महाराष्ट्राची तब्येत सध्या बिघडलीय…!

कुठे ते राजेश टोपे, कुठे बाळासाहेब थोरात- आजचे आरोग्यमंत्री कुठे आहेत?

– मधुकर भावे

महाराष्ट्राची तब्येत सध्या बिघडलेली आहे. १२ ऑगस्ट २०२३ रोजी एकाच रात्रीत कळव्यातील शासकीय रुग्णालयात अचानक १८ जणांचा मृत्यू झाला. ठाणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचे गाव. मुख्यमंत्री रातोरात धावून गेले. ‘असं कसं झालं…’ चिंता व्यक्त झाली. डॉक्टरांची पळापळ झाली. मृतांच्या नातेवाईकांचा हंबरडा… त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला…. मुख्यमंत्री म्हणाले, ‘आठ दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल द्या…’ मुख्यमंत्र्यांचा आदेश… आठ दिवसांत चौकशीचा अहवाल आला. सर्वांना ‘क्लीनचीट’  दिल्याचे जाहीर करण्यात आले. जे अठराजण मृत्यू पावले त्यांच्याकडे ही ‘क्लीनचीटची’ प्रत पाठवण्यात आली. महिना जातो ना जातो तोच नांदेड शासकीय रुग्णालयात १२ बालके दगावली. पाठोपाठ संभाजीनगरच्या ‘घाटी’ रुग्णालयात हाहा:कार झाला. पाठोपाठ उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नागपूरमध्ये रुग्णालयातील मृतांची एकूण संख्या तीन दिवसांत ६३ झाल्याचे वृत्त बाहेर आले. हे ६३ मृत्यूही नागपूरच्या शासकीय रुग्णालयातच झाले आहेत. तिथेही मृतांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. पण, आपले मुख्यमंत्री दिल्लीला होते. त्यांनी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ करून सगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांना तंबी दिली की, ‘सखोल चौकशी करा…’ आता सखोल  चौकशी होईल. आणि अहवाल ताबडतोब येईल. ‘क्लीनचीट’ मिळेल. सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल. ‘महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या मानाने मृत्यूचे प्रमाण फारच अल्प असल्याचा’ अहवाल येवू शकेल. सध्या काही होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील लोक कोणताच विषय फार गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.

महाराष्ट्रातच कशाला…. एवढे ढोल बडवून देशात सुरू झालेल्या एकदिवसीय जागतिक स्पर्धेचा पहिला सामना मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी अहमदाबादला झाला. एक लाख तीस हजार क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर झाला. रिकाम्या स्टेडियमवर पहिला सामना खेळला गेला. आता  लोक कोणतीच गोष्ट फार गांभीर्याने घेत नाहीत. आजचे राजकारण असो… नाहीतर खेळ असो… सगळा खेळखंडोबा झाला असल्यामुळे कदाचित सामान्य माणसांची मानसिकताच निराशावादी झालेली आहे. इकडे महाराष्ट्रात… नांदेड, नागपूरात रुग्ण दगावत असल्याच्या बातम्या येत असताना आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा यांची तब्बेत बिघडल्याची बातमी आली. त्यामुळे महाराष्ट्रातील, दिल्लीतील भाजपा नेते सगळेच हवालदिल झाले. फडवीस यांच्याकडे फोनवर फोन येऊ लागले… ‘दादांना काय झाले…’ फडणवीस शांतपणे म्हणाले, ‘तसं विशेष नाही… दुपारी तब्येत  ठीक होईल…’ दुपारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. दादांना हवा असलेला पुणे जिल्हा मिळाला.  दादांची तब्बेत ठणठणीत झाली. शिवाय फडणवीस यांनी आणखी एक शक्तीवर्धक गोळी दिली… ‘दादा मुख्यमंत्री होतील ते पाच वर्षांकरिता…’ ही पाच वर्षे कधीपासून हे फडणवीस यांनी सांगितलेले नाही. पण, ई.डी.ची बला टाळण्यासाठी दादा जेव्हा भाजपाला मिळाले, तेव्हाच त्यांनी काही गोष्टी कबूल करून घेतल्या होत्या.

त्यात १) उपमुख्यमंत्रीपद २) अर्थमंत्रीपद ३) पुण्याचे पालकमंत्रीपद आणि शिंदे यांच्या विरोधातील आमदार अपात्रतेचा निर्णय झाला की, शिंदे साहेबांना पायउतार व्हावेच लागेल. मग लगेच दादा मुख्यमंत्रीपदी… हे सगळं ठरलं आहे. त्यानुसार होत आहे. आता तर खुद्द शरद पवार साहेबांनीच काल दिल्लीहून जाहीर करून टाकले की, ‘ई.डी. च्या भितीमुळे अजित पवार भाजपाच्या वळचणीला गेले….’ आता तर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता असे मानले जात आहे की, अध्यक्षांचा निर्णय लवकर येणार… निवडणुकीच्या अगोदर चार महिने येणार… आणि तो निर्णय शिंदे यांच्या विरोधात गेला की, दादांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होणार… अशा तऱ्हेने दादांची इच्छा सफल संपूर्ण होईल. दादा पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यात उसाच्या रसाचे बरेच चरक आहेत. रस काढण्यापूर्वी ऊसाची कांडी स्वच्छ धुवून ठेवली जातात. आद्रक, लिंबू घालून तयार ठेवले जाते. सोलून खायलाही ऊस चांगला लागतो. नंतर ते दांडकं तो रसवाला चरकात घालतो. छान रस बाहेर येतो पण ऊसाच्या दांडीचे चिपाड होते. संध्याकाळी ती चिपाडे पाेत्यात भरून कचऱ्यात फेकून दिली जातात. दादांना ही सगळी प्रक्रिया माहिती आहे. त्यामुळे ऊस खाताना गोड लागतो. रस पितानाही बरं वाटते पण, चिपाडाकडे बघवत नाही. भाजपाच्या जवळ जे जे जातील त्यांचा उपयोग करून घेतल्यानंतर त्यांची चिपाडं होणार आहेत. लोकसभा निवडणूका होईपर्यंत हवा तेवढा ऊस खा. पण, तिथपर्यंत ई.डी.च्या बदल्यात जे काही मान-सन्मान मिळतील, ते पदरात पाडून घ्यायला हरकत नाही.

इकडे दादा पालकमंत्री झाल्यावर तिकडे पुण्याचे जे पालकमंत्री होते त्या चंद्रकांत (दादा)  पाटील यांची तब्येत  बिघडेल, असा कयास होता. पण, ते चांगले दणकट… त्यांनीच जाहीर करून टाकले की, ‘मी पुण्याचा सहपालकमंत्री…’ त्यानंतर आता एक नवीन पद तयार झाले.. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात ‘सहपालकमंत्री’ हे नवीन पद जाहीर करावे लागणार. छगन भुजबळ यांनी ताबडतोब दादांना फोन केल्याची बातमी गावात पसरली. भुजबळांनी दादांचे अभिनंदन केले। ते म्हणाले अभिनंदन अशा करिता की, ‘माझी चिंता दूर झाली. मी पण आता नाशिकचा सहपालकमंत्री…’ इकडे दादा गटाच्या पक्षाचे नियुक्त अध्यक्ष सुनील तटकरे यांचा सगळा जीव लेकीत गुंतला आहे. आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांची लेक जिथपर्यंत रायगडची पालकमंत्री होत नाही आणि तिला ‘बंदरे’ हे खाते मिळत नाही, तिथपर्यंत तटकरे स्वस्थ बसणार नाहीत. पण, चंद्रकांत (दादा) यांच्या निर्णयामुळे तूर्तास तरी रायगडमध्येपण आमची नात आदिती आता ‘सहपालकमंत्री’ होऊ शकेल. मतभेद टोकाला गेले तर मुख्यमंत्री तातडीने जी. आर. काढतील आणि सहपालकमंत्रीपदाचा नव्याने वटहुकूम निघेल. जसे मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री तसे आता पालकमंत्र्यांनंतर सहपालकमंत्री… महाराष्ट्रात सध्या पदांची रेलचेल आहे. पण, मंत्रिमंडळ विस्तार अजून रखडला आहे. नवीन कोट शिवून तयार असलेल्या शिंदेे गटाच्या आमदारांचा नवीन कोट जुना व्हायची वेळ आली. विधानसभा अध्यक्षांचा िनर्णयही जवळ आला आणि तो निर्णय काय येणार… हे सगळ्यांना माहिती आहे.

  सुप्रीम कोर्टाने ‘सगळेच बेकायदेशीर’ म्हटलेच आहे. दादांना जवळ करण्याची खेळी त्याचसाठी तर भाजपाने खेळली होती! एकदा शिंदे गटाचे १७ आमदार अपात्र ठरले तर सरकार पडू नये म्हणून दादांना फोडले. दादाही ई. डी. ला घाबरले.. पंतप्रधानांच्या इशाऱ्यालाही घाबरले.  ‘सिंचन घोटाळा’ हा शब्द पंतप्रधानांच्या तोंडून बाहेर पडला रे पडला आणि रातोरात दादा बोहल्यावर चढले. आता मे महिन्यार्पंत तरी सगळे काही ठीक आहे. दादांना या बोलीवर उपमुख्यमंत्रीपद,  पालकमंत्रीपद आणि नंतरचे मुख्यमंत्रीपद कबूल याचसाठी करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी किमान ४० जागा जिंकून देण्याची जबाबदारी त्यांची आहे. आणि दादांनी तो विडा उचचला आहे. दादा जरी बारामती, दौंड आणि पुरंदर एवढ्याच भागात दबदबा राखून असले तरी ‘संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला जिंकून देतो,’ असे त्यांनी वचन दिले आहे. मोदी-शहा यांना महाराष्ट्रातल्या त्यांच्या पक्षाच्या नेतृत्त्वावर अजिबात विसंबून राहता येत नाही. फडणवीस तर बहुमत मिळवून द्यायला असमर्थ आहेत. म्हणून तर त्यांचे अवमूल्यन झाले. बावनकुळे हा विषय चर्चेत घेण्यासारखाही नाही. शिंदे यांना फोडण्याचे कारण तेच तर होते.

९६ कुळी मराठा असलेले चंद्रकांत (दादा) पाटील यांचा उपयोग होईल, असे वाटले होते. २०१४ ते २०१९ फडणवीस हे मुख्यमंत्री हाेेते. पण तोरा चंद्रकांत (दादा) यांचा होता. त्यांच्याकडे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून पाहिले जात होते. पण या माणसाला वकूब नाही, हे पक्षश्रेष्ठींना जाणवले.  पृथ्वीराजबाबा मुख्यमंत्री असताना हे चंद्रकांत विधानपरिषदेत आमदार होते. महराष्ट्राच्या कोणत्याही प्रश्नावर त्यांचा आवाज फुटल्याचे ऐकीवात नाही. ‘मराठा’ असल्याचा फायदा त्यांना काही दिवसच मिळाला. पण, त्याने भागत नाही म्हणून शिंदे गट फोडण्यात आला. अंधेरीची पोट निवडणूकही शिंदे गट लढवू शकला नाही. त्यामुळे ही फोडाफोडीही महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जिंकायला भाजपाला फारशी उपयोगी नाही. याची पूर्ण माहिती मोदी-शहा यांच्याकडे पोहोचली. अशा राजकीय माहितीचे संकलन करणारी एक तगडी यंत्रणा गृहखात्यात असते. सर्वच सरकारत ती असते. त्याला ‘एस. बी. १’ म्हणतात. आणि त्याचा उपायुक्त दर्जाचा अधिकारी असतो. या सगळ्यांचे मत असे होते की, महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळणे अवघड आहे, असे बाहेर उघड बोलले जात आहे. फडणवीस मुख्यमंत्री राहिले तर अजिबातच नाही. म्हणून ‘दादाप्रयोग’ झाला. ई. डी. ची भीती त्याचकरिता दाखवली गेली होती. पण, एवढे सगळे झाल्यावरही महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस, शिंदे, दादा सरकार आणू शकणार नाहीत, अशीच हवा आहे. पवारसाहेब ठामपणे पुन्हा उभे राहिले आहेत. त्यांच्या पक्षाचे चिन्ह जाईल किंवा राहील… त्यांना त्याची फारशी पर्वा नाही. चिन्हापेक्षा शरद पवार हेच नाव सर्वांना पुरून उरणार आहे.  लतादीदी म्हणाल्या होत्या, ‘मेरी आवाजही मेरी पहेचान है…’ शरद पवार हे व्यक्तीमत्त्व पाचवेळा निशाणी बदलूनही विजयी झाले आहेत. पवारसाहेब कशाला… उद्धवसाहेबांची शिवसेनासुद्धा मशाल चिन्ह मिळाल्यावर अंधेरी पोटनिवडणुकीत यशस्वी झालीच ना.. लोक आता तेवढे भोळसट राहिलेले नाहीत.

या पुरोगामी महाराष्ट्राचा जो तमाशा केला गेला आहे, त्याची महाराष्ट्रातल्या लोकांना मनस्वी चीड आहे. आणि ती चीड लोक उघडपणे व्यक्त करीत नाहीत.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हजारोंच्या सभा, मोर्चे, घोषणा, निषेध, लाठीमार… गोळीबार, या सगळ्यांमुळे चीड व्यक्त होत होती. त्यामुळे चित्र स्पष्ट होते. आता सामान्य माणसांचे मौन हे अधिक घातक आहे. कारण गेल्या काही वर्षांत जे झाले त्याचे दुष्परिणाम सगळ्यात जास्त सामान्य माणूस भोगत आहे. पापे कोणी केली आणि शिक्षा कोणाला मिळतेय, हे सामान्य माणसाला कळलेले आहे. त्यामुळे दादांनी ‘पैजेचा विडा’ उचलला तरी दादांची फसगत होईल. दादांचे चले-चपाटे यांची दमछाक होईल…

महाराष्ट्राचे प्रामुख्याने चार विभाग आहेत. यातील विदर्भात आज सगळ्यात जास्त यश काँग्रेस पक्षाला मिळेल. ‘जनसंवाद यात्रा’ विदर्भात गल्लीगल्लीत फिरली तेव्हा महिलांनी आरती करून, अक्षता टाकून या यात्रेचे स्वागत केले. पुढारी कोणीही नव्हते. सामान्य कार्यकर्त्यांचे हे अनुभव फार बोलके आहेत. लोक बोलले नाहीत तरी, त्यांच्या भावना बोलक्या आहेत. मुंबई शहर, पूर्ण कोकण, मराठवाड्यातील तीन जिल्हे तिथे उद्धव ठाकरे यांची शिवसेना क्रमांक १ वर राहील. पश्चिम महाराष्ट्र, अर्धा मराठवाडा आणि खान्देशमध्ये शरद पवारसाहेबांना मोठा पाठींबा मिळेल. हे उद्याचे चित्र काल्पनिक चित्र नाही. लोक आताच्या सरकारला पूर्ण वैतागलेले आहेत. उद्या शिंदे  यांच्या विरोधात निर्णय गेला आणि ते सरकार गेले की, शिंदेगटही जी काही थोडी शक्ती लावू शकला असता, तेही अलग होतील. एकट्या दादांच्या जिवावर फडवीस आणि त्यांचे ते कोणी बावनकुळे हे किती तकलादू आहेत, याचा महाराष्ट्राला प्रत्यय येईल.

सामान्य माणसांची खूप चेष्टा झाली. शासकीय रुग्णालयात औषधांअभावी माणसं मरत असताना ‘क्लीनचीट’ मिळते…. महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री कोण? त्याचे नाव मंत्रिमंडळातील सर्वांना माहितीतरी आहे का? आणि कुठे आहेत ते आरोग्यमंत्री? राज्यपालांनी त्यांना तडकाफडकी पदावरून दूर करायला हवे. जे मृत्यू पावले त्यांच्या नातेवाईकांचे शाप या सरकारला लागणार आहेत. कोरोनाचा ताे भीषण काळ आठवा… आपली माता मृत्यूशी झूंज घेत असताना आमचे त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वणवण करत प्रत्येक रुग्णालयात फिरत होते, व्यवस्था पहात होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटर, डॅाक्टरांची उपलब्धता, स्टाफच्या अडचणी, सॅनिटाईझ करून आंबुलन्सची  चोख व्यवस्था, त्या आरोग्यमंत्र्यांनी त्या काळात रात्र- रात्र जागून काढली, याची मला माहिती आहे. आईचा मृत्यू झाल्यावर, मृत्युचे दु:ख पचवून तिसऱ्या  दिवशी ते कामाला बाहेर पडले. याला कर्तव्यनिष्ठा म्हणतात.   महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी कोरोना संपल्यावर  राजेश टोपे यांचा सत्कार करून त्यांना ‘कोरोना योद्धा’ अशी सन्मानपत्रे दिली.  त्या काळात Tocilizumab हे अत्यंत महत्त्वाचे इंजेक्शन रुग्णाला वाचवू शकत होते. त्याचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्या इंजेक्शनचा कोठा गोठवला. आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली त्या इंजेक्शनचे नियंत्रण आणले. बाळासाहेबांनी तातडीने बैठका घेवून सगळा कोटा मुंबईच्या रॅायल केमिस्ट औषध दुकानात नियंत्रित केला. किती रुग्णांना या इंजेक्शनची गरज आहे, याचा तपशील मिळवला. मुख्य स्टॅाकिस्टकडून त्या त्या रुग्णालयात त्या-त्या रुग्णांना हे इंजेक्शन महसूल अधिकारी यांच्यामार्फत दिले  जाईल, याकरिता यंत्रणा उभी केली. रुग्णालयांत तशी यंत्रणा बसवली. अनेक रुग्णालयांनी त्याबद्दल या नियोजनाचे कैातुक केले. मी ठाण्याला राहतो त्या इमारतीच्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी व्हेंटीलेटरवर होते. ठाणे रुग्णालयाचे डॅाक्टर महेंद्र यांनी आरोग्य खात्याला तसे कळवल्यावर बाळासाहेब थोरात यांच्याकडून Tocilizumab हे  इंजेक्शन त्या रुग्णाला महसूल खात्याकडून दिले गेले. त्या रुग्णाचे प्राण वाचले. बाळासाहेब थोरात यांच्या या कर्तव्यदक्ष भूमिकेचे अनेकांनी अभिनंदन केले.

आजच्या आरोग्यमंत्र्यांचे नाव कुठे वाचण्यात तरी आले का? या आरोग्यमंत्र्याला कोणती सन्मानपत्रं द्यायची…. कसलं सरकार आणि कसले मंत्री… दादा त्याचे आता म्होरके…महाराष्ट्र इतका बेपर्वा कधीच नव्हता… संदर्भ आठवला म्हणून सांगतो, १९७३ साली माहीमच्या बेकरीतील पाव खावून पाच मुले दगावली… आणि ४० मुले अत्यवस्थ झाली… बेकरी सरकारी नव्हती पण, विधानसभेत दोन दिवस राडा झाला. त्यावेळचे आरोग्यमंत्री रफीक झकेरिया रडकुंडीला आले. त्या घडलेल्या घटनेशी आरोग्य खात्याचा थेट संबंध नसताता केमिकल अॅलायझरच्या अहवालावरुन विषबाधा सिद्ध झाल्यामुळे, सरकारला माफी मागावी लागली. शेवटी झकेरिया यांनी माफी मागितली आणि गंमतीचे वाक्य बोलले, त्यावेळी अन्न नागरि पुरवठा मंत्री भाऊसाहेब वर्तक होते. बेकरीला पुरवलेला गहू हा एका रेशन दुकानातील होता. त्या गव्हाच्या आट्यातून पाव बनवले होते. तो संदर्भ देवून डॉ. झकेरिया रडकुंडीला येवून म्हणाले…. ‘स्पीकरसाहब, ये वर्तकसाब का आटा और मै फालतू फस गया.’

त्यावेळची सरकारे संवेदनाशील होती. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची ११ वर्षे आठवा… महाराष्ट्राची खरी बांधणी त्याच ११ वर्षांत झाली. यशवंतरावांनी जो मार्ग दाखवला होता, त्याच मार्गावरून ही बांधणी होत होती. अशी सरकारे आता होणे नाही. अजितदादा जरी भाजपासोबत गेले असले तरी दादांच्यानेही आता महाराष्ट्र जिंकून देणे शक्य नाही. शिवाय आणखीन एक मुद्दा मुद्दाम सांगतो, दादा हा प्रशासनातील ‘दादा’च आहे. प्रशासनावर दादांची पकड आहे. त्यांना विषय समजतो. लोकांची कामं ते तडाखून करतात.. पक्षासाठी सकाळी ते ८ वाजता ते कार्यालयात यायचे. मेहनत घेण्यात कमी नाहीत. हे सगळं मान्य… पण, दादांनाच काही प्रश्न विचारतो… ‘दादा, सत्ता, मंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद, अर्थसंकल्प किंवा पुरवणी मागण्या, मंत्रालयातील कामकाज यातून तुम्हाला वजा केले तर महाराष्ट्रात तुम्ही नेमके कुठे आहात? कुठच्या सार्वजिनक जीवनात आहात? कुठच्या वैज्ञाानिक संमेलनात आहात..? कुठच्या साहित्य संमेलनात दिसला का? कोणत्या क्रीडांगणावर दिसला का? कोणत्या पुस्तकाचे प्रकाशन तुमच्या हस्ते झाले का? महाराष्ट्रातील दिग्गज लेखक, कवी, साहित्यिक, वैज्ञाानिक यांच्या मेळाव्यात तुम्हाला कधी पाहिले का? कुसुमाग्रज म्हणजे कोण हे तुम्हाला माहिती आहे का? राजकारण सोडले तर दादा, तुम्ही नेमके कुठे आहात…?

तुम्ही तुमच्या काकांना निवृत्त व्हायला सांगितले… पण, तुमच्या काकासाहेबांच्या पर्यंत पोहोचणे तुम्हाला शक्य होणार आहे का? त्यांचा आवाका किती चौफेर… पवारसाहेबांनी किती पुस्कांना प्रस्तावना लिहिल्या… किती पुस्तकांची प्रकाशने केली… किती संस्था हिंमतीने पवारसाहेब चालवत आहेत… तुम्ही त्यांच्या घरातीलच… तुम्हाला ते सगळं माहिती आहे… पण, त्या सगळ्या माहितीत तुम्ही नेमके कुठे आहात? पवारसाहेबांनी सत्तेत नसताना शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ४०० मैल शेतकरी दिंडी काढली. त्या दिंडीत कर्पुरी ठाकूर, जॅार्ज फर्नांडीस, देवीलाल, चंद्रजित यादव हे सामील झाले.  दिल्लीमध्ये देशव्यापी पातळीवर शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला त्याचे सभेत रूपांतर झाले तेव्हा चरणसिंग, कर्पुरी ठाकूर, प्रकाशसिंह बादल यांनी पवारसाहेबांना ‘अध्यक्ष’ म्हणून आमंत्रित केले. तुमचे लोक सांगतात… ‘पवारसाहेबांनी वसंतदादांचे सरकार पाडले…’ पण, पुढचं सांगत नाहीत.. १९८८साली वसंतदादांनीच पुढाकार घेवून ‘शरदलाच मुख्यमंत्री केले पाहिजे, तोच राज्य चालवू शकेल,’ हे सांगणारे दादाच होते. क्रिकेट संस्थांच्या अध्यक्षपदी आल्यावर फक्त पवारसाहेबांनीच निवृत्त खेळाडूंना मानधन दिले. विनोद कांबळीसारखे बाजूला पडलेले खेळाडू आज त्याच मानधनावर जगत आहेत.  तुम्ही खो-खो संघटनेचे अध्यक्ष होतात… त्या खेळाचा तुम्हाला राजकारणात उपयोग झाला, हे खरे… ‘खो’ देण्यात तुम्ही पटाईत आहात… पण, पवारसाहेबांच्या आवाक्याशी तुमची कुठेही तुलना होत नाही…. पक्षात फूट पडल्यावरचे भुजबळसाहेबांच्या कॉलेजमध्ये तुमचं पहिले भाषण झाले त्या भाषणात तुम्ही  म्हणालात, ‘त्यांनी’ (म्हणजे पवारसाहेब) सभा घेतल्या तर उत्तर देणाऱ्या सभा मी घेईन,’ दादा, कृपाकरून एवढी मोठी उडी घेवू नका… तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत नसाल त्या दिवशी तुम्ही कोण आहात?

पवारसाहेबांचे विशेष म्हणजे, शेतातल्या शेतकऱ्याच्या खांद्यावर हात टाकण्यापासून, त्याची दु:खे समजून घेण्यापर्यंत आहे. तो दिवस आठवा… ज्या दिवशी २०१९ ला लोकसभा निवडणूक झाली… रातोरात सगळ्या पक्षाचे नेते परदेशात रवाना झाले… आणि २७ मे २०१९ ला शरद पवारसाहेब सांगोला जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तळपत्या उन्हात शेतकऱ्याच्या शेतावर त्यांच्याशी चर्चा करायला गेले… हा फरक तुमच्यापैकी कोणीही भरून काढू शकणार नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, बराक ओबामा, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना , चीनचे तात्कालिन संरक्षणमंत्री क्लिन जेवई, जागतिक बँकेचे अध्यक्ष मॅकमारा असे मोठे लोक पवारसाहेबांची सत्ता गेल्यावर त्यांच्याशी संबंधित राहिलेले होते आणि आजही आहेत.

पेशवाईच्या काळात ‘काका मला वाचवा’ असे म्हणण्याची वेळ नारायणावर आली. पण तो काका त्यावेळी धावून गेला नाही… तुमच्यावर तशी वेळ येवू नये… तुमचं भलं होओ… ते कोणाकडूनही होओ… पण भाजपा हा उसाचा चरक आहे एवढे लक्षात ठेवा.  आणि तुमच्यावर तशी वेळ आली तर तुमचे हेच काका तुम्हाला आधार देण्याकरिता पुन्हा धावून येतील…कारण, राजकीय जीवनात विरोधी पक्षाशीही ते शत्रूत्त्व ठेवत नाहीत. तुम्ही तर त्यांचे पुतणे…  त्यांच्या मुलासारखेच आहात. पण, तुम्ही मात्र मुलासारखे वागला नाहीत. असंच इतिहासाला लिहावं लागेल.’

विंदा करंदीकरांच्या दोन ओळी सांगतो…

माणसाला शोभाणारे युद्ध

एकच आहे या जगी

आधी स्वत:ला जिंकणे…

(लेखक नामवंत पत्रकार व वक्ते आहेत)

9892033458

Previous articleशेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार – विजय जावंधिया
Next articleगावच्या नदीला दिगंत कीर्ती मिळवून देणारा महानायक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.