जगण्याची जिगर…   

– आशुतोष शेवाळकर

साहित्य किंवा कुठल्याही कलेचा मूळ उदेश जसा नुसत्याच रंजनाचा नसून उन्नयनाचा देखील असायला हवा, तसाच तो प्रवासाचाही असायला पाहिजे असं मला वाटतं. प्रवासात आपण वेगळे प्रदेश, वेगळी जीवन शैली, वेगळ्या चालीरीती बघतो हे सगळं आपलं,आतलं मन टीपकागदासारखं टिपून घेत असतंच. पण कधी कधी प्रवासात अगदीच वेगळ्या प्रकारची, प्रवृत्तींची माणसं भेटतात, तर कधी काही वेगळे, संपन्न करणारे अनुभव येतात. असं काही झालं की त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळत असतं. प्रवासात भेटलेल्या अशाच एका माणसाचा अनुभव आपल्यासोबत आज ‘शेअर’ करतो आहे. आता सुरू झालेल्या युक्रेन युद्धामुळे मला हा प्रसंग आठवला.

बाबांच्या व्याख्यानाच्या दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सगळेच कुटुंबीय एकदा अमेरिकेत होतो. लॉस एंजेलीसच्या  व्याख्यानानंतर तिथून जवळच असलेली ‘डिस्नेलँड’ बघायला आम्ही गेलो. त्यादिवशी का कोणजाणे सकाळपासूनच मन उदास व कमजोर होतं. आयुष्यातल्या दु:खांची अटळता, त्यांची ‘अँग्झायटी’ व अशा अवस्थेत यावा तसा आयुष्याविषयी निराशेचा व असहाय्यतेचा सूर मनाला होता. वैद्यकीय शास्त्रात कुठलंच कारण सापडत नसलेल्या तापाला PUO (Pyrexia of Unknown Origin) असं म्हणतात. म्हणून मनाची अशी अवस्था एखाद दिवशी आली की मी तिला  DUO (Depression of Unknown Origin) असं म्हणत असतो. आपल्या मनाला अशी अवस्था येण्याचं चिमटीत धरावं असं कुठलंच कारण आपल्याला अशा वेळी सापडत नसतं.

‘डिस्ने’मधली सगळ्यात ‘रीस्की’ म्हणून ‘स्पेस माऊंटन’ ही ‘राईड’ प्रसिद्ध आहे. आकाश पाळण्यात असतात तसे यात उघडे पाळणे असतात. पण इथे आपल्या समोर वा मागे वा बाजूला कुठलेच पाळणे नसतात. झिगझॅग असे ते कुठेही लावलेले असतात व बसण्याच्या वा उतरण्याच्या वेळीच फक्त ते ‘प्लॅटफॉर्म’जवळ येत असतात. ‘राईड’ सुरू झाल्यावर डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही इतका काळाकुट्ट तिथे केलेला अंधार असतो. एका पाळण्यात फक्त दोन माणसं असतात व आपल्या अगदी बाजूला बसलेला माणूस देखील आपल्याला दिसू नये इतक्या घनघोर अंधाराची आत व्यवस्था असते. उघड्या अंतराळयानातून गुरुत्वाकर्षण नसलेल्या अंतराळातल्या काळोखात आपण फिरतो आहोत असा हा आभास निर्माण केला जातो. मध्येच एखाद्या ग्रहगोलावर जाऊन भिडतो की काय असं वाटावं इतक्या वेगानी आपला हा पाळणा त्या ग्रहापर्यंत जातो व अचानक जवळ जाऊन कच्चकन ‘ब्रेक’ मारल्यासारखा थांबतो. मधेच हा पाळणा डावीकडे कलंडतो, उजवीकडे कलंडतो, सर्रकन खाली येतो, असे अनेक ‘थ्रील’ चे प्रकार या ‘राईड’मध्ये आहेत. पण अंतराळातला अंधार, लुकलुकणारे तारे, जवळून गेलो की दिसणारा एखादा ग्रह असं सगळं वातावरण या ‘राईड’ भर कायम असतं.

‘डिस्नेला’ चाललो म्हटलं की कुणीही अमेरिकेत या ‘राईड’ विषयी बोलायचे, इतकी प्रचंड लोकप्रियता व भीति या ‘राईड’विषयी तेव्हा अमेरिकेत सगळीकडे होती. ब्लड प्रेशर, डायबेटीस, हृदय विकाराचा त्रास असला तर, वा वृद्धांनी ही ‘राईड’ घेऊ नये, असे बजावणाऱ्या स्पष्ट सूचना डिस्नेमध्ये जागोजागी तेव्हा लागलेल्या होत्या.

मी ती ‘राईड’ घेण्याचा निर्णय घेतला. आई, बाबांसकट सगळ्यांची तिकीटं काढलीत. इतक्या दूर आल्यावर या अनुभवाच्या संधीपासून कुणीच का मुकावं, असं वाटत होतं. आई-बाबांना घेऊन ‘राईड’ ला बसणार आहोत, या ‘जोखमी’चा ताणही मनावर होताच. पण त्यांचं आता इथे पुन्हा कधी येणं होईल, आत्ता नाही केलं तर कदाचित त्यांचं आयुष्यात हे करणं राहूनच जाईल, अशा विचारांनी मी हा निर्णय घेतला होता.

बाबांना तेव्हा हृदयविकाराचा त्रास सुरू झालेला नव्हता, पण गुडघ्यांचा त्यांना खूप त्रास होता. ‘डिस्ने’चा परिसर खूपच मोठा आहे व या राईडपासून त्या राईडपर्यन्त जायला इथे चालावं पण खूप लागतं.  म्हणून त्यांच्यासाठी आम्ही ‘व्हीलचेअर’ घेतली. तसंही ‘डीस्ने’मधे तिकिटासाठी, प्रत्येक ‘राईड’ साठी लोकांच्या मोठ्या रांगा असतात. ‘व्हीलचेअर’ वाल्यांची रांग अगदीच छोटी असते व चटकन नंबर लागतो.  त्यामुळे तुम्ही ‘व्हीलचेअर’ घ्याच अशी ‘टिप’ आम्ही जांच्याकडे उतरलो होतो त्यांनी आम्हाला आधीच दिलेली होती. ‘व्हीलचेअर’मुळे तिकीटही आम्हाला चटकन मिळालं व प्रत्येक राईड साठीही छोटी रांग असल्याने चटकन एक ‘राईड’ संपवून आम्ही दुसऱ्या ‘राईड’ साठी जाऊ शकत होतो.

‘स्पेस माऊंटन’ साठी रांगेत उभं असतांना ‘व्हील चेअर’ वर एक माणूस आपल्या लहानग्या पोराला घेऊन माझ्या मागे येऊन उभा राहिला. त्याच्याकडे लक्ष गेल्यावर त्याला मांडीच्या खाली दोन्ही पाय व एक हात नाही आहे हे लक्षात आलं. गेलेल्या हाताच्या जागी त्यानी एक यांत्रिक हात लावलेला होता. केवळ एका हाताच्या भरवशावर व्हील चेअर चालवत व मांडीच्या खुंटावर मुलाला बसवून तो ‘राईड’ घ्यायला आला होता. तसा तो उंच, धिप्पाड व भरदार शरीरयष्टीचा होता. सिंहकटी सारखी त्याची बारीक, पीळदार कंबर व एक हात नसला तरी भरदार व रुंद खांदे, उंच व पीळदार मान, या सर्व गोष्टी त्याचे आधीचे व्यायामाने कमावलेलं ‘व्यक्तिमत्त्व’ लक्षात आणून देत होत्या. ‘खंडहर बताते है की इमारत भी कभी बुलंद थी’ असंही त्याचं झालेलं नव्हतं. इमारतीचे उरलेले सगळे भागही एकदम बुलंद होते.

उत्सुकतेपोटी ‘हाय..’ करून मी त्याच्याशी संवाद सुरू केला. त्यातून कळलं की तो आधी ‘अमेरिकन एअरफोर्स’मध्ये पायलट होता. जॉर्ज बुशनी सद्दाम हुसेनशी छेडलेल्या इराक युद्धाच्या वेळी ‘फायटर पायलट’ म्हणून त्याला आघाडीवर पाठवण्यात आलं. तिथे एका बॉम्ब स्फोटात त्याचे दोन्ही पाय गेलेत. या घटनेमुळे ‘रिटायरमेंट’ व ‘पेन्शन’ मिळाल्यावर तो बाईकला हँड ब्रेक लाऊन घेऊन ती चालवत असे. चार वर्षांनी एकदा तिचाही अॅक्सिडेंट झाला व त्यात त्याचा एक हात कापावा लागला. अशाही अवस्थेत तो फिरायला लॉस एंजेलीसला व त्यातही डिस्नेला व त्यातलीही सर्वात कठीण ‘राईड’ घ्यायला आला होता आणि तेही आपल्या पाच सहा वर्षाच्या लहान मुलाला घेऊन.

त्याची जगण्याची ही जिद्द व जिजीविषु वृत्ती पाहून मला त्यावेळेसच्या स्वत:च्या तशा मनो:वस्थेची अतिशय लाज वाटली. शरमेपायी माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मनात विचार केला की तसं पहायला गेलं तर काय दु:ख आहे आपल्या आयुष्यात? आणि तरीही आपण अशी रडकी मनःस्थिती ठेवतो व उन्मळून पडावं, आपलं नशिबच खराब असं खात्रीनी वाटायला लागावं, अशा प्रसंगातून जावं लागूनही हा माणूस इतका उत्साही, आनंदी व भरभरून जगण्याची जिगर  असलेला आहे. एका हाताच्या भरवशावर व्हील चेअर घेऊन हा  प्रवासाला निघाला आहे. असे प्रसंग येऊन गेल्यावरही अशा ‘राईडस्’ घ्यायची त्याची हिंमत अजूनही जिवंत आहे व अशाही अवस्थेत आपल्या लहानग्याचे कोडकौतुकही तो पुरवतो आहे.

शाळेत शिकवल्या गेलेल्या ‘बी’ कवींच्या कवितेतल्या ‘कोडकौतुक किंचितही न पुरवता येता त्यांssचेss, तया बापाचे हृदय कसे होsतेss.’ या ओळी त्यांच्या चालीसकट मला तेव्हा आठवल्यात. या ओळींनी व विशेषता: त्या चालीचं संगीत मनात गुंजल्यानी अधिकच हळवं वाटायला लागलं. आपण त्याच्या जागी असतो तर आपली या परिस्थितीत कशी अवस्था झाली असती याची तंतोतंत कल्पना मनात उभी झाली. न्यूनगंड, शरम व पश्चातापाने माझं मन चिंब झालं. मग मी त्याची परवानगी घेऊन त्याचा फोटो काढून घेतला.

मी त्याला ‘मी तुझा फोटो काढू शकतो का,’ अशी विनंती केली. तो संकोचाने हो म्हणाला. आणि एक हात व दुसरा यांत्रिक हात व्हील चेअर च्या दोन हँडल वर टेकवून  ‘व्हीलचेअर’च्या सीटवरचं मांडीचे खुंटे टेकवून तो उभा झाला. असं करायची त्याला खरं तर काहीच गरज नव्हती. मी ‘व्हीलचेअर’ वर बसलेलाच त्याचा फोटो काढणार होतो. फोटो काढण्याचा मान आपल्याला कोणी देतो आहे म्हणून संकोचाने आणि शिष्टाचार म्हणून तो आपल्या मांडीच्या उरलेल्या खुंटांवरच उभा झाला होता. मी त्याचा फोटो काढला.

जेव्हा केव्हा आयुष्यात पुन्हा उदास होईन तेव्हा जिद्द, हिंमत, उभारी द्यायला हा तुझा फोटो मला inspiration ठरेल असं त्याला सांगितले. खिशातल्या कामांच्या छोट्या डायरीवर मी त्याचे हस्ताक्षर व सही घेतली. तोही सुखावला. एका समृद्ध संवादाचं समाधान मनात घेऊन मी मग ‘राईड’ साठी आत गेलो.

(‘महाराष्ट्र टाइम्स’ वरून साभार)

(लेखक शेवाळकर डेव्हलपर्सचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत)

9822466401

आशुतोष शेवाळकर यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –आशुतोष शेवाळकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

…………………………….

Watch-Disneyland Space Mountain Ride

Previous articleरसिकतेच्या झाडावर विहरणारा पक्षी…
Next article‘बाजार : मूल्यहीन अर्थव्यवहारांविषयीचं मुक्तचिंतन’: अंतर्मुख करायला लावणारे पुस्तक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here