सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांच्या विविध चरित्रांत त्याकाळात मुंबई-पुण्यात मुलांमुलींसाठी पहिल्यांदाच शाळा सुरु करणाऱ्या अनेक ख्रिस्ती मिशनरींचा वारंवार उल्लेख होतो. या मिशनरींमध्ये जोतिबांना स्त्रीशिक्षणासाठी प्रेरणा देणाऱ्या आणि सावित्रीबाईंना अध्यापनाचे शिक्षण देणाऱ्या अमेरिकन मराठी मिशनच्या अहमदनगरच्या सिंथिया फरारबाईंचा तसेच पुण्यातल्या स्कॉटिश मिशनच्या नॉर्मल स्कुल चालवणाऱ्या मिचेलबाई यांचा समावेश असतो. त्याशिवाय जोतिबा फुले ज्यांच्या शाळेत इंग्रजी शिकले ते स्कॉटिश मिशनरी जॉन स्टीव्हन्सन, जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांचासुद्धा फुले दाम्पत्याच्या चरित्रांत आणि ब्रिटिश अमदानीतील स्त्रीशिक्षणविषयक पुस्तकांत हमखास उल्लेख असतोच. भारतात आणि पुण्यामुंबईत या मिशनरींनी एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीला आधुनिक शिक्षणपद्धतीचा पाया घातला.
अहमदनगर येथे मुलींच्या शाळा चालवणाऱ्या सिंथिया फरारबाई यांच्या व्यतिरिक्त जोतिबांवर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये पुण्यात स्कॉटिश मिशनच्या शाळा चालवणारे रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा उल्लेख करता येईल. स्कॉटिश मिशनरी जेम्स मिचेल आणि जॉन मरे मिचेल यांच्या शाळेत जोतिबांनी १८४१ ते १८४७ या काळात आपले माध्यमिक इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. सावित्रीबाई फुले यांनी अहमदनगर येथे सिंथिया फरारबाई यांच्याकडे आणि पुण्यात मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे घेतले असा उल्लेख हरी नरके आणि इतर संशोधक करतात, यापैकी `मिसेस मिचेल’ म्हणजेच रेव्हरंड जेम्स मिचेल यांच्या पत्नी मार्गारेट शॉ मिचेल.
“जेम्स मिचेल, मरे मिचेल, कॅन्डी, इज्देल या सर्वाशी जोतीरावांचा चांगला परिचय होता आणि त्यांचे विचार आणि कार्य यांची छाप जोतीरावांच्या मनावर पडल्याखेरीज राहिली नाही. आपल्या विचारांना परिपक्वता कसकशी येत गेली ते सांगताना त्यांनी “पुण्यातील स्कॉच मिशनचे व सरकारी इन्स्टिटयूशनचे ज्यांच्या योगाने मला थोडेबहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्यमात्राचे अधिकार कोणते हे समजले, ” अशा शब्दांत ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि सरकारी विद्यालयातील अध्यापक व अधिकारी यांचे ऋण प्रांजळपणे मान्य केले आहे’’ असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे.
हंटर शिक्षण आयोगासमोर दिलेल्या लेखी निवेदनात जोतिबा फुले म्हणतात की “ख्रिस्ती धर्मोपदेशकांनीं चालविलेल्या वसतिगृही शाळॆत मी काही वर्षे शिक्षकाचे काम केलेले आहे”.
“पुण्यातील मिशनरीनी त्यास (जोतिबांना) आपल्या ख्रिस्ती मुलीच्या शिक्षणाच्या कामावर पगार देऊन नेमले. येथे कामावर असता त्यांनी मिशनरी लोकांच्या सूचनेवरून ख्रिस्तीधर्माकडे विशेष लक्ष पुरविले’’ असे `ज्ञानोदय’ मासिकाच्या १८ डिसेंबर १८९० रोजी प्रसिद्ध झालेल्या महात्मा फुले यांच्या श्रद्धांजलीपर अग्रलेखात म्हटले आहे.
जॉन स्टीव्हन्सन हे स्कॉटिश मिशनरी सोसायटीचे धर्मगुरु म्हणून भारतात १८२३ साली आले. स्कॉटिश मिशनरींनी १८२७ साली मुंबईत आपले लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. जेम्स मिचेल आणि स्टीव्हन्सन यांनी १८२९ साली पुण्याचा दौरा केला आणि प्रवचने दिली. तेथे त्यांचे चांगले स्वागत झाल्याने स्टीव्हन्सन १८३० साली पुण्यातच स्थायिक झाले. संस्कृत आणि मराठीवर जॉन स्टीव्हन्सन यांचे कमालीचे प्रभुत्व होते, प्राच्यविद्यापंडित म्हणूनही त्यांची एक वेगळीच ओळख आहे. अशाप्रकारे पुण्यात स्कॉटिश मिशनचे शैक्षणिक आणि धार्मिक काम सुरु झाले. पुण्याला स्थायिक झाल्यानंतर जॉन स्टिव्हन्सन यांनी या शहरात १८३२ साली एक इंग्रजी शाळा सुरु केली होती. या शाळेचे कौतुक झाले. मात्र ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला मुंबईप्रमाणेच पुण्यातही इंग्रजी शाळा सुरु करायच्या होता. त्यामुळे स्टिव्हन्सन यांनी आपली शाळा १८३३ कंपनी सरकारकडे सुपूर्द केली. विशेष म्हणजे रेव्हरंड जॉन स्टीव्हन्सन यांनी सुरु केलेल्या आणि नंतर ईस्ट इंडिया सरकारकडे सुपूर्द केलेल्या या शाळेतच जोतिबा फुले आणि त्यांचे सहकारी सदाशिव बल्लाळ गोवंडे यांनी आपले शिक्षण घेतले होते.
“आपल्या विद्यार्थिदशेतच जोतीने (जोतिबा फुले ) सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्याशी अभंग अशी मैत्री जोडली. जोतीच्या ह्या गोवंडे मित्राचा जन्म १८२४ मध्ये पुण्यात झाला. तो ब्राह्मण कुटुंबातील होता. त्याने दृढनिश्चय आणि अखंड उद्योगशीलता या गुणवत्तेवर आपल्या पुढील आयुष्यात मोठीच प्रगती केली. तो स्कॉटिश मिशन शाळेत असताना जोतीचा स्नेही झाला. आणि पुढे बुधवारवाड्यातील सरकारी शाळेत ते दोघे शिकत असताना त्यांचा स्नेह दृढ होत गेला. ही शाळा स्टिव्हनसन नावाच्या गृहस्थाने सप्टेंबर १८३२ मध्ये काढली होती. ती पुढे त्याने सरकारच्या स्वाधीन केली’’ असे जोतिबा फुले यांचे चरित्रकार धनंजय कीर यांनी लिहिले आहे.
रेव्हरंड जेम्स मिचेल यांचा जन्म स्कॉटलंडमध्ये १८०० साली झाला. भारतात २३ जुलै १८२३ रोजी त्यांचे आगमन झाले. त्यानंतर अल्प कालावधीचे त्यांचे दोन मायदेशी दौरे वगळता तीन दशके त्यांनी पुण्यात आणि शेजारच्या परिसरात शिक्षणकार्य आणि शुभवर्तमानाचा प्रसार यासाठी स्वतःला झोकून दिले होते.
ईस्ट इंडिया सोसायटीचे चॅप्लेन किंवा धर्मगुरु म्हणून जॉन स्टीव्हन्सन त्यांची १८३४ साली नेमणूक झाल्याने स्कॉटिश मिशनच्या दख्खन मिशनस्थानाची धुरा जेम्स मिचेल यांच्याकडे आली. जेम्स मिचेल १८३४ पासून पुढील तीस वर्षे पुण्यात काम करत राहिले.
जेम्स मिचेल व जॉन स्टिव्हनसन या मिशनरींबद्दल गं. बा. सरदार यांनी पुढील शब्दांत लिहिले आहे:
“जेम्स मिचेल व जॉन स्टिव्हनसन हे स्कॉटिश मिशनचे दोघे उपदेशक धर्मप्रसारासाठी पुण्यास येऊन राहिले होते. हे काम करताना त्यांचा पावलोपावली कसा पाणउतारा केला जात असे, ते `पुणे वर्णन’कार ना. वि. जोशी यांनी नमूद करून ठेवले आहे: “मिचेलसाहेब उपदेशास बाहेर निघाले म्हणजे लोक त्यांचे फार हाल करीत. शिव्या देत, टोपी उडवीत, हुर्यो हुर्यो करीत, त्यांच्या पाठीस लागत, धोंडे मारीत, कोणी थापट्या मारीत, कोणी शेणमार करीत; तरी ते इतके सहनशील होते की, कोणास चकार शब्दही न बोलता उलट त्यांस चांगल्या गोष्टी सांगत. इतका कडवा विरोध होता तरीदेखील हे धर्मोपदेशक प्रतिज्ञापूर्वक स्वीकारलेल्या आपल्या मार्गापासून रेसभरही ढळले नाहीत. एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्याकडे अशी क्रियाशील श्रद्धा अगदीच दुर्मिळ होती. त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करणाऱ्या जोतीरावांसारख्या नवशिक्षित तरुणांना या उपदेशकांविषयी आदर वाटू लागला.’’
इ. स. १८३९ मध्ये मुंबईत दोन पारशी तरुणांनी ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली. त्या वेळी तेथे फार मोठी खळबळ उडाली; कोर्टकचेऱ्या झाल्या. या प्रक्षोभक घटनेचे पडसाद पुण्यातही उमटले. रे. जेम्स मिचेल यांचे विद्यालय विद्यार्थ्यांच्या अभावी ओस पडले होते असे गं. बा. सरदार यांनी लिहिले आहे. “इ. स. १८४६ मध्ये रे. जेम्स मिचेल यांनी पुण्यातील दोघा तरुण ब्राह्मणांस बाप्तिस्मा दिला. तेव्हा जोतीराव आणि त्यांचे मित्र यांच्या मनाची थोडी चलबिचल झाली. परंतु सामाजिक सुधारणेचे कार्य तडीस न्यायचे असेल, तर प्रत्यक्ष धर्मांतर न करण्यात शहाणपण आहे हा विचारच शेवटी प्रबळ ठरला.’’ असेही सरदार यांनी म्हटले आहे.
पुण्यात स्थायिक झालेल्या जेम्स मिचेल यांनी स्कॉटिश लेडीज असोसिएशन फॉर फिमेल एज्युकेशन इन इंडिया या संस्थेकडे स्त्रीशिक्षणासाठी मदत मागितली तेव्हा १८४० साली पुण्यात स्कॉटिश मिशनच्या मुलींच्या पाच शाळा होत्या आणि त्याशिवाय नऊ मुलींनी बाप्तिस्मासुद्धा घेतला होता. जेम्स मिचेल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लेडीज असोसिएशनने मिस मार्गारेट शॉ या तरुणीला १८४१ साली भारतात पाठवले. काही काळानंतर रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिस मार्गारेट शॉ यांचा विवाह झाला. आपल्याला ज्या कार्यासाठी स्कॉट्लंडहून भारतात पाठवले होते ते मिशनकार्य विवाहानंतरसुद्धा मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी पुढील वीस वर्षे चालूच ठेवले. मुंबईतल्या डे-स्कुल्सला त्या नियमितपणे भेट द्यायच्या. त्याशिवाय १८४३ साली त्यांनी मुलींसाठी अनाथाश्रम सुरु केला.
सावित्रीबाई फुले यांना आपल्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचे धडे देणाऱ्या, महात्मा फुले यांनी हंटर शिक्षण आयोगाला दिलेल्या निवेदनात, त्याचप्रमाणे फुले दाम्पत्यासंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या त्याकाळातल्या इंग्रजी वृत्तपत्रांत आणि इतर ऐतिहासिक कागदपत्रांत ज्यांचा केवळ `मिसेस मिचेल’ म्हणून उल्लेख होतो त्या जेम्स मिचेल यांच्या या पत्नी. महिलांसाठी अध्यापिका अभ्यासक्रम तयार करुन आणि प्रशिक्षणाच्या खास शाळा मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांनी सुरु केली. अशा प्रकारे मुलीच्या शाळांसाठी प्रशिक्षित शिक्षिका उपलब्ध होऊ लागल्या. प्रशिक्षित शिक्षिका निर्माण करण्यासाठी भारतात पहिली फिमेल टिचर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन करण्याचा मान मिसेस मार्गारेट शॉ मिचेल यांच्याकडे जातो. मार्गारेट शॉ मिचेल यांनी भारतातली महिलांसाठी पहिली अध्यापन प्रशिक्षण संस्था पुण्यात १८४०च्या सुमारास सुरु केली होती असे दिसते. सावित्रीबाई फुले या मिचेलबाईंच्या अध्यापन प्रशिक्षण संस्थेमधील काही पहिल्यावहिल्या विद्यार्थिनींमध्ये असतील.
जेम्स मिचेल यांना मदतनीस म्हणून पुण्यात नंतर आलेले दुसरे स्कॉटिश मिशनरी रेव्हरंड जॉन मरे मिचेल यांच्या पत्नी मारिया मॅकेन्झी मिचेल हीसुद्धा महत्त्वाची व्यक्तिमत्वे आहेत. मार्गारेट शॉ मिचेल आणि मारिया मॅकेन्झी मिचेल या दोघी समकालीन स्कॉटिश ख्रिस्ती मिशनरी केवळ `मिसेस मिचेल’ या नावानेच ओळखल्या जातात आणि या नामसाधर्म्यामुळे अनेकदा गोंधळ होतो.लग्नानंतर जोतिबांनी सावित्रीबाई आणि आपल्या जवळच्या नातलग सगुणाबाई क्षीरसागर यांना घरीच मराठीचे शिक्षण दिले. सावित्रीबाई आणि सगुणाबाई यांना मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कुलमध्ये अद्यापनाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवले.
“आम्ही पाहिलेले फुले” या हरी नरके संपादित आणि महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकात सत्यशोधक कार्यकर्ते शास्त्री नारो बाबाजी महाघट पाटील यांनी १८९१ साली लिहिलेले जोतिबांचे अल्पचरित्र समाविष्ट केले आहे. त्यात म्हटले आहे:
“जोतीराव १-१-१८४३ पासून बुधवारवाड्यातील शाळेत पुन्हा जाऊ लागला. त्याच वेळेपासून सगुणाबाईच्या आग्रहामुळे ते सगुणाबाईस व सावित्रीबाईस शिकवू लागले. पत्नीला व माईला मराठीचे सर्व शिक्षण दिल्यावर त्यांना मिसेस मिचेल यांच्या अत्याग्रहावरून शिक्षणिकीचा कोर्स देण्यासाठी त्यांनी ठरविले. हा कोर्स नार्मल स्कूलमध्ये मिचेलबाईच चालवीत होत्या. या बाईंनी सावित्रीदेवीची व सगुणाबाईची परीक्षा घेऊन त्यांना तिसऱ्या वर्षाचा प्रवेश दिला. त्यांचे तिसरे वर्ष (१८४५-१८४६) साली पास झाले. (१८४६-१८४७) साली ४ वर्षाची परीक्षा देऊन त्या स्कूलमधून बाहेर पडल्या. या दोघीही पुढे उत्तम ट्रेड मिस्ट्रेस म्हणून नावाजल्या. १८४७ साली महात्मा जोतीराव इंग्रजी शिक्षणाची शेवटची परीक्षा उत्तम तन्हेने पास झाले. त्यावेळी कॉलेज शिक्षण घेण्याची सोय पुण्यात नव्हती.’’
जोतीराव फुले यांनी १८४१-४७ या काळात मिशनरी शाळेतील माध्यमिक इंग्रजी शिक्षण घेतले. आणि १८५२ साली स्कॉटिश मिशनरींच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली असाही उल्लेख आढळतो. सावित्रीबाई फुले यांचे एक महत्त्वाचे चरित्रकार असलेले मा. गो. माळी यांनी लिहिले आहे : पुण्यातील सुप्रसिद्ध रहिवासी व युरोपियन एका सामाजिक प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र जमल्याचे पहिले उदाहरण म्हणून जोतीरावांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ वाटतो. श्रोतृसमुदाय व गंमत पाहणारे लोक यावेळी जितके जमले होते तितके पूर्वी कधीही जमले नव्हते. या समारंभाची माहिती अशी आहे :
“पूना कॉलेजच्या चौकात शनिवार ता. १२ फेब्रुवारी १८५२ रोजी एतद्देशीय मुलींच्या शाळांच्या परीक्षा झाल्या. समारंभाचा देखावा उत्साहाचा असून मनोरंजन करण्यासारखा होता. चौकामध्ये लोकांना बसण्यासाठी बिछाईत पसरली होती. खुर्च्या आणि कोचही ठेवण्यात आली होती. पुण्यातील मोठ्या हुद्दयावरील हिंदू व युरोपियन मंडळींनी सर्व जागा गच्च भरून गेली होती. चौकासभोवतालच्या गॅलरीत एका बाजूला निरनिराळया शाळांतील मुलीं व दुसन्या बाजूला पूना कॉलेजचे (आताचे डेक्कन कॉलेज) विद्यार्थी बसले होते. बाकीच्या खिडक्यांतून अनेक डोकी डोकावून पहात होती. चौकात जवळजवळ २००० माणसे होती. आणि विश्रामबाग वाडाभोवती हजारो लोक जमले होते. इतका मोठा जनसमूह मापूर्वी पुण्यात केव्हाही जमला नव्हता. युरोपिअन पाहुण्यामध्ये पुढील स्त्रीपुरुष उपस्थित होते. ब्रिगेडिअर ट्रायल, मिसेस ट्रायडेल, मिसेस कॉकबर्न, इ. सी. जोन्स (पुण्याचे कलेक्टर), मिसेस जोन्स… ”
माळी यांनी दिलेल्या युरोपियन पाहुण्यांच्या या यादीत अनेक स्त्रीपुरुषांची नावे आहेत, त्यामध्ये एक दाम्पत्य आहे, रेव्हरंड जे. मिचेल आणि मिसेस मिचेल. या महत्त्वाच्या कार्यक्रमास सावित्रीबाई फुले उपस्थित असणार हे साहजिकच आहे. फुले दाम्पत्याचे शिक्षक रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल होते. आपले विद्यार्थी असलेल्या जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणाबाबतच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी उपस्थित असलेल्या मिचेल दाम्पत्याच्या यावेळी काय भावना असतील याची आपण केवळ कल्पनाच करु शकतो.
जोतिबांबरोबर या कामात त्यांना साथ देणाऱ्या सावित्रीबाई यांचाही या कार्यक्रमात सत्कार व्हायला हवा होता, तो झाला की.नाही हे आता कळणार नाही. हंटर शिक्षण आयोगापुढे पुणे येथे १९ ऑकटोबर १८८२ रोजी सादर केलेल्या निवेदनात जोतिबा फुले यांनी पहिल्याच परिच्छेदात `हे शिक्षणकार्य आपल्या पत्नीच्या मदतीने केले’ असा सावित्रीबाईंना. त्यांचे श्रेय देताना, त्यांचे ऋण मान्य करताना जोतिबा स्पष्ट उल्लेख करतात.
जोतिबा या निवेदनाच्या पहिल्याच परिच्छेदात लिहितात: “सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनीं या पुण्यात स्त्रियांसाठी एक शाळा स्थापन केली होती. पण जिला स्वकीय म्हणता येईल अशी एकही मुलींची शाळा नव्हती. म्हणून तशी शाळा स्थापन करण्याची प्रेरणा मला सन १८५४ ( १८५३) च्या सुमारास झाली व मी आणि माझी पत्नी अशा उभयतांनीं कित्येक वर्षांपर्यंत त्या शाळेत काम केले’’याच निवेदनात जोतिबा फुले यांनी लिहिले आहे कि त्यांनी सुरु केलेल्या “मुलींच्या शाळांची व्यवस्था नंतर शिक्षण खात्याकडे मिसेस मिचेल यांच्या देखरेखीखाली सुपूर्द केली होती आणि मुलींच्या या शाळा अद्यापही चालू आहेत. ‘’
रेव्हरंड जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल यांनी जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्या जडणघडणीत अशाप्रकारे अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले आहे. जेम्स मिचेल यांचे माथेरान येथे २८ मार्च १८६६ रोजी वयाच्या ६६ वर्षी निधन झाले.