आला चॅट-जीपीटीचा ‘बाप’ : वेलकम गुगल जेमीनाय!

-शेखर पाटील

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात प्रचंड घडामोडी घडत असतांनाच अखेर गुगलने ‘जेमीनाय’ हे आपले टुल सादर करून या क्षेत्रात अव्वल स्थानी असलेल्या चॅट-जीपीटीला तगडे आव्हान उभे केले आहे. एकीकडे चॅट-जीपीटीला एक वर्ष होत असतांना गुगलने प्रचंड ताकदीनीशी जेमीनायला लॉंच करतांना या क्षेत्रातील जबरदस्त स्पर्धेत आगेकूच करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील काही दिवस हे ‘मैलाचा दगड’ म्हणून गणले जातात. अशाच प्रकारचा दिवस म्हणजे ३० नोव्हेंबर २०२२ होय. कारण याच दिवशी ‘ओपनएआय’ कंपनीच्या चॅट-जीपीटी या चॅटबॉटला जगभरात लॉंच करण्यात आले होते. यानंतर नेमके काय झाले याचा इतिहास आपण सर्वांनी गेल्या वर्षभरात अनुभवला आहे. खरं तर, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ऍपल, अमेझॉन आदी दिग्गज कंपन्यांना गाफील ठेवत ओपनएआयने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात घेतलेली आघाडी ही या कंपन्यांना अस्वस्थ करणारी ठरली. यथावकाश सर्व कंपन्यांनी एआयच्या क्षेत्रात उडी घेतली.

चॅट-जीपीटीची धमाल

खरं तर, चॅट-जीपीटीच्या आगमनाची सर्वात जास्त धडकी ही गुगलला भरल्याचे स्पष्टपणे दिसून आले. कारण चॅट-जीपीटी हे ‘एलएलएम’ अर्थात ‘लार्ज लँग्वेज मॉडेल’ या प्रकारातील सर्वाधिक  लोकप्रिय टुल ठरले. अगदी शाळकरी मुलांपासून ते सिलीकॉन व्हॅलीतल्या गुंतागुंतीचे कोडींग करणार्‍या तंत्रज्ञांसाठी ते उपयुक्त ठरले. तर अनेक क्षेत्रांमधील प्रोफेशनल्सच्या रोजगारावर यामुळे गदा येण्याचे संकेत देखील मिळाले. इंटरनेटवरील अजस्त्र माहितीचा वापर करून ओपनएआयने याला विकसित केले.

पहिल्यांदा जीपीटी ३.० तर नंतर ३.५ आणि ४.०, ‘जीपीटी ४ टर्बो’ आणि ‘जीपीटी-४ व्ही’  या आवृत्त्या युजर्ससाठी सादर करण्यात आल्या. आधी फक्त यावरून युजर टेक्स्ट प्रॉम्प्टचा ( आज्ञावली ) वापर करत होता. तर अलीकडच्या अपडेटमध्ये इमेजच्या स्वरूपातील कमांडही वापरता येऊ लागली आहे. दरम्यानच्या काळात ओपनएआय कंपनीन अनेक घडामोडी झाल्या. मध्यंतरी त्याचा संस्थापक सॅम अल्टमनची हकालपट्टी करण्यात आली आणि नंतर त्याला लागलीच परत बोलावण्यात आले. आता ही कंपनी लवकरच ‘जीपीटी ५.०’ सादर करणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.

गुगलचे ‘डीप माइंड’

एकीकडे या सर्व घडामोडी घडत असतांना गुगलने ओपनएआयशी टक्कर घेण्याची फुल प्रुफ योजना तयार केली. याच्या अंतर्गत गुगलच्या ‘डीप माईंड’ या सहकंपनीने बार्ड हा चॅटबॉट लॉंच केला असला तरी याला फारसे यश लाभले नाही. बार्ड हा काही बाबतीत सरस असला तरी चॅट-जीपीटीची लोकप्रियता त्याला भेदता आली नाही. यातच गुगलच्या वतीने बार्डचे नवीन अपडेट येईल असे मानले जात होते. तथापि, सप्टेंबर महिन्याच जेमीनाय या टुलला गुगल लॉंच करणार असल्याचे संकेत मिळाल्याने टेकविश्‍वाचे कुतुहल चाळवले. आणि यानंतर काल म्हणजेच ६ डिसेंबर रोजी जेमीनायला अधिकृतपणे लॉंच करण्यात आले.

तीन आवृत्यांमध्ये सादर

जेमीनाय हे देखील चॅट-जीपीटी प्रमाणेच ‘एलएलएम’ या प्रकारातील टुल आहे. याला जेमीनाय अल्ट्रा, प्रो आणि नॅनो या तीन आवृत्त्यांमध्ये सादर करण्यात आले आहे. यातील अल्ट्रा ही आवृत्ती डेटा आणि रिसर्च सेंटरसाठी असून यात अतिशय उच्च दर्जाचे टास्क पूर्ण करण्याची क्षमता आहे. हे फक्त डेव्हलपर्ससाठी एपीआयच्या माध्यमातून उपलब्ध असेल. ‘प्रो’ ही आवृत्ती गुगलच्या बार्ड या चॅट टुलमध्ये मर्ज करण्यात आली आहे. बार्डच्या माध्यमातून युजर याला वापरू शकतील. याच्या मदतीने कुणालाही प्रोफेशनल कामे सहजगत्या करता येतील. ‘नॅनो’ हे मॉडेल नावातच नमूद असल्यानुसार सर्वसाधारणे युजर्ससाठी सादर करण्यात आले असून ते स्मार्टफोनमधील विविध ॲप्लीकेशन्समध्ये ( उदा. जी बोर्ड, व्हाटपॲप, व्हॉईस रेकॉर्डर आदी ) वापरता येतील. तर पुढील महिन्यातच अल्ट्राला बार्डमध्ये जोडून याची ‘बार्ड ॲडव्हान्स्ड’ या नावाने आवृत्ती सादर करण्यात येईल. जेमीनायची ‘नॅनो’ आवृत्ती ही मोफत तर ‘प्रो’ ही काही प्रमाणात मोफत असेल. तसेच ‘अल्ट्रा’ ही प्रिमियम आवृत्ती असल्याने यासाठी आकारणी करण्यात येईल असे संकेत आहेत.

स्पर्धा चॅट-जीपीटीशीच !

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचे टुल्स अनेक वर्षांपासून वापरात असले तरी चॅट-जीपीटीच्या लोकप्रियतेमुळे सर्वसामान्यांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली. खरं तर याच्या आधीदेखील अनेक एआय टुल्स उपयोगात होती, आणि नंतर तर शेकडोंनी टुल्स लॉंच करण्यात आले. तथापि, चॅट-जीपीटीची सर कुणाला आली नाही. यामुळे गुगलने आता जेमीनायच्या माध्यमातून जीपीटीवरच निशाणा धरल्याची बाब स्पष्ट झाली आहे. एक तर गुगलकडे इंटरनेटवरील अजस्त्र डेटाबेस वर्गीकृत करण्यासाठीची प्रणाली आहे. यालाच एआयची जोड देऊन जेमीनायला मैदानात उतरवण्यात आल्याने आता या क्षेत्रातील स्पर्धा ही अतिशय रंगतदार होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

जीपीटी -४ पेक्षा शक्तीशाली !

जेमीनाय अल्ट्रा हे मॉडेल अतिशय शक्तीशाली असून ते ‘जीपीटी-४’ पेक्षा अधिक उपयुक्त असल्याचे गुगलने दाखवून दिले आहे. ३२ मानकांनुसार जीपीटी-४ आणि जेमीनाय अल्ट्रा यांच्यात स्पर्धा झाली असता यातील तीस मानकांमध्ये जेमीनायने बाजी मारली. यामुळे अर्थातच, जीपीटीपेक्षा जेमीनाय अधिक सरस असल्याचा दावा गुगलने केला असून बहुतांश तंत्रज्ञांनी त्याला दुजोरा देखील दिला आहे. अर्थात ही जेमीनायची पहिलीच आवृत्ती असून भविष्यात ते अजून गतीमान बनणार यात शंकाच नाही.  यामुळे पहिल्याच फटक्यात ‘जीपीटी-४’ पेक्षा शक्तीशाली व गतीमान टुल सादर करून गुगलने या स्पर्धेत आघाडी घेतल्याचे मानले जात आहे.

गुगलला होणार फायदा

गुगल विरूध्द ओपनएआय यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईत गुगलला अनेक आघाड्यांवर फायदा होणार आहे. एक तर त्यांच्याकडे गुगल सर्चपासून ते जीमेल, युट्युब आदींसह अब्जावधी युजर्स असणारे अनेक टुल्स आहेत. एका अर्थाने जेमीनायला ही परिपूर्ण ‘इको-सिस्टीम’ आयती मिळाली असल्याने त्यांना या स्पर्धेत आघाडी मिळणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘जीपीटी’ हे फक्त शब्द आणि प्रतिमा यांच्या कमांड स्वीकारत असले तरी जेमीनाय हे टेक्स्ट (शब्द), इमेज ( प्रतिमा), ऑडिओ ( ध्वनी ); व्हिडीओ ( चलचित्र ) आणि कोडींग या पाच प्रकारांमध्ये प्रॉम्प्ट स्वीकारण्यास सक्षम असल्याने अर्थातच युजर त्याच्या मदतीने आपल्याला हवे असणारे टास्क हे सहजसोप्या आणि गतीमान पध्दतीत पूर्ण करू शकेल. यामुळे हे टुल युजर फ्रेंडली ठरणारे असून याचा साहजीकच गुगलला लाभ होणार असल्याचे समजले जात आहे.

स्पर्धा होणार तीव्र

चॅट-जीपीटी आणि जेमीनाय यांच्यातील लढाईत नेमके कोण बाजी मारणार हे आजच सांगता येणार नाही. तथापि, गुगलने परिपूर्ण पध्दतीत तगडी तयारी करून जेमीनायला मैदानात उतारल्याची बाब लक्षणीय आहे. या टुलच्या आगमनामुळे ‘एलएलएम’ या प्रकारातील एआय टुल्सच्या क्षेत्रातील स्पर्धा ही अजून अतिशय रंगतदार होणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे याचा युजर्सला लाभ होणार आहे. चॅट जीपीटीमुळे अनेक क्षेत्रांमधील ऑटोमेशनला गती मिळाली आहे. जेमीनायमुळे याला अजून पंख लागतील ही अपेक्षा. अर्थात, जीपीटीमुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली असून जेमीनाय किती जणांचा रोजगार हिसकावणार ? हा मुद्दा देखील नक्कीच चिंताजनक असा असेल. याचे उत्तर येणारा काळच देणार आहे. तूर्तास, आपण सर्वांनी जेमीनायचे खुल्या दिलाने स्वागत केले पाहिजे.

पहा : गुगलच्या जेमीनायची प्राथमिक माहिती देणारा व्हिडीओ !

https://www.youtube.com/watch?v=jV1vkHv4zq8

………………………………………………………….

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)

9226217770

[email protected]