–नीलांबरी जोशी
तो : “चाफा आवडतो का तुला?” दुतर्फा पांढऱ्या चाफ्याची झाडं असलेल्या निवांत रस्त्यावरुन ते दोघं चालले होते. अचानक वाकून खाली पडलेलं एक फूल तिनं उचलून घेतलं.. नाकाशी नेलं.. त्या सुगंधाचा दरवळ तिच्या डोळे मिटलेल्या चेहर््या कडे पाहून त्याच्यापर्यंत पोचला.. पण त्यावर त्यानं विचारलेल्या “चाफा आवडतो का” या प्रश्नावर मात्र तिनं उत्तर दिलं नाही. तो जरा खट्टू झालाच.
फोनवर ती भरभरुन गप्पा मारायची.. तिला आवडलेली आणि नावडलेली माणसं, त्यांच्या भावभावना, भोवतालच्या लोकांच्या कॉमेंटस आणि त्याचा तिला झालेला त्रास, आवडते रंग, फुलं, पाहिलेला चित्रपट, आवडलेली दृश्यं, आवडती गाणी आणि कविता, पुस्तकं.. पुस्तकं का आवडली त्याचं विश्लेषण.. तिच्या बोलण्याचा धबधबा सुरु झाला तर थांबवणं मुष्किल.. त्याला ते ऐकायला आवडायचं. तिच्याबरोवर शॉपिंगला, चित्रपटांना, फिरायला जाण्यात निश्चितच आनंद होता. अनेक बाबतीत दोघांची मतं जुळत होती. दोघांनी एकमेकांना आपला भूतकाळ विचारायचा आणि सांगायचा नाही असा अलिखित करारही त्यांच्यात होता.. दोघांना ते मान्य होतं..
पण अशा एखाद्या क्षणी तिच्या मनात काय सलतंय याचा थांगपत्ताच लागायचा नाही.. अनेकदा तिच्या अंगावर निळसर रंगाचे कपडे पाहून दुकानात जरा “तिला हा निळा कुर्ता घे..” असं प्रेमानं म्हणावं तर ती अबोलच होऊन जायची.. तिच्या आवडीचं रेस्टॉरंट लक्षात ठेवून “तिथं जाऊयात का?” असं आवर्जून विचारावं तर ती गप्पच होऊन जायची. दुखावल्याचे भाव तिच्या डोळ्यात उमटायचे. आत्ताही “चाफा आवडतो का” एवढ्या साध्या प्रश्नाचं उत्तर तिला त्रास देऊन गेल्याचं तिच्या चेहर््या वर उमटलं..
ती : “चाफा आवडतो का?” या त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं किती सोपं होतं.. पण “यानं” असं काही विचारलं तर मला “तो” आठवतो. दोन वर्षं झाली आता ते नातं संपून.. पण आजही “तुला छान दिसेल हा रंग” म्हणत त्यानं तेव्हा आणलेली साडी आठवते. “तुला आवडेल हे” .. असं म्हणत व्हॉटसअॅपवर पाठवलेलं गाणं आठवतं.. “तुला एका खास ठिकाणी जेवायला नेतो… तुला आवडेल तिथली टेस्ट” .. असं म्हणत एका रविवारी त्यानं नेलेलं रेस्टॉरंट आठवतं.. रोजच तासनतास त्यांचे फोन चालायचे.. इतकं मनापासून यापूर्वी ती कोणाशी कधी बोलली नव्हती.
पण मग एके दिवशी तो सहजच म्हणाला, “आजतागायत मी तुला इतक्यावेळा फोन केले”.. दुसर््या एका संवादात त्यानं “इतक्या वेळा साड्या दिल्या”..असं सहजच बोलून दाखवलं. इतकंच नव्हे तर त्यानं तिला “व्हॉटसअॅपवर किती गाणी पाठवली” याचीही नोंद होती त्याच्याकडे.. नंतर मग सारखं इतकं आणि तितकं चालू झालं.. ती सावध झाली. त्यापेक्षा जास्त कोमेजून गेली.
असं मोजमाप त्याच्या मनात असेल हे तिच्या खिजगणतीतही नव्हतं.. मग संवाद बिनसत आणि संपत गेले.. सगळ्याचंच मोजमाप होतंय अशा विचारानं तिच्या उत्स्फूर्त वागण्याबोलण्याला एक लगामच बसला.. सावकाशपणे ते नातं तक्रार आणि भांडण न होता विझत गेलं.. “कोई शिकवा भी नही, कोई शिकायत भी नही, और हमें तुमसे वह पहलीसी मुहब्बत भी नाही..” हे जाणवत गेलं..
दोन वर्षं अशीच गेली.. आता हा भेटला.. जरा सूर जमतायत, याच्याबरोबर जरा मनाची पाकळी खुलते आहे असं वाटायला लागलं. . ते हवंसंही वाटायला लागलं.. पण आता परत त्या वाटेवरुन चालताना जीव घाबरा होत होता.. ! दुसऱ्या कोणावर तरी आसुसून प्रेम करायची तिची क्षमताच संपली असं तिला वाटत होतं.. खरं तर त्याच्या चाफा आवडतो का या प्रश्नावर एकच उत्तर होतं.. तुम पूछो और हम न बताएं, ऐसे तो हालात नहीं.. बस ज़रा सा दिल टूटा है, और तो कोई बात नहीं..!
(नीलांबरी जोशी ‘कार्पोरेट कल्लोळ’ , ‘झपूर्झा’, ‘जिथे मुलांना पंख फुटतात’ आदी गाजलेल्या पुस्तकांच्या लेखिका आहेत)
…………………………