गावच्या नदीला दिगंत कीर्ती मिळवून देणारा महानायक

– मधुकर भावे

हजारो वर्षांपासून साऱ्या जगात नदीच्या कांठी गांवे वसली. नदीमुळे गावांची भरभराट झाली.  कृष्णेकाठी वसलेले कराड असो, नाही तर थेम्स नदीच्या काठी वसलेले लंडन असो… नदीमुळे गावं मोठी झाली… आणि गावामुळे त्यातली माणसं मोठी झाली. पण, आपल्या गावच्या नदीला जगभरात पोहोचवणारा एकच महानायक झाला, त्याचे नाव आचार्य अत्रे.  त्यांच्या गावची ‘कऱ्हा’ नदी गराडे गावच्या डोंगरातून  उगम पावते…आणि अवघी ३० किलोमीटर खळाळत वाहून नीरा नदीला मिळते. नदी छोटी आहे… पण अत्रेसाहेबांमुळे ही छोटी नदी जगभर साहित्यातून अखंड वाहत आहे. नद्यांमुळे गावं मोठी झाली… पण कऱ्हा या छोट्या नदीला अत्रेसाहेबांनी मोठेपण मिळवून दिले. म्हणून अनेक भाषांत ती भाषांतरीतही झाली. 

‘कऱ्हेचे पाणी’ हे आचार्य अत्रे यांचे पाच खंडातील आत्मचरित्र… जवळपास ५००० पाने. जगामध्ये कोणताही लेखक-कवी किंवा नेता याचे, इतक्या प्रचंड पानांचे आत्मचरित्र नाही. अत्रेसाहेबांनी लिहिलेल्या पाच खंडांनंतर दुर्दैवाने १३ जून १९६९ ला त्यांचे दु:खद निधन झाले. त्यानंतर त्यांच्या द्वितीय सुकन्या श्रीमती मीना देशपांडे यांनी अथक परिश्रम करून तीन खंड प्रसिद्ध केले. एका व्यक्तीचे आठ खंडातील हे आत्मचरित्र जगाच्या साहित्य विश्वातील एक वेगळा विक्रम! आचार्य अत्रे या नावातच पराक्रम आणि विक्रम… प्रचंड आणि अभूतपूर्व… अफाट आणि बेफाट… सर्वकाही  आभाळाएवढे! त्यामुळे त्यांचे आत्मचरित्र हे छोटे असणेच शक्य नव्हते. ते त्यांनी स्वत:साठी लिहिले नाही. ज्यांना महाराष्ट्र समजून घ्यायचा असेल, त्यांना या चरित्रातून अख्खा महाराष्ट्र समजून येईल. राजकीय महाराष्ट्र… सामाजिक महाराष्ट्र… सांस्कृतिक महाराष्ट्र… साहित्यिक महाराष्ट्र…. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांपासून २०१५ पर्यंतचा सगळा महाराष्ट्र या ७ ते ८ हजार पानांत सामावलेला आहे.

अर्थात आजच्या या धावत्या जगात एवढे प्रचंड साहित्य वाचायला कुणाला वेळ आहे?… ‘महाराष्ट्राचा खजिना’ या पुस्तकात दडलेला असताना मोबाईलमुळे वेेडे झालेल्या या महाराष्ट्राला आता वाचनाला वेळ राहिलेला नाही. त्यामुळे लाखमोलाची अनेक पुस्तके वाचनालयात किंवा कपाटात पडून आहेत. वाचन… चिंतन… आणि मनन… हे विषय जणू महाराष्ट्रातून बादच झालेले आहेत.  अशा या काळात आचार्य अत्रे यांच्या अवाढव्य आत्मचरित्राचे संक्षिप्त आवृत्तीत परिवर्तन करून २०० पानांत जवळपास ‘समग्र अत्रे’ सामावून त्याची एक वेगळी आवृत्ती काढणे, हे काम सोपे नव्हते. मुळात आचार्य अत्रे यांच्या आत्मचरित्राला हात घालणे आणि त्यातून २०० पानांत आचार्य अत्रे यांना बसवणे, हे सगळे आवाक्याच्या पलिकडचे काम आहे. पण, अत्रेसाहेबांवर प्रेम करणारे, आपण त्यांच्या गावचे आहोत- सावसवडचे आहोत म्हणून  श्री. विजयभाऊ कोलते यांनी हे शिवधनुष्य उचलले आणि यशस्वीपणे त्याला प्रत्यंचा लावली. हे काम सोपे नव्हते. या कामात त्यांना वसंत ताकवले, डॉ. जगदीश शेवते, शांताराम पोमण, सुरेश कोडीतकर या सर्वांची मदत झाली. त्याचा त्यांनी मनोगतात उल्लेखही केला आहे. पण, विजयभाऊंनी केलेले काम महाराष्ट्रासाठी किती उपकारक आहे, याची त्यांनाही कल्पना नसेल. आजच्या पिढीला ना अत्रेसाहेब फारसे माहित… ना त्यांचे चरित्र… ना त्यांचे साहित्य… त्यांची नाटके… त्यांचे चित्रपट… संयुक्त महाराष्ट्रासाठी दोन हातात दांडपट्टे घेवून लढलेला हा महानायक… महाराष्ट्र हा त्याचा श्वास… छत्रपती शिवाजी महाराजांपासून ज्ञाानाेबा-तुकोबांचा हा महाराष्ट्र…. शाहू-फुले-आंबेडकरांचा हा महाराष्ट्र… साने गुरुजींचा महाराष्ट्र त्या चरित्रनायकांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवून, ज्यांनी एक नव्हे, तर अनेक क्षेत्रांत स्वत:चे नाव दिग्गज करून ठेवले…. ते आचार्य अत्रे एक नव्हे तर दहा विद्यापीठे होते… आणि आहेत… मराठीभाषा आणि महाराष्ट्र या सोबत कायम चालणारे आधुनिक महाराष्ट्रातील एकच नाव आहे… ते म्हणजे आचार्य अत्रे…

त्या आचार्य अत्रे यांचे पहिल्या पाच खंडातल्या प्रचंड आत्मचरित्राचे हे संक्षिप्त चरित्र अतिशय प्रभावीपणे रेखाटले गेले. त्या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दि. २८ ऑक्टोबर  रोजी मुंबई मराठी पत्रकारसंघात सायंकाळी ४ वाजता आयोजित केले गेले आहे.  काही विषय भावनात्मक असतात.. या कार्यक्रमासाठी श्री. विजय कोलते यांचा जेव्हा मला फोन आला आणि त्यांनी सांगितले, ‘या पुस्तकाचे प्रकाशन तुमच्या हस्ते करायचे आहे…’ क्षणभर स्तब्ध झालो. आयुष्यामध्ये क्वचितच सन्मानाचे जे क्षण असतात तो क्षण माझ्या आयुष्यात  येतो आहे, या कल्पनेनेच गदगद होऊन गेलो. आचार्य अत्रे यांच्या पाचही खंडाचे वाचन पूर्वीच झाले होते. त्यावेळच्या पाच खंडाच्या  प्रकाशनाचा  वार्ताहर म्हणून साक्षीदारही आहे. पहिल्या खंडाच्या प्रकाशनाला महामहोपाध्याय दत्तोपंत पोतदार यांचे भाषण आजही कानात घुमते आहे. पण, मी वेगळ्या भावनेने भारावून गेलो. आचार्य अत्रे यांचे गुरू राम गणेश गडकरी अकाली गेले. त्यांच्या १९३० सालच्या  पुण्यतिथीला आचार्य अत्रे यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. हे आमंत्रण त्यांना ज्या दिवशी दिले गेले त्या दिवशी साहेबांच्या डोळ्यांत अश्रू आले होते. ते साल १९३० होते. अत्रेसाहेब लंडनहून टी.डी. ही शिक्षणातील अत्युच्च पदवी घेवून परतले होते आणि त्यांना गडकरी यांच्या, म्हणजे आपल्या गुरुच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण मिळाले. त्या दिवशी त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यातला शब्द न शब्द डोळ्यांसमोर आला.  ‘श्री. कोलते यांचे मला आलेले आमंत्रण हा माझ्या गुरुचाच प्रसाद आहे.’ असे मी मानले. आणि त्याच रात्री पुन्हा एकदा ‘कऱ्हेचे पाणी’ या संक्षिप्त आत्मचरित्राचे पान आणि पान वाचून काढले.

अत्रेसाहेबांची अनेक रूपे डोळ्यांसमोरून गेली. अत्रेसाहेब एक की दहा… अत्रेसाहेब एक विद्यापीठ की दहा विद्यापीठे…. असा प्रश्न पडेल, इतक्या प्रचंड कामगिरीचा हा लेखक, कवी, विडंबनकार, पत्रकार, वक्ता, नेता आणि एका दुष्ट राजवटीच्या विरुद्ध मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे अख्खे राज्य खेचून आणणारा एक योद्धा… त्यांच्यासोबत दहा वर्षे काम करायला मिळाले…. आणि आज त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे आमंत्रण आले.. मी  जो काही  आज बरा-वाईट आहे, त्याचे सगळे श्रेय अत्रेसाहेबांचे आहे. नाहीतर मला कोणी विचारले असते? अत्रेसाहेबांच्यासोबत दहा वर्षे नसतो तर लोकमतच्या बाबूजींनी मला संपादकाची संधी कशी दिली असती?…. आयुष्यात जे काही नांव मिळाले ते सगळे अत्रेसाहेबांमुळे… अशा या अत्रेसाहेबांच्या संक्षिप्त पुस्तकाचे वाचन करताना महाराष्ट्राने अत्रेसाहेबांना न्याय दिला नाही, ही पहिली गोष्ट मनात सतत टोचत राहिली. पूर्वीपासूनच माझे ते मत आहे की, खरोखर या आधुनिक महाराष्ट्रात एवढा प्रचंड पुरुष यापूर्वी झाला नाही, आणि पुढेही होणार नाही. अत्रेसाहेबांच्या समकालात आणि नंतर अनेक आत्मचरित्रे आली. यशवंतराव चव्हाण यांचे ‘कृष्णाकाठ’, एस. एम. जोशी यांचे ‘मी एस. एम.’, कॉम्रेड गोदावरी परुळेकर यांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो…’, मोहन धारिया यांचे ‘संघर्षमय सफर’, शरद पवार यांचे ‘लोक माझे सांगाती’, ग. प्र. प्रधान यांचे ‘माझी वाटचाल’, जी.डी. बापू लाड यांचे ‘एक संघर्ष यात्रा’, दत्ता देशमुख यांचे ‘मी दत्तूचा दत्ता झालो…’ अशी अनेक आत्मकथने किंवा आत्मचरित्रे यापूर्वी प्रसिद्ध झालेली आहेत। ती अत्यंत वाचनीय आहेत… पण, ती त्यांच्या त्यांच्या एक-दोन क्षेत्रापुरती मर्यादित आहेत. आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र कवेत मावणारे नाही. अनंत विषय, व्यक्ती, घटना जणू इतिहासाची पानेच आपण उलटतो आहोत… त्यामुळे ते चरित्र हातात घेतल्यानंतर संपेपर्यंत ते खाली ठेवता येणार नाही, इतकी अवीट गोडी त्यांच्या लेखनात आहे… ‘ते आपल्याशी बोलत आहेत’ असा एक भास या आत्मचरित्राचा होत असतो. त्यांच्या प्रस्तावनेमध्येच त्यांनी सांगून टाकले आहे की, ‘स्वत:चे महात्म्य जगाला सांगण्यासाठी मी आत्मचरित्र लिहिलेले नाही…’ एवढे प्रचंड आतमचरित्र मी कशाला लिहिले, असे जे विचारतील, त्यांना माझे सांगणे आहे की, या आत्मचरित्रात ‘मी’ महत्त्वाचा नाही. गेल्या ५०-६० वर्षांतील महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, राजकीय सामाजिक, साहित्यिक घटना घडल्या, ते सांगण्यासाठी मी हे लिहितो आहे.  मराठी समाजाचेच हे चरित्र आहे. माझे काम प्रेक्षकाचे आणि निवेदकाचे आहे.’ इतक्या नितळ निवेदनानंतर आचार्य अत्रे यांनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या अनेक पराक्रमांची प्रकरणे थक्क करून टाकणारी आहेत.’

शिक्षक म्हणून, त्यांनी कीर्ती मिळवली. पुण्यातील कँम्प एज्युकेशन सोसायटी ही बहुजन असलेल्या पालकांच्या मुलांसाठी शिक्षणाची माेठी संस्था…  अत्रेसाहेबांनी त्या संस्थेला दिगंत किर्ती मिळवून दिली. ज्या काळात ‘स्त्री मुक्ती’ हा शब्दही उच्चारला जात नव्हता, त्या काळात अत्रेसाहेबांच्या लेखणीतून उतरलेली ज्वलंत सामाजिक विषयावरील तीन नाटके अजरामर ठरली. ‘घराबाहेर’, ‘उद्याचा  संसार’, ‘जग काय म्हणेल’ या तीन नाटकातील निर्मला, करूणा आणि उल्का या बंडखोर स्त्रियांच्या प्रतिनिधी आहेत. ‘उद्याचा संसार’मध्ये बदफैली दारूड्या नवऱ्याचा धिक्कार करून, नायिका निर्मला  आपले मंगळसूत्र तोडते. हा प्रसंग टाळावा, असे बालगंधर्व यांनी आचार्य अत्रे यांना नाटकाची ‘तालिम’ पाहताना सुचवले होते. तेव्हा अत्रेसाहेब म्हणाले होते की, ‘अहो, हाच तर नाटकाचा परमोच्च बिंदू आहे. इथेच नाटक मनाला भिडते.’ आणि अत्रेसाहेबांनी तो प्रसंग कायम ठेवला.

नाटकाकडून चित्रपटाकडे वळलेल्या आचार्य अत्रे यांनी आजपर्यंत कोणालाही जमलेला नाही, असा महापराक्रम करून दाखवला. राष्ट्रपतींचे पहिले सुवर्णपदक  मिळवणारा ‘शामची आई’ चित्रपट. त्याच्या पुढच्या वर्षी ‘महात्मा फुले’ हा रौप्यपदक मिळवणारा चित्रपट असा लागोपाठ पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम ना बिमल रॅाय यांना करता आला.. ना सोहराब मोदी … ना बी. आर. चोप्रा, ना व्ही. शांताराम या प्रख्यात दिग्दर्शकांना करता आला. ते सगळे विक्रम अत्रेसाहेबांच्याच नावावर आहेत.

अभिजनांमध्ये वावरणारे अत्रेसाहेब… त्यांनी आपल्या साहित्यातून… लेखनातून.. नाटकातून… चित्रपटांतून महाराष्ट्रातील बहुजनांचा पुरस्कार केला. उपेक्षितांचा… दलितांचा… त्या काळातील साहित्यातील नेता म्हणून अत्रेसाहेबांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्या विचारात दांभिकता नव्हती. शिवाय बोलघेवडेपणा नव्हता. ७५ वर्षांपूर्वी त्यांनी अंतरजातीय विवाह केला… महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्या चित्रपटासाठी साक्षीदार ठेवले. जे जे भव्य आणि दिव्य, त्याचा त्याचा पुरस्कार केला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील ‘पत्री सरकारावर’  ‘नवयुग’ चा भलामोठा अंक काढून त्यांचा गौरव केला. बडोदा असो… मुंबई असो… नाशिक असो…  या साहित्य आणि नाट्य संमेलनात अध्यक्ष म्हणून भाषण करताना अभिजनांचा पुरस्कार न करता, बहुजनांच्या दु:खाला आपल्या भाषणातून त्यांनी वाचा फोडली. राष्ट्रहितासाठीच महाराष्ट्राने राजकारण केले आहे, याचा आग्रहाने पुरस्कार केला. जे पटले नाही त्यांच्यावर प्रहार करायला साहेब कधी कचरले नाहीत. महाराष्ट्राची निष्ठा त्यांनी कधी बदलली नाही. सुभाषचंद्र बोस यांचा गौरव करताना ‘जगात दोनच चंद्र आहेत… एक आकाशातील चंद्र आणि दुसरा सुभाषचंद्र’… या गौरवाने त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्यावर विशेषांक काढला. ‘मराठा’च्या शिवशक्ती इमारतीतील मुख्य सभागृहाला ‘सुभाष सभागृह’ असे नाव दिले.

पुण्याहून मुंबईत आल्यानंतर अत्रेसाहेब स्वातंत्र्याच्या चळवळीशी संबंधित होते. हे कितीजणांना माहिती आहे? त्या काळातील भूमिगत नेते आचार्य अत्रे यांच्या घरी राहत होते…. वेष बदलून राहात होते. अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, साने गुरुजी, यांच्या भूमिगत काळातील मुक्काम अत्रेसाहेबांच्या घरात होता. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी या महाराष्ट्रातील वारली, ठाकूर, आदिवासी अशा वंचितांचा लढा लढवणाऱ्या कॉम्रेड गोदावरी परुळेकर लढवत होत्या.. सावकार आणि जमिनदारांच्याविरुद्ध एक महिला या लढाईत उतरली होती. ठाणे जिल्हा त्यावेळी  या चळवळीने देशभर चर्चेत होता. १३ मार्च १९४७ रोजी म्हणजे, स्वातंत्र्याच्या आगोदर पाच महिने आचार्य अत्रे यांनी गोदावरी परुळेकर यांच्या या महान लढ्यावर ३२ पानांचा ‘नवयुग’चा विशेषांक काढला. ‘वारल्यांची गोदाराणी’ हे त्याचे शिर्षक होते. स्वत: आचार्य अत्रे त्यावेळच्या खड्ड्यांच्या रस्त्यातून आंदोलनाच्या गावात गेले. ­या अंकाचे एवढे कौतुक झाले की, वाचता न येणाऱ्या  वारली समाजाने अत्रेसाहेबांच्या सभेसाठी उन्हाला आडोसा म्हणून हेच अंक आपल्या डोक्यावर धरले हाेते.

अत्रेसाहेबांना किमान आठ खंडात आत्मचरित्र लिहायचे होते. पण त्यांचे अचानक निधन झाले. नंतर तीन खंडाचे काम मीनाताई देशपांडे यांनी केले. या छोट्या लेखात ते सगळे कसे मावणार… पण हे पराक्रम कसे होते… चित्रपटाच्या शुटींगसाठी स्टुडीओ भाड्याने घ्यायला गेलेले अत्रेसाहेब, खिशात ५० रुपये नसताना तो स्टुडीओ विकत घेवून बाहेर पडतात. १९३५ साली पुण्याहून मुंबईला येताना खंडाळ्यात थांबले आणि  खंडाळ्याच्या प्रेमात पडले. तिथे त्यांना कळले की, एक बंगला विकायचा आहे… त्याचा मालक जमनालाल गांधी हा पार्ले येथे राहात होता. खंडाळ्याहून अत्रेसाहेब थेट पार्ल्याला गेले.. त्या जमनालालला  शोधून काढले. १८,००० रुपयांत बंगला खरेदी करून टाकला. तोच हा राजमाची बंगला… तिथे हापूस आंब्याची  १५० झाडे लावली. १३ ऑगस्टच्या वाढदिवसाला सानेगुरुजी यांना तिथे बोलावले… तिथे एक जिवंत झरा मिळाला… त्यातून २४ तास पाण्याची सोय झाली… याच बंगल्यात साहित्य संमेलने सुरू झाली… २६ डिसेंबर १९४६ या दिवशी पहिले साहित्य संमेलन झाले. अनंत काणेकर, दत्तु बांदेकर, सोपानदेव चौधरी, प्रबोधनकार ठाकरे आणि १५-२० साहित्यिक… दोन दिवस संमेलन असे रंगले… समाजवादी पक्ष आणि शेतकरी कामगारी पक्ष यांचा प्रख्यांत ‘खंडाळा करार’ याच बंगल्यात झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ग्वाल्हेरच्या राणी विजयादेवी, अशोक मेहता, अच्युतराव पटवर्धन, क्रांतीसिंह नाना पाटील, शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाथ पै, एस. एम. जोशी हे मोठे नेते त्या बंगल्यात राहून गेलेले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दादर येथील हिंदू कॉलनीतील ‘राजगृह’ या घरी आचार्य अत्रे साहेब गेले ते वर्णन वाचताना तर अंगावर काटा येतो.. घरात पाऊल ठेवताच… डॉक्टर आंबेडकर यांना साहेब म्हणाले, ‘डॉक्टरसाहेब, हे तुमचं घर आहे की ग्रंथालय…’  ग्रंथांच्या प्रचंड राशी चोहीकडे ठेवलेल्या होत्या. बाबासाहेबांचे जेवत तिथेच… आणि तिथल्याच पलंगावर त्यांची विश्रांती… साहेबांनी लिहिले आहे… ‘या ग्रंथालयात ज्ञाानाची तपश्चर्या करीत बसलेला तो ब्रह्मऋषी पाहून मी चकीत झालो…’ आंबेडकर त्यावेळच्या मागास जातीत जन्मले… पण वृत्तीने, व्यासंगाने, विद्वत्तेने, अधिकाराने कोणत्याही पंडित ब्राह्मणापेक्षा हा पवित्र ब्राह्मण आहे… धर्मशास्त्र ते घटनाशास्त्र असे कठीण विषय ते सहज सोपे करतात.. अत्रेसाहेबांनी आंबेडकर यांच्यावर ‘नवयुग’चा प्रचंड अंक काढला… १५००० प्रती पहिल्या दिवशीच संपल्या… त्या अंकावरचे डॉ. आंबेडकरांचे चित्र अनेक घरांत फ्रेम करून आजही लावले गेलेले आहे.

१ मे १९४७ रोजी पंढरपूरचे मंदिर दलितांना खुले होण्यासाठी सानेगुरुजी यांच्या उपोषणावर अत्रेसाहेबांनी ‘नवयुग’चा विशेषांक काढला. त्याच रात्री साहेबांनी पंढरपूर येथे जाहीर सभा घेवून भाषण केले.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे तर आचार्य अत्रे यांचे सगळ्यात मोठे महायुद्ध होते. मुंबई महापालिकेत ते सदस्य होते. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, हा मुंबई महापालिकेतील पहिला प्रस्ताव आचार्य अत्रे यांनीच मांडलेला आहे. आणि १९५७ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यावर विधानसभेतील ठरावही अत्रेसाहेबांनीच मांडला.

‘मी कसा झालो..’ हे आचार्य अत्रे यांचे पहिले आत्मचरित्र. याचा प्रकाशन समारंभ ३१ ऑगस्ट  १९५३ रोजी मोठ्या थाटात झाला होता. त्यानंतर अत्रेसाहेबांनी साहित्याचे सगळे विषय बाजूला ठेवून सारे आयुष्य मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीला  वाहून टाकले.

७० दिवस त्यांना मुख्यमंत्री मोरारजींनी तुरुंगात डांबले. तुरुंगातूनही त्यांचे लेखन चालूच होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र  होईपर्यंत अत्रेसाहेबांनी ‘फक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी’ लेखणी उचलली.. आणि आपल्या वाणीची तोफ धडधडत ठेवली. संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर १९६२ पासून १९६९ पर्यंत आचार्य अत्रे यांचे ‘कऱ्हेचे पाणी’ हे आत्मचरित्र पाच खंडांमध्ये  प्रसिद्ध झाले. १३ जून १९६९ ला आचार्य अत्रे सगळ्यांना सोडून गेले… महाराष्ट्र पोरका झाला… ‘शिवशक्ती’मधील आम्ही सगळे, आपल्या पित्याच्या निधनाएवढे दु:खी झालो. पण, अत्रेसाहेबांच्याच प्रेरणेमुळे  संपादक  शिरीषताईंनी १५ जून १९६९ च्या ‘दैनिक मराठा’त मला लेख लिहायला सांगितला… आणि त्या दिवशी अत्रेसाहेबांवरील तो लेख आजही अनेकांनी संग्रही ठेवला आहे. त्या लेखाचे नाव होते…

‘साहेब गेले नाहीत… ते अमर आहेत…’

आचार्य अत्रे यांचा वारसा चालवणाऱ्या   श्रीमती शिरीष पै…

१९४० साली अत्रेसाहेबांनी ‘नवयुग’ साप्ताहिक सुरू केले. पा. वा. गाडगीळ, शांता शेळके सहसंपादक… आणि अत्रेकन्या श्रीमती शिरीष पै याच्याकडेही त्यांनी साहित्याच्या पानाची जबाबदारी सोपवली. पुढे ‘दैनिक मराठा’मध्ये रविवारची पुरवणी शिरीषताईंकडेच सोपवली. महाराष्ट्राचे आजचे ख्यातनाम लेखक विजय तेंडुलकर, शंकरराव खरात, बाबुराव बागुल, केशव मेश्राम अगदी नामदेव ढसाळ, अर्जुन डांगळेंपर्यंत या बहुजन लेखकांना ‘मराठा’च्या पुरवणीची पाने शिरीषताईंनीच उपलब्ध करून दिली. त्या स्वत: लेखिका आणि कवी होत्या. ‘हायकू’ या मराठी काव्य प्रकाराला त्यांनीच जन्माला घातले. अत्रेसाहेबांचा वारसा त्यांनी प्रभावीपणे चालवला. त्यांचे  सुपूत्र  अॅड. राजेंद्र पै, अॅड. विक्रम पै आणि भाचा हर्षवर्धन देशपांडे अत्रेसाहेबांच्या जयंतीचा भव्य कार्यक्रम दरवर्षी साजरा करून त्यांची स्मृती ‘अत्रेय’तर्फ जागवत आहेत.

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9892033458

Previous articleमहाराष्ट्राची तब्येत सध्या बिघडलीय…!
Next articleप्रिय प्रकाशभाई, महाराष्ट्राच्या आघाडीची कॉफी आणखी गोड करा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.