पंडित नेहरू-एडविनाची उत्कट प्रेमकहाणी

लॉर्ड माऊंटबॅटन, एडविना व पंडित नेहरू.भापद्मजा नायडूरताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि शेवटचे ब्रिटिश व्हॉईसरॉय व भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या पत्नी एडविना यांच्या प्रेमकहाणीला पुन्हा एकदा नव्याने उजाळा मिळाला आहे. एडविना यांची मुलगी पामेला माऊंटबॅटन हिने ‘इंडिया रिमेम्बर्ड’ या आपल्या पुस्तकात पंडितजी आणि एडविनाच्या प्रेमसंबंधाबाबत पुस्तकातील ‘A Special Relationship’ या प्रकरणात सविस्तर माहिती दिली आहे. ती म्हणते, ‘माझी आई व पंडितजींमध्ये अतिशय उत्कट प्रेम होतं यात वादच नाही. ‘दो जिस्म एक जान’ या प्रकारातील ते प्रेम होतं. मात्र ते कामवासनारहित (प्लेटॉनिक) प्रेम होतं. मात्र त्यांच्यात कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध नव्हते. हे भावनिक प्रेमसंबंध समजून घेणं लोकांसाठी अतिशय कठीण बाब आहे. मात्र ते तसेच होते. ते दोघेही एकाकी होते. पंडितजींच्या पत्नीचे निधन झाले होते. मुलीचं (इंदिरा गांधी) नुकतंच लग्न  झालं होतं. दुसरीकडे माझ्या आईलाही एकटेपणा वाटत होता. ती मुळातच अंतमरुख स्वभावाची होती. त्यामुळे त्यांच्या मनाच्या तारा जुळल्या असाव्यात. खरंतर माझी आई एडविनाच्या आयुष्यात पंडितजींच्या अगोदर काही पुरुष येऊन गेलेत. तिचे काही प्रियकर होते. त्यांचा वावर बेडरूमपर्यंत राहत असे. यामुळे माझ्या वडिलांना दु:खही होत असे. मात्र पंडितजींसोबतच्या आईच्या प्रेमसंबंधांची जातकुळी वेगळी होती.’आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पामेलाने आपल्या वडिलांनी तिच्या मोठय़ा बहिणीला जून 1948मध्ये लिहिलेल्या पत्रातील काही ओळी नमूद केल्या आहेत. ‘ती (एडविना) आणि जवाहरलाल एकत्र अतिशय गोड दिसतात. ते एकमेकांना शोभूनही दिसतात. जवाहरच्या सान्निध्यात ती अतिशय खूश असते. स्वाभाविकच घरातील वातावरण आनंदी असते.’

पामेलाच्या मते, ‘पंडितजी, एडविना, आपले वडील लॉर्ड

माऊंटबॅटन या तिघांमध्ये नात्याची उत्तम समज होती. एकमेकांबद्दलचा ठाम विश्वास होता आणि मर्यादांची जाणही होती.’ तिने या नात्याचा उल्लेख ‘Happy three some’ असा केला आहे. या नात्यात उत्कटता खूप होती हे पामेला नाकारत नाही. पंडितजींनी मार्च 1957मध्ये एडविनाला लिहिलेल्या एका पत्रातील ओळी तिने पुस्तकात नमूद केल्या आहेत. ‘अचानक मला जाणवलं आणि ते तुलाही जाणवत असेल की, आपण दोघेही एकमेकांमध्ये अतिशय खोलवर गुंतलो आहोत. कुठली तरी एक अनियंत्रित शक्ती आहे जिच्याबद्दल नेमकेपणाने मला सांगता येणार नाही. तिने आपल्याला एकत्र आणलं आहे. हे जेव्हा जेव्हा मला जाणवतं तेव्हा मी अतिशय उत्तेजित होतो. आनंदाने फुलून जातो. मात्र एडविना आपल्या नात्यातील काही किरकोळ पेच बाजूला झाले तर आपण एकमेकांसोबत आणखी उत्कटतेने बोलू शकू. कुठलीही भीती किंवा दडपणाशिवाय एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जाऊ शकू.’पंडितजी आणि एडविनाला एकमेकांबद्दल वाटत असलेल्या अनिवार ओढीचे असे अनेक प्रसंग पामेलाच्या पुस्तकात आहेत. ‘आपल्या आईच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 1960पर्यंत ही ओढ कायम होती. पंडितजी जवळपास रोज आईला पत्र लिहीत असे. ती पत्रे आकाशी रंगाच्या कागदावर ते लिहीत. अनेकदा त्या पत्रावर गुलाबाच्या पाकळ्या चिकटविलेल्या असे. त्या पत्रांमध्ये एकमेकांवरील प्रेमाव्यतिरिक्त राजकारणातील कटकटी आणि इतरही विषय असत. 1948मध्ये माऊंटबॅटन कुटुंबाने भारत सोडल्यानंतर एडविना दोनदा भारतात आली होती. त्या वेळी तिचा मुक्काम पंडितजींच्या तीन मूर्ती हाऊसमध्येच होता. तिला सरकारी पाहुण्याचा दर्जा असे. पंडितजी जेव्हा-केव्हा इंग्लंडला जात तेव्हा तेसुद्धा माऊंटबॅटन कुटुंबाच्या हॅम्पशायरमधील ब्रॉडलॅण्ड्स इस्टेटमध्ये मुक्काम करत. वर्षातून किमान एक किंवा दोन वेळा ते भेटायचे. त्यांचे नाते खूपच अनौपचारिक होते. ती पंडितजींना जवाहरच म्हणे, तर तेसुद्घा एकेरी नावाचेच तिला हाक मारायचे.’

‘जवळपास 12 वर्षाच्या प्रेमकहाणीत पंडितजींना एडविनाला जवळपास एक मोठी सुटकेस भरेल एवढी पत्र लिहिलीत. एडविनाचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तिच्या पलंगावर सभोवताल नेहरूंनी लिहिलेली पत्रे होती. ती पत्रे वाचून तिला समाधान, शांतता मिळत असे.’ (एडविनाच्या निधनानंतर पंडितजींनी तिच्या अंत्यसंस्कारासाठी भारतीय नौसेनेची एक छोटी नौका पाठविली होती. त्यावरील सैनिकांनी तिला मानवंदना दिली होती.) या प्रेमसंबंधाच्या स्वरूपाबाबत लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मनातील घालमेलही पामेलाने पुस्तकात रेखाटली आहे. ‘माझ्या वडिलांनी आई गेल्यानंतर पंडितजींनी तिला लिहिलेली पत्रे मला वाचायला सांगितली. त्यांच्या मनात किंचित, किचिंत., किंचित शंका होती. पण मी जेव्हा त्यांची पत्रे वाचली तेव्हा त्यांना आश्वस्त करू शकले. मी त्यांना म्हणाले, ते दोघेही एकमेकांना खूप तीव्रतेने हवे होते. मात्र तुम्ही विचलित व्हावं असं त्यांच्या नात्यात काहीच नव्हतं.’ आपली आई पंडितजींच्या जीवनात आली तेव्हा त्यांचं वय 58 तर एडविनाचं वय 45 असल्याची माहितीही ती पुस्तकात देते. या दोघांमध्येच प्लेटॉनिकच प्रेम होतं हे पामेला खूप ठामपणे सांगते. भारताच्या फाळणीदरम्यानच्या घडामोडींवर ‘फ्रीडम अँट मिडनाइट’ या पुस्तकाचे लेखक डॉमिनिक लॅपिए आणि लॅरी कॉलिन्स यांचेही मत असेच आहे. ते म्हणतात, ‘नेहरू आणि लेडी माऊंटबॅटन या दोघांमध्ये वेगळ्या प्रकारचे विशेष असे प्रेमबंध आढळत होते. यात यत्किंचितही शंका नाही. मात्र आम्हांला असा एकही पुरावा आढळला नाही की, ज्याचा आधार घेऊन त्या प्रेमबंधाची खिल्ली उडवावी. कारण ते प्रेम सर्वस्वी प्लेटॉनिक होते. त्या प्रेमबंधांना वैषयिक कलंक बिलकूल लागलेला नव्हता. पंडित नेहरूंच्या निवासाची देखभाल करणार्‍या सेवकांकडेही आम्ही बारकाईने चौकशी केली. त्यांनीही आम्हांला निक्षून सांगितले. ‘नाही, ती दोघे एका खोलीत कधीही झोपलेली दिसली नाहीत. तसला कुठलाही पुरावा नाही.’ अर्थात सर्वानाच हे मान्य आहे अशातला भाग नाही. ‘एडविना आणि नेहरू’ या प्रसिद्ध पुस्तकाची

फ्रेंच लेखिका कॅथरिन क्लिमेंट म्हणते, ‘नेहरूंचे आणि एडविनाचे प्रेमसंबंध बर्‍याचअंशी प्लेटॉनिक होते; पण नेहमीच नाही. ‘Mostly, but not always’. कॅथरिनाने एडविना माऊंटबॅटनने आपल्या नवर्‍याला लिहिलेली काही पत्रेही पुस्तकात टाकली आहेत.एका पत्रात एडविना म्हणते, ‘आमच्या पत्रापत्रीवरून तुझ्या लक्षात येईल की, आमचं नातं मोठं अद्भुत, चमत्कारिक आहे. बर्‍याचअंशी ते आध्यात्मिक आहे. जवाहरचं माझ्या आयुष्यात खूप वेगळं महत्त्व आहे. तसंच माझंही त्याच्या आयुष्यात आहे.’

पंडितजी आणि एडविनाच्या प्रेमकहाणीवर एक चित्रपटही काढण्याचा प्रयत्न झाला होता. ह्यूज ग्रँट हा अभिनेता नेहरूंची तर केट ब्लँचेट एडविनाची भूमिका साकारणार होते. अँलेक्स व्हॉन या लेखकाच्या ‘इंडियन समर’ या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार होता. मात्र भारत सरकारने या चित्रपटाबद्दल नकारात्मक धोरण अवलंबविलं. त्या चित्रपटात नेहरू आणि एडविनात कुठलेही अंतरंग दृश्य दाखविणार नाही, अशी अट घालण्यात आली होती. पुढे तो चित्रपटच बारगळला. असाच प्रकार नेहरूंनी एडविनाला लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहाबाबतही झाला. ही पत्रे पुस्तकस्वरूपात यावी, असे प्रयत्न काहींनी केले. मात्र भारतातील जनतेला ते आवडणार नाही असे सांगत त्या पुस्तकाला परवानगी नाकारण्यात आली. भारतीय जनता नेत्यांना माणूस म्हणून का स्वीकारत नाही? याचा पाश्चात्त्य लेखकांना मोठा पेच पडतो. ‘स्वत: स्खलनशील असले तरी नेत्यांनी मात्र आदर्शच असलं पाहिजे. त्याला काही वैयक्तिक भावभावना नसल्या पाहिजे असंच भारतीय जनतेला वाटतं की काय?’, असं निरीक्षण जॅनेट मॉर्गन या लेखकाने भारतीयांबद्दल नोंदवून ठेवलं आहे. खरंतर एडविना ही काही पंडितजींच्या आयुष्यातील पहिली स्त्री नव्हती. एडविनाच्या अगोदर जवळपास 11 वर्षे सरोजिनी नायडू यांची देखणी कन्या पद्मजा नायडू हिच्यासोबत पंडितजींचे प्रेमसंबंध होते. तिला ते ‘बेबी’ या नावाने हाक मारत. तिलाही त्यांनी भरपूर पत्रे लिहिली आहेत. त्यादरम्यान काही महिने पद्मजा नायडू नेहरूंच्या निवासस्थानीही राहत. पंडितजींची बहीण विजयालक्ष्मी पंडित यांनी याबाबत त्यांना सावध केल्यानंतर पद्मजा दुसरीकडे राहावयास गेल्या. मात्र त्यांचं प्रेम कायम होतं. एका पत्रात पंडितजींनी लिहिलं होतं. ‘मी ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना बरंच काही भोगावं लागतं. माझं प्रेम कमी होत नाही. पण इतर अनेक बाह्य गोष्टी, भावना, कर्तव्ये वरचढ होतात..मी माझ्या प्रिय व्यक्तीला कवेत घेतलं तरी कित्येकदा माझं मन कुठेतरी भरकटत जातं आणि मी स्वत:लाच परका होऊन जातो. मी वर्तमानकाळ विसरतो. स्वत:कडे तटस्थपणे पाहू लागतो.’ या पद्मजा नायडूंना पंडितजींनी पुढे बंगालचं राज्यपाल केलं होतं. कमला नेहरूंच्या निधनानंतर एकाकी झालेल्या पंडितजींचे नाव मृदुला साराभाई आणि वाराणसीच्या संन्यासिनी श्रद्धा मातेसोबतही जोडले गेले होते. ही सारी प्रकरणं आता इतिहासजमा झाली आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पंडित नेहरू हा माणूस कोणालाही हवाहवासाच वाटायचा.स्त्रियाचं काय, पुरुषही त्यांच्या प्रेमात पडत असे. तेव्हा देशातच नव्हे, तर परदेशातही ते कमालीचे लोकप्रिय होते. त्यांच्या एडविनासोबतच्या प्रेमसंबंधाचा फायदा घेऊन लॉर्ड माऊंटबॅटननी नेहरूंना फाळणीसाठी राजी करून घेतले, असा आरोप होता.े मात्र यात काहीही तथ्य नाही. देशहिताच्या कुठल्याही विषयात नेहरूंनी प्रेमसंबंध मधे आणले नाहीत. उलट एडविनासोबतच्या संबंधांमुळे माऊंटबॅटननी काश्मीर भारताला दिला, असा जोरदार आरोप फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये होत होता. एडविनासोबतच्या मधुर संबंधातून नेहरूंनी पाकिस्तानसोबतच्या सीमारेषा आपल्या मनाप्रमाणे आखून घेतल्या, असेही काही पाश्चात्त्य इतिहासकार मानतात.

(संदर्भ – इंडिया रिमेम्बर्स-पामेला माऊंटबॅटन, एडविना आणि नेहरू-कॅथरिन क्लिमेंट, इंदिरा-कॅथरिन फ्रँक, टाइम्स ऑफ इंडिया, डीएनए)

(लेखक दै. ‘पुण्य नगरी’चे वृत्तसंपादक आहेत.)

भ्रमणध्वनी : 8888744796

Previous articleमहात्मा फुलेंच्या विचारप्रसारासाठी झोकून देणारा माणूस
Next articleगाडगेबाबा, आम्हाला माफ करा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here