लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ . नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज पाच वर्ष पूर्ण झालीत . त्यांच्या हत्येप्रकरणी गेल्या २-३ दिवसात एटीएस व पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय . पण हत्येमागील मास्टरमाइंड अजूनही पडद्याआडच आहे. दाभोळकररानंतर पानसरे , कलबुर्गी , गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्यात . त्यानंतरही अनेकांच्या नावावर फुल्या मारून त्यांना संपविण्याचे मनसुबे जाहीरपणे व्यक्त होत आहे . त्या पार्श्वभूमीवर मंगेश सपकाळ यांनी दाभोळकरांना लिहिलेले हे पत्र -प्रत्येकाने अवश्य वाचावे असे आहे .
……………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………
दुर्जन माणसा,
आज २० ऑगस्ट. ५ वर्ष झाली बघ, खम्प्लिट, तुला जाऊन. तुझे मारेकरी सापडणं तर दूरच, पण त्यानंतर अजून तीन लोकं मारली रे. घंटा कोणी काही उखडलं नाही त्यांचं. ज्या सनातनवर प्रत्येकवेळी शंका घेतली गेली, त्या सनातनचंही काही उखडलं नाही. समीर गायकवाड असो कि तावडे असो, नुसता खेळ. ते सनातन म्हणे, “ऍक्ट लाईक अ नक्षल”, “दुर्जनांचा नाश करा” … वगैरे वगैरे. किती ते पवित्र विचार, नाही. आता दुर्जन वगैरे तेच ठरवणार बरं का. कायदा तर त्यांच्या पायात लोळतो. त्यांनी ठरवलं तू दुर्जन, मग तू दुर्जन. अरे तुला मारलं नाही काही, तर तुझा वध केला. ते साक्षात देव झाले आणि तू राक्षस. खरंच, देवाशप्पथ. अरे गीतेत सांगितलंय. ज्या गीतेवर हात ठेवून आपली न्यायव्यवस्था खरं खरं बोलायला सांगते, तीच तीच गीता ही.
“परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥
– “सज्जनांचा उद्धार करण्यासाठी, “दुष्कृत्य करणाऱ्यांचा विनाश करण्यासाठी” आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो.”
कळलं का काही. संविधान, कायदा, सुव्यवस्था हे सगळं धर्मापुढे ‘किस खेत की मूली’. धर्म पहिले, मग बाकी सगळं.
इथे धर्माचं कारण देऊन काहीही करता येतं हां.
आधी वाटायचं फक्त इस्लाममध्येच लोकांचं ब्रेनव्हॉश केलं जातं, पण सनातनसारख्या संस्थांनी हे चुकीचं ठरवलंय. ‘हम भी किसी से कम नही’, म्हणत जोरात ब्रेनव्हॉशिंग चालू असतं. ते फॉरेनर पण रस्त्याने फिरत असतात, हरे रामा हरे कृष्णा म्हणत.
आता तरी भारतीयांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान, इस्राईल, इराक, इराण सारख्या देशाला नावं ठेवणं बंद करायला हवं, नाही.
———————
तशी आपली भेट झाली नाही कधी आणि जरा उशिराच तू हातात पडलास….
खरं तर ते बरंच झालं. नाहीतर उगाच वाया बिया गेलो असतो. कार्यकर्ता वगैरे होऊन दगडावर डोकं आपटण्याचा निरर्थक प्रयत्न करत फिरलो असतो.
आजकाल कार्यकर्ता म्हणजे ‘भाडे का तट्टू’.
श्श्या ! किती निगेटिव्ह झालोय मी.
अंनिसची ही चतुसुत्री जेव्हा वाचली होती, ऐकली होती, तेव्हा ज्याम प्रभावित झालो होतो.
– शोषण/फसवणूक करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं.
– वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणं / अंगीकार करणं.
– धर्माची कठोर विधायक चिकित्सा करणं.
– व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं.
वाटलं होतं, आपणही कधीतरी तुला जॉईन करावं….
पण आता सगळं आठवलं तर वाटतं, ‘कसला फालतू विचार आलेला मनात’. साक्षात आत्महत्याच होती कि रे ती.
गाढवांच्या देशात लाथाच मिळणार, दुसरं काय.
—————————
अरे, नुकताच भारताचा स्वातंत्र्य दिन झाला, ७० वा. कसला ऊत आलेला सगळ्या भारतीयांना. म्हणजे सगळेजण खूपखूप शुभेच्छा देत होते स्वातंत्र्याच्या. इथे ‘स्वातंत्र्य म्हणजे काय’, हे कळलंच नाही आहे कित्येकांना. त्यांना वाटतं आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं. एका दळभद्री मानसिकतेचे आपण वर्षानुवर्षे गुलामी करतोय, याची त्यांना जाणीवच नाही…. कमाल आहे, नाही. पण तरी १५ ऑगस्टची सुट्टी मिळाली, मग करू काहीतरी, या कृतज्ञतेपोटी शुभेच्छा देत असतात. मला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा कोणाला द्यावाश्या वाटतात, तर त्या इंग्रजांना. साले सुटले एकदाचे. म्हटले असतील, गाढवांपुढे बायबल वाचून काहीही होणार नाही.
तो लॉर्ड बेंटिंक, ज्याने सतीप्रथा बंद केली. तर त्यावर आपले पंडित श्रद्धा दुखावल्या म्हणून हायकोर्टात गेले. असला निर्बुद्ध गाढवांची मेजॉरिटी असलेला देश.
खरंतर, ‘इंग्रज नसते तर’, असा प्रश्न पडायला पाहिजे प्रत्येक भारतीयाला.
मुंबईत प्रत्येक पावसाळा रस्त्यावर पाणी तुंबतं. साला यांच्याकडे एक इंजिनिअर नाही, जे हे थांबवू शकेल. (असता तर नसतं का थांबवलं). साला यांना एक पूल सांभाळता येत नाही. नाहीतर नवीन बांधलेले पूल मध्येच कुठेतरी कोसळतात तरी.
त्याचं काय आहे, शिकलेली लोकं बाहेरगावी जातात लगेच, त्याच इंग्रजांकडे काम करायला, ज्यांच्यापासून त्यांच्या पूर्वजांनी अमाप कष्ट करून स्वातंत्र्य मिळवलं. किती हा विरोधाभास.
काही म्हणतात, “देश आगे बढ रहा है”.. काहीतर, ‘प्राऊड टू बी इंडियन”, वगैरे पण म्हणतात, तेव्हा मात्र मी खूप हसतो, विनोद समजून. फक्त भारतात जन्मलो म्हणून कुणाला अभिमान वगैरे वाटत असेल तर ह्याहून दुसरा विनोद काय ना.
“फ्री स्पीच” तरी आहे का भारतात ? असं काहीबाही वाटतं कधीकधी. मुळात ‘फ्री स्पीच’ म्हणजे काय ते तरी कळलं असेल का लोकांना ?
जगातली सर्वात जास्त ब्रेनव्हॉश झालेली तरुणाई कुठे असेल तर ती भारतात, असं मला उगाच काहीबाही वाटत राहतं.
ह्यांना कोणीही गंडवू शकतो, ह्यांचा कोणीही वापर करू शकतो. थोडंसं भडकवलं की लगेच जाळपोळ करायला तयार नेहमी.
म्हणूनच भारताची प्रगती ही कागदावरच छान वाटते. शहरात मेट्रो आली, दोन पुलं बांधली की यांना प्रगती झाल्यासारखी वाटते. शेवटी भक्तच ते.
शांतता हा ‘प्रगतीचा’ पाया आहे, हे कुणालाच कसं कळलं नसेल ?
——————–
आज मी एकटाच बोलणार आहे बरं तुझ्याशी, त्यामुळे तुला आज काहीच बोलता येणार नाही.
अरे त्याचं काय आहे, मागे बाबासाहेब स्वप्नात आले म्हणून लिहिलं, तर कुणीतरी म्हटलं, “ते का साने गुरुजी आहेत का, तसं बोलायला”.
आता मला काय माहित, मी काही फारसे आंबेडकर वाचले नाहीत …. पण, मला तर साने गुरुजी कसे बोलतात तेही माहित नाही. ते तरी कुठे वाचलेत मी.
भारतात बरीच लोकं पुस्तकं फक्त ज्ञान पाजळण्यासाठीच वाजतात, असं काहीसं दीडशहाणं मत झालंय माझं.
म्हणून तू नकोच काही बोलू. उगाच मला, ‘मंगू झंडू’ वगैरे काही म्हणायचास, आणि मग रिकामटेकड्या विद्वांनाच्या झुंडी हजर व्हायच्या.
तसं आजकाल त्याच झुंडी जास्त करमणूक करतात म्हणा. एखादा स्क्रिनशॉट टाकला की पोरं पोटभर चढतात. ते तरी आपलं फ्रस्टेशन कुठे काढणार, नाही का. त्यामुळे मी सातारा वगैरेचा पण उल्लेख करणार नाही हां.
बाकी, तुला डोक्यावर घेणारी पण लोकं आहेत बरं का.
आजकाल डोक्यावर घेण्याची फॅशनच आहे भारतात. आणि डोक्यावर घेणाऱ्यांना अरे-तुरे केलेलं चालत नाही, सुसंस्कृत देशात.
ती रमाई, ती जिजाई चालते बरं.. पण तो शिवाजी, तो आंबेडकर वगैरे चालणार नाही हां. पुरुषप्रधान संस्कारच ते, दुसरं काय.
बायका पण पुरुषांची थोरवी गाण्यात जुंपलेल्या असतात.
भारतात देवाच्या नावाने जरा कुणी काही म्हटलं की लगेच आस्तिक लोकांच्या भावना दुखावतात. लोकं रस्त्यावर येतात, जाळपोळ करतात आणि शिव्या वगैरे तर एकदमच कॉमन झालंय आता …. ही सगळी अध्यात्म वगैरे जानणारी लोकं असतात म्हणे.
पण माणसं मेली तर त्यांच्या दिखाऊ भावना जागच्या हलता हलत नाही. त्यांचा दिवस व्यवस्थित पार पडतो.
गंमत म्हणजे,
भारताच्या संविधानात प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांबाबत काय लिहिलंय, तर
” Its fundamental duty, To develop the Scientific Temper, humanism and the spirit of inquiry and reform”
म्हणजेच काय तर – “शास्त्रीय दृष्टिकोन, मानवता आणि अभ्यासूवृत्ती यांची वाढ करणे, हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं मूलभूत कर्तव्य आहे” .
Scientific Temper ….. ??
कसला भारी विनोद आहे, नाही.
अरे जिथे भारतातले मंत्री, भारताचा पंतप्रधान,
मडक्यातून राख काढणं आणि जादूने सोन्याची चैन काढणाऱ्या सत्य साई सारख्या भुरट्यांच्या पायात लोळतात,
तिथे संविधानातलं, “शास्त्रीय दृष्टिकोन” वगैरे गोष्टी त्यांना तरी पटलेल्या असतात का ?
मुळात संविधान तरी त्यांना माहितेय का ?
उलट,
कुंकू का लावावं, बोटांत अंगठी का घालावी, मंगळसूत्र का घालावं,
याची शास्त्रीय कारणं शोधणारी एक निर्बुद्ध पिढी घडतेय सध्या, Rather घडवली जातेय.
——————–
तू लिहीतोस, “श्रद्धा म्हणजे तपासलेल्या विचारांचे भावनेत परिणित झालेले रूप”.
परंतु, देवावर असलेली श्रद्धा कुठल्या विचारांवर तपासली गेलेय ?
‘देव’ हीच अंधश्रद्धा हे पटत असूनही ते तू किंवा तुझ्यासारखी बुद्धिप्रामाण्यवादी लोकं तसं म्हणत का नाहीत ?
का हा सावध स्टॅन्ड नेहमी ?
अब्राहम कोवूर, बी प्रेमानंद यांचा लढाही अंधश्रद्धे विरोधातच होता की, पण तरी तुझा लढ्याचा मार्ग हा त्यांच्याहून पुढे जाणारा होता, असं तु म्हणतोस.
म्हणजेच लढा वेळोवेळी पुढे न्यावा लागतो, त्यात बदल करावा लागतो. आणि ते तू वेळोवेळी केलंसंच.
अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरु झालेली तुझी चळवळ, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा, धर्मनिरपेक्षता, विवेकवाद इथपर्यंत जरी पोहोचली असली तरी ‘धर्मचिकित्सेबद्दलचा’ स्टॅन्ड हा अजूनही मिळमिळीतच आहे.
आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सार्वजनिक उत्सवांनाही विरोध करायला हवा. जिकडे तिकडे लाखो मंदिरं असूनही जागोजागी रस्ते खोदून, रस्ते तोडून सार्वजनिक जागांवर मंडप उभारून इतरांना गैरसोय करण्याचा अधिकार काय ? आपल्या श्रद्धेचा इतरांना त्रास देण्यात कुठला आलाय विचारीपणा ? ही अंधश्रद्धाच नाही का होत ? वाऱ्यांना उपस्थिती लावून लोकांना वेगळा संदेश जात नाही का ?
पण शेवटी काठावर असणाऱ्या माझ्यासारख्या रिकामटेकड्या उपटसुम्भानीं पोहोणाऱ्यावर टीका तरी का करावी ?
——————
पण तुला कसं काहीच कळलं नाही याची मला कमालच वाटते.
पोलीस संरक्षण नाकारताना तू म्हणाला होतास,
“जर मला पोलीस संरक्षण घ्यावं लागलं, तेही माझ्या देशात, तेही माझ्याच लोकांकडून, तर नक्कीच माझं काहीतरी चुकतंय. मी भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून संघर्ष करतोय आणि तो संघर्ष कुणाच्या विरोधात नाही, तर सगळ्यांसाठी आहे”….
यातलं काहीतरी पटण्यासारखं आहे का ?
अतिभावनाप्रधानशीलतेने विवेकावर मात केली का ?
अरे बाबा, भारतात, जिथे
वकील सगळ्यांसमोर विद्यार्थ्यांना मारू शकतात,
सरकारी नेते मीडियासमोर गुंडागर्दी करू शकतात,
टीव्हीवर जिवंत जाळण्याची भाषा करू शकतात,
सनातन सारख्या संस्था आपल्या अंकातून, ‘दुर्जनांचा खात्मा करा’, म्हणून सांगतात.
तिथे भावनाप्रधान वगैरे हा किती मोठा विनोद आहे, हे तुला कळायला हवं होतं.
जिथे ‘जात पंचायतीचे कायदे’, देशाच्या कायद्यातून वेगळे असतात, स्वनिर्मित …
जातीच्या नावाखाली स्वतःचे आईवडीलच आपल्या मुलांना मारून टाकतात,
ज्या देशात “शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये”, म्हटलं जातं, तिथे न्याय वगैरे गोष्टी दुबळ्यांसाठी असतील का ?
“माणूस मरतो, विचार मरत नाहीत, विचार महत्वाचे”, असं कुणी म्हटलं की त्याला नम्रपणे सांगावंसं वाटतं, “तुझे शेवटचे विचार एकदाचे रेकॉर्ड कर आणि आत्महत्या कर”. हिंस्र श्वापदांना कसला आलाय विचार आणि फलाना डिकरा. त्यांना माणसंच संपवायची असतात.
आणि म्हणूनच कि काय हल्ली मला तुझा रागच जास्त येतो.
बुद्धिप्रामाण्यवादी म्हणवणारा तू ‘पोलीस संरक्षण’ नाकारतो ?
जी तू चळवळ जनहितासाठीच सुरु केली होती, जिथे तू लाखो कार्यकर्ते निर्माण केलेस, तुझ्या विचारांवर विचार करून आमच्यासारख्या माठांच्या डोक्यात प्रश्न उभे केलेस, ‘दैव’ या तद्दन फालतू जोखडातून मुक्त केलंस, तिथे तुझं असणं, तुझं ‘जिवंत’ असणं चळवळीसाठी किती महत्वाचं आहे, तुला कळायला हवं होतं.
तुझ्यासारख्या शांत आणि अहिंसक माणसावर, ज्याला आपण शेवटचं कधी चिडलोय हेही माहित नाही, अशा तुझ्यासारख्या लोकांना संपवलं जातं. निषेध वगैरे होतो मग त्यावर, थोडे दिवस चालते गरमागरमी. मग शांत होतं सगळं. मग नवीन काहीतरी येतं. रोज नवीन असतं काहीतरी. बातम्यांना कसलाही तोटा नसतो.
कधी बॉम्बस्फोटच होतात, कधी सामूहिक बलात्कार, कधी जातीचं कारण काढून लहानग्या पोरांना जाळलं जातं, तर
कधी आतंकवादी येऊन मारतात, कधी पूलच पडतो ….. रोज नवीन तमाशा.
यापुढे, ‘मी दाभोलकर’, या ऐवजी “मी दाभोलकर नाही आणि होणारही नाही”, चे फलक घेऊन मोर्चा काढायला हवा.
“यापुढे मी मरणार नाही”.
कुठल्याही चळवळीसाठी, कुठल्याही लढ्यासाठी जीव तर असावा की रे हातात पहिला, मग बाकीचं.
पण साला, तू येवढा मेंदूत खोलवर मुरलायस की निघता निघत नाहीयेस….
मेलेल्या माणसाने असं रुतून बसू नये, हेही कळू नये का तुला ?
….
……..
असो ! आजच्या दिवशीच एवढंच हां. बाकीचं पुढच्या वर्षी.
नास्तिकाने मेलेल्या माणसाशी असं गप्पा मारू नये …. कसं दिसतं ते !
आधीच विकृत म्हणतात मला, आता वेडाही म्हणावी अशी इच्छा आहे का तुझी ?
ढीश्श केल्यावर गायब व्हयला शिकायला हवंस तू.
ढीश्श !
(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात )
– मंगेश सपकाळ