नरूची परीक्षा

– ॲड. किशोर देशपांडे

   नरूच्या शाळेत दर वर्षी एका प्रमुख विषयाची परीक्षा घेत असत. यंदाचा विषय होता ‘अर्थशास्त्र ‘. पेपर सोडवून नरू घरी आल्याआल्या चिडचिड करू लागला. त्याचे बाबा मोहनराव शांत स्वभावाचे विचारी गृहस्थ होते. नरूला त्यांनी चिडण्याचे कारण विचारताच तो उसळून म्हणाला, ” बाबा या राहुल्याचा मी असा बंदोबस्त करेन की तुम्ही पहातच रहा “.

बाबा:– ” अरे पण आता परीक्षा सुरू आहे ना, मग तिथे त्याने काय गोंधळ केला ?”

नरू :- बाबा, तो चक्क चिटींग करत होता. माझ्या मागेच बसला होता, आणि बाजूच्या अब्दुल्याला  उत्तरं पुरवत होता. मला सारखं मागे वळून त्याच्यावर लक्ष ठेवावं लागलं. मी पर्यवेक्षकांकडे त्याची 2- 3 दा तक्रारही केली. पण त्यांनी त्याचा पेपर हिसकावून घेतला नाही. याचाच मला संताप आला आहे.

बाबा :- बाळ नरू, तू सारखा सारखा त्या राहुलची टेहेळणी करून तक्रारी केल्या, पण स्वतःचा पेपर तरी पूर्ण व्यवस्थित सोडवलास की नाही? मी तुला म्हटलं होतं की अर्थशास्त्र कठीण विषय आहे. आपल्या घराण्यात कोणालाही त्या विषयात रुची नव्हती.तेव्हा तू निदान निर्मला, मुकेश, गौतम यांच्याकडून तरी तो विषय नीट समजून घ्यायला हवा होता.

नरू:- बाबा, काळजी करू नका. त्या निर्मलाशी कशाला बोलू ? आणि मुक्या, गौत्या यांना काय माझ्यापेक्षा जास्त अक्कल आहे ? मागच्या दोन्ही परीक्षांमध्ये   मी त्या राहुलला धोबीपछाड देऊन पहिला नंबर मिळवला, हे विसरू नका. आणि यंदा तर मी 500 पैकी 400 मार्क मिळवणारच !

बाबा :- नरू बाळा, मला तुझी काळजी वाटते रे. तुमचा पहिला पेपर इतिहासाचा होता. आपले देवदेवता हे इतिहासाचा विषय नसून आस्थेचा विषय आहेत, असं तू  मोठया आणि सुवाच्य अक्षरात लिहिलेलं उत्तर परीक्षकांना खूप आवडलं, म्हणून तुझा पहिला नंबर आला. त्यानंतर दुसरा पेपर राज्यशास्त्राचा होता. परचक्रापासून आणि अंतर्गत शत्रूंपासून राष्ट्राचे संरक्षण करणे, हेच राज्यशास्त्र होय, असं तू पेपरात लिहिलंस.आणि पुन्हा परीक्षक जास्त खुश झालेत. तुला दुसऱ्यांदा पहिला नंबर मिळाला. पण हा तिसरा पेपर अर्थशास्त्राचा आहे. तो राहुल बऱ्यापैकी अभ्यास करून आकडेवारी पण गोळा करत असल्याची जाणीव मी तुला अधूनमधून करून देत होतो.पण तुझा अति आत्मविश्वास, राहुलद्वेष आणि अहंकार तुला पास होऊ देणार नाही, असं वाटतच होतं. तू पेपरमधल्या सर्व प्रश्नांची उत्तरं लिहिलीस की नाही ?

 नरू :- बाबा, देश कसा बरबाद होणार आहे, स्त्रियांचे दागिने, शेतकऱ्याच्या म्हशी कशा चोरल्या जातील, हे मी अगदी सविस्तर लिहिलं. फक्त सर्वाना काम कसे मिळेल आणि महागाई कशी रोखता येईल, यावर मला उत्तर माहीत नव्हतं, म्हणून मी त्या प्रश्नांवर उत्तरच दिलं नाही. काय उत्तर असेल हो ?

 बाबा:– गाढवा, मला तरी उत्तर कुठून माहीत असणार. अर्थशास्त्र समजून आपण चाणक्याचा अभ्यास केला, पण त्यात राज्यशात्रच जास्त. आणि जे काही अर्थशास्त्र असेल ते या काळात उपयोगी नाही. बघूया काय निकाल लागतो तुझा. कधी लागणार ?

नरू :- चार जून !

…………………………………………………….

 भाग 2

   नरूच्या शाळेत परीक्षेचा आणखी एक वेगळा प्रकार असा होता की, विद्यार्थ्यांना  अर्थशास्त्राचा एकच पेपर सात वेळा द्यायचा होता. बाबांकडून दम बसल्यावर नरू खूप नर्व्हस झाला होता. अशा वेळी तो त्याला हिरो मानणाऱ्या लहान मुलांकडे जाऊन मन मोकळं करायचा. बाबांनीही त्याला आठवण करून दिली की अजून तीन पेपर बाकी आहेत, आणि शाळेच्या नियमानुसार प्रत्येक पेपर वेगवेगळ्या परिक्षकांकडे तपासणीला जातो. आता तरी damage control  करून नरूने नीट अभ्यास करावा. अभ्यासापूर्वी आपल्या छोट्या कंपनीला भेटून थोडं रिलॅक्स व्हावं म्हणून नरू अर्णव, सुधीर, अंजना वगैरे मुलांना भेटला. त्या सगळ्यांना नरूविषयी आदरयुक्त धाक किंवा धाकयुक्त आदर असायचा. नरू भेटताच बच्चा कंपनी मोहरून गेली. त्यांनी नरूला बालसुलभ उत्सुकतेने खूप प्रश्न विचारले. ” दादा, तू कित्ती कित्ती अभ्यास करतोस रे ! इतका स्टॅमिना तुझ्यात कसा आहे ? ” “दादा, तुला थकवा येत नाही का ? ” ” नरुदादा, तू झोपतोस तरी किती तास ? ” त्या चिमुकल्यांचे गोडगोड प्रश्न ऐकताच नरूचा नर्व्हसनेस दूर झाला. मग तो नदीकाठी गेला. तिथे त्याचा पिच्छा करत आणखी एक चिमुकली आली, रुबिका नावाची. मग नरू तिला सोबत घेऊन एका बोटीवर चढला. रुबिकाने पण नरूला आधी बरेच इतरांसारखे प्रश्न विचारले. मग ती म्हणाली ” दादा, आमच्या भागात किनई लोक म्हणतात की नरूला मुसलमान मुळीच आवडत नाहीत. तू ते एका पेपरमध्ये लिहिलंस ना, की नवीन सरकार हिंदूंची प्रॉपर्टी काढून मुसलमानांना देणार म्हणून? “

  हे ऐकताच नरूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याचा कंठ दाटून आला. कसंबसं स्वतःला सावरून तो म्हणाला, ” बेटी रुबी,  मी मुसलमानांच्या विरुद्ध कसा असेन ? अगं, माझ्या लहानपणी इदीच्या दिवशी आमच्या घरी स्वयंपाक होत नसे. मोहल्ल्यातले सगळे मुसलमान डबे पाठवायचे. काही वर्षांपासून माझी इमेज खराब करायचा प्रयत्न तो राहुल्या करत असतो.ही अफवा नक्कीच त्यानेच पसरवली असणार बघ.

  रुबिका :- ” पण दादा तू असं लिहिलंस ना, की नवे सरकार हिंदूंची प्रॉपर्टी काढून जास्त मुलं असणाऱ्या लोकांना देईल ? “

  नरू :-” मूर्ख मुली, जास्त मुलं ही मुस्लिमांनाच  होतात असं तुला कोणी बरं सांगितलं? गरीब हिंदूंना सुद्धा जास्त मुलं होतात.”

  हे ऐकून रुबिकाच्या डोक्यात एक भाबडा प्रश्न आला, ” दादा मग सर्व धर्मातल्या गरिबांना प्रॉपर्टी वाटायला तुझा कसा विरोध आहे ? ” पण नरूविषयी तिला वाटणाऱ्या आदरयुक्त धाकामुळे किंवा धाकयुक्त आदरामुळे बिचारीने आपला भाबडा प्रश्न आवंढा घेऊन गिळून टाकला.

 भाग 3

     नरू तसा हुशार, बुद्धिमान, धाडसी व चलाख मुलगा होता. माहितीचे भंडार  मोबाईलवर उपलब्ध असल्यामुळे  Whats App university तून ही त्याने खूप ज्ञान प्राप्त केले होते. शिवाय त्याला चांगलेचुंगले खाण्याचा, उत्तम कपडे घालण्याचा, विविध प्रकारच्या टोप्या, कॅप, हॅट यांचाही शौक होता. त्याच्यात वक्तृत्वकला तर होतीच, पण वादविवाद स्पर्धेत दुसऱ्या वक्त्यांना डीवचून नामोहरम करण्याचं कसब देखील नरूमध्ये होतं. या व अशा अनेक गुणांमुळे तो बाबांचा लाडका होता.

    त्याच्या बाबांची (मोहनरावांची) आपल्या मातृभूमीवर अनन्य श्रद्धा होती. त्यांनी नरूला दोन कानमंत्र दिले. (१) नमो मातृभू: आणि (२) विद्या विनयेन शोभते.

नरूचे संस्कृत ग्रामर जरा कच्चे होते.त्यामुळे दोन्ही मंत्रांचे अर्थ त्याने आपल्या बुद्धीचा वापर करून लावले. नरूचे आडनाव मोगरे होते. त्याला काही मित्र नमो म्हणायचे. नरूला वाटले , बाबांना म्हणायचं आहे की मातृभूमी नरूचीच आहे. त्यामुळे नरू तेव्हापासून मातृभूमीबद्दल फार म्हणजे फारच हळवा झाला आणि तिच्या रक्षणाचा भार फक्त आपल्याच खांद्यावर आहे, असं मानू लागला.

    दुसऱ्या मंत्राचा अर्थ देखील नरूने असा घेतला की विद्या ही विनयलाच शोभते. त्याला विनय नावाचा मुलगा अजिबात आवडत नसे. कारण तो विनय आवाजात चढउतार न करता संथ लयीत शांतपणे काहीतरी न समजण्यासारखं बोलत असे. त्यामुळे नरूला विद्येचा आणि विद्वानांचाही तिटकारा वाटू लागला.

   असो. आपला विषय आहे नरूची परीक्षा. त्याबद्दलच सांगायचं आहे. पण म्हटलं, आधी थोडी नरूची ओळख करून द्यावी.

……………………………………….

 भाग 4

नदीकाठी रुबिकाजवळ मन हलकं केल्यावर नरू तडक गौतमकडे गेला. ” यार गौत्या, हा साला अर्थशास्त्राचा पेपर भारी वाटतोय यार. तू काहीतरी सुचव  नं. “

  गौतम घुश्यात होता. तो डाफरला. ” नरू दादा, मी तुला का मदत करू ? तू फेसबुकवर काय पिचकलास ? मी राहुलला चोरून बदाम पाठवतो ? तुझ्याशिवाय मी वर्गातल्या कोणत्याही मित्राला बदाम किंवा मश्रूम पाठवत नाही, हे चांगलं माहीत असूनही तू असं खोटं स्टेटस टाकून माझी बदनामी का केलीस, ते आधी सांग. “

  नरू:– ” ते जाऊ दे यार. चुकून मी ती गंमत केली. पण काळजी नको. कोणीच ते सिरियसली घेतलं नाहीय. चिल यार. बरं काही पेपरसाठी टिप्स तर दे. “

गौतम :- ” ठीक है यार. तू पण माझ्यासाठी किती केलं आहेस, ते सगळी शाळा जाणते. अशी गंमत पुन्हा नको करूस.

    हे बघ, संपत्तीच्या पुनर्वाटपाचा प्रश्न जटिल आहे. तू सारखा सारखा ते 80 कोटी लोकांना फुकट रेशन देण्याची तरफदारी करतोस, ते बोलणं बंद कर. त्या ऐवजी तू असं लिही, की मोठमोठया विश्वासू कंपन्यांना सरकारने उद्योग थाटण्यासाठी जमिनी मोफत द्याव्यात, पाणी , वीज वगैरे सोयी पण मोफत उपलब्ध करून द्याव्या. मोठमोठे 16पदरी रस्ते, विमानतळ, बुलेट ट्रेनच्या सुविधा देशभर झपाट्याने निर्माण कराव्या. यामुळे देशात खूपखूप संपत्ती निर्माण होईल. नोकऱ्या, रोजगार वाढतील. त्यातून संपत्ती आपोआपच वाटली जाईल.

  नरू:– हे ठीक आहे. पण गौत्या, लेका सरकारने इतका खर्च करण्यासाठी पैसा कुठून आणायचा ? “

गौतम:- ”  जीएसटी, टोल, असे पुष्कळ रस्ते असतात यार. “

………………………………………

भाग 5

गौतम पुढे म्हणाला. ”  हे बघ नरुदादा, आपल्या देशात दारू, जुगार यांचं व्यसन आधीच आहे. सरकारने त्याला आडपडद्याने उत्तेजन द्यावे. मग अबकारी, गेमिंग वर टॅक्स आपोआप वाढत जातो.लोकही नादखुळे होऊन खऱ्या समस्या विसरतात. भव्य मंदिरे बांधून टुरिझम वाढू द्यावा. त्यातूनही खूप रोजगार वाढतो. शेतमालाच्या आयात निर्यातीवर नियंत्रण ठेवून कर कमीजास्त करत जावे. त्यामुळे महागाई आटोक्यात राहते. अशी ही सोपी उत्तरं आहेत. तू उगीच हिंदू मुस्लिम वगैरे काही लिहू नकोस. हा इतिहासाचा पेपर नाही.”

 गौतमचं अर्थशास्त्रावर चाललेलं रटाळ प्रवचन ऐकता ऐकता नरूच्या पापण्या जड झाल्या होत्या. फक्त त्यातले मंदिर मशीद, हिंदू मुस्लिम असे काही शब्द त्याच्या लक्षात राहिले. शेवटचे दोन वाक्य मात्र  बऱ्यापैकी आठवून तो बोलला, ” गौत्या, इतर मंदिरं भव्य होऊ शकतात रे, पण काशी मथुरेचं कसं ?

गौतम :- ” अशी कामं गाजावाजा न करताही होऊ शकतात ना. कधीकधी मला तुझ्यापेक्षा आपला अमित आणि आदित्य हुशार वाटतात. त्यांनीच मला सांगितलं की ज्ञानव्यापीला कसा विळखा पडत चाललाय. “

  अमित आणि आदित्य यांची नांवे गौत्याच्या तोंडून ऐकताच नरूचा अगदी तिळपापड झाला. तो संतापून पाय आपटत बाहेर पडला.

  दुसऱ्या दिवशी पाचवा पेपर होता. नरू रुबिकाला विसरला, गौतम काय म्हणाला तेही विसरला. त्याने त्वेषाने उत्तरपत्रिकेवर लिहायला सुरुवात केली.

 ” मित्रांनो, या राहुल्याचं सरकार आलं तर हा तुमचं आरक्षण काढून मुसलमानांना देईल “

  नंतर त्याने फुशारकीने हे उत्तर सांगितले, तेव्हा बाबांनी कपाळावर हात मारून घेतला, गौतमने अमित आणि आदित्यसोबत घसट वाढवली तर रुबिकाने नरूसोबत घेतलेली नदीकाठची सेल्फी डिलीट करून टाकली.

भाग 6

सायंकाळी नमस्ते सदा हे स्तोत्र गुणगुणत बाबा खिन्न मुद्रेने मिशांना हळुवार कुरवाळत माडीवर येरझारा करत होते . एकाएकी त्यांना आठवले, आपला नितीन किती सोशिकपणे सतत अभ्यास करत असतो. त्याचा अर्थशास्त्राचा चांगलाच व्यासंग आहे. त्याचा पहिला नंबर आला तरी हरकत काय ?

(या कथेतील सर्व पात्र काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा संबंध वाटल्यास तो योगायोग समजावा)

(लेखक नामवंत विधीज्ञ आहेत)
9881574954

Previous articleआठवणी..जलसमृद्ध कामठवाड्याच्या!
Next article‘बसोली’ @ चंद्रकांत चन्ने !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.