अर्थक्षेत्राचा खेला होबे: ‘एनपीए’ नावाचे फसवे जाळे

भाग ३ व ४

-आशुतोष शेवाळकर

यावर्षी ५ मे रोजी रिझर्व्ह बॅंकेने ‘कोविड रीलीफ’ साठी काही घोषणा जाहीर केल्यात. या सगळ्या घोषणा मागच्या वर्षीसारख्याच मदतीचा आव आणून केल्या गेलेल्या सावकारी थाटाच्या योजना आहेत. या योजना आधी समजून घेऊ.

या योजनांमध्ये ‘कोविड लोन बुक’, २५ कोटींच्या खालच्या खात्यांचे ‘रिस्ट्रक्चरिंग’ व 10 लाखांपर्यंतची छोटी नवीन कर्जे अशा तीन योजना आहेत. यात ‘रिस्ट्रक्चरिंग’च्या योजनेत थकीत व्याज (अॅक्युअर्ड इंटरेस्ट) भरण्यासाठी २ वर्षांची मुदत देण्याचं रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलं आहे. पण त्यासाठी ३१ मार्च २०२१ ला जी खाती ‘स्टँडर्ड’ असतील त्यांनाच ही योजना लागू होईल असे म्हटले आहे. ३१ मार्च २०२१ ला ‘स्टँडर्ड’ असलेल्या खात्यावर ५ मेपर्यंतच्या या ३४ दिवसांत थकीत व्याज असेलच कसं आणि असलं तरी ते असं कितीसं असेल? त्या एव्हढयाशा व्याजाकरता ही २ वर्षांची मुदत दिल्या गेली आहे कां? आणि ३१ मार्च २०२१ ला जी खाती ‘स्टँडर्ड’ नसतील त्यांच्या विषयी काय धोरण ठेवायचे याविषयी रिझर्व्ह बॅंक या परिपत्रकात काहीच उल्लेख करत नाही.

‘कोविड लोन बुक’ या दुसऱ्या योजनेत सगळ्या आरोग्याशी संबंधित उद्योगांना व ‘पेशंटस्’ना ‘ट्रीटमेंट’साठी कर्जे देण्यासाठी बँकांना ५०,००० कोटींची रक्कम ४ टक्के व्याजानं देण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केली आहे. या ५०००० कोटी रुपयांत बँकांनी आरोग्याशी संबंधित असलेल्या उद्योगांना स्वस्त दराने कर्जे घ्यावीत अशी रिझर्व्ह बॅंकेची या मागे अपेक्षा आहे. या योजनेत इतर कोणत्याही उद्योग धंद्यांचा समावेश नाही.

याव्यतिरिक्त छोट्या बँकांना १०,००० कोटींची रक्कम नवीन १० लाखांपर्यंतची कर्जे देण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं देऊ केलेली आहे. याही योजनेचा जुन्या कर्जदारांना काही फायदा नाही. शिवाय ही १० लाखांपर्यंत रकमेची नवीन कर्जे कुणाला द्यायची, त्यांची अर्हता काय, त्यासाठी तारण काय अपेक्षित आहे या तपशिलांचाही या योजनेत काहीच उल्लेख नाही. अशा कर्जांपासून साध्य काय होणार, रोजगार किती उभा होणार असे या योजनेमागच्या विचाराचे पण काहीच तपशील यात दिलेले नाहीत. आजची गरज म्हणून सहज उपलब्ध असलेली ही रक्कम उचलायची व त्यानंतर व्याजाच्या चक्रात अडकून आणखीन तळात जायचं असं या नवीन कर्जांच्या बाबतीत होऊ शकतं. किंवा यातली अर्धी कर्जे परत येणार नाहीत या तयारीनंच ही योजना जाहीर करण्यात आलेली असावी कदाचित.

कोविडच्या या वर्षभराच्या काळात आयुष्यातून पूर्णच उठलेल्या आणि कर्जाची रक्कम कमीजास्त करून, घरदार विकून ती भरून मोकळं होऊ इच्छित असलेल्यांसाठी ओटीएस (OTS : One Time Settlement) वगैरे अशा अपेक्षित असलेल्या कुठल्याच योजना रिझर्व्ह बॅंकेनं या घोषणेत जाहीर केलेल्या नाहीत.

तसेच ‘रिस्ट्रक्चरिंग’मध्ये सुद्धा अशा आपत्तीच्या वेळी लॉकडाऊनच्या पूर्ण बंद काळाचं व्याज न आकारणं, आपत्तीच्या या वर्षा-दोन वर्षांच्या काळाचा व्याजदर कमी करणं व या काळाएवढी मुदत सगळ्या कर्जांना वाढवून देणं हाच एकमेव ‘सेन्सिबल’, ‘प्रॅक्टिकल’ उपाय, उपचार करण्याऐवजी रिझर्व्ह बँकेनं मागील वर्षाच्या योजनांसारखीच आणखीन एक आत्ममग्न योजना जाहीर केलेली आहे.

गेल्या वर्षभराच्या अनुभवातून सत्य परिस्थिती दिसत असून व या वर्षी त्यापेक्षाही विदारक परिस्थिती असताना आता पुन्हा तशीच योजना जाहीर केल्यानं काय साध्य होणार आहे हे कळत नाही.

अशा योजना जाहीर करण्यात नुस्ती आत्ममग्नताच नाही तर लोकांना गृहीत धरण्याचा दर्प सुद्धा जाणवतो. देशाची सर्वोच्च आर्थिक संस्था म्हणुन लोकांच्या असलेल्या निस्सीम श्रद्धेमुळे आपण करू तीच या देशात पूर्व दिशा ठरते अशा गेल्या ७० वर्षांच्या अनुभवामुळे हळूहळू हे गृहीत धरणं येत गेलं असावं.

या निमित्ताने मागच्या वर्षी रिझर्व्ह बँकेने ‘कोविड रीलीफ’ साठी काय योजना जाहीर केल्या होत्या व त्याचं पूढे काय झालं याचाही आढावा यावेळी घेणे आवश्यक आहे.

मागच्या वर्षी रिझर्व्ह बँकेनं याच वेळी घोषित केलेल्या योजनेमध्ये आधी कर्जाच्या एप्रिल व मेच्या हप्त्यांना ३० जून २०२० पर्यंतचे ‘मोरेटोरियम’ घोषित करून ते हप्ते ३० जूनपूर्वी यांच्या व्याजावरील व्याजासहित वसूल करण्याच्या बँकांना सूचना दिल्या होत्या. हे साध्य न झाल्यावर ३० जून नंतरच्या घोषणेत मग हे ‘मोरेटोरियम’ त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत वाढवलं आणि ३० सप्टेंबरच्या आधी सगळे हप्ते, त्यांच्यावरच्या चक्रवाढ व्याजासकट भरण्यास सांगितलं होतं.

या घोषणेचा अव्यावहारिकपणा खालील काही उदाहरणांनी सहज स्पष्ट होईल. ज्यांनी गृह किंवा वाहन कर्ज घेतलं असेल व ज्यांना लॉकडाऊन काळाचा पगार मिळाला नसेल किंवा अर्धा पगार मिळाला असेल त्यांनी नंतरच्या तीन महिन्यांच्या पगारात लॉकडाऊन काळात त्यांच्यावर झालेली उधारी, कर्ज तर फेडावेच, शिवाय या तीन महिन्यांच्या पगारातच ६ महिन्यांचे हप्ते व व्याज भरावं किंवा ज्यानं ट्रक किंवा टॅक्सीसाठी कर्ज घेतलं असेल त्यानं बंदच्या ९० दिवसांनंतर उरलेल्या १०५ दिवसांत १९५ दिवस ट्रक किंवा टॅक्सी चालवून हप्ते व व्याज भरावं किंवा हॉटेलनं १०५ दिवसांत १९५ दिवसांचं बुकिंग मिळवून पैसे भरावेत किंवा कारखान्यांनी १०५ दिवसांत १९५ दिवसांचं उत्पादन करावं आणि तेही नंतर वाढणाऱ्या मंदीच्या काळात विकावं, दुकानदारांनी १०५ दिवसांत आधी १९५ दिवसांत विकत असतील तेवढा माल विकावा, असं अशक्य ते साध्य होईल अशी अपेक्षा करणारी, वास्तवाचं भान नसलेली ही घोषणा होती.

मुळातच अव्यावहारिक असल्यामुळे ही योजना अर्थातच साध्य न झाल्यानं मग रिझर्व्ह बॅंकेनं ३० सप्टेंबरनंतर, हप्त्यांना ३० सप्टेंबरपर्यंतचा ‘मोरेटोरियम’ व त्या हप्त्यांचा भरणा मार्च २०२१ पूर्वी करावा, अशी योजना जाहीर केली. या सर्व योजनांचे एकत्रित परिणाम म्हणून डिसेंबरमध्ये बरीच खाती ‘एनपीए’ झालीत व त्या कर्जदारांचे फ्लॅटस्, मालमत्तांचा जाहीर लिलाव करणाऱ्या विविध बँका आणी ‘वित्तीय संस्थां’च्या जाहिरातींनीच वृत्तपत्रांची पाने फेब्रुवारी व मार्च या महिन्यांमध्ये मग भरलेली होती.

ग्रामीण भागात सामान्य शेतकरी करतो तसे ‘हे’ खत देऊन पाहू, नाही जमलं तर मग ‘ते’ देऊन पाहू असे ‘ट्रायल अँड एरर’चे धोरण भारतीय अर्थव्यवस्थेच्या या सर्वोच्च थिंकटॅंकला आणि तेही अशा कठोर कसोटीच्या काळात का राबवावंसं वाटत असेल याची कल्पना नाही. असं केल्यानं वसुली वाढते, असा युक्तिवाद या बाबतीत असेल तर अशा दुर्मिळ आपत्तीच्या काळात रिझर्व्ह बँकेचा ‘फोकस’ ग्राहकांची हिंमत वाढवण्यावर असला पाहिजे, वसुलीसाठी तर उभा जन्म पडला आहे, असं म्हणावंसं वाटतं.

……………………………………..

‘एनपीए’ नावाचे फसवे जाळे…

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार ९० दिवस कुठल्याही खात्यावरचं व्याज वा हप्ते भरले गेले नाहीत तर त्या खात्याला ‘एनपीए’ ( non performing asset )ठरविणे कुठल्याही बँकेला भाग आहे. यात ८ वर्षांच्या कर्ज मुदतीपैकी गेली ७ वर्षं नियमित हप्ता भरलेलं, पण शेवटच्या वर्षीचे पहिले ३ हप्ते न भरू शकलेलं खातं आणि पहिल्याच वर्षांत ३ हप्ते न भरलेलं खातं हे दोन्ही पण ‘एनपीए’ ठरतात. असा अगदी दोन टोकाच्या खात्यांना बरोबरीत आणून ठेवणारा हा ‘मेकॅनिकल’ नियम आहे.

एक कर्जदार एका बँकेचा २५-३० वर्षांपासूनचा जुना गिऱ्हाईक असेल व आतापर्यंतच्या त्याच्या इतर कर्जांच्या व्याजापोटीच आता घेतलेल्या नवीन कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम त्यांनी या आधीच्या काळात त्या बँकेला दिलेली असेल, तरीही या नवीन कर्जाचे मधले सलग ३ हप्ते तो भरू शकला नाही तरी तो त्या बँकेसाठी ‘नॉन-परफॉर्मिंग’ ठरतो. गेली २५-३० वर्षं मेहनत करून, जोखीम घेऊन, ‘परफॉर्म’ करून त्या बँकेला व्याजाची कमाई करून देणारं खातं तिच्यासाठी ३ महिन्यांतच ‘नॉन-परफॉर्मिंग’, नकोसं होतं ही कल्पनाच असह्य आहे. (सुदैवानं ‘डायव्होर्स’च्या बाबतीत असे ‘नॉर्मस’ नाहीत ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे!!) त्या विशिष्ट ३ महिन्यांच्या काळातील त्याच्या व्यवसायाची ‘मार्केट कंडिशन’, त्या काळातल्या त्याच्या इतर काही अडचणी, त्याचं आजवरचं चारित्र्य या इतर कुठल्याच बाबींचा विचार त्याला ‘नॉन-परफॉर्मिंग’ ठरवताना केला जात नाही.

‘वर्ल्ड बँके’च्या काही सूचनांवरून रिझर्व्ह बँकेनं हा नियम केला असावा; पण सगळ्या जगामध्ये गृह कर्जांवर ३ टक्के आणि व्यापारी कर्जांवर ६-७ टक्के व्याज आकारलं जातं, तेच आपल्या इथे गृह कर्जांवर ८, ९ व व्यापारी कर्जांवर ११ ते १६.५० टक्क्यांपर्यंत पर्यन्त व्याज आकारलं जातं. हा फरक दुपटीपेक्षा जास्त आहे. पगाराची रक्कम आपल्या इथे इतर देशांपेक्षा बरीच कमी असते. नफ्याची टक्केवारी सगळ्या जगात सारखीच असते; पण व्याजदरातील या फरकामुळे हप्त्याची रक्कम मात्र आपल्या इथे दुप्पट होत असते, ही बाब तरी रीझर्व्ह बँकेनं इथं विचारात घ्यायला हवी होती.

एखादं खातं ‘एनपीए’ ठरण्याचा सगळ्यात भयंकर परिणाम म्हणजे मग त्या खात्यालाही ‘सेक्युरीटायझेशन अॅक्ट’ लागू केला जाऊ शकतो. या मूळ कायद्यात कर्जदारांवर ही कारवाई करण्यासाठी ते कर्ज ‘एनपीए’ होणं एवढाच संदिग्ध उल्लेख आहे व कोणतं खातं ‘एनपीए’ आहे हे ठरवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं ‘एनपीए’साठी ठरवलेले ‘नॉर्मस्’ असा मोघम उल्लेख आहे.

रिझर्व्ह बँकेच्या वर लिहिलेल्या ‘नॉर्मस्’ अनुसार त्यामुळे २००२ ते २०१३ ही ११ वर्षं हा कायदा वापरण्याची मुभा ९१ व्या दिवशीच मिळत होती. आजही तांत्रिकदृष्ट्या तशी ही मुभा ९१ व्या दिवशीच आहे.

हा कायदा वापरल्या जाण्याचे किती भयानक दुष्परिणाम होत असतात याची सविस्तर चर्चा पुढच्या लेख क्रमांक ५ मधे केलेली आहे.

त्यानंतर रिझर्व्ह बँकेनं २०१३,१४,१५ या सलग तिन्ही वर्षी एक एक ‘मास्टर सर्क्युलर’ जारी करून ‘एनपीए’ खात्यांची ‘सब-स्टँडर्ड’, ‘डाऊट फुल’ व ‘लॉस अॅसेट’ अशी वर्गवारी केलेली आहे. पण ही वर्गवारी मुख्यत: बँकांना त्यांच्या ‘बॅलेन्स शीट’मध्ये अशा खात्यांसाठी २५,५० वा १००टक्के ‘प्रोव्हीजन’ करायला लावण्यासाठी केलेली आहे. कोणत्या वर्गवारीतल्या खात्यांना ‘सेक्युरीटायझेशन अॅक्ट’ वापरावा याचा या ‘सर्क्युलर’मध्ये उल्लेख नाही. बँकानीच मग स्वतःचा तारतम्य भाव वापरून अमुक वर्गवारीच्या वर या कायद्याचा वापर करावा असं स्वतःसाठी धोरण ठरवून घेतलेलं आहे. पण मूळ कायद्यानुसार खरं तर तांत्रिकदृष्ट्या ९१ व्या दिवशीच त्यांना हा कायदा वापरण्याची मुभा आहे.

‘एनपीए’चे ‘नॉर्मस्’ सुरुवातीला ठरवताना रिझर्व्ह बँकेचा मूळ उद्देश तोपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांचं ‘बॅलन्स शीट’मधून जे तोटा लपवणं चालायचं, त्याला आळा घालण्याचा असेल; पण ‘सरफेसी अॅक्ट’ 2002 मधे लागू झाल्यावर या ‘नॉर्मस्’ अनुसार जर तो कायदा लागू करणं क्रमप्राप्त होत असेल तर ‘सरफेसी’ कायदा लागू करण्यासाठीचे वेगळे ‘नॉर्मस्’ रीझर्व्ह बँकेनं निर्देशित करायला पाहिजे होते; पण गेल्या १९ वर्षांत हे झालेलं नाही आहे. कायद्याचा ‘लूज एंड’ म्हणून असं ‘डिस्क्रिशन’ कुठल्याही बँक वा ‘वित्तीय संस्थेकडे’ असणं ही धोक्याचीच बाब आहे.

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

[email protected]