गांधीजींशी मतभेद

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमाला – भाग ११

साभार – साप्ताहिक साधना

– सुरेश द्वादशीवार

 

मद्रासच्या अधिवेशनात नेहरूंनी अनेक ठराव मांडले. त्यातला एक भारतासाठी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा होता. तोपर्यंत अशी मागणी काँग्रेसने केली नव्हती. टिळक व गांधीही वसाहतीच्या स्वराज्यापाशी थांबले होते. मवाळांचाही भर त्यावरच होता. त्यामुळे नेहरूंचा ठराव सार्‍यांच्या भुवया उंचावणारा ठरला. मात्र गंमत ही की तो अधिवेशनाला आलेल्या सर्व प्रतिनिधींनी एकमताने व उत्साहाच्या भरात संमत केला. त्यावेळी हजर असलेल्या अ‍ॅनी बेझन्ट यांनीही त्याला पाठिंबा दिला. गांधीजींनी मात्र त्यात भाग घेतला नाही. त्यांना तो ठराव आवडलाही नाही. नंतर लिहिलेल्या आपल्या संपादकीयात त्यावर टीका करताना गांधीजींनी म्हटले ‘जे कधी मंजूर होणार नाही वा अंमलात येणार नाही ते ठराव करून काँग्रेस आपले देशात व जगात हसे करू घेत आहे, असे ठराव या राष्ट्रीय पक्षाला एखाद्या वादविवाद सभेचेच स्वरूप तेवढे आणू शकतात.’

गांधीजींच्या टिकेने सारे अधिवेशनच अंतर्मुख झाले. आपण हा ठराव मांडण्यात घाई केल्याची जाणीव नेहरूंनाही झाली. बहुसंख्य प्रतिनिधी मग गांधीजींकडे वळले. तथापि नेहरूंचा ठराव तसाच ठेवून काँग्रेसने येऊ घातलेल्या सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा व त्यासाठी उदारमतवाद्यांएवढीच मवाळांचीही मदत घेणारा ठराव संमत केला. नेहरूंचा ठराव काही काळातच मागे पडला व कर्मठ मताच्या लोकांच्या टीकेचा तो विषयही बनला…

४ जानेवारी १९२८ ला गांधीजींनी पत्रातूनच त्यांची नाराजी नेहरूंना कळविली. ‘तुम्ही फार घाईत असल्यागत वागत आहात, देश व समाजमन यांची  सद्यस्थिती तुम्ही ध्यानात घेत नाही. तुमचा अहिंसेवर असलेला विश्वास किती खोलवर आहे याचीही यामुळे मला कधीकधी शंका येते. हा देश हिंसेने स्वतंत्र होणार नाही आणि अतिरेकाने त्याचे कल्याणही होणार नाही. परंतु तरीही तुमचे मत तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी त्याला विरोध करणार नाही. सध्या तरी वर्किंग कमिटीचे सचिव या नात्याने संघटनेचे धोरण राबविणे हे तुमचे काम आहे. त्यासाठी सायमन कमिशनवर बहिष्कार व काँग्रेसचे ऐक्य यासाठीच तुम्ही झटले पाहिजे.’ नंतर १७ जानेवारीला लिहिलेल्या दुसर्‍या पत्रात ते नेहरूंना म्हणतात, ‘आपल्यातले मतभेद तुटेपर्यंत ताणले गेले आहेत. तुमच्यासारखा स्नेही व सहकारी दुरावल्याचे माझे दु:ख शब्दातीत आहे. मात्र हा दुरावा आपले सख्य नासवू शकणार नाही. आपण एका कुटुंबाचे सदस्य आहोत आणि मतभेदानंतरही आपण तसेच राहणार आहोत.

नेहरूंनाही त्यांचे उतावळेपण या पत्रांनी लक्षात आणून दिले. जनतेची निष्ठा गांधीजींवर असल्याचेे व तेच देशाला खरा मार्ग दाखवू शकणार असल्याचेही त्यांच्या मनात आले. परिणामी त्यांनी त्यांच्या भूमिका बाजूला सारल्या व ते पुन्हा गांधीजींच्या बाजूने उभे राहिले. यानंतरचा काळ नेहरूंची जास्तीची कोंडी करणारा ठरला. सार्‍या देशात सायमनविरोधी वातावरण पेट घेत होते आणि देशाच्या स्वातंत्र्याची योजना इंग्रजांनी तयार करण्याऐवजी ती भारतीयांनीच तयार केली पाहिजे ही भावना जोर धरत होती. सायमनच्या आगमनाआधीच सार्‍या देशात त्याच्या निषेधाचे  ‘सायमन गो बॅक’ असे फलक लागले होते. या काळात होऊ घातलेले काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्यात व मोतीलालजींच्या अध्यक्षतेखाली व्हायचे होते. देशाला लागणारे संविधान त्यांच्याच नेतृत्वात तयार व्हावे अशा सूचनाही सार्‍या बाजूंनी येत होत्या. मोतीलालजींचे कायदेपांडित्य अर्थातच त्याला कारण होते. मोतीलालजींना सहाय्यक म्हणून नऊ जणांची एक समिती नेमली गेली. अ‍ॅड. बापूजी अणे हे त्या समितीचे सचिव व लेखनिक होते.

हा काळ देशातील ग्रामीण भागात वाढीला लागलेल्या असंतोषाचाही होता. नेहमीच शांत म्हणून ओळखला जाणारा ओरिसाचा ग्रामीण भाग वाढते कर व अधिकार्‍यांचे वाढते जुलूम यामुळे त्रस्त होऊन अस्वस्थ बनला होता. गुजरातमध्ये दुष्काळ पडून तेथील शेतकर्‍यांचे आयुष्यही मेटाकुटीला आले होते. सरकार करमाफीला राजी नव्हते, उलट कराचा भरणा करण्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लिलावात काढण्याचे काम त्याने हाती घेतले होते. या स्थितीत काँग्रेसच्या वतीने व शेतकर्‍यांच्या बाजूने पुढे होण्याचे आवाहन गांधींनी सरदार पटेलांना केले.

सरदार बॅरिस्टर होते. अलाहाबाद नगरपरिषदेचे पूर्वाध्यक्ष या नात्याने त्यांना प्रशासनाचा अनुभव होता. शिवाय कायदा व इंग्रजी भाषा  यावरचा त्यांचा अधिकार व दरारा कोणाच्याही मनात आदर उभा करणारा होता. आठ वर्षांपूर्वी त्यांनी वकिली सोडली होती व ते काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते बनले होते. शेतीची जाण, गरिबांच्या दु:खांशी नाते व ग्रामीण जीवनाची ओळख असलेले सरदार वास्तवाचे जाणकार व जमिनीशी नाते जुळविलेले होते. त्यांनी दुष्काळी भागात फिरून शेतकर्‍यांना दिलासा दिला. ‘सरकारला तुमच्या जमिनी जप्त करून इंग्लंडला न्यायच्या असतील तर नेऊ द्या, त्या ते कसे करतात तेच आपण पाहू’ असे म्हणत सरदार ग्रामीण जनतेच्या लढ्याचे नेते बनले. सरकारने शेतसारा २२ टक्क्यांनी वाढविला. दुष्काळी स्थिती असतानाही बारडोली भागात त्याची सक्ती सुरू केली. पोलिसांची कुमक आली. सरदारांनी आपल्यासोबत २५० कार्यकर्त्यांची फौज घेतली. शिवाय शेतकर्‍यांची सोळा शिबिरे उभी केली आणि ते स्वत: साराबंदीच्या मोहिमेवर निघाले. सरकारने जमिनीचे लिलाव जाहीर केले पण त्यात बोली बोलायला कोणीच पुढे आले नाही. सर्वत्र वल्लभभाईंचा शब्द कायद्यासारखा चालला. याच लढ्यात त्यांना सरदार हे नामाभिधानही प्राप्त झाले. सार्‍या देशात त्यांचे नाव गांधी आणि नेहरूंबरोबर घेतले जाऊ लागले आणि संघटनेतही त्यांचा शब्द प्रमाण बनला. परिणामी कलकत्ता काँग्रेसमध्ये ते आल्यापासूनच त्यांच्या स्वागताच्या व जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या. त्यामुळे प्रत्यक्ष संमेलनाध्यक्ष मोतीलाल नेहरू यांनीच सरदार पटेलांचे नाव पुढे होणार्‍या लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी गांधीजींना सुचविले.

गांधीजींच्या मनात मात्र यावेळी नेहरूंवर जास्तीच्या जबाबदार्‍या टाकण्याचा विचार प्रबळ होत होता. युरोपच्या दौर्‍याने व विशेषत: त्यातील रशियाच्या भेटीने नेहरूंना साम्यवादाच्या व समाजवादाच्याही काहीसे जवळ नेले होते. साम्यवादातील हिंसा सोडली तर तो विचार समाजवादाच्या जवळ जातो आणि समाजवाद आपल्याला मान्य असल्याचे नेहरू त्यावेळी उघडपणे बोलतही असत. त्यांच्या भाषणात तो विचार सदैव येत असे. भारत नुसता स्वतंत्र होऊन चालणार नाही. इंग्रज गेले आणि भारतीय राज्यकर्ते आले की स्वातंत्र्य येईल पण ते स्वराज्य असणार नाही आणि ते भारतीयांच्या अपेक्षा पूर्णही करू शकणार नाही. स्वातंत्र्याने प्रत्येकाला त्याचा वाटा एखाद्या अधिकारासारखा दिला पाहिजे. या देशात माझेही काहीतरी आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे आणि असे वाटायला लावणे व प्रत्यक्ष तसा वाव देणे हे समाजवादाचे उद्दिष्ट आहे असे ते म्हणत. त्यामुळे त्यांच्या मते स्वातंत्र्याला समाजवादाची जोड आवश्यक होती.

गांधीजींना साम्यवादाएवढाच समाजवादही मान्य नव्हता. मुळात कोणताही वाद मानवनिर्मित असल्यामुळे तो बनविणार्‍याच्या मनातील चौकटीसारखा असतो. अशा कोणत्याही व कोणाच्याही चौकटीत समाजाला बसविणे गांधींना मान्य नव्हते. निसर्गात बळी तो कानपिळी हा न्याय आहे. तोही गांधींना अमान्य होता. पण जो न्याय मानवनिर्मित म्हणून सांगितला जातो तोही माणसाच्या विकासाला सहाय्यभूत ठरणारा आणि त्याची नैसर्गिक वाढ होऊ देणारा असावा असे ते मानत. स्वातंत्र्याला चौकटी नसाव्या. असल्या तरी त्या न्याय्य व समाजमान्य असाव्या. वरून लादलेल्या नसाव्या. समाजवाद आणि साम्यवादाचा विचार वरून लादल्यासारखा आहे. तो माणसाचा नैसर्गिक विचार रोखणारा व बंदिस्त करणारा आहे. गांधींना ही बाजूच मान्य होणारी नव्हती. त्यामुळे नेहरूंच्या मनावरचे समाजवादाचे गारुड उतरविणे त्यांना गरजेचे वाटत होते. त्यासाठी त्यांच्यावरच काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे जोखड लादणे त्यांना आवश्यक वाटत होते. आपला विचार त्यांनी तात्काळ कोणाला सांगितल्याचे मात्र दिसले नाही.

केवळ नेहरूंशी  ते समाजवादाच्या उपयुक्ततेविषयी चर्चा करीत. प्रत्यक्ष भेटीत, तर कधी पत्राने त्याविषयीची आपली मते ते नेहरूंना कळवीत. एका पत्रात गांधींनी काहीशा उपरोधाने लिहिले, ‘मी जगातले बहुतेक सगळे ज्ञानकोष पाहिले. त्यातल्या एकाने केेलेली समाजवादाची व्याख्या दुसर्‍याने केलेल्या व्याख्येशी जुळत नाही आणि त्यातली कोणतीही मला पटण्याजोगी वाटत नाही.’ समाजाला एखाद्या वादाच्या चौकटीत ठासून बसविण्याची  गांधींची तयारी नव्हती आणि शिस्त वा दिशा यावाचून विकासाला गती मिळत नाही ही नेहरूंची धारणा होती… मात्र एवढ्या मतभिन्नतेनंतरही नेहरू गांधींसोबतच राहिले. तसे राहताना त्यांच्या मनातला गांधीजींविषयीचा विश्वास बळकट ठरला होता. देश गांधींसोबत आहे आणि गांधींएवढा हा देश दुसर्‍या कोणाला कळलाही नाही असे त्यांना वाटे. नेहरूंच्या या सातत्याने बदलणार्‍या भूमिकांमुळे पक्षातील अनेकांनी त्यांच्यावर अनिर्णायकी अवस्थेचा आरोप केला तर काहींनी त्यांची टवाळीही केली.

दरम्यान मद्रास काँग्रेसमधील मतभेदांपासून मोतीलालजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कलकत्ता काँग्रेसपर्यंत नेहरूंचा गांधीजींशी काहीसा दुरावा राहिला. भंगीमुक्ती किंवा त्यासारख्या कार्यक्रमांना गांधी स्वातंत्र्याच्या तुलनेत एवढे महत्त्व का देतात हे त्यांना कळत नव्हते व पटतही नव्हते. ते आणि सुभाष या काळात जास्तीची उग्र भाषा बोलत. सुभाष तर आता जुन्या नेत्यांकडे सांगण्याजोगे व करण्याजोगे काही उरले नाही असे म्हणत… त्यावरचा मोतीलालजींचा अभिप्राय हा की प्रत्येकच नव्या पिढीला जुन्या पिढीची उपयुक्तता संपली असे आजवर वाटत आले आहे. त्यामुळे सुभाष व जवाहरलाल यांच्यावर माझा राग नाही. मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी माझ्या नेतृत्वात तयार होत असलेल्या योजनेत त्यांनी सहभागी होऊन तिचा अधिक आक्रमक प्रचार केला पाहिजे. पुढच्या काँग्रेसपर्यंत आमच्यातले हे अंतर बहुदा संपलेही असेल.

नंतर लगेचच नेहरूंनी गांधीजींना आपल्यासोबत उत्तरप्रदेशच्या दौर्‍यावर येण्याचे निमंत्रण दिले. गांधीजींनी त्यांच्यासोबत तो सारा प्रदेश फिरून पाहिला. त्यांच्या सभांना दरदिवशी लाखोंच्या संख्येने लोक येत. लाऊडस्पिकरची सोय नसल्याने येणार्‍यांना त्यांचे नुसते दर्शन घडे. भाषण मात्र ऐकता येत नसे. परंतु त्यांचे दर्शनही त्यांच्या मंत्राहून अधिक प्रभावशाली होत असे. तशात लाहोर काँग्रेसचा दिवस जवळ येऊ लागला आणि देशात पुन्हा उत्साहाचे वारे फिरू लागले. काँग्रेस पक्षात मात्र नेहरू वा पटेल याविषयीचा गांधीजींचा निर्णय यायचा होता.

नेमक्या अशावेळी ब्रिटीश सरकारने काँग्रेससह देशातील इतर पक्षांना गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. त्यात भारताला क्रमाने द्यावयाच्या वसाहतीच्या स्वराज्याची चर्चा करणे हा महत्त्वाचा विषय होता. ज्यासाठी लढायचे त्याचसाठी चर्चा करण्याचे आमंत्रण आल्यानंतर ते स्वीकारणे काँग्रेससह सार्‍यांना भाग होते. गांधींनी त्याचा लागलीच स्वीकार केला. नेहरू मात्र त्याला राजी नव्हते. मद्रास काँग्रेसमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मंजूर झाल्यानंतर वसाहतीचे स्वातंत्र्य मागायला जाणे ही गोष्ट काही पावले मागे घ्यायला लावणारी आणि स्वत:ला हास्यास्पद बनविणारी आहे असे त्यांचे मत होते. तर देश व समाज हा व्यक्तीहून मोठा असल्याने त्याची बाजू घेताना स्वत:ची मते मागे टाकणे हा त्याग आहे ही गांधींची समजावणी होती. गोष्टी अटीतटीला आल्या तेव्हा गांधीजींनी नेहरूंना स्पष्टच सुनावले. ‘तुम्हाला पक्षात राहायचे असेल आणि वर्किंग कमिटीवर सचिव म्हणून काम करायचे असेल तर तुम्ही पक्षाची भूमिका मान्य केली पाहिजे अन्यथा त्या दोन्ही पदांचा तुम्ही राजीनामा दिला पाहिजे’.

नेहरूंना गांधी हवे होते. त्यांच्यासाठी आपली मते बाजूला सारण्याचीच मग त्यांनी तयारी केली. यावेळी वर्किंग कमिटीने ब्रिटीशाकडे पाठवायच्या ठरावाचा जो मसुदा तयार केला त्यात वसाहतीच्या स्वातंत्र्याच्या चर्चेला काँग्रेस तयार असल्याचे म्हटले होते. त्यावर सार्‍या सभासदांनी सह्या केल्या. नेहरूंनीही त्यावर आपली सही केली. पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी होते असे तेथे उपस्थित असणार्‍यांनी नमूद केले आहे.

(लेखक नामवंत विचारवंत , वक्ते व ‘लोकमत’ च्या नागपूर आवृत्तीचे संपादक आहेत)

9822471646

जवाहरलाल नेहरू विशेष लेखमालाजुने सगळे लेख वाचण्यासाठी क्लिक करा- http://mediawatch.info/category/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82/

Previous articleबे-मोहब्बत ख़ुदा नहीं मिलता….
Next articleविदर्भातील निकाल कमालीचे धक्कादायक असणार !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.