढलेला असून चौथ्या बाजूने दोन मोठमोठे खंदक निर्माण केले आहेत. किल्याच्या आत राजराजेश्वरीचे मंदीर संग्रामशाहीने बनवले होते. मात्र राणी दुर्गावतीनंतर गोंडांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली आणि एका स्वर्णीम युगाचा अंत झाला. आता त्या स्वर्णयुगाचे भग्न अवशेषच शिल्लक आहेत.