अर्थात आजच्या या धावत्या जगात एवढे प्रचंड साहित्य वाचायला कुणाला वेळ आहे?… ‘महाराष्ट्राचा खजिना’ या पुस्तकात दडलेला असताना मोबाईलमुळे वेेडे झालेल्या या महाराष्ट्राला आता वाचनाला वेळ राहिलेला नाही. त्यामुळे लाखमोलाची अनेक पुस्तके वाचनालयात किंवा कपाटात पडून आहेत. वाचन… चिंतन… आणि मनन… हे विषय जणू महाराष्ट्रातून बादच झालेले आहेत. अशा या काळात आचार्य अत्रे यांच्या अवाढव्य आत्मचरित्राचे संक्षिप्त आवृत्तीत परिवर्तन करून २०० पानांत जवळपास ‘समग्र अत्रे’ सामावून त्याची एक वेगळी आवृत्ती काढणे, हे काम सोपे नव्हते. मुळात आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राला हात घालणे आणि त्यातून २०० पानांत आचार्य अत्रे यांना बसवणे, हे सगळे आवाक्याच्या पलिकडचे काम आहे. पण, अत्रेसाहेबांवर प्रेम करणारे, आपण त्यांच्या गावचे आहोत- सावसवडचे आहोत म्हणून श्री. विजयभाऊ कोलते यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि यशस्वीपणे त्याला प्रत्यंचा लावली. हे काम सोपे नव्हते. या कामात त्यांना वसंत ताकवले, डॉ. जगदीश शेवते, शांताराम पोमण, सुरेश कोडीतकर या सर्वांची मदत झाली. त्याचा त्यांनी मनोगतात उल्लेखही केला आहे. पण, विजयभाऊंनी केलेले काम महाराष्ट्रासाठी किती उपकारक आहे, याची त्यांनाही कल्पना नसेल. आजच्या पिढीला ना अत्रेसाहेब फारसे माहित… ना त्यांचे चरित्र… ना त्यांचे साहित्य… त्यांची नाटके… त्यांचे चित्रपट… संयुक्त महाराष्ट्रासाठी दोन हातात दांडपट्टे घेवून लढलेला हा महानायक… महाराष्ट्र हा त्याचा श्वास… छत्रपती शिवाजी महाराजांपासून ज्ञाानाेबा-तुकोबांचा हा महाराष्ट्र…. शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र… साने गुरुजींचा महाराष्ट्र त्या चरित्रनायकांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून, ज्यांनी एक नव्हे, तर अनेक क्षेत्रांत स्वत:चे नाव दिग्गज करून ठेवले…. ते आचार्य अत्रे एक नव्हे तर दहा विद्यापीठे होते… आणि आहेत… मराठीभाषा आणि महाराष्ट्र या सोबत कायम चालणारे आधुनिक महाराष्ट्रातील एकच नाव आहे… ते म्हणजे आचार्य अत्रे…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या घरी आचार्य अत्रे साहेब गेले ते वर्णन वाचताना तर अंगावर काटा येतो.. घरात पाऊल ठेवताच… डॉक्टर आंबेडकर यांना साहेब म्हणाले, ‘डॉक्टरसाहेब, हे तुमचं घर आहे की ग्रंथालय…’ ग्रंथांच्या प्रचंड राशी चोहीकडे ठेवलेल्या होत्या. बाबासाहेबांचे जेवत तिथेच… आणि तिथल्याच पलंगावर त्यांची विश्रांती… साहेबांनी लिहिले आहे… ‘या ग्रंथालयात ज्ञाानाची तपश्चर्या करीत बसलेला तो ब्रह्मऋषी पाहून मी चकीत झालो…’ आंबेडकर त्यावेळच्या मागास जातीत जन्मले… पण वृत्तीने, व्यासंगाने, विद्वत्तेने, अधिकाराने कोणत्याही पंडित ब्राह्मणापेक्षा हा पवित्र ब्राह्मण आहे… धर्मशास्त्र ते घटनाशास्त्र असे कठीण विषय ते सहज सोपे करतात.. अत्रेसाहेबांनी आंबेडकर यांच्यावर ‘नवयुग’चा प्रचंड अंक काढला… १५००० प्रती पहिल्या दिवशीच संपल्या… त्या अंकावरचे डॉ. आंबेडकरांचे चित्र अनेक घरांत फ्रेम करून आजही लावले गेलेले आहे.