=शेखर पाटील
‘आपल्याकडे बुध्दीमत्ता असेल तर कृत्रिम बुध्दीमत्तेची गरज काय ?’ असा प्रश्न नेहमी विचारला जातो. यात गैरदेखील नाही. खरं तर मानवी विद्वत्तेची मशिन्स १०० टक्के बरोबरी करतील की नाही ? ही शंका रास्त आहे. तथापि, मानवी प्रज्ञेला नवीन आयाम देण्यासाठी ‘कृत्रिम बुध्दीमत्ता’ (आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच ‘एआय’ ) अत्यंत उपयुक्त आहे. आपण ज्यादेखील क्षेत्रात कार्यरत असाल, त्यात येत्या किमान दोन तर कमाल पाच वर्षांमध्ये ‘एआय’चा विपुल प्रमाणात वापर होणार असल्याची बाब आजच लक्षात घेण्याची गरज आहे.
अगदी किरकोळ विक्रेता वा प्राथमिक स्वरूपाची नोकरी करणार्यांपासून ते मोठा व्यापारी/उद्योजक/सेवा पुरवठादार वा कार्पोरेट क्षेत्रातील उच्चपदस्थांपर्यंत बहुतेकांचे काम एआयवर अवलंबून राहणार आहे. यामुळे प्रत्येकाला आपले काम कसे बदलणार याची किमान प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे. सध्या मी डिजीटल मीडियात काम करत आहे. येत्या किमान दोन वर्षातील माझे काम नेमके कसे बदलत जाणार ? याची ढोबळ माहिती जर मला नसली तर, गळेकापू स्पर्धेत टिकून राहणे आणि नवीन युगातल्या संधींचा लाभ घेणे या दोन्ही पातळ्यांवर मला जबर धक्का बसेल हे नक्की. यामुळे मी या क्षेत्रातील सर्व माहितीबद्दल स्वत:ला अपडेट करत असतो. खरं तर मी चार वर्षांपासूनच एआयचा वापर करत असून याबाबत आधीच पोस्ट टाकलेली आहे. मात्र आज हे सर्व सांगण्याचे कारण वेगळेच आहे. आज गुगलने गुगल असिस्टंटसह महत्वाच्या सेवांसाठी मराठीचा सपोर्ट जाहीर केला असून याबाबतचे टेकवार्तावरील वृत्त आपण http://bit.ly/2kJbyMH या लिंकवर वाचू शकतात.
मराठीत ‘एआय’चा वापर कमी असल्याबद्दल अनेक जण खंत व्यक्त करतात. मात्र आता याला वेग येणार असल्याचे गुगलच्या आजच्या घोषणेतून स्पष्ट झाले आहे. कालच अमेझॉनने आपल्या अलेक्झा या असिस्टंटसाठी हिंदीचा सपोर्ट जाहीर केला ( टेकवार्ताच्या वृत्ताची लिंक : http://bit.ly/2lU9gdQ ) यानंतर आज गुगल असिस्टंटला मराठीचा साज चढल्याची बाब लक्षणीय आहे. यामुळे आता कुणीही स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर अथवा स्मार्ट डिस्प्लेला ”हे गुगल…” म्हणून माय मराठीत ऑर्डर देऊ शकतो. याच्या मदतीने कॉल करणे वा रिसीव्ह करण्यासह दैनंदिन जीवनातील अनेक बाबींमध्ये आपल्याला अक्षरश: एक ‘डिजीटल सांगकाम्या’ उपलब्ध होणार आहे. दरम्यान, गुगल लेन्सलाही मराठीचा सपोर्ट आल्याची बाब ही याच प्रमाणे अतिशय रोमांचकारी अशीच आहे. गुगल लेन्स हे ‘व्हिज्युअल सर्च टुल’ आहे. ( आपण याला वापरण्यासाठी https://play.google.com/store/apps/details… येथून इन्स्टॉल करू शकतात ) यात स्मार्टफोनमधील कॅमेर्याच्या मदतीने सर्च करण्याची सुविधा आहे. यात कुणीही फलकांवरील मजकूर अनुवादीत करू शकतो. याच्या मदतीने छायाचित्र घेऊन इंटरनेटवरील त्या बाबीशी संबंधीत सर्च करता येतो. हॉटेलमधील डिशचे फोटो घेतल्यानंतर त्याच्या रेसीपीजशी संबंधीत बाबी आपल्याला दिसू शकतात. आता याला मराठीतून वापरण्यात येणार असल्याचे अनेक अफलातून उपयोग होणार आहेत. कुणीही इंग्रजीसह अन्य भाषांमधील मजकुरासमोर स्मार्टफोनचा कॅमेरा धरून संबंधीत मजकुराला मराठीत वाचू शकतो. याच्या मदतीने दुकाने, माहिती फलक आदींवरील माहिती, विविध प्रॉडक्टचे विवरण आदी माहितीला मराठीतून वाचता येईल. आपण परदेशात गेल्यानंतर तेथील एखाद्या रस्त्याच्या पाटीसमोर कॅमेरा धरल्यानंतर आपल्याला लागलीच त्यावरील माहिती मराठीत वाचता येईल. या सर्व सेवा चकटफू अर्थात पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत.
कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक भन्नाट सुविधा वापरायला मिळत आहेत. यात रिअल टाईम कॅप्शन, रिअल टाईम ट्रान्सलेशन आदींसारखे फिचर्स सध्या इंग्रजीत उपलब्ध असले तरी ते लवकरच मराठीत येणार आहेत. आज गुगल असिस्टंट मराठीत आला तर लवकरच अलेक्झा वा सिरीदेखील येईलच. अर्थात, या नवीन क्रांतीसाठी आपण सज्ज राहण्याची गरज आहे. स्मार्टफोनसह बहुतांश स्मार्ट उपकरणांशी आपण लवकरच मराठीत बोलू शकू. ते मराठीतील आपल्या आज्ञांचे पालन करतील. मराठीतच आपल्याला उत्तर देतील. या सर्व सेवांमुळे आपली खूप सोय होणार आहे. या प्रणालींमुळे आपला वेळदेखील वाचणार आहे. मात्र या सर्व सुविधांचा वापर आपण सुजाणपणे कसा करावा ? हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असणार आहे. एकीकडे मोठ्या टेक कंपन्या अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करून कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारे नवनवीन टुल्स आपल्याला सादर करतील. तर दुसरीकडे, याचा आपल्याला वैयक्तीक, सामूहिक आणि व्यावसायिक पातळीवर कशा प्रकारे उपयोग करावा ? याची बुध्दीमत्ता व सारासार विवेक आपल्याकडे असण्याची गरज आहे. यामुळे अर्थातच, भविष्यकाळ हा ”मानवी बुध्दीमत्ता+कृत्रीम बुध्दीमत्ता” अशा समुच्चयाने युक्त असेल हे आजच स्पष्ट झाले आहे. पुढील जबाबदारी अर्थातच आपलीच आहे !
(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)
92262 17770
https://shekharpatil.com