मराठा सेवा संघटनेचं हे रौप्य महोत्सवी वर्ष़. एखाद्या संस्था-संघटनेसाठी २५ वर्षांचा कालखंड हा तसा फार मोठा नसतो़ मात्र त्या संघटनेचा आचार-विचार, तिची दिशा, तिची ताकद कळायला ही एवढी वर्ष पुरेशी असतात़ २५ वर्षाच्या कालावधीत मराठा सेवा संघाने महाराष्ट्रातील बहुसंख्य असलेल्या मराठा समाजाची जबरदस्त प्रभाव असलेली संघटना, असं स्थान निश्चितपणे निर्माण केलं आहे़ लोकशाही व्यवस्थेत वेगवेगळ्या दबावगटांचं फार महत्व असतं़ तसा विचार जर केला तर एक अत्यंत प्रभावी परिवर्तनवादी दबाव गट, असं एका वाक्यात सेवा संघाचं वर्णन करता येतं़ मराठा सेवा संघाबद्दल एकंदरीत समाजात दोन विचारप्रवाह आढळतात़ एक समूह सेवा संघाला अतिशय कट्टर, झुंडशाहीने धाक आणि दहशत निर्माण करणारी संघटना मानतो़ इतर जातींच्या संघटनेप्रमाणे ही सुद्धा एक जातीय संघटना आहे, असं ते मानतात़ या संघटनेने महाराष्ट्रातील सहिष्णुता, सत्यशोधकी परंपरा संपविली़ एका समाजाला टार्गेट करुन व्देषाची पेरणी करण्याचं, येथील बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचं काम सेवा संघाने केलं, असा आरोप ते करतात़ दुसरीकडे मराठा सेवा संघाचे समर्थक महाराष्ट्राच्या समाजजीवनात सेवा संघाने अतिशय क्रांतिकारक बदल घडवून आणलेत, असा दावा करतात़ समग्र समाजाचं आणि इतिहासाचंही ब्राह्मणीकरण करायला निघालेल्यांना सेवा संघाने चाप लावला़ बहुजनांच्या डोक्यातील जळमटं आणि त्यांच्या डोळ्यावरील झापडं सेवा संघामुळे दूर झालीत, असं ते सांगतात़.
परस्परविरोधी मतांच्या गदारोळात नेमकं खरं काय आहे? १९९० मध्ये स्थापन झालेली ही संघटना २००४ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या तोडफोडीपर्यंत फार कोणाच्या खिजगणीत नव्हती़ इतर संस्था-संघटनेप्रमाणेच एक संघटना असंच सेवा संघाकडे तोपर्यंत पाहिलं जात होतं़ २००४ मधील भांडारकर प्रकरणानंतर या संघटनेची पहिल्यांदा गांभीर्याने दखल घेण्यात आली़ राजकारणी, समाजकारणी, इतिहास संशोधक, पत्रकार, शिक्षणतज्ञ अशा साºयांच्या रडारवर ही संघटना पहिल्यांदा तेव्हा आली़ त्यानंतर या संघटनेचे टोकाचे समर्थक आणि टोकाचे विरोधक अशी सरळसरळ विभागणी झाली़ मात्र दोन्ही टोकांचा विचार करण्यापेक्षा प्रत्यक्ष वास्तव काय आहे, हे तपासलं पाहिजे़ मराठा सेवा संघाच्या नावात मराठा असलं आणि मराठा समाजाचा सर्वांगिण विकास हे सेवा संघाचं प्रमुख उद्दिष्ट असलं तरी मला आठवते, प्रारंभीच्या काळात ओबीसी, दलित, आदिवासी आणि इतरही समाजातील वेगवेगळ्या पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक, पत्रकार, संशोधक मोठ्या संख्येने सेवा संघाकडे आकर्षित झाले होते़ सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर आणि सेवा संघाचे ठिकठिकाणचे पदाधिकारीही त्यांना आपल्या कार्यक्रमांना आमंत्रित करत होते़ त्यांना सन्मानाचं स्थान देत होते़ सर्व प्रकारच्या उपक्रमात त्यांना बरोबरीने सामावून घेत होते़ त्यामुळे संघटनेच्या नावात जरी मराठा असलं तरी महाराष्ट्रात राहणारा तो मराठा या व्यापक अर्थाने हा मराठा सेवा संघ आहे, असंच तेव्हा अनेकांना वाटत होतं़ तशीही मराठा समाजाची ओळख ही नेतृत्व करणारा समाज, त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज अशी असल्याने ते अगदी सहजपणे झालं असावं, असं वाटतं़ त्यातच सेवा संघाने जी प्रतीक स्वीकारली, ज्या महापुरुषांना आदर्श म्हणून स्वीकारलं ते छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई, संत तुकाराम, गाडगेबाबा हे महापुरुष महाराष्ट्रातील ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येचे श्रद्धास्थाऩ त्यामुळे मराठा सेवा संघ ही संघटना अगदी नकळतपणे बहुजन समाज, अठरापगड जातीतील समाजाला आपली संघटना वाटायला लागली़
मराठा सेवा संघाचं मला व्यक्तिश: सर्वात मोठं वैशिष्टयं कुठलं वाटत असेल, तर या संघटनेने फुले-आंबेडकर ही बहुजन, दलित समाजाची दैवतं अगदी मनापासून स्वीकारली़ त्यात कुठलीही लबाडी नव्हती़ मराठा समाज हा एकीकडे व्यवहारात उदार असला तरी दलित समाजाबद्दल आणि आंबेडकरांबद्दलही या समाजाच्या मनात जे पूर्वग्रह आहेत, ते लपून नाहीत़ मराठा समाजाची दलितांकडे पाहण्याची दृष्टी ही आश्रित अशीच राहिली आहे़ त्यांनी लाईनदोरीत आपल्या मर्यादेत राहावं, असं या समाजातील बहुतांश लोक मानत आले आहेत़ नामांतर आंदोलनाच्यानिमित्ताने मराठा समाजाची मानसिकता महाराष्ट्राने अनुभवली होती़ या अशा पार्श्वभूमीवर सेवा संघाने आपल्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात आंबेडकर ज्या पद्धतीने घुसविले ते अगदी कौतुकास्पदच आहे़ हे वरवरंच नाही़ फुले-आंबेडकरांचं मोठेपण, त्यांनी बहुजनांच्या उत्थानाकरिता केलेली विचारांची मांडणी, केलेला संघर्ष हा वारंवार मांडून सेवा संघाने कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले़ त्यामुळेच त्यांनी ते मनापासून स्वीकारलेही़ म्हणायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही फुले-आंबेडकर, गांधींना प्रात:स्मरणीय मानतो़ सामाजिक समरसतेच्या नावाने त्यांचे गोडवे गातो़ प्रत्यक्षात व्यवहार मात्र उलट आहे़ एखादा-दुसरा अपवाद वगळला तर कुठल्याही संघीयांच्या घरातील भिंतींवर वा त्यांच्या पुस्तकांच्या कपाटात फुले, शाहू, आंबेडकर दिसणार नाही़ तिथे हेडगेवार, गोळवलकर, सावरकरच असणाऱ येथे मात्र मराठा सेवा संघ आचारविचाराच्या एकरुपतेत अस्सल ठरतो़ सेवा संघाने सामाजिक समरसता वगैरे भंपक गोष्टी न करता एका कट्टर समाजाची मानसिकता बदलविण्याचं महत्त्वपूर्ण काम सेवा संघाने केलं़ सेवा संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी फुले-आंबेडकर अगदी मनापासून स्वीकारले आहेत़ त्यांच्या घरात यांच्या प्रतिमा आहेत़ त्यांची पुस्तकं ते मोठया संख्येने खरेदी करतात, हे मी अनेकदा अनुभवलं आहे़ हे परिवर्तन सोपं नव्हतं़ परंपरावादी मानसिकता असलेल्या एका समाजाची विचार करण्याची पद्धत मुळापासून बदलविल्याबद्दल पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांच्या सहकाºयांना १०० टक्के मार्क दिले पाहिजेत़
दुसरं एक मोठं परिवर्तन सेवा संघाने घडवून आणलं ते म्हणजे छत्रपती शिवराय हे मुसलमानांचे विरोधक होते, ही समजूत सेवा संघाने मोडित काढली़ महाराजांनी हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदूंसाठी स्वराज्य निर्माण केलं होतं, हा जाणिवपूर्वक निर्माण केलेला भ्रम दूर करतानाच हे कुठल्याही जाती-धर्माचे राजे नव्हते़ ते रयतेचे राजे होते़ मुसलमानांचे तर अजिबात विरोधक नव्हते, हे शेकडो उदाहरणं देऊन सेवा संघाने बहुजन समाजाला पटवून देताना त्यांच्या मनातील मुसलमानांबद्दलची अढीही काढली़ त्याचवेळी मुसलमानांच्या मनात शिवरायांबद्दल असलेले गैरसमजही सेवा संघाने मोठ्या खुबीने काढलेत़ त्याचाच परिणाम म्हणजे पुणे आणि इतरही शहरात शिवजंयतीच्या मिरवणुकीत मुसलमानांचा वाढत असलेला सहभाग आहे़ या दोन्ही गोष्टी अजिबात सोप्या नव्हत्या़ अनेकांनी याविषयात हात टेकले होते़ सेवासंघांचं आॅडिट करताना ही फार मोठी जमेची बाजू आहे़ याशिवाय हजारो वर्षे चुकीच्या रूढी-परंपरा आणि कर्मकांडाचा जबरदस्त पगडा असलेल्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाला सेवा संघानं खडबडून जागं केलं़ त्यांना आपल्या सत्त्वाची जाणीव करून दिली़ सत्यनारायण, नारायण नागबळी, शनिमाहात्म्य या खुळचटपणातून बाजूला काढून त्यांना स्वत:चं डोकं वापरायची अक्कल दिली़ सनातन्यांनी येथील इतिहासाचं जाणीवपूर्वक केलेलं विकृतीकरणही सेवा संघानं सर्वांच्या लक्षात आणून दिलं़ अलीकडच्या काही वर्षांत आणखी एक महत्त्वाचं काम म्हणजे, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, सनातन संस्था अशा जातीयवादी आणि समाजात द्वेषाची पेरणी करणाºया संघटनांविरुद्ध सेवा संघाने ताकदीने शड्डू ठोकला़ सरकार नावाची यंत्रणा आणि इतर पुरोगामी संघटना या संस्थांचा मुकाबला करताना अयशस्वी ठरत असताना सेवा संघाने वैचारिक मार्गाने आणि वेळप्रसंगी मैदानातही या संघटनांना जबरदस्त आव्हान दिलं़ बहुजन समाजाचं ब्राह्मणीकरण करायला निघालेल्या या संघटनेच्या कारवायांना सेवा संघानं चाप लावला़ पुरोगामी विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक जबरदस्त दबाबगट सेवा संघाच्या निमित्ताने महाराष्टात तयार झाला ़
या सर्व जमेच्या बाजू असल्या तरी सेवा संघाच्या वाटचालीबद्दल चिंता वाटावी, असेही काही प्रकार आहेत़ पुरुषोत्तम खेडेकर आणि सेवा संघाच्या विचारवंतांनी स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून सन २००० नंतर ब्राह्मणविरोधाचा सूर प्रखर केला़ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्या पद्धतीने समाजातील सर्व समस्यांना मुसलमान जबाबदार आहेत, अशी मांडणी करतात़ त्याच पद्धतीने थोड्याफार फरकाने सेवा संघाने ब्राह्मणांना जबाबदार पकडायला सुरूवात केली़ बाभळीच्या झाडाला काटेच लागणार या पद्धतीने खेडेकर स्वत: ब्राह्मणविरोधाचं समर्थन करत होते़ कुठलाही नेता संघटनावाढीसाठी , समाजाच्या हितासाठी स्ट्रॅटेजी म्हणून काही गोष्टी ठरवित असतो़ प्रत्यक्षात व्यवहारात तो वेगळं वागतो़ मात्र समर्थक, अनुयायांना हे भान नसतं़ ते आंधळेपणाने नेत्याचा शब्द, त्याचे चांगले-वाईट विचार अंतिम मानतात़ त्यामुळे आचार-विचारातील तारतम्य ते हरवून बसतात़ यातून एक कट्टर विचार करणारा कळप तयार होतो़ मराठा सेवा संघातही हे मोठ्या प्रमाणात झालं आहे़ या कट्टरतेतून एका कालखंडातील कार्यकर्त्या्ंचा एक मोठा समूह स्वतंत्र विचार करण्याची शक्ती गमावून बसला आहे़ त्या समूहातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या मेंदूचे दरवाजे बंद करुन घेतले आहे़ ठराविक आडनावाची माणसं आजूबाजूला दिसली की, त्यांची बॉडीलँग्वेज बदलते़ प्रतिवादासाठी सुद्धा ते ब्राह्मण लेखकांची पुस्तकं वाचत नाही़ त्यांची भाषणं ऐकत नाही़ हे सारं अतिशय धोकादायक असतं़ एका समूहाचा केवळ जाती-धर्मावरुन व्देष करणं याचं कुठल्याही पद्धतीने समर्थन करता येत नाही़ एकीकडे सेवा संघ वैचारिकदृष्ट्या अतिशय व्यापक भूमिका मांडत असताना दुसरीकडे कार्यकर्त्यांचा बोनसाय करण्याचे प्रकार गर्दी जमविण्यासाठी ठीक असले तरी त्यातून एक संपूर्ण पिढी बरबाद होण्याचं पातक घडते , या वस्तुस्थितीचा काही वर्ष तरी सेवा संघाला विसर पडला होता़ मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांचं विसंगत वागणंही संघटनेच्या भविष्याच्यादृष्टीने पोषक नाही, असं म्हणावं लागतं़ ज्या काळात खेडेकर साहेब व सेवा संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि ब्राह्मणांविरुद्ध कमालीचे आक्रमक होते, त्याच कालावधीत त्यांच्या धर्मपत्नी रेखाताई खेडेकर आरएसएस मातृसंस्था असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून निवडणुका लढवित होत्या़ एकीकडे ब्राह्मणांना शिव्याचा रतीब सुरु असताना युती सरकारच्या पहिल्या कार्यकाळात आणि आताही खेडेकर साहेब ब्राह्मण नेत्यांशी मैत्री ठेवतात, त्यांच्याशी जुळवून घेतात, हे चित्र महाराष्ट्राने पाहिलं आहे़ लोकशाही मार्गाने स्थापित झालेल्या व्यवस्थेचा लाभ घ्यायचा असेल, समाजाचं समग्र हित साधायचं असेल तर अशा तडजोडी कराव्या लागतात, यापद्धतीने याचं समर्थन होत असलं, तरी यातून संघटनेची आणि नेत्याची इंटेग्रिटी धोक्यात येते़ कार्यकर्त्यांच्या डोक्यात प्रश्नांचं मोहोळ तयार होतं़ कदाचित अशा तडजोडीतून तत्कालिक लाभ मिळत असेल, मात्र दूरचा विचार करता अशा तडजोडीमुळे संघटनेचं अस्तित्व धोक्यात येत़ं हे त्वरेने लक्षात येत नाही़ मात्र भूमिकेतील बदलाचे परिणाम हमखास होतात़ राजकीय प्रतिनिधीत्व किंवा सत्तेतील सहभाग या गोष्टींचा विचार करायचा होता, तर सेवा संघाला विचारांशी साधर्म्य असलेल्या राजकीय पक्षासोबत जवळीक साधून अधिक मोठं यश मिळवता आलं असतं़ दुटप्पीपणाची टीकाही टळली असती़ पण राजकारण याविषयात सेवा संघाची सारीच गणित चुकत आली आहेत़ कधी शरद पवारांना जाणता राजा म्हणायचं, कधी आरएसएसचा माणूस म्हणायचा़़़ असा सारा गोंधळ आहे़
मराठा सेवा संघाने काही चुका टाळल्या असत्या तर महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात सेवा संघाला अधिक व्यापक आणि ऐतिहासिक भूमिका बजावता आली असती, असे मला प्रामाणिकपणे वाटते़ प्रारंभीच्या वाटचालीत सेवा संघाकडे सर्व जातीसमूहातील माणसं ओढली गेली होती़ पुरुषोत्तम खेडेकरांना वेगवेगळ्या समूहाचं नेतृत्व करण्याची उत्तम संधी मिळाली होती़ त्यातून सामाजिक सलोख्याचं सुंदर वातावरण तयार होण्याची लक्षणं दिसत होती़ फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार प्रमाण मानणारा विभिन्न जातीसमूहाचा एक प्रबळ गट तयार झाला असता़ महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे प्रश्न सोडवितानाच प्रस्थापित यंत्रणेला हादरविण्याची शक्ती त्यातून निर्माण झाली होती़ राज्याच्या राजकारणातील समीकरणांची उलटफेर करण्याची ताकद निर्माण करण्याची संधी होती़ मात्र नंतरच्या काळात मराठा तितुका मेळवावा़़़हा सूर प्रखर झाला़ त्यातून सेवा संघाचा परीघ मर्यादित झाला़ कदाचित हा परीघ मराठा समाजाच्या हितासाठी जाणीवपूर्वक मर्यादित केला असावा़ मात्र त्यातून सेवा संघाची घसरण सुरु झाली़ सेवा संघ दिवसेंदिवस आक्रसताना दिसायला लागला़ अलीकडच्या काही वर्षात मात्र सेवा संघात काही सकारात्मक बदल होताना दिसत आहेत़ कट्टरता कमी करुन व्यापक होण्याचा प्रयत्न दिसतो आहे़ कट्टरता ही शेवटी नुकसानच करते, हे उशीरा का होईना सेवा संघाच्या लक्षात येत आहे़ वैचारिक गोंधळातून सेवा संघ वाट शोधताना दिसतो आहे़ सेवा संघाच्या आघाडीच्या फळीतील पदाधिकारी अधिक व्यापक भूमिका घेताना दिसत आहेत़ ही चांगली लक्षणं आहेत़ देशात आणि महाराष्ट्रातही कालचक्र उलटे फिरविण्याचे प्रयत्न जोरात सुरु झाले असताना, नथुराम गोडसेंचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरु असताना मराठा सेवा संघाने आवश्यक ते बदल करुन अधिक भक्कमपणे आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याची गरज आहे़
अविनाश दुधे
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
(‘ मराठामार्ग’ मासिक -फेब्रुवारी २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख)