-डावकिनाचा रिच्या
…………………………
‘ये क्या जगह है दोस्तों, ये कौन सा दयार है
हद-ए-निगाह तक जहाँ गुबार ही गुबार है’
(ही कोणती जागा आहे मित्रांनो, ही कोणती दुनिया आहे
जिथंपर्यंत नजर जाईल, धुळीचेच लोट दिसत आहे)
‘उमराव जान’ चित्रपटामधील गीतात शहरयार यांनी लिहिलेल्या वरील ओळी नंदा खरे यांचं नवं पुस्तक “बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन” वाचून झाल्यावर आठवतात. अर्थशास्त्रावरील एखाद्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी शायरीचा वापर तुम्हाला आश्चर्यजनक वाटला असेल परंतु पुस्तक वाचून बाजूला ठेवल्यावर मनातून आलेली ही उस्फूर्त प्रतिक्रिया. अर्थशास्त्रात पीएचडी केलेल्या अस्मादिकांना अनेक नव्या बाबी, नवे दृष्टिकोन या पुस्तकातून समजले.. आपणासी जे “भावे”.. ते इतरांना सांगावे या उक्तीप्रमाणे या पुस्तकाचा परिचय करून देण्यावाचून राहावले नाही.
पिढी दरपिढी जीवनाची मूल्यं बदलत जातात आणि अर्थव्यवस्थेची मूल्यं हरवत जातात. या मूल्यहीन होत चाललेल्या अर्थव्यवहारांवर नंदा खरे सरांनी केलेलं हे मुक्तचिंतन. अतिशय महत्त्वाचा हा विषय मनोविकास प्रकाशनाने अतिशय सुंदर पुस्तकाच्या स्वरुपात आपल्यासमोर आणला आहे. वाचकांशी गप्पा मारल्याप्रमाणे अतिशय सोप्या भाषेत आणि नेहमीच्या जीवनातील उदाहरणं देऊन खरे सर हा अवघड विषय अतिशय सोपा करून सांगतात. आणि आपण रोज आसपास अनुभवत असलेल्या बाजारव्यवस्थेचे अनपेक्षित पैलू आपल्याला दिसू लागतात.
