#माणसं_साधी_आणि_फोडणीची (भाग आठ)
…………………………….
-मिथिला सुभाष
माझ्या मध्यमवर्गीय मनाला त्यावेळी जो धक्का लागला तो आजही तसाच आहे. पुरुष वेश्यावृत्ती करतो? हो.. जशी एकट्या पुरुषांना मोलाने मिळणाऱ्या स्त्रीची गरज असते, तशी गरज एकट्या स्त्रियांना देखील असते. फार पूर्वीही असायची.. केशवपन करायला येणाऱ्या न्हाव्यापासून गरोदर राहणाऱ्या तरुण विधवांच्या कहाण्या तुम्हीही ऐकल्या असतील.. पैसे घेऊन स्त्रीच्या सेवेला जाणाऱ्या अशा पुरुषांना ‘गिगोलो’ म्हणतात. आता काळ बदललाय.. स्त्री अधिक मुखरित झाली आहे. शहरात श्रीमंत स्त्रिया बदल म्हणून देखील या ‘गिगोलो’ना बोलावतात.. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात श्रीमंत शौक़ीन स्त्रियांसाठी पुरुष वेश्यांचे ‘स्ट्रिप टीज’ शोज आयोजित केले जातात. स्ट्रिप टीज म्हणजे एक एक कपडा उतरवत पूर्ण नग्न होणं! त्यात शहरातले सगळे नामांकित आणि मानांकित गिगोलो शामिल होतात. तिथेच परस्पर ओळखी होतात, फोन नंबर्सची देवाणघेवाण होते, ‘रेट्स’ विचारले जातात आणि व्यवसाय वाढतो हे पत्रकार म्हणून मला माहित होतं, पण माझ्या घरी एवढी वर्षं नवऱ्याचा मित्र म्हणून येणारा एकजण ‘त्या’ व्यवसायात आहे?
*******
अतिशय नम्र आणि ऋजु होता तो. उत्तरेतला कुठलातरी होता. पंजाबी असावा असं त्याच्या हिंदी उच्चारांवरून वाटायचं. मी कधी फार खोलात शिरले नाही. नवऱ्यानेही कधी मुद्दाम सांगितलं नाही. परमीत त्याचं नाव, माझा नवरा त्याचा उल्लेख ‘मीत’ असा करायचा. फिल्म लाईनमधले अनेक स्ट्रगलर माझ्या नवऱ्याच्या परिचयाचे होते आणि त्यांचा आमच्या घराशी संबंध नाही यायचा. कधीतरी नवरा आसपास गेलेला असतांना एखाद्याचा फोन उचलायचा आणि नवऱ्यासाठी निरोप घ्यायचा. कधीतरी एखादा दारात यायचा, फोटो वगैरे द्यायचा. अशा माणसांना गूळ-पाणी देऊन वाटेला लावायची मी. असाच एकदा परमीत आला. तो त्याच्या काही कामासाठी इंदौरला गेला होता आणि तिथून आमच्या कुटुंबीयांनी काही वस्तू पाठवल्या होत्या, त्या द्यायला तो आला होता. नवरा घरीच होता आणि परमीत येणार हे त्याला माहित होतं. त्यामुळे थोडं चहापाणी वगैरे झालं. माझ्याशीही जुजबी बोलणं झालं. म्हणजे भाभीजी, आप पत्रकार हैं ना? वगैरे.. मी त्याला पाहिलं ते तेवढंच. पण मनातून पुसला गेला नाही तो. सहा फुटाच्या वर उंच, रुबाबदार, गोरा, देखणा आणि वागायला, बोलायला निहायत तहजीबदार! एखाद्या ग्रीक देवतेचा पुतळा चालताबोलता झाल्यासारखा वाटत होता.
एक दिवस अचानक नवरा म्हणाला, मीतचा नर्वस ब्रेक डाऊन झालाय. मला तो मीत जरा प्रयासाने आठवावा लागला. आणि आठवला तेव्हा मी अवाक झाले. एवढ्या तरण्याबांड गड्याचा नर्वस ब्रेक डाऊन? माझ्यातला पत्रकार एकदम जागा झाला. (एकदा पत्रकार तो जन्मभर पत्रकार या न्यायाने अजूनही माझ्यातला पत्रकार जागाच असतो, असो!) मी माझ्या नवऱ्याला विचारलं काय झालं अचानक? नवऱ्याने आधी थातुरमातुर उत्तरं दिली. “सिनेमात काम करायला आला होता.. पण कामं मिळत नाहीत, मग काहीही करावं लागतं वगैरे..”
“काहीही? म्हणजे काय?”
या प्रश्नावर नवऱ्याने सांगितलेली माहिती मीतच्या पाँईंट ऑफ व्यू’ने सांगते.. तेव्हाच त्याच्यातला माणूस तुमच्यासमोर उभा राहील!
*******
देशभरातून सिनेमात काम करण्यासाठी तरुण येतात. काही चमकतात काही वाया जातात. मीत तसाच आला होता दहा वर्षापूर्वी. तोंड मिटलेलं असलं की हिरो दिसायचा पण बोलायला लागला की पंजाबी ऍक्संट! अनेकांनी त्याला सांगितलं की तुझ्या उच्चारांवर काम कर.. पण ते काही त्याला जमलं नाही. निर्मात्यांच्या ऑफिस आणि घरी खेटे मारता-मारता एक दिवस एका निर्मात्याच्या बायकोनं त्याला पाहिलं. बाई चाळीशीच्या वरची होती. आधुनिक होती. तिनं मीतशी राबता वाढवला. ही हिच्या नवऱ्याला सांगून आपल्याला काम मिळवून देईल अशी खात्री होती मीतला. घरून वडलांनी पैसे पाठवणं बंद केलं होतं. खोलीचं भाडं थकलं होतं. खायचे वांदे होते. अशा परिस्थितीत ती बाई आशेचा किरण वाटली मीतला.. आणि एक दिवस ती त्याला बेडरूममध्ये घेऊन गेली. मीत आधी बावचळला. पण अखेर पुरुषच. समोरची स्त्रीही काही कोणी ऐरीगैरी नव्हती. त्याच्यापेक्षा पंधरा वर्षं मोठी होती फक्त!
सगळं झाल्यावर तिनं मीतच्या हातात पाच हजार रुपये ठेवले. मीत हक्काबक्का! तिनं हसून सांगितलं, ठेव, तुझ्या कामी येतील, मी बोलवीन तेव्हा परत ये! तो बघतच राहिला. पण तिनं बोलावल्यावर जात राहिला. आधी ती.. मग तिच्या मैत्रिणी.. तिच्या क्लबमधल्या बायका.. रोजचं काम.. शिवाय सुखाचं आणि मोबदला म्हणून भरपूर पैसे!
आणि मीत गिगोलो झाला!
बायका त्यांच्या फर्माईशी त्याला फोनवर सांगायच्या. त्यानुसार तो पैसे वाढवायचा, कमी करायचा. असल्या एकही बाईच्या प्रेमात पडायचं नाही हे त्याने आधीच ठरवलेलं होतं. आणि काय पडणार प्रेमात? सगळ्या चाळीशीच्या वरच्या असायच्या. मीतची अजून तिशी पण आलेली नव्हती..
मूर्ख होता तो! प्रेमात पडण्याचा वयाशी काही संबंध नसतो हे त्याला कळायचं होतं.
काळ आपल्या वेगाने सरत होता. मीत पण आता तिशी पार करून आला होता. त्यानं मुंबईत एक छान घर घेतलं होतं. बाईक घेतली होती. त्याच्या अंगावर उत्तमोत्तम कपडे असायचे.. परफ्युम्स, सनग्लासेसची चंगळ होती. त्याचं वागणं-बोलणं एवढं आदबशीर आणि खानदानी होतं की त्यामुळेच त्याला जास्त ‘असाईनमेंट’ मिळायच्या. अचानक घरी कोणी आलं तर भाऊ, भाचा, पुतण्या म्हणून श्रीमंत घरात सहज खपून जाईल असा दिसायचा तो!
आणि एक दिवस त्याला ‘तिचा’ फोन आला. रेवा!
तिनं फोनवर त्याची आवश्यक ती माहिती विचारली. स्वत:ची जुजबी माहिती दिली. ती पन्नाशीची होती, म्हणजे मीतपेक्षा वीस वर्षं मोठी. पण अशा गोष्टींचा आता त्याला फरक पडणार नव्हता. त्याने फक्त बोलता-बोलता आरशात पाहून स्वत:ला एक स्माईल दिलं आणि मनाशी म्हणाला, पाच मिनिट में फुस्स हो जायेगी आंटी!
“पन्नास वर्षं? मी जास्त पैसे घेणार!”
तिनं शांतपणे हो म्हंटलं.
ठरल्या दिवशी, ठरल्या वेळी मीत तिच्या घरी पोचला. त्याच्या अंदाजाच्या विपरीत, बाई एकदम क्लासी होती. तिनं पाणी समोर आणून ठेवलं, चहा विचारला. मीत आपल्या बॅंकपॅकमधून पाण्याची बाटली काढत म्हणाला, मी क्लाएन्टच्या घरचं काहीही खातपीत नाही. तिनं फिकटसं स्माईल दिलं आणि त्याला म्हणाली, चल!
बेडरूम… दोन तास होऊन गेले.. एकदा झाल्यावर जेव्हा ती पुन्हा चाळवली तेव्हा मीत म्हणाला, एकदाच ठरलं होतं. ती म्हणाली, डबल पैसे घे! त्यानंतर मात्र मीत काहीसा थकला.. त्याने तिच्याकडे पाहिलं.. ती हसली.. फक्त.. मीतला वाटलं, ही ज्वालामुखी आहे! पण हिच्यात भस्म होत नाही काहीच.. फुलूनच आलंय उलट.. तो पडून राहिला.. ती कपडे घालून रूमच्या बाहेर गेली. थोड्या वेळाने हातात एक ज्यूसचं ग्लास आणि पैश्याचं पाकीट घेऊन आली. त्याला म्हणाली,
“ऊठ आता.. कपडे घाल आणि नीघ.. नेक्स्ट टाईमपासून माझ्या घरी येतांना ज्यूस पण आणत जा.. हे मी माझ्यासाठी आणलंय..!”
त्याने कपडे घालीपर्यंत ती ज्यूस पीत त्याच्याकडे बघत राहिली. मग त्याला पैसे दिले आणि तो निघाला तेव्हा म्हणाली, बिल्डींगच्या बाहेर पडल्यावर डाव्या कोपऱ्यात ज्युसवाला आहे. तो हसला. ती पुढे म्हणाली, मला वेळ असेल तेव्हा पुन्हा फोन करेन. तो हो म्हणून निघून गेला.
अशा तर आजपर्यंत अनेक आल्या आणि गेल्या. तीही त्याला महिन्यातून दोनदा, कधी तीनदा फोन करायची. मीतची सेवा घेणाऱ्या इतर बायकांपेक्षा फारच वेगळी होती. मीतएवढीच तीही आदबशीर होती. फार बोलायची नाही. पण बेडरूममध्ये पोचल्यावर तिच्यात अभूतपूर्व बदल व्हायचा. ती एकदम विशीतली… छे, विशी, पंचविशीतल्या मुलींना काही नसतं येत.. शिकाऊ असतात त्या. या खेळात पारंगत होण्यासाठी पस्तीशी गाठावीच लागते. हळूहळू मीत तिच्या घरून निघाल्यापासून तिच्या फोनची वाट पाहायला लागला. एक दिवस त्याने सांगितलं, ‘मला पाणी हवंय आणि नंतर ज्यूसही..’ तिनं चेहऱ्यावरची रेषही न हलू देता हो म्हंटलं. मीतला तिच्या बाबतीत एवढंच कळलं होतं की तिची जाहिरात एजन्सी आहे आणि ती त्यातली मुख्य कॉपी रायटर आहे. म्हणजे क्रिएटीव्ह बाई होती. एकदा तिनं बेडरूममध्ये त्याला सांगितलं होतं, ‘क्रिएटीव्ह लोकांच्या सेक्शुअल नीड्स जास्त असतात!’
मीत हल्ली तिच्याशी बोलणं वाढवायला बघायचा. पण ती कट शॉर्ट करण्यात माहीर होती. तो रेंगाळतोय असं बघितल्यावर ती त्याला सरळ ‘आता नीघ’ असं म्हणायची. एकदा अचानकच त्यानं तिला फोन केला आणि विचारलं, मी येऊ का आज? ती म्हणाली, मला वेळ नाहीये..
“पण मला भेटायचंय मॅम तुम्हाला..”
“कशाला?”
“तुम्ही हवं तर पैसे देऊ नका..!”
“You are insulting me Mr. Parmeet!”
मीतची बोबडी वळली. त्यानंतर तिथून बोलावणी कमी झाली. महिन्यातून एखादा फोन यायचा. मीत तिच्या फोनची वाट पाहायचा. तिनं बोलावलं की त्याला हुरूप यायचा.. तिनं कधीच त्याला नाराजी दाखवली नाही.. एक दिवस सगळं झाल्यावर मीतनेच तिला विचारलं-
“मॅम, तुम्ही नाराज आहात का माझ्यावर?”
तिने नुसत्या डोळ्यांनी प्रश्न विचारला. त्यानेच पुढे विचारलं-
“नाही, मी त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता ना.. मला वाटलं तुम्हाला राग आला असेल!”
ती म्हणाली-
“तुझ्यावर रागवायला लागतोस कोण तू माझा? मी तुला पैसे देते, त्याचा मोबदला म्हणून तू सुख देतोस. आपला संबंध एवढाच आहे.”
“मला तुम्ही आवडता!”
“म्हणजे?”
“तुमचं क्लासी वागणं.. तुमचं बोलणं.. मला मोह पडलाय त्याचा.. बेडरूममधले तुमचे रिस्पॉन्सेस.. तरुण मुलगी देणार नाही अशी साथ देता तुम्ही.. एखादा नामर्दही तुमच्या संगतीत..” त्याला बोलू न देता ती बोलली-
“मला हे सगळं माहित आहे. अगदी तुला मी आवडते हेही माहित आहे. यानंतर आपण भेटूया नको. नीघ तू आता..”
परमीत नॉन प्लस झाला आणि निघून गेला. त्याला कळलं की बाई रागावली आहे. पण त्याचा स्वत:च्या पुरुषार्थावर भारी विश्वास होता. जाईल कुठे? आज ना उद्या फोन करेल, असं त्याने वाटून घेतलं. पण फोन नाही आला. महिना उलटून गेल्यावर त्याला अगदीच राहवेना. दुसऱ्या बायकांच्या बेडवर असतांना देखील त्याला तिचे उसासे ऐकायला यायचे.. तो इतर बायकांना टाळू लागला. माझ्या नवऱ्याला सांगायचा, सोन्याची मोहोर मिळाली होती मला, आता मला या चिल्लर बायका आवडत नाहीत. एक दिवस त्याने न राहवून फोन केला. तिनं नंबर बदललाय हे त्याला कळलं आणि धक्काच बसला त्याला. तिच्या घराचा पत्ता त्याला माहित होता.. पण तिची डीसेन्सी जपणं त्याला महत्त्वाचं वाटलं. नाही गेला तो..
हे सारं माझ्या नवऱ्याने मला सांगितलं. माझ्या मध्यमवर्गीय मनाला त्यावेळी जो धक्का लागला तो आजही तसाच आहे. पुरुष वेश्यावृत्ती करतो? हो.. सुभाषनेच सांगितलं- जशी एकट्या पुरुषांना मोलाने मिळणाऱ्या स्त्रीची गरज असते, तशी गरज एकट्या स्त्रियांना देखील असते. फार पूर्वीही असायची.. केशवपन करायला येणाऱ्या न्हाव्यापासून गरोदर राहणाऱ्या तरुण विधवांच्या कहाण्या तू ऐकल्याच असशील.. पैसे घेऊन स्त्रीच्या सेवेला जाणाऱ्या अशा पुरुषांना ‘गिगोलो’ म्हणतात. आता काळ बदललाय.. स्त्री अधिक मुखरित झाली आहे. शहरात श्रीमंत स्त्रिया बदल म्हणून देखील या ‘गिगोलो’ना बोलावतात.. मुंबई, दिल्लीसारख्या शहरात श्रीमंत शौक़ीन स्त्रियांसाठी पुरुष वेश्यांचे ‘स्ट्रिप टीज’ शोज आयोजित केले जातात. स्ट्रिप टीज म्हणजे एक एक कपडा उतरवत पूर्ण नग्न होणं! त्यात शहरातले सगळे नामांकित आणि मानांकित गिगोलो शामिल होतात. तिथेच परस्पर ओळखी होतात, फोन नंबर्सची देवाणघेवाण होते, ‘रेट्स’ विचारले जातात आणि व्यवसाय वाढतो हे पत्रकार म्हणून मला माहित होतं, पण माझ्या घरी एवढी वर्षं नवऱ्याचा मित्र म्हणून येणारा एकजण ‘त्या’ व्यवसायात आहे?
*******
मीत आता कुठेय मला माहित नाही. माझ्या घटस्फोटालाच पंचवीसच्या वर वर्षं झाली. माझा नवरा २०१४ साली व्यतीत झाला. आता कोण मला सांगणार मीतबद्दल? पण खरंच, प्रेमाला वयाची बंधनं नसतात हेच खरं!
(फोटो सौजन्य: गुगल)
(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)
………………………………………………..