लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया
“जाता जात नाही ती जात”
बऱ्याच लोकांकडून हे वाक्य ऐकायला मिळतं. थोडक्यात त्यांना म्हणायचं असतं, ‘जात संपणार नाही’.
ह्या अशा वाक्यांना माझा विरोध आहेच. पण त्याआधी ‘विज्ञान’ काय म्हणतंय ते पाहू –
‘जाता जात नाही ती जात’, ह्यावर विज्ञानाचा आधार घेतला तर विज्ञानही फार काही वेगळं सांगत नाही.
पण त्यासाठी थोडं खोलात जाऊ –
RACE – वंश, कुळ, जात …. वगैरे.
– आपण जेव्हा मानवाची, त्याच्या शारीरिक स्वभावैशिष्ट्यांवरून, त्याच्या पूर्वजांवरून, त्याच्या संस्कृतीवरून, तो राहत असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीवरून विभाजन करतो तेव्हा त्याला ‘RACE’ म्हणतात.
जगातल्या मुख्य RACE कुठल्या ?
– Caucasian, Mongolian, Negroid and Australoid.
ह्यात परत शेकडो वर्गीकरण आहेतच.
चायनीज, भारतीय, युरोपियन, आफ्रिकन …. वगैरे लोकं त्यांच्या शारीरिक स्वभाव-वैशिष्ट्यांवरून ओळखता येतात. म्हणजे वर्ण, त्यांची उंची, चेहऱ्याची ठेवण वगैरे.
तुमच्या DNA वरून तुमचे पूर्वज ओळखता येतात, तसंच तुमचा वंशही सांगता येतो.
म्हणजे तुमची RACE तुम्हाला सांगता येते.
एक आश्चर्याची गोष्ट अशी की, भारतीय जात-व्यवस्थेचा परिणाम आपल्या जिन्सवर (GENES) देखील आढळला आहे. Genetic Science सांगतं, ४५०० हजार वर्षांपूर्वी आपण कोणत्याही जातीत लग्न करायचो, पण साधारण २००० वर्षांपूर्वी ही पद्धत बंद झाली आणि आपण आपल्याच जातीत लग्न करू लागलो. म्हणजे जातीचं वर्चस्व हे साधारण ३००० ते ३५०० वर्षांपूर्वी झालं असावं, असं Genetic Science सांगतं.
माझ्या Genes वरून माझी जात सांगता येईल का ?
हो आणि नाही ?
त्यासाठी प्रत्येक जातीतल्या आताच्या आणि आधीच्या बऱ्याच पिढ्यांचे GENES हवेत अभ्यासासाठी. त्यावरून कदाचित अमुक एखादा ‘अतिविशिष्ठ’ Gene आहे का ते पाहावं लागेल. असं काही असण्याची शक्यता आहे का ?
शक्यता “होती”…. यापुढे क्वचितच.
म्हणजे,
मी काय खातो, मी कुठे राहतो, मी कसं वागतो …. ह्या सगळ्यावरून हजारो वर्षांनंतर माझ्या ‘GENES’ मध्ये एक आमूलाग्र बदल होत असतो.
समजा १००० वर्ष माझे पूर्वज एका अमुक ठिकाणी राहिले असतील, त्यांनी विशिष्ट असं खाद्य ग्रहण केलं असेल, त्यांची एकच संस्कृती असेल तर कदाचित माझे GENES हे माझं वैशिष्ट्य सांगतील. म्हणजे मी कुठल्या GROUP चा आहे, जातीचा आहे हे सांगू शकतील.
आता हे शक्य नाही, कारण आपल्या जागा बदलल्या, राहणीमान बदललं, आपलं खाणं-पिणं सगळं बदललं. त्यामुळे ह्या पुढे आपले Genes कुठल्या एका स्टेशनवर थांबणार नाहीत.
ब्राह्मण, मराठा किंवा इतर जातीची वा इतर धर्माची स्वतःची एक स्वतंत्र संस्कृती होती, त्यांचं खाणं-पिणं-राहणं ह्यात वेगळेपण होतं. त्यामुळे त्यांच्या शरीरातील Genes मध्ये देखील स्वतःचा पूर्वजात चालत आलेला एक विशिष्टपणा होता.
ह्या प्रत्येक जाती-धर्मातलं खाणं-पिणं वेगळं आहे. त्याला परंपरेची जोड आहे.
बरं, हे Genes ह्यांनी एकमेकांना कसे काय दिले ? तर सेक्समुळे. म्हणजेच आपल्याच जातीत लग्न करून. तेच तेच Genes आपल्या पुढच्या पिढ्यांना देऊन त्या Genes ला एक वैशिष्ट्य प्राप्त झालं. पण तुमच्या मागच्या पिढीतल्या पंधराव्या आजोबांनी स्वतःच्याच जातीत लग्न केलं ह्याबद्दल तुम्हाला खात्री आहे का ?
महत्वाचं हे की, ह्या सगळ्या गोष्टींची आजच्या युगात गरज आहे का ?
तर ते वैयक्तिक आहे. कुणाला ‘जात’ कवटाळणं जर योग्य वाटत असेल, त्याला आनंद मिळणार असेल, त्याला सुरक्षित वाटणार असेल तर त्याने ते नक्की करावं. शेवटी मानसिक समाधानापुढे सगळं फोल आहे.
पण मग मलाही अशी लोकं आजूबाजूला बाळगल्याने समाधान मिळत नाही, हेही माझं स्वातंत्र्य स्वीकारायला हवं. शेवटी मी देखील माझ्या समाधानासाठीच गोष्टी करणार.
———-
बरं, आता मुद्द्यावर –
“जात नाही ती जात”, म्हणजे काय हे महत्वाचं नाही.
तू काय समजतोस हे महत्वाचं. तू तुझ्यासाठी जात संपवलीस का ? आणि संपवलीस म्हणजे काय केलं ?
बरं मी सांगतो मी काय केलं.
मी समोरच्याची जात विचारत नाही, माझी जात सांगत नाही. कोणाच्या जातीबद्दल पुळका नाही, Soft Corner नाही, राग द्वेष नाही. कोणी अमुक एका जातीचा असला म्हणून मी त्याला जास्त भाव देत नाही की कमी लेखत नाही. भाव देणं, कमी लेखणं हे त्याच्या विचारांपुरतं. मी ह्याला ‘जात’ सोडली असं म्हणतो. म्हणजे ‘माझी जात’ गेली असं मी समजतो. हे असं केल्याने ना मी श्रेष्ठ होतो, ना कनिष्ठ. पण ‘जात नाही ती जात’, ह्या वाक्याला असलेल्या माझ्या आक्षेपाबद्दल असलेलं हे स्पष्टीकरण.
जे लोक म्हणतात, ‘जाता जात नाही ती जात’, त्यांच्या मनातूनच ‘जात’ गेलेली नसते….. आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो.
——————
बरं आता सर्वात महत्त्वाचं –
आपण जातीत लग्न केल्यावर काही फायदा आहे का ?
तर विज्ञान सांगतं, काही फायदा नाही.
पण असं का ?
त्याआधी,
आपण आपल्या भाऊ-बहिणीशी लग्न करू शकत नाही, आपल्या नात्यातल्या कुणाशी शक्यतो लग्न करत नाही.
का ?
तर, आपल्या शरीरात ४६ Chromosomes असतात. आपल्याला आईकडून २३ Chromosomes (गुणसूत्र) मिळतात आणि वडीलांकडून २३ Chromosomes मिळतात. म्हणजे तुमच्याकडे गुणसूत्रांचे २ सेट्स असतात. २ सेट्स असण्याचा फायदा काय ? तर समजा आईकडचं गुणसूत्र जर खराब निघालं, तर कमीतकमी वडिलांच्या गुणसूत्रावर काम चालतं. आपल्या शरीरात असे Broken Chromosomes असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असतातच.
आता होतं काय, की हे बिघडलेलं गुणसूत्र आई-वडिलांकडून मुलांकडे जातं. आता समजा, ते बिघडलेलं गुणसूत्र जर माझ्यात आलं असेल आणि माझ्या बहिणीच्यात आलं असेल, तर आमच्या लग्नानंतर जे अपत्य जन्माला येईल त्याच्याकडे दोन्हीही ‘बिघडलेली गुणसूत्र’ असण्याची शक्यता वाढते. प्रत्येकवेळी असं होईलच असं नाही, पण शक्यता वाढते. मग ते अपत्यात ‘व्यंग’ निर्माण होतं. अपंग असेल, वेडसर असेल … किंवा अजून काही. बरेच आजार बळावतात.
हे झालं एकाच नात्यातल्या अपत्यांबद्दल.
आता एकाच जातीत जेव्हा आपण लग्न करतो, तेव्हा आपण जरी ‘वरचा’ भीतीदायक प्रकार टाळत असलो तरी आपल्या Genes ला त्याचा फायदा नसतो. कारण वर्षानुवर्षे आलेले तेच रटाळ Genes आपण पुढे ढकलत असतो.
———-
आता ‘पर जाती-धर्मात’ लग्न केल्याचा फायदा आहे का ?
विज्ञानाने हे सिद्ध केलंय की, ‘साम्य-नसलेल्या’ जातींत किंवा भिन्न परंपरा असलेल्या, वेगळेपण असलेल्या स्त्री-पुरुषांत जेव्हा सेक्स होतो, मुलं होतात तेव्हा Genes च्या वेगळेपणामुळे ती जन्माला येणारी मुलं ही जास्त हुशार, Active असतात आणि आई-वडिलांच्या भिन्न संस्कृतीमुळे त्यांना व्यापक दृष्टिकोन मिळतो.
थोडक्यात, ‘हायब्रीड मुलांकडे भिन्न Genes येऊन ती ‘स्मार्ट-किड’ होण्याची शक्यता जास्त असते.
आता येवढं सगळं असूनही आपण जर आपल्याच जातीत, आपल्याच धर्मात लग्न करण्याचा अट्टाहास करणार असू, तर आपण स्वतःला जाणून बुजून मागास ठेवतोय, असा अर्थ होतो. जे आई-वडील इंटरकास्ट लग्नाला विरोध करतात, त्यांना आपल्या मुलांपेक्षा स्वतःच्या हिताची काळजी असते. त्यांच्या अज्ञानामुळे आणि संकुचित स्वभावामुळे मुलांना मिळणाऱ्या ‘नैसर्गिक फायद्यावर’ ते बंधनं आणतात.
प्रश्न राहिला ‘जात’ जाण्याचा …. तर ती स्वतःच्या विचारांतून जोपर्यंत जात नाही, तोपर्यंत ते शक्य नाही. आणि तीच लोकं मग ‘जात नाही ती जात’, म्हणत फिरतात. त्यांना वाटतं, आपण फार खोलातलं काहीतरी बोललो आहे, परंतु अशा बोलण्यातून फक्त त्यांचा जातीबद्दलचा दृष्टिकोन बाहेर पडतो.
जो विज्ञान नाकारतो, तो प्रगती नाकारतो …
जो प्रगती नाकारतो, तो फुकाचा अभिमान बाळगतो …
जो फुकाचा अभिमान बाळगतो, तो स्वतः विनाशाकडे जातो आणि इतरांनाही विनाशाकडे घेऊन जातो. …
आपण कशात मोडतो, हे पाहायला हवं.
पुढे स्मार्ट जनरेशन हवंय की तेच परंपरागत चालत आलेली, जाती-धर्मावरून एकमेकांची टाळकी फोडणारी पिढी हवेय …. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहेच.
JAt nashta karane ka avashyak ahe yache apratim vishleshan