अनंत अशा विश्वात भव्यता या शब्दाला तोड नाही. एकापेक्षा एक भव्य गोष्टी विश्वात पहायला मिळतात. आपल्या सूर्याचेच उदाहरण घ्या ना. सूर्याच्या आकारासमोर आपली पृथ्वी ठिपक्याएवढी वाटेल एवढा सूर्य मोठा आहे. पण हा सूर्य एका ठिपक्याएवढा वाटेल असे मोठ्ठाले सूर्यासारखे तारे आपल्या आकाशगंगेत आहेत. असे काही तारे हे आपल्या आकाशगंगेच्या बाहेर पण जवळ असलेल्या तारकासमुहात आढळले आहेत, तर काही तारे सर्वात जवळची दिर्घिका असलेल्या एंड्रोमेडा दिर्घिकेत – Andromeda galaxy आढळले आहेत.
आपली दिर्घिका जी आकाशगंगा या नावाने ओळखली जाते, या आकाशंगंगेचा व्यास हा सुमारे एक लाख ७० हजार ते २ लाख प्रकाशवर्ष एवढा आहे. खगोल अभ्यासकांचा – शास्त्रज्ञांना असा अंदाज आहे की आपल्या आकाशगंगेत १०० ते ४०० अब्ज तारे असावेत. थोडक्यात आपली आकाशगंगा असंख्य अशा ताऱ्यांनी खचाखच भरली आहे. यापैकी एका अंदाजानुसार जेमतेम ५ लाख तारे हे आपल्याला माहिती झाले आहेत.
ताऱ्यांचे काही प्रकार आहेत. विद्युत चुंबकीय वर्णपटनुसार ताऱ्यांचे ढोबळपणे सात प्रकारात O, B, A,F, G, K, M अशी विभागणी करण्यात आली आहे. ( आपला सूर्य हा G या प्रकारात मोडतो ) ताऱ्याच्या पृष्ठभागावरील तापमानानुसार हे वर्गीकरण करण्यात आलं आहे. अर्थात जेवढा ताऱ्याचे तापमान जास्त तेवढा तारा मोठा किंवा लहान अशीही परिस्थिती नाहीये. ताऱ्याचे वस्तुमानही ही ताऱ्याची एक स्वतंत्र ओळख आहे. ताऱ्याच्या वस्तुमानानुसार ताऱ्याचे आणखी काही वेगळे प्रकार करता येतात. कारण वस्तुमान जास्त असलेल्या ताऱ्याचे प्रभावक्षेत्र हे मोठे असते. ताऱ्यांची प्रखरता हाही एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. Red Giants, Super Giants अशाही व्याख्या या ताऱ्यांच्या अभ्यासादरम्यान वाचायला मिळतील.
थोडक्यात ताऱ्यांचे वर्गीकरण हा एक स्वतंत्र आणि किचकट विषय आहे. तेव्हा एवढ्या खोलात न जाता आपण आकारमानानुसार काही माहीत असलेल्या ताऱ्यांची तुलना आपल्या सूर्याशी – आपल्या ताऱ्याशी करुया…..
आपल्या सूर्याचा व्यास हा सुमारे 13 लाख 92 हजार 700 किलोमीटर एवढा आहे.
सूर्य वगळता आकाशातील सध्याचा सर्वात तेजस्वी तारा म्हणजे व्याध – Sirius तारा. ( द्वैती तारे – binary stars ) हा तारा आपल्यापासून सुमारे ८.६ प्रकाशवर्षे दूर असून आपल्या सुर्यापेक्षा दुप्पट आकाराचा असून २५ पट तेजस्वी आहे.
आपल्या सूर्याला – सूर्यमालेला सर्वात जवळचा तरा म्हणजे प्राक्झिमा सेंचूरी. हा सुमारे ४.२२ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सूर्यापेक्षा सुमारे ७ पट आकाराने लहान आहे.
आपल्या सर्वांना दिशा दाखवणारा प्रसिद्ध ध्रुव तारा – Polaris Star हा आपल्यापासून सुमारे ४३३ प्रकाशवर्षे अंतरावर असून हा सूर्यापेक्षा ५० पट मोठा आहे आणि तब्बल ४००० पट तेजस्वी आहे.
खगोलप्रेमींमध्ये – अभ्यासकांमध्ये सर्वात जास्त अभ्यास- निरिक्षण झालेल्या ताऱ्यांपैकी एक म्हणजे अभिजीत तारा – Vega Star. उत्तर गोलार्धातून सहजरित्या दिसणारा हा तारा आपल्यापासून २५ प्रकाशवर्षे अंतरावर असून आपल्या सूर्यापेक्षा तिप्पट मोठा आणि ६० पट तेजस्वी आहे.
रोहिणी तारा – Aldebaran star. आकाशातील आणखी एक तेजस्वी तारा. आपल्यापासून ६५ प्रकाशवर्षे अंतरावर असून ४४ पट मोठा असून सुर्यापेक्षा कितीतरी तेजस्वी आहे.
ज्येष्ठा तारा.( द्वैती तारे – binary stars ) – Antares star. हा तारा आपल्या सूर्या पेक्षा 850 पट मोठा असून कित्येक हजार पट तेजस्वी आहे.
सर्वात मोठा ताऱ्यापैकी एक अशी ओळख असलेला UY Scuti हा सुर्यमालेपासून ९५०० प्रकाशवर्षे दुर आहे. हा तारा सूर्यापेक्षा तब्बल १७०० पट मोठा आहे.
तर Stephenson 2-18 हा तारा आकाशगंगेच्या मध्याच्या दिशेला आपल्यापासून २० हजार प्रकाशवर्षे अंतरावर आहे. हा तारा १९९० च्या सुमारास माहीत जरी झाला असला तरी त्याच्या भव्यतेबाबत नुकतेच कुठे शिक्कामोर्तब झाले आहे. Stephenson 2-18 या ताऱ्याचा आकार आपल्या सूर्यापेक्षा तब्बल २१५० पट मोठा आहे. म्हणजेच सध्या माहीत असलेल्या ताऱ्यांपैकी सर्वात मोठा तारा म्हणून Stephenson 2-18 ची ओळख झाली आहे. समजा हा तारा आपल्या सूर्यमालेत आपल्या सूर्याच्या जागी ठेवला तर तो गुरु आणि शनी ग्रहादरम्यान असलेल्या भागापर्यंतची जागा आरामात व्यापेल. एवढंच नाही तर सूर्यावर जशा सौरज्वाला असतात या Stephenson 2-18 मुळे या ज्वालांचा पसारा हा प्लुटो ग्रहाच्या पलीकडे पोहचेल. यावरुन Stephenson 2-18 या ताऱ्याची भव्यता लक्षात येईल.
आत्तापर्यंतच्या निरिक्षणांमुळे माहीत झालेल्या काही मोजक्या ताऱ्यांच्या आकारांची ही तुलना आहे. आपल्या आकाशगंगेत आणखी कोट्यावधी तारे आहेत जे अजून माहीत व्हायचे आहेत, त्यांचा अभ्यास तर खूप दूरची गोष्ट. तेव्हा कदाचित आत्तापर्यंत माहीत असलेल्या ताऱ्यांपेक्षा आणखी मोठे तारे, वेगवेगळ्या प्रकारचे तारे असू शकतात.
ताऱ्यांचा एवढा अभ्यास का केला जातो तर यामुळे ताऱ्यांची जडणघडण कळण्यास मदत होते, विविध ताऱ्यांभोवती असलेल्या ग्रहांची माहितीही मिळते. एकंदरितच ताऱ्यांचा जन्म-मृत्यू वगेैरे याचा अभ्यास होत सृष्टीच्या निर्मितीचे ठोकताळे बांधता येतात.
ताऱ्यांबद्दल माहिती देणारी असंख्य पुस्तके आहेत. इंटरनेटवर ढीगभर माहिती उपलब्ध आहे. यापैकी काही फोटो आणि व्हिडियो शेयर करत आहे. यामुळे आपला सूर्यया विश्वात नेमका कसा आहे याचा अंदाज लावण्यात मदत होईल.