दंतकथेचा विषय झालेली १६0 वर्षांची भारतीय रेल्वे

१६ एप्रिल १८५३ ला मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे भारतात धावली.भारताची जीवनरेषा मानल्या जाणार्‍या भारतीय रेल्वेने मंगळवारी १६0 वर्षे पूर्ण केलीत. भारतात १६ एप्रिल १८५३ रोजी बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली. तेव्हापासून भारतीय रेल्वेचा प्रवास अव्याहतपणे सुरू आहे. गेल्या १६0 वर्षांत रेल्वेचा परीघ एवढा प्रचंड विस्तारला आहे की, भारतीय रेल्वे आज दंतकथेचा विषय झाली आहे. भारतीय रेल्वेचं नेटवर्क चीननंतर आशियातील दुसर्‍या क्रमांकाचं नेटवर्क मानलं जातं. भारतात एकूण ७, ८५३ रेल्वे स्टेशन आहेत. देशातील रेल्वे रुळांची एकत्रित लांबी पकडली तर ती जवळपास ७0 हजार किलोमीटरपर्यंत जाते. हे अंतर पृथ्वीच्या एकूण अंतराच्या जवळपास दीडपट आहे. भारतात दररोज १४,४00 गाड्या रुळावरून धावतात. त्यापैकी ७ हजार प्रवासी गाड्या आहेत. त्यातून अडीच कोटी माणसं दररोज प्रवास करतात. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडच्या एकत्रित आणि युरोपातील ऑस्ट्रिया, हॉलंड, स्पेन अशा अनेक छोट्या-मोठय़ा देशांच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या कितीतरी अधिक आहे. भारतीय रेल्वेत काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या तब्बल साडेसोळा लाख आहे. जगात एकमेव भारतीय रेल्वे अशी आहे की, जिचा वेगळा अर्थसंकल्प सादर होतो. कुठल्याही कारणाने या रेल्वेची चाकं थांबलीत, तर संपूर्ण देश ठप्प होईल, एवढं महत्त्वपूर्ण स्थान आज तिने मिळविलं आहे. भारतीय रेल्वेच्या स्थापनेपासून आतापर्यंत एवढय़ा अद्भुत कहाण्या आहेत की, त्या संपूर्ण सांगायच्या म्हटल्यास दोन-चार ग्रंथ कमी पडतील. एकमेवाव्दितीय असलेल्या भारतीय रेल्वेच्या १६0 वर्षानिमित्त तुम्हाला माहीत असलेली-नसलेली ही तिची खास वैशिष्टे-

भारतातील सर्वात वेगवान रेल्वे- नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्स्प्रेस. संपूर्ण वातानुकूलित असलेली ही गाडी फरिदाबाद ते आग्रा या दरम्यान १५0 किमी. प्रतितास या वेगाने धावते. दिल्ली-भोपाळ हा ७0४ किमीचा प्रवास ही गाडी ७ तास ५0 मिनिटात पूर्ण करते.

भारतातील सर्वात संथ गतीची रेल्वे- मेटूपलायम उटी-निलगिरी पॅसेंजर. ही गाडी केवळ १0 किमी. प्रतितास या गतीने प्रवास करते. निलगिरी पर्वतरांगांचं मनोहारी दर्शन घडविणारी ही गाडी १८९९ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून ती याच गतीने धावते. पर्यटकांची अतिशय आवडती अशी गाडी आहे. तिला हेरिटेज रेल्वेचा बहुमान आहे. प्रतापनगर-जंबुसार पॅसेंजर ही दुसरी सर्वांत संथ गाडी आहे. ती १२ किमी. गतीने धावते.

सर्वात लांबचा प्रवास करणारी गाडी- विवेक एक्स्प्रेस. ही गाडी दिब्रुगड (आसाम) ते कन्याकुमारी असा ४२७३ किमीचा प्रवास करते. या प्रवासासाठी ही गाडी ८२ तास १५ मिनिट घेते. मात्र निर्धारित वेळेत ती क्वचितच पोहोचते.

सर्वात कमी अंतराची गाडी- नागपूर-अजनी. नागपूर शहरातील या दोन स्टेशनमधील अंतर केवळ ३ किमी. आहे. रेल्वेच्या कर्मचार्‍यांना नागपूर स्टेशनवरून अजनीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये पोहाचविण्यासाठी या शटल सेवेचा उपयोग होतो.

सर्वात जास्त अंतर न थांबता कापणारी गाडी- त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस. ही गाडी बडोदा ते कोटा हे ५२८ किमीचे अंतर कुठेही न थांबता धावते.

लांबलचक नाव असलेलं रेल्वे स्टेशन-चेन्नईजवळचं वेंकटनरसिम्हाराजूवरीपेट्टा. (श्ील्ल’ं३ंल्लं१ं२्रेँं१ं्न४५ं१्रस्री३ं) इंगजी वर्णमालेतील २६ अक्षरांपेक्षा या स्टेशनच्या नावात दोन अक्षर अधिक आहेत. इंग्रजीत हे नाव लिहायचं झाल्यास २८ अक्षर होतात.

सर्वात छोटं नाव असलेली स्टेशन- आयबी (ओडिशा) आणि ओडी (गुजरात)

सर्वात जास्त थांबे घेणारी गाडी- हावडा-अमृतसर एक्स्प्रेस. ही गाडी आपल्या तब्बल ११५ ठिकाणी थांबते.

कधीच वेळेनुसार न धावणारी गाडी- गौहाटी-त्रिवेंद्रम एक्स्प्रेस. या गाडीला आपलं अंतर पार करण्यासाठी साधारण ६५ तास लागतात. पण ही गाडी नेहमीच १0 ते १२ तास लेट धावते.

एकाच ठिकाणी असणारी दोन स्टेशन- श्रीरामपूर आणि बेलापूर. महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील ही दोन स्टेशन एकाच ठिकाणी आहेत.

देशाच्या चार कोपर्‍यातील शेवटचे रेल्वे स्टेशन- पूर्व-लिडो(आसाम), पश्‍चिम-नालिया (गुजरात), उत्तर- बारामुल्ला (जम्मू आणि काश्मीर), दक्षिण-कन्याकुमारी

सर्वात व्यस्त असणारे रेल्वे स्टेशन- लखनौ (उत्तर प्रदेश) येथून दररोज ६४ गाड्या धावतात.

सर्वात लांब प्लॅटफॉर्म- खरगपूर(प. बंगाल) २,७३३ फूट.

कार्यरत असलेले सर्वात जुने इंजिन- ‘फेअरी क्विन’ . हे वाफेचे इंजिन १८५५ मध्ये तयार झाले. अजूनही ते उत्तम स्थितीत आहे. या इंजिनाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.

रेल्वेचा रोजचा प्रवास – भारतीय रेल्वेच्या १४,४00 प्रवासी व मालगाड्या रोज पृथ्वी ते चंद्राचं जे अंतर आहे त्यापेक्षा साडेतीनपट अधिक अंतर पार करतात.

रेल्वेतील शौचालय – रेल्वेत सर्वात प्रथम वातानुकूल डब्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी १८९१ मध्ये शौचालय बसविण्यात आले. सामान्य वर्गात प्रवास करणार्‍या प्रवाशांना ही सोय १९0७ मध्ये उपलब्ध झाली. त्याअगोदर जिथे गाडी थांबे तिथे लोक आपली लघू, दीर्घ शंका आटोपून घेत. रेल्वेला १६0 वर्षे झाल्यानंतरही प्रवाशांचं मलमूत्र अजूनही रेल्वे रुळांच्या मध्येच पडतं. त्यामुळे परदेशी प्रवासी जगातील सर्वात मोठं ओपन टॉयलेट हे भारतीय रेल्वेमार्गावर आहे, असा उपहासाने उल्लेख करतात. आता रेल्वेने पर्यावरणपूरक ग्रीन टॉयलेट बसविण्याची घोषणा केली आहे.

वातानुकूल सेवा- ही सेवा सर्वात प्रथम ग्रेट इंडियन पेनिनसुलर रेल्वेत १८७४ मध्ये सुरू झाली.

सर्वात लांब बोगदा- काश्मीर खोर्‍यात सुरू होणार्‍या रेल्वेमार्गावरील पिर पंजाल पर्वतरांगांतील ११.२५ किमीचा बोगदा हा देशातील सर्वात मोठा बोगदा आहे. कोकण रेल्वे मार्गावर करबुडेचा बोगदा दुसर्‍या क्रमांकाचा ६.५ किमीचा आहे.

पहिली मेट्रो – जमिनीखालून धावणारी पहिली मेट्रो रेल्वे कोलकात्यात १९८४ मध्ये सुरू झाली. त्यानंतर राजधानी दिल्लीत २00२ मध्ये मेट्रो धावायला लागली. मुंबईत ती अजूनही सुरू झाली नाही.

रेल्वेचा सर्वात मोठा अपघात- भारतातील रेल्वेचा सर्वात मोठा अपघात बिहारमध्ये ६ जून १९८१ मध्ये झाला होता. मानसी आणि सहरसा या स्टेशनदरम्यान बागमती नदीत पुलावरून गाडी नदीत पडली. या अपघातात जवळपास ८00 लोकांचा मृत्यू झाला.

सर्वात जास्त गर्दी असणारं रेल्वे स्टेशन- छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई. येथून जवळपास रोज ३ कोटी प्रवासी वेगवेगळ्या दिशेने प्रवासाला निघतात. या रेल्वे स्टेशनचा युनेस्कोने जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

सर्वात लांब रेल्वे पूल- केरळातील एडापल्ली ते वल्लारपडमला जोडणारा ४.६२ किमीचा पूल

सर्वात उंचावरील रेल्वे पूल- काश्मीरमध्ये चिनाब नदीवर कौरी गावाजवळ जवळपास ३५९ मीटर उंचीवर पूल उभारण्यात येत आहे. हा पूल कुतूबमिनारपेक्षा पाचपट उंचीवर तर आयफेल टॉवरपेक्षा ३५ मीटर उंच असणार आहे.

समुद्रावरील रेल्वे पूल- पाल्क समुद्रधुनीवरील रामेश्‍वरम व पाम्बन बेटाला जोडण्यासाठी समुद्रावर रेल्वे पूल उभारण्यात आला.

रेल्वेची संपत्ती- भारतीय रेल्वेकडे जवळपास १0.६५ लाख एकर जमीन आहे. त्यापैकी ९0 टक्के जमीन रेल्वेमार्ग व रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी वापरली जाते. १.१३ लाख जमीन रिकामी वा अतिक्रमीत आहे. रेल्वेचे रोजचे उत्पन्न जवळपास ८00 कोटीच्या घरात आहे.

रेल्वे संग्रहालय- भारतीय रेल्वेचं संग्रहालय दिल्लीच्या चाणक्यपुरी भागात आहे. भारतीय रेल्वे कशी बदलत गेली, याचा संपूर्ण इतिहास तेथे पाहायला मिळतो. राजे-रजवाडे संस्थानिकांच्या काळातील खास रेल्वेगाड्या तेथे पाहायला मिळतात. दिल्लीला गेलात तर ते संग्रहालय पाहायला अजिबात विसरू नका.

(लेखक दैनिक ‘पुण्य नगरी’चे कार्यकारी संपादक आहेत.)

Previous articleसुनीता विलियम्स आणि तिचा विक्रमी स्पेसवॉक
Next articleअद्भुत,भन्नाट ख्रिस्टोफर हेन्री गेल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here