जात पडताळणी समितीने आपल्या निकालात उपलब्ध पुराव्यांची तपासणी करताना नवनीत राणा यांनी सादर केलेला कार्तिका हायस्कूलचा शाळासोड दाखला, नवनीत राणा यांच्या वडिलांचा शाळासोड दाखला आणि त्यांनी सादर केलेल्या तीन वंशावळी या पुरावा म्हणून मान्य केल्या नव्हत्या. परंतु दि. ११ फेब्रुवारी २०१४ रोजी खालसा कॉलेजने दिलेले Bonafide Certificate व १९३२चा बुधिया रोडा यांचे निवासस्थान दर्शविणारा भाडे करारनामा, तसेच राधादेवी अडूकिया यांचे शपथपत्र हे दस्तऐवज पुरेसे मानून नवनीत राणांना जातवैधता प्रमाणपत्र दिले. खालसा कॉलेजने दक्षता कक्षाला मूळ रजिस्टर दाखविण्यास नकार दिला होता; शिवाय रजिस्टरमध्ये लागोपाठ असलेल्या दोन नोंदींच्या हस्ताक्षरात व शाईत फरक आढळतो, असेही दक्षता कक्षाने आपल्या अहवालात नमूद केले होते. त्या अनुषंगाने जात पडताळणी समितीने खालसा कॉलेजला मूळ रजिस्टर हजर करण्याचा आदेश दिला होता. मग कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपलनी कमिटीसमोर मूळ रजिस्टर आणल्यानंतर पडताळणी समितीने त्यांना असा प्रश्न विचारला की, ही नोंद नक्की १६ नोव्हेंबेर १९४६ रोजीच झाली की त्यानंतर? त्यावर साक्षीदाराने आपले अज्ञान प्रदर्शित केले आणि जात पडताळणी समितीने मात्र तक्रारकर्त्यांना या साक्षीदाराची उलटतपासणी घेण्याची परवानगी नाकारली.
जात पडताळणी समितीने नैसर्गिक न्याय तत्त्वाचे पालन केल्याचा अभिप्राय नोंदवून, सुप्रीम कोर्टाने नवनीत राणा यांची ‘मोची’ ही अनुसूचित जात असल्याबाबत निर्वाळा देऊन पडताळणी समितीचा निर्णय हा योग्य ठरविला आहे. सुरुवातीस नमूद केल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टातील मा. न्यायमूर्तींच्या सद्हेतूविषयी कोणताही आक्षेप न घेता मी असे नम्रपणे सांगू इच्छितो की, हा निकाल वर्ष २०००च्या कायद्यातील व २०१२च्या नियमातील तरतुदींकडे केवळ तांत्रिक अंगाने पाहून, जात पडताळणी समितीसमोर आलेल्या पुराव्यातील व निकालपत्रातील विपर्यस्ततेकडे डोळेझाक करणारा आहे. तसेच बनावट दस्तऐवज बनवून आरक्षणाचे लाभ लाटू इच्छिणाऱ्या लोकांच्या फसवेगिरीला वाव देणारा आहे. जात पडताळणी समितीमध्ये केवळ शासकीय अधिकारी असतात, ज्यांना दिवाणी प्रक्रिया संहिता (Civil Procedure Code) व भारतीय पुरावा कायदा यांचे सखोल ज्ञान असणे अपेक्षित नाही. एकतर दिवाणी न्यायालयाचे दरवाजे या कायद्याने बंद केले आहेत आणि त्यात पडताळणी समितीच्या निकालावर अपीलाची कुठलीही तरतूद नाही. नवनीत राणा यांची जात ‘मोची’ आहे किंवा नाही, याबाबत मला भाष्य करायचे नाही. परंतु त्यांनी एका पाठोपाठ एक सादर केलेले अनेक दस्तऐवज हे बनावट असल्याचे आढळून आले आहे. खुद्द जात पडताळणी समितीने देखील अनेक दस्तऐवज हे ग्राह्य मानलेले नाहीत. खोटे दस्तऐवज दाखल करून लबाडीने जातीचे प्रमाणपत्र मिळविणे हा २०००च्या कायद्यानुसार दखलपात्र व अजामीनपात्र अपराध मानला आहे. शिवाय आय.पी.सी. मधील कलम ४६८ व ४७१च्या तरतुदींनुसार, अशा स्वरूपाच्या अपराधासाठी सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रात त्या बनावट दस्तऐवजांची दखल घेतलेली नाही.