‘मटका किंग’ होता मुन्शी प्रेमचंदांचा चाहता

‘मटका किंग’ रतन खत्री यांच्या निधनानंतर गुन्हेगारी जगतातील या (कु) वलयांकीत व्यक्तिमत्वाच्या कथा-दंतकथा आणि त्यांनी सर्वव्यापी केलेल्या मटक्याच्या आठवणी अनेक  समाज माध्यमांवर शेअर होत आहेत. दोन वर्षांपूर्वी  ‘दीपावली ’ च्या दिवाळी अंकात शेफ श्रीरंग भागवत यांनी ‘ माणसं मला दिसली तशी … ’ या लेखात रतन खत्रींच्या कोणीही imagine करू शकणार नाही अशा साहित्यप्रेमावर प्रकाश टाकला होता. गुन्हेगारी जगतातील हा डॉन चक्क मुन्शी प्रेमचंदांच्या साहित्याचा चाहता होता. रतन खत्रींच्या एका अनोख्या पैलूंवर प्रकाश टाकणारा हा लेख वाचायलाच हवा.

……………………………………………………….

– श्रीरंग भागवत

मी आमच्या रेस्टॉरंट मॅनेजरला – प्रेम शर्माला एका गेस्टसोबत गप्पा मारत विशिष्ट टेबलाच्या दिशेने जाताना पाहिलं. असं वाटत होतं की, त्या गेस्टला या जागेची आणि आमच्या रेस्टॉरंटमधील सर्वांना या पाहुण्याची सवय होती. कारण तो पाहुणा आपणहूनच एका ठरावीक टेबलकडे चालत गेला आणि आपल्या नेहमीच्या जागेवर बसल्यासारखा स्थानापन्न झाला. एका वेटरने तत्परतेने त्यांना साधं पाणी प्यायला दिलं. त्यांना काय हवं नको न विचारताच रेस्टॉरंट कॅप्टनने त्यांची ऑर्डर किचनमध्ये आणून दिली. पण ती ऑर्डर किचनमध्ये येण्याआधीच आमच्या किचनमधील एकाने त्यांच्यासाठी व्हेजिटेबल सँडविच बनवायला घेतलं होतं. माझ्या हातात आलेली त्यांची ऑर्डर मी वाचली तर लिहिलं होतं, व्हेजिटेबल सूप आणि व्हेजिटेबल सँडविच. गेस्टला न विचारताच किचनमध्ये जेवणाची ऑर्डर देण्याचं मला फार नवल वाटलं नाही. कारण कुठल्याही हॉटेलमध्ये असे रोज येणारे पाहुणे हे असतातच. त्या पाहुण्यांच्या सगळ्या गरजा हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांना नीट ठाऊक असतात. अशा पाहुण्यांना काय हवं काय नको, ते अगदी न विचारता केलं जातं.

या पाहुण्याचा चेहरा मला ओळखीचा वाटत होता, पण तो कोण ते मला कळत नव्हतं. त्याचा पेहरावही आमच्या हॉटेलच्या रिवाजापेक्षा बराच वेगळा होता. पांढरा ढगळ पठाणी सूट, पायात काळे पठाणी सँडल आणि डोक्याला लोकरीचा विणलेला पटका, नीट बारीक कापलेल्या आणि पांढऱ्या झालेल्या मिश्या, वावरण्यात प्रचंड आत्मविश्र्वास आणि चेहऱ्यावर स्मितहास्य! अशा तऱ्हेचा माणूस ओबेराय हॉटेलमध्ये दिसला तर कोणालाही आश्चर्यच वाटलं असतं. त्यातून अशा पाहुण्याची ओबेरायचे कर्मचारी मनापासून खातिरदारी करत आहेत हे दृश्य तर कल्पनेच्या पलीकडचं होतं. “कौन है रे ये?” मी हळूच माझ्या बाजूला उभे राहून त्या पाहुण्यासाठी सँडविच बनवणाऱ्या माझ्या सहकाऱ्याला विचारलं, “धर्मात्मा है ये। रतन खत्री।” माझ्या सहकाऱ्याने मला माहिती दिली. मी उडालोच. रतन खत्री या माणसाबद्दल भरपूर ऐकलं होतं. त्याच्या जीवनावर एक हिंदी चित्रपटही निघालेला होता. अख्खा भारतात मटका नामक बेकायदेशीर लॉटरीचा प्रचंड मोठा कारभार चालवणारा एक डॉन म्हणून त्याची ख्याती होती. “हररोज आता है यहाँ। दोपरका नंबर निकालके। हररोज ये साला हमारे हातका बना व्हेजिटेबल सूप और सँडविच खाता है। कभी पूछेंगे उसे अगले दिन का नंबर। हररोज हमारे हाथका खाना खाता है, एक बार नंबर देने में क्या हर्ज है?” सहकाऱ्याने पुष्टी जोडली आणि तो जोरात हसला. अर्थात ही माहिती रतन खत्रीला विचारण्याचं धाडस माझ्या सहकाऱ्याला काय, तिथे असलेल्या कोणालाच झालं नसतं.

ज्याच्याबद्दल मी फक्त ऐकलंच होतं, असा एक खराखुरा हाडामांसाचा डॉन माझ्यासमोर होता. असं दृश्य मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो. त्याचं टेबल मला काउंटरवरून दिसत होतं. शर्मा त्यांच्याशी गप्पा मारत उभा होता. खत्री शांतपणे जेवत होते. एखादा सँडविचचा घास घ्यायचे आणि मध्येच थोडंसं सूप प्यायचे. त्यांना तशी घाई आहे असं वाटत नव्हतं. मध्येच ते शर्माशी एखादं वाक्य बोलत होते. साधारण अर्ध्या तासात त्यांनी जेवण उरकलं. त्यांच्यासमोर बिल ठेवण्यात आलं. बिलावर त्यांनी सही केली, बिलावर एक मोठी नोट टीप म्हणून ठेवली आणि सावकाशपणे उठून ते जायला निघाले. शर्मा त्यांना सोडायला अगदी लिफ्टपर्यंत गेला होता.

मधल्या वेळात माझ्या सहकाऱ्यांनी आमचं जेवण किचनमागच्या डायनिंग रुममध्ये मांडलं होतं. त्यांच्या दृष्टीनं खत्रींचं इथे जेवायला येणं रोजचंच होतं. पण मला मात्र हे अगदी नवीन आणि रोमांचक वाटत होतं. आत्तापर्यंत मी डॉन पाहिले होते ते फक्त सिनेमात. सिनेमात डॉनचं चित्र रेखाटताना त्याच्यात एकही चांगला गुण न दाखवण्याची दक्षता बाळगलेली असे. हा तर हाडामांसाचा डॉन होता. त्याच्याबद्दल इथे असणाऱ्या सर्वांना मनात कुठेतरी भीती वाटत असणार. पण कोणी दाखवत मात्र नव्हतं. तो इतर गेस्टप्रमाणेच आमच्याकडे आला, त्याला जेवण वाढण्यात आलं. रोज येणाऱ्या पाहुण्याला आम्ही जेवढं आदरातिथ्य दाखवतो ते दाखवलं आणि पैसे देऊन तो निघून गेला. मला या गोष्टीचं खूप आश्र्चर्य वाटत होतं. पण माझ्या सहकाऱ्यांसमोर ते न दाखवण्याचा मी प्रयत्न केला. थोड्या वेळाने शर्मा आमच्याबरोबर जेवायला डायनिंग रुममधे आला. आणि खुर्चीवर बसता बसता म्हणाला, “खाना खिलाव शेफी। बहोत भूख लगी है। ये साला तो हररोज आता है यहाँ। उसकी वजहसे मेरा खाना खराब हो जाता है हररोज।”

“लेकिन तुम्हे वहाँ रुकने की जरुरत क्या है? तुम तो अपना खाना खा सकते हो। उसका खाना तो कोई भी सर्व्ह कर देगा।” मी त्याला निरागसपणे म्हटलं.

“आप जानतेनहीं हो शेफी, कौन है ये। डॉन है डॉन। खाना खाते समय जोकर लगता है इनको गप्पे लडाने के लिये। खाना खाते समय इनके साथ मॅनेजर या तो शेफ या तो कोई सीनियर आदमी नहीं होगा तो बहुत उंगली करता है ये। बडी कंप्लेंट होती है बादमें। कौन मगजमारी करेंगा। आज मेरी बारी थी। कल आपकी होगी।” शर्मानी मला माहिती पुरवली आणि बरोबर माझ्या जबाबदारीची जाणीवही करून दिली. ही काही फार मोठी जबाबदारी होती अशातला भाग नाही. हॉटेलमध्ये नेहमी येणारे कितीतरी गेस्ट, आपल्याबरोबर कोणीतरी सीनियर माणसाने जेवताना गप्पा माराव्यात ही अपेक्षा ठेवतात. आमच्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी ही सुद्धा एक असते. पण इथे गोष्ट एका कुविख्यात डॉनची होती. मी त्याच्याशी कुठल्या विषयावर गप्पा मारणार होतो? या माणसाला खाण्याचीही फारशी आवड दिसत नव्हती. त्याच्या जेवणाचा मेनूही वर्षानुवर्ष तोच होता. त्यामुळे संभाषणाचा विषय ‘खाणं’ हाही होऊ शकणार नव्हता. पण माझ्या सहकाऱ्यांना मुळी हा विचार करण्यासारखाही विषय वाटत नव्हता, कारण त्यांच्यासाठी हे नेहमीचंच होतं. तिथे नवखा होतो तो मी. आपणही या गोष्टीचं फार दडपण घ्यायचं नाही, असं मी मनाला बजावलं आणि माझं जेवण उरकलं.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कामावर आलो तेव्हा खरं तर माझ्या मनातून रतन खत्री पूर्णपणे गेलेला होता. मी कामात बिझी होतो. ब्रेकफास्ट आणि लंचची गर्दी संपली. तीन-साडेतीन वाजले तशी आमची आपण काय जेवायचं ही चर्चा सुरू झाली. इतक्यात रेस्टॉरंटमधून मला एका कॅप्टनकडून बोलावणं आलं, “शेफ बाहर आ जा। धर्मात्मा आया है। उसे जोकर चाहिये।” असल्या भाषेत एकमेकांशी बोलणं ही आमच्या हॉटेल व्यावसायिकांची खासियत आहे. त्या बोलण्याचं मला काही वाटलं नाही, पण त्यामुळे शर्माची सुट्टी असल्याचं लक्षात आलं. मनावर पुन्हा एकदा दडपण आलं. पण रतन खत्रीचा जोकर बनणं हे माझ्या अनेक कामांपैकी एक काम असल्यामुळे ते टाळणंही शक्य नव्हतं. बघू काय होतंय ते, असा विचार करून मी रेस्टॉरंटमध्ये गेलो. रतन खत्री नेहमी एका ठराविक टेबलावरच बसत असे. त्यामुळे त्याला शोधायलाही काही कष्ट पडले नाहीत. त्याने आज काळा वेष परिधान केला होता. काळी लुंगी, काळा ढगळ कुडता आणि डोक्याला काळा पटका. ओबेराय हॉटेलात या वेषात प्रवेश करणारा हा बहुधा पहिलाच इसम असणार.

मी त्याच्या टेबलाजवळ गेलो आणि हस्तांदोलन न करता रीतसर नमस्कार केला, नमश्कार सर। मै शेफ भागवत हूँ। आज शर्माजीकी छुट्टी है, “इसलिये आपको मुझसे काम चलाना पडेगा।” मी माझं हिंदी वापरण्याचा प्रयत्न केला.

“कोई बात नहीं। आप खडे क्यों हैं? आप बैठिये ना।” त्यांनी अगदी मोकळेपणाने उत्तर दिलं. काल मी शर्माला यांच्यासमोर उभे राहूनच बोलताना पाहिलं होतं. बरेच वेळा गेस्ट बोलतात एक आणि त्यांच्या मनात काही वेगळंच असतं.

“धन्यवाद सरजी। लेकिन खडे होके बात करनेमें मेरे लिये कोई कठिनाई नहीं है।” मी उभंच राहायचं ठरवलं.

“वैसे शर्माजीने मुझे बताया था आजके छुट्टीके बारेमे। ऐसे लगता है कि आप इस जगहपर नये हैं। वैसे कहाँके हो आप?”

“हाँ जी। नया हूं मैं इस रेस्टॉरंटमें, लेकिन हॉटेलमें पुरानाही हूँ। मै बंबईकाही हूँ।” मी माहिती दिली.

“क्या बात है। तो बंबईकर है आप। जय महाराष्ट्र।” असं म्हणून ते मिस्कीलपणे बसले.

हा छोटासाच संवाद इतक्या मोकळेपणाने झाला, की मनातली भीती पार पळून गेली. माझ्याशी बोलताना त्याचं खाणं सुरूच होतं. त्यानी माझी आपलेपणाने चौकशी केली. मी आधी कुठे काम करत होतो, तेही विचारलं. मी बगदादवरून आत्ताच परत आलो आहे हे ऐकल्यावर तिकडच्या वातावरणाबद्दलही चार सवाल केले. त्याची भूमिका ही प्रश्र्न विचारणाऱ्याची होती. स्वतःबद्दल ते काही बोलत नव्हते आणि त्यांना ते विचारण्याची हिंमत काही मी केली नसती.

माझ्या घरच्यांबद्दल चौकशी करताना त्यांना जेव्हा कळलं की, आमचा घरचा व्यवसाय मराठी पुस्तकांचा आहे; तेव्हा त्यांच्या डोळ्यांत काहीतरी चमकल्याचं मला उगीचच वाटलं. “तो किताब पढतें है आप?” त्यांनी जरा गंभीरपणे विचारलं. “हाँ।” म्हणून मी मान डोलावली.

तोपर्यंत त्यांचं जेवण झालं होतं. ते सरळ उठले आणि चालू लागले. त्यानंतर ते काहीही बोलले नाहीत. मी त्यांना लिफ्टपर्यंत सोडायला गेलो. ते निघून गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की, यांच्याशी मी संवाद साधू शकतो. इतर चारचौघांसारखेच आहेत हे. स्वतःबद्दल काही बोलत नाहीत इतकंच. त्या दिवसानंतर रोज नाही, पण आमच्या भेटी होत राहिल्या. रोजच्या रोज त्यांचा जोकर बनण्याची जबाबदारी अजून शर्माचीच होती, पण त्यांच्या सुट्टीच्या दिवशी किंवा तो कुठे इतर कामात बिझी असला रतन खत्रींच्या लंचसोबतची जोकरगिरी करण्याची जबाबदारी माझ्यावर येत असे. त्यांना सर्व्हिस कशी होईल वगैरे गोष्टींची चिंता फार नसे, कारण त्यांचे असे दोन-तीन वेटर ठरलेले होते. त्यांच्यापैकीच कोणीतरी त्यांना सर्व्हिस करी. खत्रींच्या सर्व सवयी त्यांना नीट माहीत होत्या. माझं काम फक्त त्यांच्यासमोर उभं राहून त्यांच्याशी गप्पा मारण्याचं. आमच्या बोलण्याचा विषय काही ठरलेला नसे. कुठे क्रिकेटची सिरीज चालू असे, त्याबद्दल बोलणं होई; तर कधी हवा व पावसाबद्दल. कुठलाही विषय चाले त्यांना. एखादा हिंदी सिनेमा नुकताच रिलीज झालेला असे. त्यातल्या गाण्यांबद्दल मला काय वाटतं, याची चौकशी ते करत. पण ते स्वतःच्या कुठल्याही आवडीबद्दल फार बोलत नसत. त्यांचे खाजगी जीवन लपवून ठेवण्यामागे कदाचित काही कारणही असू शकेल. पण मधूनमधून “क्या पढ रहे हो आजकल?” हा प्रश्नही येई. मी वाचत असलेल्या मराठी किंवा इंग्रजी पुस्तकाचं नाव सांगे आणि विषय तिथेच संपे.

एकदा त्यांना नेहमी सर्व्हिस करणारा वेटर आठवडाभर येत नव्हता. त्याच्या घऱी त्याचे कोणीतरी जवळचे नातेवाईक दुर्धर रोगाने आजारी होते. इलाजाचा खर्च त्याला परवडण्याच्या बाहेरचा होता. आम्ही सहकाऱ्यांनी मिळून आम्हाला जमेल तेवढी मदत केली होती. हॉटेलनेही आपल्यापरीने होईल तशी मदत केली होती. पण तेवढ्याने जमणारं नव्हतं. तो चार-पाच दिवस सर्व्हिसला नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यांनी चौकशी केली. शर्मानी त्यांना खरी हकिगत सांगितली. त्यांनी खिशातून एक नोटांचं बंडल काढलं आणि शर्माकडे दिलं. पण शर्मानी ते घेण्यामागची अडचण सांगितली. आम्हा सर्वांनाच ठरावीक रकमेपेक्षा जास्त रक्कम खिशात बाळगली तर सिक्युरिटीमधे हिशोब द्यायला लागत असे. पैसे त्या वेटरपर्यंत पोहोचवणं आम्हाला थोडं कठीणच झालं असतं. रतन खत्रींनी त्या मुलाचा पत्ता घेतला, हॉस्पिटलचा पत्ता घेतला आणि ते निघून गेले. शर्माजवळ किंवा माझ्याजवळ काहीही बोलले नाहीत. तीन-चार दिवसांनंतर तो वेटर जेव्हा पुन्हा कामाला आला, तेव्हा आम्हाला कळलं की, त्याच्या नातेवाइकाचा हॉस्पिटल आणि ऑपरेशनचा खर्च रतन खत्रींनी पूर्णपणे भरला होताच, पण त्याच्याही हातात त्यांनी वरखर्चाला बऱ्यापैकी रक्कम दिली होती. असं दान करणारे इतरही लोक असतील, पण रतन खत्रींनी ही गोष्ट केली याचं मला थोडंसं आश्र्चर्य वाटलं. या गोष्टीची त्यांनी कुठेही वाच्यता केली नाही, हेही महत्त्वाचं.

आमच्या संभाषणात माझ्या वाचनाबद्दल ते नेहमी विचारत असत. तसंच एकदा त्यांनी मला विचारलं. मी तेव्हा कुठलंसं इंग्रजी पुस्तक वाचत होतो. मी पुस्तकाचं नाव आणि त्याच्या लेखकाचं नाव सांगितलं. ते नेहमी विषयाबद्दल चौकशी करत, म्हणून ते पुस्तक कशाबद्दल आहे हेही थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला.

त्यांनी तोंडात असलेला घास संपवला, घोटभर पाणी प्यायले आणि मला विचारलं, “आपने कभी हिंदी किताब पढी है।“ माझी विकेट उडाली. माझं हिंदी वाचन अजिबात नव्हतं. मी हिंदी वाचत नसल्याचं त्यांना थोडं ओशाळूनच सांगितलं.

“हिंदी फिल्लम तो देखते हैं आप। हिंदी किताब भी पढिये कभी कभी। अच्छे होते हैं।“ त्यांच्याकडून मला सल्ला मिळाला.

“आपने कभी मुन्शी प्रेमचंदजी का नाम सुना है?” मी होकारार्थी मान तर डोलावली, पण आता पुढे काय बोलावं तेच कळेना.

हिंदीचं आणि माझं तसं फारसं कधीच जमलं नाही. शाळेत असल्यापासून मराठी पुस्तकांचं बऱ्यापैकी वाचन आहे. कॉलेजला गेल्यानंतर इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्रजी वाचायला सुरुवात केली. त्याची थोडीशी आवडही निर्माण झाली. पण हिंदी साहित्याशी मैत्री मात्र कधीच झाली नाही. मुन्शी प्रेमचंद यांची एक कथा आम्हाला शाळेतल्या हिंदीच्या पुस्तकात होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला खरं तर एवढीच माहिती होती. इतर कोणी मला हा प्रश्र्न विचारला असता, तर मला कदाचित लाज वाटली नसती. पण ज्या माणसाची ख्याती भारतातील सर्वात मोठा जुगाराचा धंदा चालवणारा डॉन अशी आहे; त्याने माझ्या हिंदी साहित्य, मुन्शी प्रेमचंदसारख्या विषयांवर चर्चा करावी, हे पचण्याच्या पलीकडचं होतं. त्यांनाही मला वाटत असलेली लाज माझ्या चेहऱ्यावर दिसली असावी. त्या दिवशीचा आमचा संवाद तिथेच संपला. त्यांचं जेवण संपलं होतं. बिल भरून झालं होतं. त्यांची ही सवय मला माहीत होती. बिल भरल्यानंतर ते सेकंदभरही थांबत नसत. लगेच ते निघून जात. त्या दिवशी ते निघून गेल्याचं मला मनापासून बरं वाटलं.

त्यानंतर काही दिवस मी त्यांच्यापासून थोडं दूरच राहिलो. मला हिंदी साहित्याची आवड नाही, या गोष्टीची लाज वाटायचं खरं तर काही कारण नव्हतं. पण ती वाटली हे मात्र खरं. एक दिवस मी किचनमध्ये काहीतरी काम करत होतो. शर्मा कामावर असल्यामुळे जोकर बनायची पाळी माझ्यावर येणार नव्हती. इतक्यात मला रेस्टॉरंटमधून बोलावणं आलं, “शेफ, धर्मात्मा बुला रहा है आपको।” माझ्या पोटात गोळा आला. माझी आता पुन्हा हिंदीची परीक्षा घेतली जाणार होती.

मी सावकाश चालत, रेस्टॉरंटमधे त्यांच्या टेबलाशी गेलो. शर्मा तिथेच उभा होता त्याला माझ्यात आणि रतन खत्रींमध्ये झालेले संवाद माहीत होते. मी रेस्टॉरंटमध्ये येणं का टाळतो आहे, हेही त्याला माहीत असल्यामुळे तो मला एका छद्मी स्मितहास्याने खिजवत आहे, हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.

टेबलाजवळ जाऊन मी रतन खत्रींना अभिवादन केलं, “नमस्कार सर। क्या आपने मुझे याद किया?”

“हाँ। मुझसे छुप रहे हो आप। वैसे आप मुझसे जादा देर तक छुप नहीं सकते। मैने आपके लिये एक तौफा लाया है।” असं म्हणून एक ब्राउन पेपरचा लिफाफा त्यांनी माझ्या हातात दिला. मी तो घेतला, पण उघडून बघायचा उतावीळपणा दाखवला नाही.

“कृपा करके आप लिफाफा खोलके देखिये। बहुत पसंत आयेगा आपको।” असं म्हणून त्यांनी मला तो लिफाफा उघडायला लावला. मी थोड्या नाखुशीनेच तो लिफाफा उघडला, तर आतमध्ये ‘निर्मल’ नावाचं मुन्शी प्रेमचंद यांचं पुस्तक होतं. हे पुस्तक मी वाचलं असण्याची शक्यताच नव्हती. मी तर ह्या पुस्तकाचं नावही ऐकलं नव्हतं. मी ते पुस्तक बघितलं. पहिल्या प्रकाशित आवृत्तीची तारीख १९२७ सालची होती. पण ही प्रतही बऱ्यापैकी जुनी असावी. कारण कागद बऱ्यापैकी पिवळे पडले होते. पण वाचणाऱ्याने याचा वापर फार नीटनेटकेपणाने केला होता.

“बहुत अच्छी किताब है। पढके देखिये। कापी पुरानी है, लेकिन मेरी खुदकी है। जरूर पढियेगा।” त्यानी मला पुस्तकाबद्दल माहिती पुरवली.

“धन्यावाद। मै पढनेकी जरूर कोशिश करूंगा।” आमची भेट इथेच संपली. मी नंतर बराच वेळ पुस्तकाकडे बघत होतो. ते चाळूनही बघितलं. ते पुस्तक वाचणं तसं कठीणच जाणार होतं. हिंदी वाचनाची बिलकूल सवय नव्हती. शाळेच्या पुस्तकात काय हिंदी वाचन केलं असेल तेव्हढंच. मराठी आणि हिंदी या दोनही भाषा जरी देवनागरी लिपीतच लिहिल्या जात असल्या, तरी हिंदी समजायला आणि त्यांचा अर्थ जिरवायला थोडं कठीणच जातं. मी ते पुस्तक घरी घेऊन गेलो.

दुसऱ्या दिवशी शर्माजींची सुट्टी होती, त्यामुळे रतन खत्री जेवत असताना त्यांच्यासोबत राहणे ही माझी जबाबदारी होती. त्यांच्या टेबलाकडे चालत जाताना आता रतन खत्री मला पुस्तकाबद्दल काय विचारणार, ही भीती मनात होतीच. पण मला पुस्तक मिळून एकच दिवस झाला असल्यामुळे काहीतरी कारण सांगता आलं असतं. मी टेबलाजवळ गेलो. त्यांनी अभिवादन वगैरे केलं. पण त्या दिवशी त्यांनी पुस्तकाचा विषयच काढला नाही. शेवटी ते निघाले, तशी मीच त्यांना सांगितलं की, “मी अजून पुस्तक वाचायला घेतलेलं नाही.” त्यांनी फक्त हसून मला ऐकल्याची पावती दिली. घरी गेल्यावर आज पुस्तक वाचायला सुरुवात करायचं मनाशी मी नक्की केलं. घरी गेलो आणि नंतर पुस्तक वाचण्याची आठवण व्हावी या दृष्टीने बिछान्याबाजूच्या टेबलाच्या अगदी वरच ठेवून दिलं. पण वाचायला मुहूर्त काही मिळाला नाही. रात्री झोपण्यासाठी बिछान्यावर आडवा होताना ते पुस्तक दिसलं आणि रतन खत्रीचा हसणारा चेहरा डोळ्यांसमोर आला. मी पुस्तक उघडून बघितलं. साधारण पावणेदोनशे पानांचं पुस्तक होतं ते. ‘फार मोठ नाही, तेव्हा दोन-तीन दिवसांत वाचून टाकू.’ माझ्या मनात विचार आला.

डोळ्यांची उघडझाप करून मी माझी झोप उडवली आणि पुस्तक उघडलं. वाचायला सुरुवात केली. पहिल्याच पानावर उदयभानूच्या घरात प्रवेश केला आणि साधारण घरातल्या पंधरा-वीस माणसांची, कल्याणी या उदयभानूच्या पत्नीची किंवा निर्मला, कृष्णा आणि चंदर या त्यांच्या मुलांची ओळख होऊन, निर्मलाचं तिच्या पंधराव्या वर्षीच लग्न ठरता ठरता माझे डोळेच मिटले. मनाविरुद्ध काही वाचावं लागलं की असंच होत असावं. सकाळी उठलो तेव्हा पुस्तक माझ्या छातीवरून खाली पडलं होतं. मी ते उचलून नीट परत टेबलावर ठेवलं. चहा पिताना परत ते पुस्तक हातात घ्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीलाच उदयभानू आणि कल्याणीचा वाद वाचला. उदयभानूचं रस्त्यात झालेलं भांडण आणि त्यातून त्यांचा झालेला अचानक मृत्यू वाचला आणि कसंबसं पहिलं प्रकरण संपवलं. आपण एका मोठ्या लेखकाचं पुस्तक वाचत आहोत हा अंदाज आला होता, पण हिंदी वाचणं काही जमत नव्हतं. त्यात बालविवाह हा विषय आता कालबाह्य झाला आहे, असा माझा एक शहरी समज होता. त्यामुळे हे पहिलं प्रकरण वाचणंही थोडसं कंटाळवाणंच झालं होतं. हे पुस्तक वाचायला बराच संयम लागणार होता. डिक्शनरीची जोड घ्यायला लागणार होती. माझा स्वभाव लक्षात घेता हे जरासं कठीणच वाटत होतं.

अजून मी रतन खत्रींच्या समोर जाऊन या विषयावर त्यांच्याशी काही बोलू शकेन अशी खात्री नसल्यामुळे त्यांच्यापासून तूर्तास तरी लांबच लाहायचं मी मनात ठऱवलं. असेच सहा-सात दिवस गेले असतील. माझी त्या पुस्तकाच्या वाचनात काही प्रगती होत नव्हती आणि आठवड्याभराने खत्रींना भेटायची वेळ आलीच.

“मैने किताब पढना शुरू किया है।” त्यांनी काही विचारण्याआधीच मी सांगिंतलं. त्यांच्या चेहऱ्यावर एक मिस्कील हसू आलं. त्या दिवशी माझ्याकडून काही त्या पुस्तकाबद्दल ऐकायला मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असावी.

“कहाँ तक पहुंचे?” त्यांनी विचारलं.

“अभी अभी तो लाला उदयभानूकी मृत्यू होकर निर्मला की शादी टूट चुकी है।” सहासात दिवसांत साधारण दीड प्रकरण म्हणजे अभिमान बाळगण्याजोगं काहीच नव्हतं. पण मी खरं बोलायचं ठरवलं. “हिंदी पढना बहुत मुश्कील है। शब्दकोश यूज करना पडता है मुझको।” मी माझं हिंदी पाजळलं.

“कोई जल्दी नहीं है शेफसाब। आरामसे पढिये, लेकिन तबियतसे और समझके पढियेगा। ऐसे मत सोचिये कि ये उपन्यास और ये समस्या अब पुरानी हो चुकी है। काफी सारे शहरी बाबू वैसा सोचते हैं। लेकिंन हमारे देशकी असलियत कुछ और है। अपने देशके देहातमें जरा झाँकके देखिये।” मी मान डोलावली, पण या पुस्तकाबद्दल काय विचार करतो आहे हे ओळखलं होतं, त्यावर जे काही तो बोलत होता ते खरं होतं. तसंच या माणसाशी या पुस्तकाविषयी काही बोलणं थोडं धोकादायकच होतं; कारण त्याने हे पुस्तक बरेच वेळा वाचलं असावं असा माझा अंदाज. त्या दिवशी आमचं अजून या पुस्तकावर काही बोलणं झालं नाही. पण मला तिथून निघताना लाजिरवाणं मात्र वाटलं नाही. मी एक-दीड प्रकरणच का होईना, पण काहीतरी वाचलं होतं. थोडंसं अजून वाचायला हुरूप आला होता.

मी रात्री जेवल्यानंतर ते पुस्तक पुन्हा हातात घेतलं, पण वाचायला घेतल्यानंतर पुन्हा माझ्या वाचनाच्या गतीआड हिंदी भाषा येऊ लागली. पुढच्या दोन-तीन दिवसांत मी जेमतेम तिसऱ्या प्रकरणापर्यंत पोहोचलो. निर्मलाचं दुसऱ्या एका धनिक वकिलाबरोबर लग्न झालं होतं. त्यांच्या वयांतलं अंतर मनाला न भावणारं होतं. ती पंधरा वर्षांची, तर तिचा वर वकील मुन्शी तोताराम चाळिशीच्या पुढचा, बिजवर आणि आधीच्या लग्नातली दोन मुलं असलेला.

कितीही रेटलं तरी माझा वाचायला वेग काही दिवसाला दोन-तीन पानांच्या पुढे जात नव्हता. पण रतन खत्री भेटली की, मी त्यांना माझी झालेली प्रगती सांगत होतो आणि तेही थोडंसं हसून मला प्रोत्साहन देत होते. मध्येच त्यांची एखादी टिपणीही होत असे.

सुरुवातीच्या एका प्रकरणात लग्नानंतर लवकरच निर्मलाबद्दल तिची नणंद रुक्मिणी तोतारामचे कान भरायला सुरुवात करते, असा प्रसंग आहे. मी त्या प्रकरणापर्यंत पोहोचल्याचे सांगितल्यावर, “बहु-ननद बेबनाव तो मुन्शी प्रेमचंदभी नहीं टाल पाये, शेफजी।” अशी रतन खत्रींची प्रतिक्रिया होती.

मुन्शी तोताराम त्यांच्याहून वयाने खूप लहान असलेल्या पत्नीला म्हणजेच निर्मलाला खूश करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करत; तिला भेटवस्तू, मिठाई आणून देत. पण तिच्या तरुणाईला असलेल्या आशाआकांक्षा ते पूर्ण करू शकत नसत. ह्याबद्दल रतन खत्रींचं मत होतं, “निर्मलाकी जवानी और जोश की भूख पैसे से कैसे मिटाये मुन्शीजी?”

नंतर जेव्हा निर्मला आणि तोतारामची बहीण रुक्मिणीत, मुलांच्यात तेढ निर्माण झाली, तेव्हा निर्मलाने ती मिटवण्याचे केलेले प्रयत्नदेखील निष्फळ ठरले होते. “दुनियाका कोई भी बच्चा किसी दुसरी औरत को, वो चाहे कितनीभी यत्न करें, अपनी माँ नही मानेगा। माँ तो माँ होती है।” खत्रींकडून मला ही टिपणी ऐकायला मिळाली होती.

कितीतरी वळणं घेत मुन्शी प्रेमचंद यांची निर्मला तिच्या मृत्यूपर्यंत जाऊन पोहोचली. आपल्यावर लादलं गेलेलं लग्न यशस्वी करण्याचे भरपूर प्रयत्न आपल्यापरीने करूनदेखील सुखी संसार करू न शकल्यामुळे निराश झालेली निर्मला, मृत्युशय्येवर असताना आपल्या नवजात मुलीला रुक्मिणी या आपल्या नणंदेच्या पदरात घालते आणि ही कादंबरी संपते. “जिससे बेबनावकी शुरुआत हुई उसी ननदकी गोदमे बच्ची को छोडना पडा बेचारीको। ऐसा होता है नसीब का करीश्मा।” रतन खत्री.

त्यांची मते फार वैचारिक नसत, त्यांना कुठल्याही मोठ्या तत्त्ववेत्त्याच्या जड भाषेची झालरही नसे. पण स्वतःच्या अनेक वर्षांच्या अनुभवातून बनलेली वैयक्तिक मतं असत. ऐकायला बरी वाटत. मला ती पटत आहेत की नाहीत, हा विचारही मी तेव्हा केला नाही. ते मला यासंबंधी विचारतील, या भीतीने मीही दररोज दोन-तीन पानं तरी वाचत होतो. माझा वाचनाचा वेग कमी असल्यामुळे कधी ते नाराज झालेत असं मला तरी जाणवलं नाही. मी वाचतोय याच गोष्टीचं त्यांना कौतुक असावं.

माझं निर्मला हे पुस्तक वाचून संपलं होतं. माझाच या गोष्टीवर विश्र्वास बसत नव्हता. हे पुस्तक मला नीट समजलं होतं असं नाही. पूर्ण वाचून झाल्यानंतरही त्या पुस्तकातील कित्येक शब्दांचा किंवा वाक्प्रचारांचा अर्थ मला नीटसा उमजला नव्हता. या कादंबरीतून मुन्शी प्रेमचंद यांना जे सांगायचं होतं, ते सर्व त्या वेळी मला कळलं. असाही दावा मी करत नाही. पण हे पुस्तक वाचल्याचा आनंद मात्र जरूर झाला. या पुस्तकातील विविध पात्रं, मुन्शी प्रेमचंद यांनी निर्माण केलेली त्यांच्यातील नाती आणि बेबनाव मात्र मनाला भावले आणि पटलेसुद्धा. ही सर्व नाती आणि बेबनाव इतक्या वर्षांनंतरही मला ओळखीचे, आजूबाजूला पाहायला मिळणारे असे वाटले. रतन खत्रींनी कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता, हळुवारपणे, गोडीगुलाबीने, माझ्याकडून हे पुस्तक वाचून घेतलं होतं. या एका पुस्तकाच्या वाचनामुळे मला हिंदी वाचनाची आवड लागली असं नाही. ‘निर्मला’ हे मी वाचलेलं एकमेव हिंदी पुस्तक आहे. पण ते वाचणं मी मनापासून एंजॉय केलं हे महत्त्वाचं! त्यानंतर माझी त्या रेस्टॉरंटमधून दुसरीकडे बदली झाली. मी अजून काही दिवस तिकडे राहिलो असतो, तर कदाचित त्यांनी माझ्याकडून अजून हिंदी पुस्तकं वाचून घेतली असती. मला हिंदी वाचनाची आवडही लागली असती कदाचित. पण ज्या माणसाने माझ्याकडून हे करून घेतलं, त्या माणसाची समाजातली प्रतिमा काय होती?

फाळणीच्या वेळी पाकिस्तानमधील सिंधी प्रांतातून आलेला हा माणूस फारसा शिकलेलाही नव्हता. त्याने मटक्याचे प्रचंड मोठे बेकायदेशीर साम्राज्य उभारले, ते स्वतःच्या ताकदीवर. मोठे होताना त्याने कशा प्रकारचे कष्ट उचलले असतील, कुठले वैध-अवैध मार्ग अवलंबले असतील याची मला काय, कोणालाच कल्पना नसेल. त्या काळच्या सगळ्या प्रसिद्ध डॉनच्या नामावलीत त्याचं नाव फार वरती होतं. आपल्या ताकदीचा आत्मविश्र्वास त्यांच्या वावरण्यातून दिसतही असे. ओबेरायमध्ये त्यांच्या आजूबाजूला वावरणारे इतर गेस्ट हे सुटाबुटातले असत, तर हे लुंगी नेसलेले. या गोष्टीचा न्यूनगंड त्यांच्या वागण्यात फार जाणवला नाही. चेहऱ्यावर आजूबाजूच्या कोणाचीही कदर न करणारं स्मितहास्य असे त्यांच्या. आणि बोलण्यात कमालीची नम्रता. त्यांना माझ्याशीच काय, पण कोणाशीही अरेतुरे करताना मी पाहिलं नाही. अशी कुविख्यात ख्याती असलेल्या या माणसाच्या प्रतिमेत हिंदी साहित्य, मुन्सी प्रेमचंद हे शब्द कुठेही बसत नव्हते. यांच्या त्या कादंबरीवरील टिपादेखील एखाद्या प्रपंच करणाऱ्या गृहस्था साजेशा असत. मग ते प्रतिमेतील रतन खत्री खरे, की मी अनुभवलेले खरे?

(साभार: प्रवीण बर्दापूरकर)

हेही वाचायला विसरू नका –

रतन खत्री ‘मटका किंग’ कसे झालेत?https://bit.ly/2SX0fOO

आठवणी मटक्याच्या …रतन खत्रीच्या! https://bit.ly/2YRg79d

 

Previous articleआठवणी मटक्याच्या …रतन खत्रीच्या!
Next articleगांधी+नेहरू+आंबेडकर= भारत!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here