(साभार:लोकसत्ता)
भावनांचे जाहीर प्रदर्शन टाळून संयतपणे वागावे, हा सल्ला खरे तर अलीकडच्या राजकारणातील अनेकांना सरसकटच देण्याची गरज आहे..
प्रत्येक क्षेत्रात नवीन पिढी नवीन वारे घेऊन येत असते. त्यामुळे ते क्षेत्र तरुण दिसू लागते. पण तरीही कोणतेही क्षेत्र कितीही तरुण झाले तरी काही मूलभूत मुद्दे बदलत नाहीत. हे सर्व क्षेत्रांस लागू आहे. तेव्हा शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांची कन्या सुप्रिया, नातू रोहित आदींच्या राजकारणाची शैली असणार नाही, हे अभिप्रेतच आहे. पण म्हणून वडिलांच्या राजकारणातील गांभीर्य कन्येने घेऊ नये असे नाही. महाराष्ट्रातील एका वर्गास शरद पवार यांच्या नावाने नाके मुरडणे आणि बोटे मोडणे नेहमी आवडते. त्यांचा तो मताधिकार मान्य करूनही पवार यांच्या राजकीय वाटचालीत घेण्यासारखे बरेच काही आहे, याचा विसर पडणे शहाणपणाचे नाही. मते मिळतात म्हणून कोणा टिनपाट बाबा वा बापूसमोर नतमस्तक न होण्याइतका विवेक, गंडेदोऱ्यास नाही म्हणण्याइतके शहाणपण, बुद्धिवाद आणि मुख्य म्हणजे भावनेचे कधीही जाहीर प्रदर्शन न करणे ही पवार यांच्या राजकारणाची वैशिष्टय़े. यातील पहिली तीन त्यांच्या पुढच्या पिढीत किती उतरली याच्या मूल्यमापनाची तूर्त गरज नाही. पण यातील शेवटच्या गुणाची वानवा त्यांच्या कन्येच्या ठायी मोठय़ा प्रमाणावर दिसते असे मानण्यास जागा आहे.
सुप्रिया यांचे बंधुप्रेम हा त्यांचा पूर्ण वैयक्तिक मामला. चार भिंतींच्या आत त्यांनी आपल्या जिवलग बंधूस काही मणांची राखी बांधली तरी अथवा या भावाने संपूर्ण जग जरी भाऊबीजेच्या तबकात ओवाळणी म्हणून घातले तरी आमच्या तसेच समस्त महाराष्ट्राच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. पण हे बंधुभगिनी प्रेम चारचौघांत आणि त्यातही महाराष्ट्रातील सत्तानाटय़ात हस्तक्षेप करत असेल तर मात्रेचे चार वळसे देणे आवश्यक ठरते. अजित पवार माघारी परतल्यानंतर एक बहीण म्हणून सुप्रियांस झालेला आनंद आम्ही समजू शकतो. त्या भावनेविषयी आम्हालाही आदरच आहे. पण त्याच्या इतक्या प्रदर्शनाची गरज होती का, हा प्रश्न आहे. बरे, सुप्रियांचा हा भाऊ काही माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे शुभ वर्तमान घेऊन परत येत नव्हता. तेव्हा त्याचे असे आणि इतके जाहीर कवतिक करण्यासारखे काय? सर्वोच्च न्यायालयाच्या रट्टय़ामुळे या सुप्रियाबंधूंवर मान खाली घालून परत येण्याची वेळ आली. सर्वोच्च न्यायालयाने यांना सरळ केले नसते तर हे वीर भाजपच्या पंगतीत फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून उपमुख्यमंत्री पद ओरपताना दिसले असते. बरे काही एक उपरती होऊन ते परत आले असते तरी हा सार्वजनिक बंधुप्रेमोत्सव काही प्रमाणात रास्त ठरला असता. वास्तव तसे नाही. मग या परत येण्याचे इतके कसले कवतिक? आणि हे असे डोक्यात राख घालून निघून जाणे हेदेखील बंधू अजितसाठी नवीन नाही. आतापर्यंत किमान तीन वेळा तरी हे अजित निघून गेले आहेत आणि तितक्याच त्वेषाने परतही आले आहेत. अर्थात या तिनांच्या तुलनेत या वेळचे त्यांचे जाणे जरा जास्तच जिव्हारी लागणारे होते आणि त्यामुळे त्यांचे परत येणे पक्षासाठी आणि मुख्य म्हणजे बहीण म्हणून सुप्रियांसाठी जास्त स्वागतार्ह होते हे कबूल. पण त्याचे असे प्रदर्शन कदापिही समर्थनीय ठरणारे नाही.
याचे कारण प्रश्न या दोघांच्या नात्याचा नाही. तर तो काही एक विचारधारा मानणाऱ्या एका राजकीय पक्षाचा आहे. याचा कोणताही विचार न करता अजित पवार यांनी पक्षत्याग केला. त्यांच्या परतण्याचे इतके जंगी स्वागत होणार असेल तर अजितदादांचा पक्षत्यागच बनावट होता, असे कोणी म्हणाल्यास ते कसे नाकारणार? नाही तरी एक वर्ग या पक्षांतरनाटय़ात ‘पवारांचा हात’ कसा होता हे ‘सूत्रां’च्या हवाल्याने छातीठोकपणे सांगतोच. ते परत आल्यानंतर सुप्रियांच्या ‘ओवाळिते मी लाडक्या भाऊराया’छाप स्वागताने या संशयास पुष्टी मिळण्याचीच शक्यता अधिक. या कृत्याने गावोगावच्या नानानानी उद्यानात ‘‘मी नव्हतो का सांगत तुम्हास’’ अशा सानुनासिक स्वरांत एकमेकांस टाळ्या देऊन आपल्या वडिलांच्या राजकारणाबाबतच संशय व्यक्त केला जाईल याविषयी सुप्रियांचे भान सुटले असे म्हणावे लागेल. खेरीज यातून नेमका कोणता संदेश त्यांच्या पक्षास जातो? एकदा नव्हे दोनतीनदा पक्षाला धक्का देणारे वर्तन केले तरी चालेल. नंतर माघारी या, आम्ही तुमचे स्वागतच करू, असे सुप्रियांना पक्षबांधवांना सांगावयाचे आहे काय? असे अर्थातच त्यांना अभिप्रेत असणार नाही. पण मग पवार कुटुंबीयांसाठी पक्षात वेगळे नियम आहेत काय? या कुटुंबाच्या सदस्याने काहीही केले तरी चालेल, त्यास सर्व काही माफ असा त्याचा अर्थ. सुप्रियांच्या कृतीतून तो दिसतो. सुप्रियांच्या बंधुप्रेमाविषयी संशय घेण्याचे कारण नाही. पण त्याच प्रेमास पणाला लावून त्यांनी असे माथेफिरू वर्तन करणाऱ्या भावाशी खरे तर ‘कट्टी’ घ्यायला हवी होती. त्यामुळे मग ‘बट्टी’साठी मिनतवाऱ्या करणाऱ्या अजितदादांकडून ‘‘यापुढे तरी शहाण्यासारखा वागेन’’ असे वचन त्यांना घेता आले असते. ती संधी गेलीच म्हणायची. अर्थात दादांचा स्वभाव लक्षात घेता ते परत असे गायब होणारच नाहीत असे नाही. पण त्या वेळी तरी परत आल्यावर सुप्रियांनी आपल्या बंधुप्रेमाच्या अभिव्यक्तीत संयतता दाखवावी.
पण हा सल्ला खरे तर अलीकडच्या राजकारणातील पुढच्या पिढीस सरसकटच देण्याची गरज आहे. निवडणुकीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील सार्वजनिक वर्तन हे असेच बंधुप्रेमाचे अगोचर प्रदर्शन करणारे होते. महाविद्यालयीन मित्रांनी एकमेकांच्या कानात आपापली गुपिते सांगावीत आणि आपण जगास कसे फसविले या आनंदात उभयतांनी मशगूल व्हावे असे ते व्यासपीठावर वागत. त्याची खरे तर काहीही गरज नव्हती. विशेषत: यातील एक देशातील सर्वात बलाढय़ अशा राज्याचा मुख्यमंत्री आणि दुसरा एक पक्षप्रमुख हे वास्तव लक्षात घेता बंधुप्रेमाचा हा असा सार्वजनिक आविष्कार कसा दिसेल याचा विचार व्हायला हवा होता. आणि इतके करून या दोघांत वाजायचे ते वाजलेच. म्हणजे मग ते बंधुप्रेम कोठे आणि का गेले हा प्रश्न उरतो. ते असे इतके इकडेतिकडे जाण्याच्या लायकीचे होते तर मग त्याच्या प्रदर्शनाची गरजच काय?
तिकडे दिल्लीत प्रियंका आणि राहुल गांधी हेदेखील असेच बहीणभावाच्या प्रेमाचे दर्शन घडवीत असतात. आपला भाऊ किती पुरुषोत्तम आहे हे सांगण्याचा प्रियंका यांचा प्रयत्न असतो. राहुल तसे असतीलही. ज्याप्रमाणे प्रत्येक भारतीय महिलेसाठी आपला पोटचा गोळा सद्गुणी असतो त्याप्रमाणे प्रत्येक महिलेस आपला भाऊदेखील आदर्श पुरुष असतो. पण म्हणून अन्य जगासाठी तो तसा असेलच असे नाही. आणि राहुल हे प्रियंकांसाठी बंधू आहेत. त्या राहुल गांधींकडे ममत्वाच्या नजरेने पाहणार हे नैसर्गिक.
पण अन्यांस ते पुरेसा गृहपाठ न करणारा राजकीय नेते आहेत, असे वाटत असेल तर ते कसे नाकारणार? ज्याप्रमाणे राहुल यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही कमतरता प्रियंकांच्या बंधुप्रेमाच्या आड येऊ नये त्याचप्रमाणे अन्य जनतेच्या राहुल गांधी यांच्या मूल्यमापनात ‘‘पण तो भाऊ म्हणून किती चांगला आहे,’’ हा मुद्दादेखील येऊ नये. याचा अर्थ इतकाच की सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्यांनी आपापली नाती घरातच ठेवावीत आणि काही एक पाचपोच दाखवावा. एरवी राजकारणाचा पोरखेळ सुरू आहेच. त्यात या नात्यांची भर नको.
(साभार:लोकसत्ता)