सफल प्रेमाच्या असफल गोष्टी-३
–– सानिया भालेराव
काय दिलंय ह्या प्रेमाने मला? मला काही सेल्फ रिस्पेकट् आहे कि नाही? तिची मुलगी चिडून तिला सांगत होती . त्याला माझी अजिबात पर्वा नाहीये. मला नाही वाटतं आमच्यात काही उरलंय आता ते. संपून गेलंय प्रेम. सो नातं संपवून टाकणं उत्तम. सिम्पल. तिला मात्र हे सिम्पल कसं ते समजलं नाही. प्रेम संपून गेलंय … असं कसं होऊ शकतं? पण ती काहीच बोलली नाही. हसली फक्त. किती सोप्प असतं ना असं प्रेम संपणं. प्रेम असं संपत नसत ग बाई.. सांगायचं होतं तिला समजावून. पण ह्या पिढीला ते उमजणार तरी आहे का? ह्यांचे अहम , स्वप्न, आयुष्य सगळंच खूप मोठं आणि कॅल्क्युलेटेड. तिला कधी कधी कौतुक हि वाटायचं ह्या पिढीचं. मानसिक गुंतवणूक म्हणून नाही.. कशातच. किती सरळ आणि सोप्प ना! केवळ स्वतःचा विचार. पण मग तिला वाटायचं कि दुसऱ्या साठी जगणं, दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख गवसण आणि प्रेमात झुरणं ह्या सगळ्यातला आनंद मिळणार आहे का ह्या पिढीला?
इतकी वर्ष उलटली तरीही आपल्याला जमलं नाही ते. आजही तो तसाच आणि तितकाच आठवतो… जेंव्हा त्याला पहिल्यांदा पहिलं होतं. त्याच क्षणी काळजात काही हाललं होतं . आणि त्यानंतर जसं समजत गेले तसा तसा अधिकच आवडत गेला तो. तिने त्याच्या कडून कधीच कुठलीच अपेक्षा केली नाही. तिच्या आवडत्या साहिर म्हणतो तसं….
अपनी तबाहियों का मुझे कोई ग़म नहीं
तुम ने किसी के साथ मोहब्बत निभा तो दी
प्रेम केलं फक्त. सगळं विसरून. प्रेमाने काय दिलं असा प्रश्न तो आयुष्यातून गेल्यावर तिला कधीही पडला नाही. तो नाही म्हणून त्याच्यावर प्रेम करायचं नाही हे तिला कधी समजलंच नाही. उलट काळानुसार तिचं प्रेम अधिकच गहिरं होत गेलं. तिला ते ना कधी कोणाला भासवायची गरज पडली नाही ना लपवण्याची. तिला त्याच्यावर प्रेम करून जे काही गवसलं होतं ते मोजता येण्यासारखं नव्हतंच मुळी. त्याच्यामुळे तिला ती स्वतःच गवसली होती. तिचं तेज, झळाळी होती ती फक्त त्याच्या प्रेमामुळे. ते असं मोजता थोडीच येणार! जेव्हा जेव्हा तिचे हात जोडले जायचे तेव्हा तेव्हा फक्त त्याच्यासाठीच.
वो बड़ा रहीम ओ करीम है मुझे ये सिफ़त भी अता करे
तुझे भूलने की दुआ करूँ तो मिरी दुआ में असर न हो
बशीर बद्र म्हणतात तसं कि देवा तू खूप दयाळू आहेस, तेव्हा मला एक वर दे कि जेव्हा जेव्हा मला त्याचा विसर पडो म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करेन तेव्हा ती सफल होऊ देऊ नकोस. अश्या प्रेमाला काय म्हणणार? असा प्रश्न देखील तिला कधी पडला नाही. इतकं निरलस, निर्लेप प्रेम केलं तिने त्याच्यावर. असं नाही कि तिला त्याच्या सोबतीची आस नव्हती. तो बरोबर असावा असं अनेक वेळा तिला वाटलं. त्याच्या साठी तीही खूप व्याकुळ व्हायची. सुरवातीला तर एकाकीपणा तिला सहन व्हायचा नाही. कालांतराने मात्र तिला एकाकी वाटणं बंद झालं.
एक शेर आहे अफ़ज़ल ख़ान यांचा…
बना रक्खी हैं दीवारों पे तस्वीरें परिंदों की
वगर्ना हम तो अपने घर की वीरानी से मर जाएँ
तसंच काहीसं. ती एकटी होती.. एकाकी नाही कारण तो सतत तिच्या बरोबर होताच. ती तसंच जगायला शिकली. तिच्या प्रेमाने तिला शिकवलं, सावरलं. प्रेम माणसाला कमकुवत करतं असं तिला कधीच वाटलं नाही. ह्याउलट प्रेम माणसाला अंतर्बाह्य सुंदर, तेजस्वी करतं असंच तिला वाटायचं. आज इतकी वर्ष झाली तरीही तिचं त्याच्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. उलट ते मुरत गेलं.. आत खोल.. इतकं कि तिला त्याच्यावर प्रेम करण्यासाठी खुद्द त्याचीही गरज उरली नव्हती. तिला वाटलं समजवावं का हे सगळं आपल्या मुलीला?
रहने दे अपनी बंदगी ज़ाहिद
बे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता….
कळणार तरी होतं का तिला ह्या दोन ओळींमधला गहिरा अर्थ? तसंही जेंव्हा काळानुसार प्रेम बंदगीमध्ये ,भक्ती मध्ये रूपांतरित होतं समाजाला ते वेडंच वाटतं. ज्यांनी ते अनुभवलं असतं, त्या प्रीतीची चव चाखली असते तेच हे समजू शकतात. नाहीतर ह्या भौतिक जगात तुला प्रेम करून काय मिळालं? असा प्रश्न विचारणारेच जास्त असतात.. प्रेमाने काही दिलं असेल तर हे श्वास दिलेत, ज्याच्या मुळे मी जगते आहे. ती उभारी दिली ज्याच्या मुळे मला माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली. ती झळाळी दिली ज्याच्यामुळे माझ्या चेहेऱ्यावर तेज चढलं. माझी ओळख माझ्या स्वतःशी करून दिली. काय आणि किती सांगितलं तरी ते कमीच पडणार होतं … पण असं सांगून प्रेमाची उकल करता येण्यासारखं सोप्प असतं का ते?
इश्क़ इक ‘मीर’ भारी पत्थर है
कब ये तुझ ना-तवाँ से उठता है
कोणालाही असं उठून प्रेम करता येण्यासारखं ते सोप्प असतं का? मीर म्हणतो तसं इश्क़ एका जड दगडा प्रमाणे आहे, कमकुवत लोकांसाठी प्रेमाचा भार उचलणं शक्य नाही…
तो एकटाच आहे का? हज्जार भेटतील असे… तिची मुलगी बडबडत होती. ती मात्र मंद हसली. लाखात काय, अख्या दुनियेत त्याच्या सारखा परत कोणी तिला मिळणार नव्हता.. संध्याकाळ होत होती. ती मावळणाऱ्या सूर्याला डोळेभरून पाहत राहिली. तिने सवयी प्रमाणे दिवा लावला. दिव्याची मंद वात तेवत होती. अगं अंधारात काय बसतेस अशी रोज?लाइट लाव कि… तिची मुलगी म्हणाली. ती नुसतंच हसली यावर. तिची खोली उजळून निघाली होती त्या प्रकाशाने तिला तेवढंच पुरेसं होतं. तिने डोळे मिटून गाणं गुणगुणायला सुरवात केली.
छुपा लो यूँ दिल में प्यार मेरा
के जैसे मंदिर में लौ दीए की
तुम अपने चरणों में रख लो मुझको
तुम्हारे चरणों का फूल हूँ मैं
मैं सर झुकाए खड़ी हूँ प्रीतम
के जैसे मंदिर में लौ दीए की
ये सच है जीना था पाप तुम बिन
ये पाप मैंने किया है अब तक
मगर है मन में छबी तुम्हारी
के जैसे मंदिर में लौ दीए की
(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे .)
[email protected]
……………………………………………………………………………………………………
हे सुद्धा नक्की वाचा –
दिल धडकने का सबब याद आया http://bit.ly/2D28ktu
कुछ लोग बिखर कर भी तमाशा नहीं होते http://bit.ly/2X9YRIa