सुनील इंदुवामन ठाकरे
यु़द्धाची तशी धामधूम नव्हती. जवळपास शांततेचाच काळ होता. सगळी प्रजा आपापल्या व्यवसाय, उद्योगात लागली होती. 1806च्या काळात रघुजी राजे भोसले
द्वितीय हे काही आठवड्यांवर आलेल्या पोळ्याच्या तयारीत लागले होते. रघुजी राजे भोसले हे शेतीला जीव लावणारे होते. शेतकऱ्यांवर अपार माया करणारे होते. कलाप्रेम व सर्जनशिलतेचा गौरव हे त्यांच्यातील विशेष गुण होता. याच रसिकतेतून त्यांनी नागपूर शहरात तेलंगखेडीसारख्या अनेक बागा फुलविल्यात. शेती व शेतकरी हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. शेतीकडे ते केवळ व्यवसाय किंवा उद्योगच म्हणून पाहत नव्हते. तर ती एक परंपरा व संस्कृती होती त्यांच्यासाठी. ही परंपरा व संस्कृती नव्या पिढीनेदेखील जोपासली पाहिजे असा त्यांचा आग्रह व प्रयत्न असायचा. यातूनच उदयास आला ‘‘तान्हा पोळा’’.

शेती हा एक प्रमुख व्यवसाय होता. शेतकरी तन, मन, धनाने समर्पित होऊन शेतात आपले श्रम व समाधान रुजवत होते. शेती श्रेष्ठच होती त्या काळी. या देशात अनेक उत्सव पिकांसारखे शेतीतूनच फुललेत. मोठी माणसं जीव लावायची मातीला. शेतीशी जुळलेले सर्वच घटक त्यांचे जीव की प्राण असायचे. त्यातील एक म्हणजे बैल. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सणदेखील याच शेतीपरंपरेतूनच आलेला.
रघुजी राजे भोसले द्वितीय हे दूरदृष्टी असलेले लोकनेते होते. नव्या पिढ्यांना शेती व शेतीशी जुळलेले बैल यांच्याप्रती आस्था व रुची वाढावी म्हणून त्यांनी 1806 मध्ये तान्हा पोळा सुरू केला. श्रावण अमावस्येला महाराष्ट्रात पोळा साजरा होतो. भारतभर विविधपद्धतीने शेतकरी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीतच असतात. खरेखुरे मोठमोठाले बैल घेऊन शेतकरी हा सण आजही साजरे करतातच. यात लहान मुलांचा विशेष काहीच रोल नसतो. ते बिचारे फक्त बघेच असतात. महाराजांना यातून एक कल्पना सुचली. त्यांनी लगेच ती अमलात आणली. ती यशस्वी झाली. लहान मुलांसाठी त्यांनी तान्हा पोळा सुरू केला. मोठा बैल लहान लेकरांना सांभाळणं कठीण असतं. मग काय करायचं? तर त्यांनी लाकडाचा बैल तयार करवून घेतला.


पहिला लाकडी बैल बराच काळ उत्तम स्थितीत होता. एकदा वाड्याला आग लागली. त्या
आगीत तो पहिला व अन्य लाकडी बैल जळून भस्मसात झालेत. पण एक छान माहिती मुधोजी राजेंनी दिली. ते म्हणाले की, घरात मुलगा जन्मला की त्याला त्याच्या पहिल्या पोळ्याला एक नवा लाकडी बैल मिळतो. हे पोळ्याच्या परंपरेचं हॅण्डओव्हरच असतं. लाकडी बैल संपतीलही. काही काळाने ते नष्टही होतील. मात्र नव्या पिढीला आम्ही लाकडी बैलासोबत आपली परंपरा सोपवत असतो. लाकूड नष्ट होईल पण ही परंपरा नष्ट होणार नाही असा विश्वास मुधोजीराजेंनी दाखविला.

रघुजी राजे भोसले यांचे दहावे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी या परंपरेची माहिती दिली. तंजावर, सातारा, कोल्हापूर व नागपूर ह्या नागपूरच्या प्रमुख गादी. भोसले चौफेर असले तरी तान्हा पोळा मात्र केवळ नागपूरकर भोसलेच साजरा करतात. पशूप्रेमाची पूर्वापार परंपरा विद्यमान मुधोजी राजेंनी जपली. त्यांच्या संग्रहात आजही उमदे घोडे, राजहंस, विविध पक्षी, प्राणी आहेत.
सन 1806 पासून नागपूर व आता जवळपास संपूर्ण विदर्भातील काही भागांत तान्हा पोळा साजरा केला जातो. काळी व पिवळी मारबत काढली जाते. तिचादेखील एक स्वतंत्र इतिहास आहे. श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांनीदेखील ही घराण्याची परंपरा जोपासली. त्यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल जतन करून ठेवलेला आहे. त्या बैलाची उंची आठ फूट आणि लांबी सहा फूट आहे. त्या बैलाच्या पायात चांदीचे तोडे आहेत.

तान्हा पोळा विदर्भात आणि त्यातही नागपूर भागात साजरा केला जातो. आपली शेतीची, पधूधनाची असलेली बांधिलकी व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न असतो. शेती हीच एक स्वतंत्र संस्कृती आहे. याच संस्कृतीमधून बहुतांश संस्कृती उदयास आल्यात. या संस्कृतीचं जतन, संवर्धन आणि हस्तांतरण होत आहे, ही आनंदाचीच बाब आहे.
(लेखक हे प्रतिभावंत कवी , निवेदक आणि मुलाखतकार आहेत)
-सुनील इंदुवामन ठाकरे
नागपूर
8623053787