त्या वेळी भारत ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली होता. आणि त्या काळात आधुनिक औषधं मुश्किलीनेच भारतात येत होती. मी दुसऱ्या एका ठिकाणी लिहिलं आहे की, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे दत्तक सुपुत्र डॉ. यशवंतराव या दोघांचाही पुण्यातील रुग्णांची शुश्रूषा व त्यांना मदत करतानाच मृत्यू झाला होता. भारतीय होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांचा त्या वेळच्या रुग्णांनाही क्वचितच उपयोग झाला होता. ढोबळ अंदाज असा आहे की, तत्कालीन भारताची (ज्यात आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश होता) लोकसंख्या १८ ते २० कोटी होती आणि त्यापैकी एक कोटी लोक प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले. ………………………………………………………………
जागतिकीकरणाच्या युगातील विश्वाला COVID-19 ने अभूतपूर्व हादरा दिला आहे. तो वुहानमध्ये उदयाला आला, आणि त्याचा पहिला तडाखा चीनमधील वातानुकूलित प्रवासी जीवनपद्धतीभोवती केंद्रित होता. पुष्कळ तासांचा विमानप्रवास करून आलेल्या व्यक्ती या पहिल्या फळीतील COVID-19 पॉझिटिव्ह होत्या, असं भारतातील रुग्णांच्या माहितीवरून कळतं आहे. त्याचा दुसरा हल्ला सॉफ्टवेअर कंपन्या, उच्च दर्जाची वातानुकूलित कार्यालयं, बोर्डरूम्स अशा जागी काम करणाऱ्या व्यक्तींवर होता. सुरवातीचा धक्का त्याने श्रीमंतांना दिला; पण याचा अर्थ असा नव्हे की, गरिबांना त्याने सोडून दिलं.
कोरोना विषाणूचा जलद प्रसार होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय विमानप्रवासात मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ. मुख्यतः माहिती तंत्रज्ञान क्षेत्र जगभरात भरभराटीला येण्याने ही वाढ झाली. ‘जग हे एक वैश्विक खेडं आहे’ हा सिद्धांत इतर कशाहीपेक्षा कोरोनाच्या परिणामाने खरोखरच सिद्ध केला आहे. खरं तर, उच्चस्तरावरील जागतिक अर्थव्यवस्थेने जगाला एक ‘वैश्विक वातानुकूलित शहर’ बनवून ठेवलं आहे आणि आता या अकल्पित कोरोना विषाणूमुळे मात्र तो मृत्यूचा सापळाच ठरणार आहे.
उदाहरणार्थ- तेलंगणा व आंध्रप्रदेशमध्ये अनेक देशांतून आलेले आणि कोरोनाग्रस्त असलेले रुग्ण वगळता,१ ते २० जानेवारीपर्यंत ४० हजार लोक अमेरिका आणि युरोपमधून हैदराबाद विमानतळावर आले. एक अंदाज असा आहे की, या काळात एकंदर परदेशांशी असणाऱ्या हवाई संबंधांतून ६५ हजार लोक हैदराबादमध्ये उतरले. दुबई, इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या देशांतून जे लोक तिथे आले, तेदेखील कोरोनाग्रस्त असल्याचं सिद्ध झालं. COVID-19 प्राथमिक पातळीवर, केवळ तीन महिन्यांत १९० देशांमध्ये झालेला प्रसार जागतिकीकरणाची एक निराळीच कथा सांगतो आहे. महत्त्वाची शहरं विशेषतः मोठे विमानतळ असणारी ठिकाणं -ही अधिक भयग्रस्ततेची आणि अस्वस्थतेची केंद्रं झाली आहेत. परदेशी विमानप्रवाशांविषयीची नकारात्मक भावना वाढू लागली आहे आणि ते भीती व अस्वस्थतेचे स्रोत बनले आहेत.
शेतीप्रधान व ग्रामीण जीवनक्रमामुळे भारतातील खेडी ही आधीच स्वतःहून सामाजिकदृष्ट्या विलग राहणारी असतात आणि झपाट्याने शहरीकरण होत चाललेल्या जगात ही तरी निदान सुंदर गोष्ट आहे. भारत आणि जग या साथीच्या आजारातून कसं पार होईल, याची काहीच शाश्वती नाही. कारण वैद्यकशास्त्र शर्थीने प्रयत्न करत असूनही, त्याने अद्याप या आजारावर कोणतीही लस सुचवलेली नाही किंवा या आजारावरील उपचारांची नेमकी पद्धतही अजून सापडलेली नाही. जागतिक पातळीवर पसरलेली घबराट आणि ‘लॉकडाऊन’सारख्या सर्वच देशांनी अवलंबलेल्या नेहमीपेक्षा वेगळ्या उपाययोजना मागे वळून पाहायला लावत आहेत. गाठीच्या प्लेगच्या 1897 मध्ये आलेल्या साथीत भारतातील 1 कोटी आणि चीन व इतर देशांमधील 20 लाख लोक मृत्युमुखी पडले. त्या प्लेगमधून भारताने कसं निभावलं होतं?
त्या वेळी भारत ब्रिटिश साम्राज्याच्या अमलाखाली होता. आणि त्या काळात आधुनिक औषधं मुश्किलीनेच भारतात येत होती. मी दुसऱ्या एका ठिकाणी लिहिलं आहे की, सावित्रीबाई फुले आणि त्यांचे दत्तक सुपुत्र डॉ. यशवंतराव या दोघांचाही पुण्यातील रुग्णांची शुश्रूषा व त्यांना मदत करतानाच मृत्यू झाला होता. भारतीय होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांचा त्या वेळच्या रुग्णांनाही क्वचितच उपयोग झाला होता. ढोबळ अंदाज असा आहे की, तत्कालीन भारताची (ज्यात आत्ताचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांचाही समावेश होता) लोकसंख्या १८ ते २० कोटी होती आणि त्यापैकी एक कोटी लोक प्लेगच्या साथीत मृत्युमुखी पडले.
मग उर्वरित लोकांनी स्वतःचं रक्षण कसं केलं आणि आजचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश कसा घडवला? हे सगळे एकत्र केले तर आज आपण १६० कोटी लोक आहोत. प्लेगच्या त्या काळात, आत्ताच्या तेलंगणा राज्यातल्या वारंगळ जिल्ह्यातील लोकांनी जिवंत राहण्यासाठी जे-जे उपाय केलेत त्यांची माहिती मी पिढ्यान्पिढ्यांनी सांगितल्या गेलेल्या मौखिक इतिहासातून गोळा केली आहे. प्लेग जेव्हा शहरांमध्ये येऊन धडकला, तेव्हा लोकांना त्यांच्या उपजतज्ज्ञानातून आणि परस्परचर्चेतून ताबडतोब याची जाणीव झाली की जंगली भागात किंवा निमजंगली भागात जाऊन राहण्याने समूहामध्ये एकमेकांशी येणारा संपर्क टाळता येईल आणि आपोआप सामाजिक विलगीकरण साधेल. ज्या तीन जातसमूहांनी गाठोडी बांधून तिथून नव्या, दूरवरच्या ठिकाणी तत्काळ स्थलांतर केलं, ते होते- मेंढपाळ, मासेमार आणि गुराखी. हे समाज कोणत्याही जागी त्यांच्या गोधनाच्या किंवा माशांच्या अर्थकारणासह आणि वनोत्पादनांच्या बळावर जगू शकतात.
आजपासून १२३ वर्षांपूर्वी हैदराबादमधील निजामाच्या राज्यात भरपूर वनजमिनी, निम-वनजमिनी प्राण्यांना चरण्यासाठी उपलब्ध होत्या. नद्या व इतर जलप्रवाहांबरोबरच मासेमारीसाठीही जलाशय उपलब्ध होते. याच प्लेगच्या साथीमध्ये शेकडो मेंढपाळ कुटुंबांसह माझे आजोबा करीमाबाद येथील ‘उरसू’ मधून (या गावांना एकत्रितपणे ‘फोर्ट वारंगळ गाव’ असं म्हटलं जातं. ही गावं १३ व्या शतकानंतरच्या काकतीय साम्राज्याच्या काळात वसवली गेली) पाकलपट्टी येथे स्थलांतरित झाले. नरसमपेटजवळ असणारं, काकतीय साम्राज्याच्या काळात बांधलं गेलेलं पाकल तळं हा त्याच्याशेजारी मोठ्या संख्येने नव्याने राहायला आलेल्या समूहाचा मुख्य जलस्रोत होता. महबुबाबाद आणि नरसमपेट यांच्यामध्ये असणाऱ्या त्या जंगली वा निमजंगली पट्ट्यात स्थलांतरित झालेल्या मेंढपाळांना ‘कुरुमा गोला’, मासेमारांना ‘मोतिराज’ व गुराख्यांना ‘लंबाडा’ असं म्हटलं गेलं.
माझ्या वयाचे लोक हे त्या स्थलांतरितांच्या खेड्यांमधील तिसऱ्या पिढीचे आहेत. त्या दुष्ट प्लेगमुळे स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीच्या काळातील आठवणी माझ्या लहानपणी आणि शाळेतील दिवसांमध्ये सांगितल्या जात होत्या. काही विधवा या प्लेगमधून वाचल्या होत्या. मी जेव्हा लहानाचा मोठा होत होतो; तेव्हा प्लेगची भयानकता, त्यांचं विस्थापन आणि नव्या जागी झालेलं स्थलांतर, प्लेगच्या तावडीतून त्यांचं वाचणं या सगळ्याविषयी त्या सांगत असत. माझ्या तीन आज्या- कांचा लिंगम्मा (माझ्या वडिलांची आई), तिची मोठी बहीण इरम्मा या दोघी आणि माझ्या आईची आई चित्ते बालकोमुरम्मा हीदेखील विधवाच होती. ही दोन्ही कुटुंबं पाकल झऱ्याजवळ एकाच ठिकाणी स्थायिक झाली. हादेखील शेळ्या आणि मेंढ्यांना चरण्यासाठी उपयुक्त असा पपैहपेट नावाचा जंगली पट्टा होता. माझ्या शेजारी राहणारं कुटुंब कापू-रेड्डींचं होतं, त्याही घरात दोन विधवा होत्या. अनेकदा कठीण काळात स्त्रियाच टिकून राहतात, कारण नवरा-बायकोमधील वयाचं अंतर अधिक असतं आणि स्त्रियांची टिकून राहण्याची क्षमताही अधिक असते. त्या भागांतील अनेक खेड्यांमध्ये अशा विधवा होत्या आणि अतिशय खडतर परिस्थितीतही मेहनतीने त्या आपलं कुटुंब चालवत होत्या.
या कुटुंबांनी स्वतःची लहान-लहान घरं तिथे उभारली आणि शहरापासून, खेड्यापासून किंवा मोठ्या ग्रामीण समूहापासून स्वतःला दूर ठेवलं. नागरी वस्तीतील स्वतःची उत्तम तऱ्हेने बांधलेली फरसबंद घरं सोडल्यानंतर अन्नाला पारखं होण्याची किंमत मोजून त्यांनी स्वतःला वाचवलं. प्लेगची साथ संपल्यानंतर या विस्थापितांची त्यांच्या मूळच्या गावांतील घरं इतरांनी ताब्यात घेतली.
बराच काळपर्यंत हे स्थलांतरित गवताने शाकारलेल्या लहानशा घरांमध्ये राहत होते. त्यांचं गोधनाचं अर्थकारण हळूहळू वाढू लागलं आणि त्यांच्यातील काही कुटुंबांनी जमिनीची स्वहस्ते मशागतदेखील सुरू केली. सुरुवातीच्या काळात त्यांची मुख्य अडचण ‘धान्याची टंचाई’ ही होती. त्या वेळी मांस, मासे, जंगलातील कंदमुळे अशा गोष्टींवर त्यांनी कशीबशी निकड भागवली. साथीच्या आजारात तिथे स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीने काळाच्या ओघात तिथे गो-पालनावर आणि शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था उभी केली. ही नवजात व्यवस्था जसजशी वाढू लागली तसतशी अधिक वेगाने त्यांनी अर्थव्यवस्था उभारायला सुरुवात केली. सध्याच्या महबुबाबाद जिल्ह्यात तेव्हा भटक्या जमातींची अनेक लहान खेडी असल्यामुळे, तो भाग अशा जमातींसाठीच्या राखीव लोकसभा मतदारसंघाचा होता; त्याचबरोबर तो पुष्कळ लोकसंख्या असणारा आणि शेतीच्या चांगल्या उत्पादनामुळे हिरवागार असणारा पट्टा होता.
आपण हे विसरता कामा नये की, त्या साठीनंतरच्या १२३ वर्षांत आपण एकट्या भारतातच १३० कोटी एवढी लोकसंख्या निर्माण केली आहे. भारत सरकार मात्र १८९७ च्या साथीच्या विकारांसंबंधीचा कायदा २०२० च्या या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी वापरत आहे. असं असूनही आपण मात्र आपल्या आजूबाजूला असलेल्या या कोरोनामुळे घाबरून जाता कामा नये. आता आपल्याकडे अत्याधुनिक वैद्यकशास्त्र आहे. या साथीवरही आपण नक्कीच मात करू.